प्रशांत डिंगणकर
आपल्या आवडत्या लेखकाच्या घराचं डिझाइन मागून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आपल्याला स्वप्नातील घर बांधायचं हा वेडेपणा कोण करेल असं वाटत नाही. मीही तो करणार नाही. पण माझ्या घरातील भिंतीवर पुस्तकांचं कपाट मात्र आहे…
कवी इंद्रजीत भालेराव यांना परभणीत नवीन घर बांधायचं होतं त्यावेळी त्यांनी त्यांचे आवडते लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या घराचे नकाशे मागितले आणि त्याच पद्धतीनं घर बांधलं… ही आठवण सांगताना इंद्रजीत भालेराव आजही भावुक होतात. इंद्रजीत भालेराव यांचं घर म्हणजे पुस्तकांनी भरलेले घर… हे घर मी पहिलंय. वीस वर्षांपूर्वी जेव्हा समाजमाध्यमं एवढी फोफावली नव्हती तेव्हा अशा अनेक श्रध्दा, भाव आणि त्यातील देव आपल्या मनातील ‘घरात’ वास करीत होते.
घर ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात वेगळी असते… घर बांधून पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद शब्दात सांगताही येत नाही आणि शब्दात मांडताही येत नाही. आज शहरात घर घेताना दमछाक होते. कर्जबाजारी व्हावे लागते, उसनवारी करावी लागते. एवढं सगळं करून आपल्याला हवं तसं घर मिळतंच असं नाही. किंमत जुळली तर जागा पसंद पडत नाही. सगळंच जुळलं तर मग जेवढं हवं तेवढं कर्ज मिळत नाही. ही फरपट मुंबई, ठाणे, पुण्यातच नाही, तर तालुक्याच्या ठिकाणी घर घेणाऱ्यांची सगळ्यांचीच… घर घेताना कर्ज काढले की त्याचे हप्ते फेडता फेडता आयुष्य निघून जातं आणि घर कर्जमुक्त व्हायच्या आतच निघायची वेळ होते. शहरी माणसाची ही फरपट कधीच न संपणारी…
हेही वाचा >>>अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्था महत्त्वाचा फरक आणि त्याचे परिणाम!
एकदा घर घेतलं की बकेटलिस्टमधील अनेक डिझाइन्स समोर उभी असतात, पण मग जी जागा उपलब्ध होईल त्या जागेत कपाटाचे कप्पे रचावे लागतात. देवघर भिंतीवर, डायनिंग टेबल भिंतीतच आणि बेडरूममध्ये कपाटांची गर्दी… अशीच सगळी आवराआवर करावी लागते. मुंबईत एसआर ए योजनेत जी घरं दिली जातात ती घरं की कोंडवाडे हेच कळत नाही. पूर्वी इंग्रजानी जेल म्हणून बीडीडी चाळी बांधल्या, आपण त्यात माणसं कोंबली. आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरूअसताना या जेलमध्ये बंद केलेल्या माणसांना थोडी ऐसपैस वाटावी अशी घरं मिळत आहेत. पण त्याचवेळी सर्वत्र बीडीडी चाळींपेक्षा भयंकर एसआरए मधील शेकडो ‘जेल घरं’ आपण उभी करीत आहोत. या शहरांना एकूणच घरघर लागलेय त्याची ही नाना रूपं…
गावात छान टुमदार घर असावं असं प्रत्येकाच्या मनात असतं, पण जे पूर्वी गाव सोडून आले त्यांना आता गावात जाऊन मातीत पाय रोवून उभं राहणं न परवडणारं झालं. पण गावांना आता गावपण राहिलं नाही.
गावांमध्ये शहरीकरणाचा वणवा पेटायला लागलाय. या वणव्यात गावातील लोकसंस्कृती, कला, लोककला, घर बांधणीची पारंपरिक पद्धत आणि एकूण घरांचं घरपण उद्ध्वस्त झालंय. घरोघरी जमिनीवर संगमरवरी फरशी तुळतुळीत आणि गुळगुळीत दिसते, पण शेणाचा गंध, त्यावर काढलेली रांगोळी आणि त्यामध्ये दडलेलं अस्सल मराठीपण सगळंच बदलून गेलंय. आता गावांनाही शहरांचंच वेड लाडलंय. म्हणून शहरातील छोट्या घरातून गावातील मातीच्या घरात जाऊ वाटणाऱ्यांना हे सगळं दुरापास्त झालं. ते मनातील, कल्पनेतील घरच दूर कुठं तरी हरवून गेलेय… आवाक्या बाहेर गेलंय असं वाटत राहतं. आता मुलांना शाळेत चित्रकला स्पर्धेत घर काढा असं सांगितले की, उंच इमारत काढू लागतात आणि मुलांच्या जगातील ते घरही हरवून गेलंय याचंच चित्र शालेय मूल रेखाटत राहतात.
