‘वास्तुरंग’मध्ये (९ मार्च) प्रशांत मोरे आणि अलकनंदा पाध्ये यांचे लेख वाचून मला चाळीत घालवलेल्या दिवसांची आठवण झाली. त्या आठवणींविषयी..
घर म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहणारे ते स्वतंत्र घराचे चित्र. माझ्या मनात आले, घर म्हटले म्हणजे ते असेच असले पाहिजे का? मग आम्ही आणि आमच्यासारखे हजारो लोक राहत होते ती चाळीतील जागा म्हणजे घर नव्हते? हो! ते नुसते घर नव्हते, तर घरापेक्षाही ते खूप जास्त काही होते. मग आठवल्या त्या सुंदर कवितेच्या ओळी.
‘‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती.’’
माझ्या चाळीमधल्या घराने या अटी नुसत्या पूर्णच नव्हे तर अक्षरश: जिवंत केल्या होत्या. काय नव्हते त्या घरात? संपूर्ण चाळ नसेल, पण प्रत्येक मजला म्हणजे पन्नासेक माणसांचे कुटुंब होते. तिथले प्रेम आणि जिव्हाळा हा फक्त स्वत:च्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर तो सर्वच चाळकऱ्यांना एकमेकांबद्दल वाटत होता. गिरगावातल्या दोन दोन खोल्यांमध्ये सारीच्या सारी सुखी कुटुंबे राहत होती. दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी पाच-सात माणसांच्या कुटुंबात आणखी एखाददुसरा गावाकडचा नातेवाईक शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून सामावला जायचा. तुटपुंज्या मिळकतीत सुखाने संसार करणारे सख्खे शेजारी तिथे राहत होते.
भांडणे, हेवेदावे नव्हते असे म्हटले तर मग ती माणसांची वस्तीच नव्हती असे म्हणावे लागेल. पण ती सारी चहाच्या कपातील वादळे असायची. जशी व्हायची तशी विरूनही जायची. एखाद्याच घरात असणाऱ्या िभतीवरच्या घडय़ाळावर माणसे आपली कामे करायची. एखाद्याच घरातल्या रेडिओवरच्या बातम्या ऐकायची आणि एखाद्याच घरातल्या टी.व्ही.वरचे छायागीत त्या घरात गर्दी करून पाहायची. हो! नळाचे पाणी दुसरीने जास्त घेतले म्हणून बायका हमरीतुमरीवर येत होत्या. पण पहाटेच्या नळनाटय़ानंतर शाळेत जाणाऱ्या त्या शेजारणीच्या मुलाला त्याच्या आईबरोबरच्या भांडणाची जाणीवसुद्धा न देता मायेने जवळ घेऊन त्याचे रडे थांबवायलाही त्या तितक्याच हिरिरीने धावत होत्या आणि त्या लहानग्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा असलेल्या आपल्या मुलाला त्या लहानग्याला आपल्याबरोबर सांभाळून न्यायला सांगत होत्या. कुठल्याही अडचणीच्या साध्या किंवा गंभीर प्रसंगी घरातल्या माणसांच्याही आधी किती तरी वेळा, शेजारी प्रथम धावत होते. शेजारणीच्या घरात भाजी तयार नसली तर कॉलेजला किंवा कचेरीत जाण्याची घाई असणाऱ्या तिच्या मुलाला किंवा नवऱ्याला चपातीबरोबर खायला भाजी देत होत्या आणि शेजारीण सुद्धा तिच्या घरात भाजी तयार होताच घरातल्याच्या पानात वाढण्यापूर्वी शेजारणीकडे पोहोचवत होत्या. नंतरच्या पिढीत आलेल्या नोकरी करणाऱ्या बायकांना मुलांना ठेवायला पाळणाघराची जरुरी वाटत नव्हती. घरीच असणाऱ्या एखाद्या यशोदेच्या गोकुळात नोकरी करणाऱ्या बाईचा कान्हा सुखाने वाढायचा. प्रत्येकाच्या घरातले वर्तमानपत्र म्हणजे मजल्यावरच्या सर्वाची सार्वजनिक मालमत्ता होती आणि ती सारी वर्तमानपत्रे संध्याकाळपर्यंत सर्वच घरात संचार करीत असायची.
