दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. या निमित्तानेच आज मी आपल्या घरातल्या, अवतीभवतीच्या एक मोठय़ाच दुर्लक्षित प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न आहे प्रकाश प्रदूषणाचा.
काही वर्षांपूर्वी, म्हणजे मी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचा प्रवक्ता म्हणून कार्यरत असताना, एक लहानगा मुलगा त्याच्या आईसोबत मला भेटायला आला. त्या मुलाला शाळेतल्या प्रकल्पाकरता माहिती हवी होती. अशी अनेक मुलं माझ्याकडे सोसायटीच्या अभ्यासिकेच्या, वाचनालयाच्या माहिती-परवानगीकरिता यायची. त्यातलीच ही एक भेट- असं माझ्या मनात असतानाच त्या चिमुरडय़ाने त्याच्या प्रकल्पाचा विषय सांगितला आणि मी चक्रावलोच- प्रकाश प्रदूषण!
हे गौडबंगाल याच्या डोक्यात कसं शिरलं, असा विचार माझ्या मनात आला, तोच तो मुलगा पुढे मला सविस्तर माहिती सांगू लागला. ‘सर, अहो प्रदूषण म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट निसर्गात अनावश्यकपणे अधिक प्रमाणात असणं. खरं ना?’ मी पटकन त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘मग सर, सूर्यास्तानंतर आपण दिवे लावतो, रोषणाई करतो, झगमगाट करतो तेदेखील प्रदूषणच झालं, खरं ना?’ या प्रश्नाने माझी विकेटच काढली होती. या मुलाला मी पुढे वन्यप्राणिजीवनावर प्रकाश प्रदूषणाचा काय विपरीत परिणाम होतो वगरे गोष्टींविषयीचे संदर्भ सांगितले खरे, मात्र हा विषय माझ्या डोक्यात घर करून राहिला.
आणि माझं आकाश हरवलं!
माझं लहानपण मुंबईच्या बोरिवली या उपनगरात गेलं. दररोज रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी मी आईबाबांसोबत आमच्या मागठाणे या परिसराला लागूनच असणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावर फिरायला जात असू.  त्या वेळी आकाशनिरीक्षण करणे हा माझा आवडता छंद होता. त्या वेळी ना रस्त्यावर आजच्या इतकी वर्दळ होती, ना आमच्या विभागात फार वस्ती होती. पुढे मागठाणे येथे आमच्या वसाहतीतच जवळजवळ, ‘बेस्ट’चा बसआगार बांधला गेला. तब्बल हजारेक बस मावतील इतका मोठा हा आगार रात्री मोठाल्या दिव्यांच्या झोतात प्रकाशमान असायचा आणि उंच मनोऱ्यावर असणाऱ्या, प्रखर दिव्याच्या झोतांमुळे खालचा आगारच नाही तर आमच्या परिसरातला सारा आसमंतच पिवळ्या-भगव्या प्रकाशाने भरून जायचा. पुढे या भागात वस्ती वाढली. रहिवासी इमारतींसोबतच टोलेजंग कार्यालयीन इमारती आल्या. गेल्या काही वर्षांत उड्डाणपूल उभे राहिले, मॉल्स आले, दिवसरात्र उत्पादनांची जाहिरात करणारे होìडग्स आले. सगळा भाग रात्रीदेखील दिव्यांनी, प्रकाशाने न्हाऊन निघू लागला. टिपूर चांदणं सोडाच, ध्रुव तारा दिसेनासा झाला. व्याधाचा तारा, शुक्राची तेजस्वी चांदणी, मंगळाचा लालसर ठिपकाही हळूहळू शोधावे लागावे इतके फिकट दिसायला लागले.
