मोठी मोठी घरे रिकामी आणि लहान घरात दाटी! हेच चित्र आपल्याला भारतामध्ये बहुतेक शहरात दिसते. त्याची कारणे विचित्रच दिसतात. पुण्यातील ३ बेडरूम असलेले १५०० चौ. फुटाचे मोठे, हवेशीर, नव्या संकुलातले, हौसेने विकत घेतलेले दुमजली घर भाडय़ाने देऊन मुंबईच्या दोन लहान खोल्यांत राहणारे लोक आढळतात. खेडय़ातील बहुसंख्य लोक मुंबईला किंवा इतर शहरात नोकरी-धंद्यानिमित्त जातात तेव्हा तेही बहुतेक वेळेला लहान जागेशी तडजोड करतात. घराच्या आकारापेक्षा मोक्याची जागा, संधी देणारे शहर जास्त महत्त्वाचे वाटते. म्हणूनच अनेकदा झोपडपट्टीतील लोकही चांगले घर फुकट पण दूर मिळाले तरी ते विकून वा भाडय़ाने देऊन परत रोजगार जवळ असलेल्या जवळच्या वस्तीत परत जातात.
मुंबईमध्ये नवीन स्थलांतरितांना आसरा देण्यासाठी अनेक प्रकारे मदत केली जाते. अनेकदा नवे स्थलांतरित जवळच्या-लांबच्या नातेवाईकांकडे काही काळ राहतात. काही जण आपल्या गाववाल्या लोकांकडे राहतात. काही जुन्या गावकरी मंडळांकडे मुंबईच्या चाळीतील ५-६ खोल्यांची मालकी असते. तेथे आपल्या गावातील स्थलांतरितांना महिना केवळ १०० ते ३०० रुपये भाडे आकारून राहायला जागा दिली जाते. जवळच खानावळीत जेवण मिळते. मुंबईसारख्या शहरात, रोजगार शोधणाऱ्या लोकांना असे हक्काचे छप्पर मिळते. जुन्या चाळींमध्ये तसेच बी.डी.डी. चाळीसारख्या शासनाने बांधलेल्या वस्तीमध्ये हे दिसते. पूर्वी तर लॉजिंग-बोर्डिग अशी सोय असणाऱ्या अनेक इमारती होत्या आणि गावाकडून येणाऱ्या लोकांना त्याचा मोठा आधार असे. आजही अनधिकृत वस्त्यांमध्ये कॉट बेसिसवर जागा देणे आहे अशा पाटय़ा दिसतात आणि म्हणूनच अशा अधिकृत, अनधिकृत किंवा जुन्या चाळी, वस्त्या यामध्ये गर्दी असूनही लोकांना सामावून घेतले जाते.
एका माणसाला किती जागा लागते? असा प्रश्न अनेकदा आपण वेगवेगळ्या संदर्भात विचारतो. पण याचे काही प्रमाण असावे असे वास्तुरचनेत मानले जाते. साधारण १९२०च्या दशकात ब्रिटिश शासनाने मुंबईतील घरांतील लोकसंख्या आणि प्रतिमाणशी जागा याचा हिशेब केला असता त्यांना कामगारांच्या चाळींमध्ये खूप दाटी आढळली. प्रतिमाणशी केवळ २५ चौ. फूट इतकी जागा असल्याचे आढळले. तेव्हा त्यांनी प्रतिमाणशी किमान ४० चौ. फूट जागा असावी असे ठरवून बी.डी.डी. चाळी बांधल्या. १६० चौ. फुटांची एक खोली एका कुटुंबाला आणि सामायिक संडास आणि न्हाणीघर अशी रचना करून २०,००० घरे केवळ २ वर्षांत बांधली. खोल्या लहान असल्या तरी मधला ८ फुटाचा रुंद व्हरांडा हा सामायिक जागा म्हणून खूप उपयोगी होताच. शिवाय रात्री झोपायला आणि दिवसा काही कामे करायला, मुलांना खेळायलाही त्याचा उपयोग होत असे. आज महाराष्ट्र शासनाने घरांचे किमान क्षेत्रफळ आधी २५० नंतर ३०० ते ४०० इतके वाढविले आहे. प्रत्येक घरात शौचालय-न्हाणीघर असावे असेही सुचविले आहे. शासनाने आता प्रतिमाणशी किमान ५ चौ. मी. (५० चौ. फूट) इतके घर राहण्यायोग्य मानले आहे. म्हणजे तसे पाहिले तर जुन्या-नव्या प्रमाणात काही फार फरक नाही. सामायिक स्वच्छता सेवा आता खासगी झाल्या असल्या तरी वापरावयाची जागा काही बदलली नाही. शिवाय मोठय़ा
८ फूट रुंदीच्या पॅसेजच्या जागी केवळ ३ फूट रुंद असते आणि त्या जागेचा वापर चप्पल, बूट ठेवण्यासाठी करणेही अशक्य बनते! शिवाय घराचे आकार सारखे असले तरी ज्या घरात लोकांची संख्या जास्त असेल तेथे गर्दी वाटते. अशी गर्दी असणे कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते. या उलट एक-दोन गरीब माणसांसाठी अशी घरेही डोईजड होतात. म्हणूनच ठरावीक आकाराची घरे सामाजिक न्याय्य प्रस्थापित करू शकत नाहीत.
