स्त्रियांनी स्वत:चे घर खरेदी करण्याचा सध्याचा ट्रेंड खूपच चांगला आहे. पूर्वी माहेरचे स्त्री-धन म्हणून हुंडादानासकट स्त्रीचे कन्यादान करून तिच्या जबाबदारीतून मोकळे होत हात वरती करायचे. पण सासरी त्या हुंडय़ाचा तिला काही उपयोग असायचा का? स्त्री-धनावर तिचा एकटीचा हक्क तरी असायचा का? आताही परिस्थिती सर्वत्र बदललेली नाही. शहरातील फक्त कमावत्या स्त्रिया ‘एकटीची मालमत्ता’ म्हणून गृहखरेदी करून त्यात पैसे गुंतवू शकतात. पण शहरातही अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या विविध कारणांसाठी कमवत नाहीत किंवा ज्यांच्या कमाईत घर घेणे परवडणे शक्य नसते. त्यांनी त्यांच्या हक्काचे काय करायचे? परंपरेच्या नावाने सोडून द्यायचा हक्क? तसेच ग्रामीण भागातही अनेक महिला आज कमावतात, पण तिथे गृहबांधणी होत नसल्याने त्यांनी कशात पैसे गुंतवायचे की ज्याचा त्यांची ‘एकटीची मालमत्ता’ म्हणून त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना हवा तेव्हा वापर करता येऊ शकेल.
– अनामिका, ईमेलवरून

प्रेरणादायी सदर
‘वास्तुरंग’ पुरवणीत सोसायटीसंदर्भातील माहिती, घराचे इंटिरीअर, घरबांधणी, आठवणीतले घर अशी अनेक सदरे छानच असतात. यात मी एक कमर्शिअल आर्टिस्ट असल्याने साधना बहुळकर यांचे ‘स्टुडिओ’ हे सदर खूप आवडते.
या सदराचे वैशिष्टय़ म्हणजे यात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना ज्या जागेत केली व तेथे अनेक कलाविष्कार घडविले ती जागा म्हणजे त्या कलाकाराचा स्टुडिओ.
जो त्या त्या काळानुसार ज्याने त्याने आपापल्या आवश्यकतेनुसार कसा सुसज्ज व सुखसोयींनी समृद्ध केला होता, त्यातील प्रकाशाची रचना, बसण्याची जागा, वस्तूंची मांडणी, विषयाचा अभ्यास करण्याची पद्धत, नवीन तंत्रांचा वापर अशा अनेक गोष्टी या सदराद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणूनच माझ्यासारख्या विद्यार्थ्यांला त्याचे महत्त्व आहे.
या सदरामुळे आमच्यासारख्या व नवीन कलाकारांना आपापला स्टुडिओ कशा प्रकारे सुसज्ज ठेवून आपली कलानिर्मिती उत्तमरीत्या अव्याहत चालू ठेवण्याची प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
– आशुतोष सरपोतदार, मालाड (प.)

Story img Loader