|| सीमा पुराणिक

कॉम्प्युटरच्या की-बोर्डवरील वारंवार वापरली जाणारी बटणे म्हणजे अक्षर ‘E’, ‘Space Bar’ किंवा  ‘Enter’ ही असावीत.. मात्र आपण सगळेच अत्यंत विचारपूर्वक वापरतो ते बटण म्हणजे ‘Delete’. नको असलेल्या फाइल्स किंवा बॅक-अप फाइल्स डिलीट केल्याशिवाय उपयुक्त असलेल्या फाइल्स ठेवायला जागा कशी केली जाईल?

आपल्या घराचंही अगदी असंच असतं. नको असलेल्या, किंबहुना वर्षांनुवष्रे वापरल्याच गेल्या नाहीत अशा कितीतरी गोष्टी आपल्या घरातील बरीचशी जागा अडवून बसलेल्या असतात. आणि मग अडगळ बनून विनाकारण घरातले वातावरण खराब बनवतात, अर्थात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मुंबईसारख्या ठिकाणी अगदी कमीतकमी म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने किंबहुना, अधिकच किंमत देऊन आपण जी जागा खरेदी करतो, ती या तथाकथित अडगळीने व्यापून ठेवायची, की एखाद्या अंतर्गत रचनाकाराच्या मदतीने त्या जागेचा सुयोग्य वापर करून आवश्यक असेल तितकेच फíनचर घरात ठेवायचे, हे ठरवायला हवे. हीच गोष्ट मुंबईतल्या कार्यालयांच्या बाबतीत लागू होते. बरेच वेळा अनावश्यक कागदपत्रे कपाटातील जागा अडवून बसतात. आणि महत्त्वाची कागदपत्रे इतस्तत: विखरून पडल्याने वेळेला काही सापडत नाही. हेच जर कामाच्या स्वरूपानुसार स्टोरेज सिस्टीमची आखणी केली तर खूप सोयीचे होते. आधुनिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने Time Value अर्थात वेळेचे मूल्यांकन हे पदांच्या उतरंडी प्रमाणे वाढते. एखाद्या कंपनीच्या सी.ई.ओ. अथवा मॅनेजरच्या एका तासाची किंमत ही त्या कंपनीतील सामान्य कामगाराच्या एका तासाच्या किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त असते. अगदी त्याचप्रमाणे, अंतर्गत जागेचे मूल्यांकन करायचे ठरवले तर वर्षांनुवष्रे न वापरल्या गेलेल्या वस्तूंनी व्यापलेले चौरस फूट आणि भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण असताना, वापरात येणारे चौरस फूट क्षेत्रफळ यांपकी कशाचे मूल्यांकन जास्त असेल हे सांगायची गरज नाही.

या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार अंतर्गत जागेचे मूल्यांकन वाढविण्यासाठी करावा लागतो. आणि म्हणूनच Interior Space Audit अर्थात अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण करून घेणे कधीही फायद्याचेच ठरते. काळानुसार कुटुंबाच्या गरजा बदलत असतात. कमीतकमी पुढील पाच ते सात वर्षांच्या काळातील गरज लक्षात घेऊन जर घराची अंतर्गत रचना केली तर कुटुंबातील सदस्यांची कार्यक्षमता वाढते. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्यास नक्कीच मदत होते.

अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण करताना प्रथमत: इमारत किती जुनी आहे व इमारतीची सध्याची स्थापत्तीय स्थिती (Structural Condition) कशी आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. आर. सी. सी. आणि लोड बेअिरग अशा दोन्ही प्रकाराच्या इमारतींसाठी काम करण्याची तांत्रिक पद्धतही वेगवेगळी असते. अंतर्गत भागातील प्लास्टिरगची मजबूती, फरशी आणि भिंतीच्या टाइल्सचे सांधे सुस्थितीत आहेत की नाही हे बघणेही महत्त्वाचे.

