घरात लहानमोठे वाद होतात तेव्हा मोठं माणूस मध्यस्थी करतं.
तिन्हीसांजेच्या कातरवेळी देवापुढे दिवा लावताना आजीला, आईला, गृहिणीला देवाची आणि वास्तूची प्रार्थना करताना, घरातल्या सर्वाचं शुभ चिंतताना अनेकांनी ऐकलं असेल.
‘संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात
उतरला स्वर्ग इथे साक्षात’
अशा भावनेतून ती वास्तूला म्हणते-
‘धरी घरावर चंदन छाया
फुले पसरती सुगंधमाया
सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात’
दुर्धर रोगानं आजारी माणूस वैद्यकीय तपासण्या करायला बाहेर पडताना आतूनबाहेरून खचलेला असतो. दवाखान्यात निघताना देवघरात जाऊन नमस्कार करतो, तेव्हा घरातील इतर सदस्य ‘नॉर्मल येतील हो सगळे रिपोर्ट्स, मी अमक्या देवाला साकडं घातलंय, त्यानं माझा शब्द आजवर खाली पडू दिला नाही.’ अशा शब्दांत त्याला धीर देतात. घराच्या चार भिंतींत अप्रिय अंदाज कोणी व्यक्त करीत नाहीत, कटू बातम्या स्पष्ट शब्दांत सांगणं टाळतात.
वास्तू नावाची कोणी देवता खरंच अस्तित्वात असते का? आपलं बोलणं ती ऐकत असते का? सगळी माणसं तिला का इतकी भिऊन असतात? तिची मर्जी राखली तर आपल्यावर अशुभाचं सावट पडणार नाही असा लोकांचा ठाम विश्वास असतो.
एका पापभिरू माणसाचा स्वत: पाहिलेला अनुभव सांगतो. अनेक वष्रे लक्ष्मी रोडवरच्या कचेरीत होता. सरासरी बुद्धिमत्ता आणि सरासरी कार्यक्षमता. रोज सकाळी वेळेवर यायचा. आत येताना इमारतीला वाकून नमस्कार करायचा. आल्यावर लगेच कामाला सुरुवात. संध्याकाळी गुपचूप लवकर कधीही पळून गेला नाही. जागेवरून उठताना आवर्जून दिवा मालवायचा. रजेवर असलेल्या व्यक्तीच्या जागेवरचा दिवा मालवायचा. ऑफीसची स्टेशनरी घरातल्या वस्तूंप्रमाणे जपायचा. दिवे मालवणं, स्टेशनरी वाचवणं यावरून तो ऑफीसमध्ये चेष्टेचा विषय झाला होता.
त्याच्या प्रमोशनची वेळ आली नि नेमका नवीन, खडूस बॉस आला. दोघांच्या स्वभावाच्या तारा काही जुळेनात. हा असा बावळट माणूस नको म्हणून बॉसनं त्याची बार्शीला बदली करायचा घाट घातला. सगळीकडे पसरलं की प्रमोशन न होता हा बार्शीला जाणार. पण तो आपल्या श्रद्धेवर ठाम होता. ‘मी कोणाचं वाईट केलं नाही. या वास्तूत प्रामाणिकपणे राबलो. ही वास्तू साक्ष आहे. माझं वाईट होणार नाही.’ असं बोलायचा. प्रमोशनसाठी कोणाला भेटायला गेला नाही. शेवटी काय झालं कोण जाणे, प्रमोशनच्या यादीत त्याचं नाव आलं. त्याला जागेवरच प्रमोशन मिळालं. त्याच्या बॉसचीच नेमकी बार्शीला बदली झाली. कोणतीही अतिशयोक्ती न करता हे लिहिलं आहे. वर्षांनुर्वष तो ज्या वास्तूवर प्रेम करीत होता, तिनं त्याला जवळ ठेवून घेतलं का? माहीत नाही. समजा, की हा योगायोग आहे.
पण ज्या कुटुंबावर वास्तू प्रसन्न असते तिथे सदैव गृहस्वामिनीच्या चेहऱ्यावर हास्य आणि जिभेवर प्रसन्न गाणं नक्कीच असतं.
‘आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी’
तिच्या घरात आनंदाची वस्ती असते. आनंद शोधण्यासाठी तिला घराबाहेर पडायची किंवा आकाशाकडे पाहून देवाजीची करुणा भाकायची काय गरज असते. घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे, अशीच तिची भावना असते. वास्तू खूश असेल तर घरातली सारी माणसं खूश असतात.
‘घर हीच राजधानी नाही उणे कशाचे
संसार साजिरा हा साम्राज्य हे सुखाचे’
एका चौकोनी कुटुंबातल्या आई, वडील, थोरली ताई आणि धाकटा मुलगा- या चौघांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं. मुलांकडून कितीही लहानमोठी चूक झाली तरी त्यांना रागवायचं नाही, मारायचं तर मुळीच नाही असा पालकांचा पण होता. पण थोरली मुलगी केव्हा तरी बालिश त्रास द्यायचीच. तिला धाक दाखवण्यासाठी आईवडील म्हणत, तू जर त्रास दिलास तर तुझ्या भावाला होस्टेलमध्ये ठेवू. मग तो तुला रोजरोज भेटणार नाही. या धमकीवर ती एकदम रडवेली व्हायची नि शरण यायची. हे सगळं त्या वास्तूनं खरंच ऐकून घेतलं का? पुढे बारावीनंतर त्या मुलाला खरोखरच पहिला, दुसरा, तिसरा- सारे प्रवेश परगावी मिळाले. लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. ती देखील दूर.
आता हे चौघे एकमेकांना फोनवर, आंतरजालावर, फेसबुकवर भेटतात. जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिले. केव्हा तरी एकाच गावात स्थायिक होऊ, असं दिवास्वप्न पाहतात. हादेखील योगायोग समजू.
कारण वास्तू नावाची कोणी देवता खरोखरच अस्तित्वात असेल तर ती काय आपल्या लेकरांना अशी शब्दांत पकडते का? तसं वाटत नाही. घर म्हणजे त्यातील सदस्यांच्या आपसातील प्रेमाचा आविष्कार असतो.
‘‘यहाँ महक वफाओं की मुहब्बत का रंग है
यह घर तुम्हारा ख्वाब है, यह घर मेरी उमंग है
न आरजू पे कैद है ना हौसले की जंग है
हमारे हौसले का घर, हमारी िहमतों का घर
यह तेरा घर, यह मेरा घर..’
‘ओम जय जगदीश’ या सिनेमामध्ये वास्तूत जीव गुंतलेल्या माणसांची कहाणी फार रोचकपणे सांगितली आहे. तीन मुलांची आई असलेली विधवा जुन्या घरात राहात असताना मोठा मुलगा ओम नोकरीनिमित्त परदेशी जातो. इकडं घरावर असलेलं कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे घर सावकाराच्या ताब्यात जातं. पण यथावकाश ओम परत येतो, घर सोडवतो. भावंडं, आई आणि घर एकत्र आल्यावर होणारा आनंद व्यक्त करताना कवीला गेल्या शतकातल्या ‘Happy days are here again’ या गाजलेल्या गाण्याचे बोल आठवले आहेत.
‘चूडी सजी है हाथों में
फिर से बजी शहनाई है
मेहंदी रची है परों में
देखो खुशी घर आयी है
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा