दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव! दीप, पणत्या, आकाशकंदील असा सगळा प्रकाशमयी सरंजाम दिवाळीच्या स्वागतासाठी आता सज्ज झाला आहे. पण या दिवाळीत पारंपरिक रोषणाईबरोबरच इलेक्ट्रिक लॅम्पच्या साहाय्याने घर छान प्रकाशमय केलं तर!
दिवाळीच्या स्वागतासाठी सगळ्यांची घरं आता छान सज्ज झाली असतील. घराची झाडलोट करून घरांना नवी झळाळी मिळाली असेल. दिवाळीत दिव्यांची आरास केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण या पारंपरिक दिव्यांच्या रोषणाईबरोबरच घरात आधुनिक, इलेक्ट्रिकल लॅम्पची रोषणाई केली तर.. मग तर तुमचं घर नक्कीच या दिवाळीत मस्त झळाळून उठेल.
गृहसजावटीत लॅम्प ही वस्तू अतिशय महत्त्वपूर्ण असते. घराची सजावट करताना एखादा कोपरा किंवा विशिष्ट जागा अर्थपूर्णरीत्या उठावदार करायची असेल तर लॅम्पची रचना हमखास केली जाते. यामुळे संपूर्ण खोलीला एक वेगळाच उबदार स्पर्श प्राप्त होतो. याआधी तुम्ही घरातील कोणत्याही खोलीत लॅम्पची मांडणी केली नसेल तर या दिवाळीत ती करून बघा, तुमचं घर नक्कीच उठावदार दिसेल. शिवाय हे काम अगदी एका दिवसात होण्यासारखं आहे. आपल्या आवडीचा लॅम्प इलेक्ट्रिशियनकडून लावायला तुमचा फार वेळ जाणार नाही. फक्त घरात कोणत्या जागेत लॅम्प लावायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा लॅम्प चांगला दिसेल याचा विचार करून लॅम्पची निवड करा.
पूर्वी लॅम्प किंवा इलेक्ट्रिक दिव्यांचे प्रकार म्हटले की, झुंबर हाच एकमेव प्रकार अस्तित्वात होता. पण आज मात्र लॅम्पमध्ये भरपूर वैविध्य दिसून येतंय. वॉल लॅम्प, पिक्चर लॅम्प, हंिगग लॅम्प, टेबल लॅम्प, फ्लोअर लॅम्प असे भरपूर प्रकार आहेत. अगदी झुंबर या प्रकारातही निवडीसाठी अनेक पर्याय आहेत. पूर्वीची झुंबरं ही आकाराने चांगली प्रशस्त होती. कारण मोठी घरं, बंगले, वाडे यामध्ये झुंबरं उठून दिसायची. आजही मोठय़ा आकारातल्या झुंबरांबरोबरच छोटय़ा आकारातली झुंबरंसुद्धा पाहायला मिळतात. दिवाणखान्याचं आकारमान लहान असेल तर सििलगला मध्यभागी असं एखादं झुंबर मस्त दिसेल. संध्याकाळी, रात्री याचा प्रकाश खूप सुंदर भासतो. पण झुंबरासाठी सििलगला तशी रचना नसेल तर लॅम्पसाठी दिवाणखान्यातील एखादा कोपरा निवडावा. बठकीच्या ठिकाणी साईड टेबलच्या वर हँिगग लॅम्प लावावेत. या ठिकाणी क्रेप पेपर, हॅण्डमेड पेपरपासून बनवलेले लॅम्प अधिक छान दिसतात. एक मोठा किंवा लहान आकारातील दोन किंवा तीन लॅम्प खाली वर बांधून ती जागा सजवावी. दिवाणखान्यातच फ्लोअर लॅम्पही ठेवता येईल. बठकीच्या रचनेच्या बाजूला असा एखादा लॅम्प ठेऊन छान लुक मिळेल. वॉल लॅम्पमध्येही अनेक डिझाइन्स आहेत. दिवाणखाना, बेडरूम कुठेही तुम्ही वॉल लॅम्प लावू शकता. यासाठी एखादा कोपराच निवडला पाहिजे असा नियम नाही. खोलीतील एक वॉल एकदम मोकळी आहे तर तिथे वॉल लॅम्प एकदम चपखल बसेल. या लॅम्पच्या अवतीभवती किंवा खाली छोटय़ा दोन पेंटिंग्ज लावल्या तर सुरेख दिसेल.
लॅम्प्समध्ये ग्लास, क्रिस्टल याप्रमाणेच रॉट आर्यन, हॅण्डमेड पेपर, केन या मटेरिअलमधले लॅम्प्सही बाजारात सहज सापडतात. या लॅम्प्सना लावलेले क्रिस्टल्स हे शेिडगमध्येही मिळतात. त्यामुळे अशा एखाद्या लॅम्पची निवडही करता येते. केनपासून बनवलेले लॅम्प्ससुद्धा खूप चांगले दिसतात. फक्त तुमच्या कलात्मक नजरेने आपल्या घरासाठी कोणता लॅम्प चांगला दिसेल हे हेरलं पाहिजे. या दिवाळीत लॅम्पची सजावट करून घराला एक फेस्टिव्ह लुक मिळेल यात शंकाच नाही.