चाळीत अठरापगड जातीचे लोक राहत असायचे. प्रत्येक जण आपलीच जात उच्च असल्याच्या भ्रमात असला तरी उगाचच जातीच्या उठाठेवी करत बसत नव्हता. हा वाद कधी कधी चाळीतल्याच दोन भिन्न जातीतल्या मुला-मुलींची लग्ने जमायची तेव्हा उफाळून यायचा. पुन्हा एकमेकांचे तोंडसुद्धा न बघण्याच्या प्रतिज्ञा व्हायच्या. पण मनाविरुद्ध विवाह केलेल्या मुलीच्या काळजीने तिची सारी बातमी आया शेजारणीकडून घ्यायच्या. घरातले गोडधोड मुलीच्या घरी शेजारणीच्याच मदतीने पोहोचवायच्या आणि नातवंडाची नुसती चाहूल लागली कीसारे काही विसरून लेकीच्या सेवेला हजर व्हायच्या. चाळीचा व्हरांडा म्हणजे सर्वासाठी अंगण असायचे आणि मुलांच्या आरडाओरडय़ाचा कुणालाच त्रास होत नव्हता. मुलांच्या धावाधावीबरोबरच या अंगणाच्या एका बाजूला मोठय़ांचे पत्त्याचे डाव आणि कॅरम आणि बुद्धिबळाचे सामने रंगत होते. घरातून बाहेर जाताना मागे राहिलेल्या मुलांच्या काळजीने जीव वरखाली होत नव्हता. कारण शेजारचे काका-काकू, आप्पा आणि आजोबा, आजी स्वत:च्या मुला- नातवंडाइतकेच त्यांच्यावरही लक्ष ठेवतील, याची खात्री असायची.
एखाद्या घरातली मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम एका घरातल्या खुच्र्या आणि दुसऱ्या एखाद्याच्या घरातील कपबश्या यांच्या मदतीने व्हायचा. मुलगी पसंत पडल्याचा आनंद सगळ्याच घरात वाटला जायचा आणि घरचेच कार्य असल्याप्रमाणे सारा मजला लग्नाच्या तयारीला लागायचा, आणि त्या दोनखणी जागेत साखरपुडे आणि बारशी झोकात साजरी व्हायची. दिवाळीच्या फराळात कोणत्या गृहिणीचा कोणता पदार्थ करण्यात हातखंडा आहे हे साऱ्या मजल्याला माहिती असायचे आणि त्याची चव हक्काने घेतली जायची. आणि हो! कोणत्या घरात कोणाला काय आवडते याची आठवण ठेवून तो पदार्थ बनविल्यावर वाटीभर का होईना, तो त्याच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आज्याही तिथे होत्या.
चाळीच्या मजल्यावरचा एखाद्या घरचा गणपती म्हणजे सार्वजनिकच असायचा. त्याची आरास ही मजल्यावरच्या सर्वच घरातल्या वस्तू आणि मनुष्यबळ यांनीच साकार व्हायची. तास तासभर चालणाऱ्या आरत्या ध्वनिप्रदूषणाच्या ऐवजी सर्वानाच आनंद द्यायच्या आणि विसर्जनाच्या वेळी अख्खा मजला चौपाटीवर जायचा आणि घरी आल्यावर गणपतीच्या अनुपस्थितीने उदास व्हायचा . चाळ संस्कृती लोप पावत चालली आहे. चाळींची जागा सदनिकांच्या गगनचुंबी इमारती घेत आहेत. चाळीतल्या आता वाटणाऱ्या गरसोयी तिथे पूर्वी राहिलेल्या चाळकऱ्यांनासुद्धा आता मान्य होणार नसल्या तरी आत्ताच्या सदनिका संस्कृतीमध्ये रुळल्यावरही चाळीतले ते प्रेम, जिव्हाळा आणि एकोपा कायमचा गमावल्याचे दु:ख मात्र मन उदास करते .
सुभाष मयेकर
५० माणसांचे घर
‘वास्तुरंग’मध्ये (९ मार्च) प्रशांत मोरे आणि अलकनंदा पाध्ये यांचे लेख वाचून मला चाळीत घालवलेल्या दिवसांची आठवण झाली. त्या आठवणींविषयी.. घर म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहणारे ते स्वतंत्र घराचे चित्र. माझ्या मनात आले, घर म्हटले म्हणजे ते असेच असले पाहिजे का?
आणखी वाचा
First published on: 06-04-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life in chawls of bombay