सगळ्याच घरात सुखाची सगळी साधनं आणून घर भरलं जातं आणि सुखाच्या शोधत माणसं बाहेर भटकताना दिसतात. सगळ्याच ठिकाणी एका घराला दुसऱ्या घराच्या भिंती चिटकलेल्या आहेत, पण माणसं एकमेकांना जोडलेली असतील असं नाही. अनेक वेळा शेजारच्यांनी त्यांच्या घरात सुखदु:खाचा एखादा प्रसंग घडला आणि त्याची समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली तरच शेजाऱ्यांना कळतं, नाही तर काही कळतच नाही. शेजारी शेजारी राहून मनं जुळतच नाही.
हेही वाचा >>>अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्था महत्त्वाचा फरक आणि त्याचे परिणाम!
गावी एका वाडीत ३० ते ४० घरं असतात काही छोट्या तर काही मोठ्या वाड्या आहेत. शहरात एका सोसायटीत ३५० ते ५०० किंवा १००० घरं असतात. म्हणजे एक गाव, एक तालुका आणि एक जिल्हा एका सोसायटीत सामावलेला आहे, पण किती अंतर आणि किती फरक आहे दोन संस्कृतींमध्ये. हा फरक वास्तविक समाजमाध्यमं आल्यावर भरून निघायला हवा होता. माणसामाणसांमधील अंतर कमी व्हायला हवं होतं, पण दुर्दैवानं अंतर वाढत गेलं. आपल्या आवडत्या कला, संस्कृती, परंपरा यातील महत्त्वाचा दुवा हे घर होतं. घर म्हणजे केवळ भिंती नाहीत, तर घर म्हणजे माणसांच्या भावभावनांनी भरलेला भरगच्च पुष्पगुच्छ असतो. कुटुंब पद्धतीनं एवढी विलक्षण वळणं घेतली आहेत त्यातून घराचीच डिझाइन बदलली नाही तर मानवी मनाचीच डिझाइन बदलून गेलेत. त्यामुळेच घरांच्या किंमती वाढत गेल्या आणि माणसाच्या जगण्याचे मोल आणि मूल्य कमी होत गेलं. आपण कितीही प्रगती केली, मशीन आणल्या आणि चंद्र-सूर्यापर्यंत जाणाऱ्या गगन भराऱ्या घेतल्या तरी सुगरण जेवढे छान, देखणं घर विणतो तो खोपा आपण आजही अत्याधुनिक शिलाई मशिन वापरूनही तयार करू शकलो नाही. त्या खोप्यासारखे दिसणारे काही फसवे डिझाइन बाजारात मिळतात आणि काही जण आपल्या घरात आणून लावतात… पण सुगरणीच्या घराचं डिझाइन नाही जमलं आपल्याला अजून एवढं मात्र नक्की… आपल्या जगण्यात अशी कित्येक मूल्यांची डिझाइन बिघडलेत आणि कित्येक जीवनमूल्यांची आपण नुसती कॉपी-पेस्ट करून वापरतोय, पण त्याला अस्सलपणाची सर नाही.
आपल्या आवडत्या लेखकाच्या घराचं डिझाइन मागून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आपल्याला स्वप्नातील घर बांधायचं हा वेडेपणा कोण करेल असं वाटत नाही. मीही तो करणार नाही. पण माझ्या घरातील भिंतीवर जे पुस्तकांचे कपाट आहे त्या कपाटावर माझे आवडते कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता मात्र ठळक अक्षरात लावलेय…
घरात असावे ग्रंथाचे कपाट,
देवा जसा पाट देव्हाऱ्यात
ही कविता मला जगण्याची ऊर्जा देते… अस्सल, साधेपण, कल्पनेतील देखणं घर उभं राहू शकतं याची सतत प्रेरणा देतं. म्हणून दसऱ्याला एवढेच सांगतो, माझ्यासह तुमच्या मनातील घराचं डिझाइन साकारण्याची संधी प्रत्येकाला मिळो…
● prashantdingankar@gmail.com