यादरम्यान कुठल्याशा ट्रेकला गेलो होतो. रात्रीच्या जेवणानंतर गप्पांची मफल जमली आणि त्यानंतर आकाश निरखण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्या वेळी जाणवलं की असंच चांदण्यांनी भरलेलं आकाश खास मुंबईतूनही आपण पाहिलेलं आहे. आमच्या वसाहतीतून दिसणारं नीरव, टिपूर चांदण्याने भरलेलं रात्रीचं आकाश आम्ही उधळत असलेल्या प्रकाशात केव्हा दिसेनासं झालं हे कळलंच नाही. आमच्या आयुष्यातून अगदी अलगदपणे हरवलेल्या या सौंदर्याने मी अस्वस्थ झालो. त्या चिमुकल्याच्या प्रश्नाने हे सगळे विचार पुन्हा एकत्र जुळून आले.
लाइट ट्रॅप
माझ्या गुरू, भारतातील अग्रणी कीटकअभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या निसर्ग शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. व्ही. शुभलक्ष्मी यांच्यासोबत एका प्रयोगात भाग घेताना मी एक धम्माल अनुभव घेतला. कीटकांचा, विशेषत: निशाचर पतंगांचा अभ्यास करताना एका पांढऱ्या पडद्यावर सायंकाळी दिवा सोडून ठेवतात, याला ‘लाइट ट्रॅप’ असं म्हणतात. प्रकाशित पडद्यावर निशाचर कीटक आकर्षति होतात आणि संशोधकांना या कीटकांना निरखणं शक्य होतं. संशोधनासाठी वापरली जाणारी ही युक्ती अर्थातच मर्यादित स्वरूपात वापरली जाते, दिवस मावळल्यानंतर दोन-एक तास वापरल्यानंतर हा प्रयोग बंद केला जातो; जेणेकरून निशाचर कीटकांवर कमीतकमी परिणाम व्हावा. या प्रयोगादरम्यान अनेक दुर्मीळ कीटक, विशेषत: पतंगांचं निरीक्षण करण्याची संधी मला अनेकवार मिळाली आहे.
या प्रयोगादरम्यान पाहिलेला एक पतंग एकदा मला आमच्या वसाहतीत एका घराच्या काचेच्या खिडकीवर बसलेला दिसला. घरात लावलेल्या टय़ुबलाइटमुळे दुधी रंगाच्या काचेच्या खिडकीने एक लाइट ट्रॅप तयार केला होता आणि त्याला आकर्षून एक दुर्मीळ, देखणा पतंग तिकडे आला होता. आपल्या आजूबाजूला अनेक दिवे पतंगांना आपल्याकडे आकर्षून घेताना दिसतात. रस्त्यांवरचे दिवे, जाहिरात फलकांवरचे प्रकाशझोत टाकणारे दिवे, गाडय़ांचे दिवे अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील. प्रकाश प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या सवयींमध्ये फरक होताना मी पाहिलेला आहे. घराजवळच्या वडावरची, सूर्यास्तानंतर थोडय़ा वेळात शांत होणारी पक्ष्यांची किलबिल गणेशोत्सवाच्या रोषणाईमुळे रात्रीदेखील चालू राहायची. त्यातले काही पक्षी रात्री झाडावर अस्वस्थ उडायचे. कृत्रिम प्रकाशामुळे वटवाघळांना त्रास होतो, सस्तन प्राण्यांच्या रात्रीच्या झोपेवर आणि साहजिकच एकूण दिनक्रमावर विपरीत परिणाम होतो. निशाचर प्राण्यांच्या अंधारात पाहण्याच्या क्षमतेवरही प्रकाश प्रदूषणाचा विघातक परिणाम होतो.
‘कधी शांतपणे विचार केलास तर लक्षात येईल की पक्षी, कीटक आणि प्राणीच नाहीत, तर या प्रकाशाच्या िपजऱ्यात आपण अधिक अडकलो आहोत. अरे निसर्गानेच अशी रचना केली आहे- बारा तास प्रकाश, बारा तास अंधार. आपण मात्र कृत्रिम प्रकाशस्रोतांचा शोध लावून अंधाराचे तास कमी करायचा प्रयत्न चालवला आहे. तुला सांगतो, अरे आपण अंधारातली मजाच घालवून बसलो आहोत. आपल्याला अंधाराची भीती वाटते ही एक चिंतेची गोष्ट आहे.’ माझे एक स्नेही आणि प्रख्यात नेत्रविशारद डॉ. विपिन तन्ना एकदा मला म्हणाले, ‘अरे या प्रकाशाच्या माऱ्याने आपण आपली शांत झोप गमावली आहे, त्यामुळे मानसिक ताण वाढतो आहे. डोळ्यांवर ताण देतो आपण आणि त्यामुळे आपली अंधारात दिसण्याची शक्तीच कमी होते, रंगांची ओळख कमजोर होते. याशिवाय अतोनात ऊर्जा वापर, सभोवतालाचा सौंदर्यऱ्हास आणि आपल्यासोबतच्या निसर्गातील घटकांवर अन्याय असे या प्रकाश प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम आहेत.’
अखेर डोक्यात प्रकाश पडला
एकेक कडी जुळत गेली. प्रकाश प्रदूषण रोखण्याकरिता काही केले पाहिजे ही जाणीव होत गेली. काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. मग पहिला हल्लाबोल केला तो स्वत:च्याच सवयींवर. महाविद्यालयात असताना रात्री जागून अभ्यास करणं अपरिहार्य ठरू लागलं तेव्हा घरात एक टेबल-लॅम्प आणला. संपूर्ण घरात प्रकाश करण्यापेक्षा जरुरीपुरता प्रकाश ठेवण्याची सवय लावून घेतली. घराला लाकडी खिडक्या होत्या, त्यामुळे प्रश्न नव्हता, मात्र दुसऱ्या घरातल्या काचेच्या खिडक्यांना आतून गडद रंगाचे जाड पडदे लावले, जेणेकरून घरातला उजेड बाहेर पडणार नाही. घरातले दिवेदेखील जरुरीपुरतेच लावायला सुरुवात केली. ज्या खोलीत दिव्यांची गरज नाही तिथे दिवे लावायचे नाहीत. शिवाय कमीतकमी प्रकाश देणारे, कमी वीज वापरणारे दोन-तीन दिवे खोलीत लावायची व्यवस्था केली. खोलीत वावरण्याकरिता, जेवण्याकरिता, टी.व्ही पाहण्याकरिता एक-दोन दिव्यांचा प्रकाश पुरेसा ठरू लागला, घरातली प्रकाशाची तीव्रता कमी झाली. साहजिकच घरातून बाहेर निसटणाऱ्या प्रकाशात लक्षणीय घट झाली.
त्यानंतर पायरी होती दिवाळीतल्या बदलांची. ते बदल मात्र पचायला, रुचायला थोडा वेळ गेला. नेहमी दिवाळीत आग्रहाने स्वत:च्या हाताने आकाशकंदील बनवणाऱ्या माझ्यासारख्या मुलाने यंदापासून आकाशकंदिलात दिवाच लावायचा नाही हे फर्मान काढलं. आमच्या आकाशकंदिलातल्या प्रखर दिव्याची जागा तेव्हापासून एका मिणमिणत्या छोटय़ा दिव्याने घेतली आहे. आकाशकंदील आता रात्रभर न पेटता ठेवता सूर्यास्तानंतर दोन तासच पेटता ठेवला जातो.
सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे दिवाळी दरम्यान लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या संध्याकाळी आमच्या घरी सगळीकडे पणत्यांच्या उजेडात आम्ही सगळे वावरतो. घरातले विजेचे दिवे पूर्ण बंद असतात. पहिली काही वर्षे आईबाबांना अवघड गेलं. शेजारीपाजारी घरी आले म्हणजे आवर्जून दिवाळीच्या दिवसात असं अंधार करून का बसलात म्हणून विचारतही, मात्र मी आवर्जून सांगत असे की ‘आम्ही अंधारात नाही, दिव्यांच्या प्रकाशात सण साजरा करतो आहोत.’ गेली काही र्वष अशी दिवाळी साजरी करणं ही आमच्या घरची खासियत झाली आहे. तुमच्या घरी कसं छान, प्रसन्न वाटतं हो या दिव्यांच्या प्रकाशात अशी शाबासकी आता आम्हाला मिळते. घरात फटाके कधी नव्हतेच, गेली काही र्वष शोभेची दारूदेखील बंद झाली आहे. आकाशकंदीलही बिनदिव्याचा झाला आहे. दिवाळीत आम्ही खऱ्या अर्थाने प्रकाशाचा उत्सव साजरा करायला शिकलो आहोत.
दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशाचा विचार एका नव्या संदर्भात करायला आपण शिकायला हवं. आपल्या वास्तूमध्ये अंधार नसावा हे जितकं खरं तितकंच आपल्या वास्तूमुळे प्रकाशाचा अतिरेक होणार नाही, हेदेखील आपण पाहायला हवं. या दिव्याच्या, प्रकाशाच्या सणानिमित्ताने इतकं जरी आपल्या मनावर ठसलं तरी हा तेजाचा उत्सव आपल्याला खऱ्या अर्थाने कळला असं म्हणायला वाव राहील.
ई-कचऱ्यासाठी
‘वास्तुरंग’ (२८ सप्टेंबर)मध्ये श्रीपाद यांचा ‘घरातल्या ई-कचऱ्याचा भस्मासुर’ हा लेख प्रसिद्ध झाला. वाचकांची ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कंपन्यांसाठी विचारणा होत आहे.
अटेरो संकेतस्थळ http://www.attero.in किंवा मोबाइल संचांसाठी खास संकेतस्थळ म्हणजे http://www.atterobay.com. . अधिक माहिती आणि संपर्कासाठी लिहा- राहुल भारद्वाज rahul.bhardwaj@attero.in  किंवा
१८००-४१९-३२८३ किंवा ०१२०-४०८७१०० (विस्तार क्रमांक १७०) या क्रमांकावर संपर्क साधा.
वाचकांनी याची जरूर नोंद घ्यावी की घरगुती ग्राहकांकडून अटेरो कंपनी २० किलोपेक्षा जास्त वजनाचा ई-कचरा देशातून कुठूनही घरून घेऊन जाते. त्यापेक्षा कमी वजनाच्या फक्त संपूर्ण उपकरणांसाठीच ही सोय उपलब्ध आहे- उदाहरणार्थ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक वगरे. इतर छोटय़ा वस्तूंकरता, उदाहरणार्थ बॅटरीज्, मोबाइल फोन, लहान मुलांची खेळणी घरी घेऊन जात नाहीत. अशा वेळी  चारपाच शेजारी, मित्र, आप्त यांनी एकत्रितपणे ई-कचरा जमा करून कुणा एकाच्या घरी २० किलोपेक्षा अधिक कचऱ्याकरता अटेरोला सांगावं किंवा त्यांच्या शहरांमध्ये असलेल्या कार्यालयात हा कचरा नेऊन देता येईल.
vasturang@expessindia.com

Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
Why do kitchen sponges come in different colors and what do they indicate
स्वयंपाकघरात भांड्यांपासून ओट्यापर्यंत सर्व सफाईकरिता एकच स्पंज वापरता? कोणत्या सफाईसाठी कोणता स्पंज वापरावा?
which oil is Best for Cleaning wood furniture
लाकडी दरवाजे स्वच्छ करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करायला हवा? वर्षानुवर्षे चमकत राहतील
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम
Pimpri, Rally cyclists, Indrayani river,
पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी ३५ हजार सायकलपटूंची रॅली
Housing sector in crisis due to environmental regulations CREDAI pune news
पर्यावरण नियमांमुळे गृहनिर्माण क्षेत्राची कोंडी! नियामक संस्थाकडून वाढलेल्या कारवाईवर ‘क्रेडाई’चे बोट
Story img Loader