मात्र मोठय़ा घरांची हौस सर्वानाच असली तरी त्याची गरज मात्र नसते. महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी धारकांबरोबर जुन्या कर प्राप्त इमारतींमधील भाडेकरूंना फुकट घरे देण्याची कायदेशीर व्यवस्था केली. फुकटच देता तर मोठी द्यावीत, ही मागणीही लोक करू लागले. आतातर गृहनिर्माण संस्थांमधील मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांनाही मोठी, पण फुकट घरे देण्याचे आश्वासन बिल्डर देऊ लागले आहेत. त्यामुळे मोठय़ा घरांची मागणी करण्यात आता सर्वच सरसावलेले दिसतात! एकीकडे बिल्डर माफियांच्या विरोधात बोलायचे आणि दुसरीकडे फुकट आणि मोठय़ा घरांची मागणी करायची, हा तर निव्वळ दुटप्पीपणा झाला. अशा वेळी मोठी किंवा खूप मोठी घरे सुयोग्य असतात का असा विचार तर कोणीच करत नाही. अनेकदा मोठी घरे हौसेने घेतली जातात. वास्तवातील अडचणी लक्षात आल्यावर त्यांचाही जाच होतो हे लक्षात येते.
घराचा सुयोग्य आकार हा कुटुंबांच्या गरजेनुसार, आर्थिक कुवतीनुसार आणि प्रदेशानुसार असणे केव्हाही चांगले. थंड हवामानात अवास्तव मोठी घरे उबदार करण्यासाठी तर उष्ण हवामानात थंडावा आणण्यासाठी जास्त ऊर्जा लागते.
खर्च, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि मानसिक दृष्टीनेही अवास्तव मोठय़ा आकाराची घरे फारशी सुयोग्य ठरत नाहीत. बरेचदा अशी अवाढव्य घरांकडे स्टेटस म्हणूनच बघितले जाते. मोठी घरे सजवायला, दुरुस्तीला, व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवायला श्रम, पैसे आणि वेळही खूप लागतो. अमेरिकेत तर घरे अवाढव्य मोठी आणि कुटुंबे लहान असे चित्र असते. त्यामुळे घरातील माणसेही दुरावतात आणि एकाकी होतात. न्यूयॉर्कमध्ये काही विभागात सरासरी घराचे क्षेत्र प्रतिमाणशी ६५ चौ. मीटर म्हणजे ७०० चौ. फूट इतके आहे. त्यामुळेच तेथे इमारती उत्तुंग आहेत. त्यासाठी चटई क्षेत्र ५ ते १५ दिलेले आहे! मुंबईमध्ये चटई क्षेत्राचे प्रमाण वाढविणे आवश्यक असले तरी ते इतके जास्त असणे परवडणारे नाही. अवास्तव मोठी घरे, उत्तुंग उंच इमारती आणि अवास्तव चटई क्षेत्र हे लोकांना आणि शहराला काही फायद्याचे ठरत नाही. घरांच्या आकाराच्या संदर्भात आर्थिक, सामाजिक आणि परिसर सुसंगत सारासार विचार महत्त्वाचा ठरतो. तोच आज दुर्मीळ झाला आहे!
वास्तुगिरी : छोटी मोठी घरे
मोठी मोठी घरे रिकामी आणि लहान घरात दाटी! हेच चित्र आपल्याला भारतामध्ये बहुतेक शहरात दिसते. त्याची कारणे विचित्रच दिसतात.
आणखी वाचा
First published on: 11-10-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little big houses