जेव्हा जुन्या जागेचे संपूर्णत: अंतर्गत नूतनीकरण करायचे असते तेव्हा फíनचर आणि रंगकामाच्या आधी सिव्हील वर्क, प्लम्बिंग, इलेक्ट्रिक वर्क, फॅब्रिकेशन इत्यादी सर्वच आघाडय़ांवर काम चालते. तेव्हा ते तांत्रिकदृष्टय़ा योग्य पद्धतीने आणि इमारतीची सुरक्षितता लक्षात घेऊन केले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे या सुरुवातीच्या परीक्षणात कोठे पाणी गळतीची समस्या असेल, तर त्याचे कारण किंवा उगम (source) काय असू शकतो याची शक्याशक्यता विचारात घेतली पाहिजे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील प्लम्बिंग सिस्टिममधील inlet तसेच Outlet चे Joints आणि इमारतीच्या बाहेरील व डक्टच्या भिंतीला असलेले तडे यांची करणे प्रामुख्याने तपासावी लागतात. या व्यतिरिक्त इमारतीचे बांधकाम करताना सॉल्टी किंवा गाळमिश्रित रेती वापरली असल्यास काही वर्षांतच भिंतींच्या जमिनीलगतच्या भागाचा रंग काही ठिकाणी खराब होण्यास सुरुवात होते. अशा वेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे योग्य होय.

जागेच्या अंतर्गत भागातील नूतनीकरण करताना जागेची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने अथवा circulation, movement या तत्त्वांचा विचार करून जर एखादी भिंत पाडायची असेल तर मात्र कॉम्प्युटरवरीली delete चे बटण वापरताना जी काळजी घेतो त्याहीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. त्या भिंतीवर एखादा लॉफ्ट किंवा तत्सम बांधकाम आधारलेले नाही, छुपे कॉलम्स आणि बीम्स यांना कोठेही धक्का लागत नाही ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन बांधकाम करताना हलक्या व जड विटा अर्थात siporex चा वापर केल्यास बांधकामावर जास्त भर येणार नाही.

संपूर्ण नूतनीकरण करताना आपण जागेचा अधिकाधिक योग्य प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. ३०० चौरस फुटांच्या वन रूम किचन फ्लॅटचे वनबीएचकेमध्ये रूपांतर हे एक उदाहरण पाहू.

स्वयंपाकघरातील सर्व गोष्टी ताबडतोब हाताशी मिळाल्या की गृहिणीचा बराच वेळ वाचतो. रोज न लागणाऱ्या वस्तू, जास्तीची भांडी, जास्तीचे वाणसामान, इत्यादी किचन प्लॅटफॉर्मजवळ न ठेवता, ती जागा दैनंदिन स्वयंपाकात लागणाऱ्या गोष्टींसाठी उपलब्ध करून देणे योग्य असते. म्हणून अगदी आवश्यक इतक्याच क्षेत्रफळाचे स्वयंपाकघर दिले आहे. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीचे चलनवलन गरसोयीचे होणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. तसेच एका नवीन बेडरूमची सोय करून त्यामध्ये सिंगल बेड, वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल आणि स्टडी टेबल हे सर्व फíनचर खोलीचा दृष्य समतोल अर्थात व्हिज्युअल बॅलन्स कोठेही ढळू न देता केले आहे.

आधुनिक पद्धतीप्रमाणे असलेल्या एकत्रित टॉयलेट ऐवजी बाथरूम आणि डब्ल्यूसी स्वतंत्रपणे असणे हे बऱ्याचदा छोटय़ा घरांमध्ये, विशेषत: जास्त सदस्य असतील तर फारच सोयीचे असते. हा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून बाथरूम हे बेडरूमला लागून ठेवले असून, डब्ल्यूसी आणि वॉशबेसिन हे लिव्हिंग रूमजवळ आहे.

तसेच लिव्हिंग रूममध्ये दिवसा बठकीची खोली आणि रात्री झोपण्याची सोय होईल अशा प्रकारे व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त बाथरूम वरील लॉफ्टवर पाण्याची टाकी तसेच किचन आणि बेडरूममध्येही ओव्हरहेड स्टोरेजची सोय केली आहे. या आराखडय़ात उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे, जवळजवळ ७०० ते ७५० पुस्तके पद्धतशीरपणे ठेवण्याची व्यवस्था बठकीच्या खोलीत केली आहे. यासंदर्भासाठी दिलेल्या छायाचित्रात तुम्हाला टीव्ही युनिट जवळ बुक-ट्रॉली सिस्टीम दिसेल.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर)

Story img Loader