‘वास्तुरंग’ मधील सुहास पटवर्धन यांचा लेख वाचला. आमची सोसायटीदेखील ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, पुणे’ ची सभासद आहे. मी स्वत: आमच्या सोसायटीच्या डीम्ड कन्व्हेअन्ससाठी त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या सोसायटीला ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ मिळाले आहे. यात शिवाजीनगर, पुणे येथील साखर संकुलमधील उपनिबंधक ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचे देखील मार्गदर्शन उपयुक्त ठरले. आमच्या सोसायटीतील सर्व सभासदांचे डीम्ड कन्व्हेअन्ससाठी बिनशर्त सहकार्य व हे काम करणाऱ्या सभासदांवर विश्वास हाही तितकाच महत्त्वाचा भाग होता.
या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’च्या संदर्भात मी खालील पद्धती ‘वास्तुरंग’च्या वाचकांसाठी देत आहे.
जमीन व इमारतीचे कन्व्हेअन्स सोसायटीच्या नावावर होण्यासाठी खालील ५ स्टेप्स पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे गोळा करणे. जसे की- सोसायटी नोंदणीपत्र, प्रॉपर्टी कार्ड किंवा ७/१२ उतारा, बििल्डगचे मंजूर झालेले प्लान्स, सभासदांच्या सदनिका बिल्डरकडून विकत घेतलेल्या करारनाम्याच्या प्रती, सदनिका रजिस्ट्रेशन केलेल्याची पावती, Stamp Duty भरल्याची पावती, बिगर शेती परवाना, ULC Order, जमिनीचा Search Report, Layout Plan, City Survey Map, आर्किटेक्टचेोरक चा वापर किंवा शिल्लक, सदनिकांची संख्या, मोकळी जागा या सर्वाच्या संदर्भातील पत्र, डीम्ड कन्व्हेअन्सचा ड्राफ्ट.. इत्यादी.
अर्ज करणे. उपनिबंधकाकडे लेखी तक्रार करणे, केलेल्या अर्जासंबंधी बिल्डरबरोबर होणाऱ्या सुनावण्यांना हजर राहणे व डीम्ड कन्व्हेअन्सचा ऑर्डर सोसायटीच्या नावावर मिळवणे.
डीम्ड कन्व्हेअन्स करारनामा तयार करणे व कलेक्टर ऑफिसला देणे. येथे प्रत्येक सदनिकाधारकाने योग्य ती Stamp Duty भरली आहे की नाही याची पडताळणी करण्यात येते. एका सदनिकेचे एकापेक्षा जास्त विक्रीचे व्यवहार झालेले असल्यास, प्रत्येक व्यवहाराच्या वेळी भरलेल्या Stamp Duty ची पावती दाखवणे आवश्यक आहे. एखाद्या सदनिकाधारकाने कमी Stamp Duty भरलेली असल्यास त्याने उरलेली Stamp Duty भरणे आवश्यक आहे. शेवटी कलेक्टर ऑफिसकडून प्रमाणित कन्व्हेअन्स करारनाम्याची प्रत मिळविणे.
प्रमाणित कन्व्हेअन्स करारनाम्याची प्रत उपनिबंधकाकडे रजिस्ट्रेशनसाठी देणे. भारतीय रजिस्ट्रेशन कायदा १९०८ प्रमाणे योग्य ती रजिस्ट्रेशन फी भरणे व उपनिबंधकाकडून मूळ कन्व्हेअन्स करारनाम्याची प्रत व प्रमाणित Index II ची प्रत मिळवणे.
सिटी सव्र्हे किंवा तलाठी ऑफिसांत जाणे. येथे सोसायटीचे नाव प्रॉपर्टी कार्डावर किंवा ७/१२ च्या उताऱ्यावर लावले जाते. नवीन प्रॉपर्टी कार्ड किंवा ७/१२ चा उतारा सोसायटी रेकॉर्डला जपून ठेवणे.
– अविनाश देशपांडे, पुणे
डोळ्यांत अंजन घालणारा लेख
‘वास्तुरंग’ (२९ डिसेंबर) रजनी देवधर यांचा ‘पेंढार वास्तुतज्ज्ञां’चे हा लेख वाचला. हा लेख मला खूपच आवडला. काही लोक वास्तुतज्ज्ञ असल्याचा आव आणून साध्याभोळ्या लोकांना फसवतात. आजच्या महागाईच्या काळात या अशा लेखांची, प्रबोधनाची समाजाला गरज आहे. मी दक्षिणमुखी घरात राहते. एका तथाकथित वास्तुतज्ज्ञ एकदा माझ्या घरी आला होता. त्याने मला साधे-सोपे उपाय सुचविले. मी त्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि त्यांना नम्र शब्दांत सांगितले की खोटय़ा शास्त्रावर विश्वास नाही आणि या घरात आल्यापासून माझी प्रगतीच झाली आहे, हे पटवून दिले. त्यानंतर मात्र त्यांनी उलटच पवित्रा घेतला की माझ्या पत्रिकेप्रमाणे मला दक्षिण दिशा शुभ आहे. तरीही मी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी मला घाबरविण्यासाठी काही भयानक गोष्टी सांगून घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कांगाव्यालाही मी बधले नाही. मी खंबीर नसते तर काही छोटय़ा अडचणींसाठी बिचाऱ्या दक्षिण दिशेला असलेल्या माझ्या छोटय़ा दाराला दोष दिला असता. काही वास्तुतज्ज्ञ स्वत:च्या लाभासाठी लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत असतात. लेखिकेचा लेख डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
– सुचिता गुजराथी
मन विषण्ण झाले
‘वास्तुरंग’ (२९ डिसेंबर)मधील रजनी देवधर यांचा ‘पेंढार वास्तुतज्ज्ञांचे’ हा लेख वाचला. मी वास्तुशास्त्राची विद्यार्थिनी आहे. एका उच्चविद्याविभूषित (वास्तुशास्त्रात डॉक्टरेट मिळविलेल्या) तज्ज्ञ व्यक्तीकडून मी वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. लेखिकेने या लेखात उल्लेख केलेल्या तथाकथित वास्तुतज्ज्ञांकडे मी शिकलेले नाही. मला वास्तुशास्त्राची गोडी लागली ती आमच्या या शिक्षकांमुळे. लेखिकेने वास्तुतज्ज्ञांवर सोडलेले टीकास्त्र वाचून मन विषण्ण झाले.
अरुंधती वैद्य, दादर.