चाळीत प्रत्येकाच्या घराबाहेर गॅलरीत बाकडे हे असतेच. तो चाळीतल्या घरांचा अविभाज्य भाग. घराचे दार आणि बाजूची खिडकी याच्या पुढील गॅलरीही त्या राहणाऱ्या रहिवाशाची हक्काची जागा असा अलिखित नियम असल्यामुळे तो रहिवासी त्या गॅलरीत खिडकीच्या खाली बाकडे तर ठेवतोच ठेवतो. पण कपडे वाळत टाकायला दांड्या, कुंड्या, बालद्या, स्टूल, चपला स्टँड वगैरे ठेवण्याचा हक्क बजावत असतो.

बाकडं हे बहुउपयोगी असल्यामुळे बऱ्याच जणांच्या खिडकीखाली बाकडे हे असतेच. जवळजवळ ७० एक वर्षांपूर्वी बाकड्याऐवजी रहिवासी पेटी किंवा पेटारा ठेवत. त्यात शेगडी, बंबाकरता लागणारे कोळसे, करवंट्या, जळाऊ सामान ठेवत असत. पुढे जसा काळ बदलत गेला तसे गावाकडची तरुण मंडळी काका, मामांकडे नोकरीकरिता मुंबईत येऊ लागल्यावर त्या बऱ्याच तरुण मुलांचे वास्तव्य जवळजवळ बाहेर बाकड्यावरच असायचे. त्या बाकड्याचे दरवाजाच्या बंद पेटीत रूपांतर करून त्यात कपडे वगैरे सामान ठेवत. खानावळीत जेवत व रात्री त्या बाकड्यावरच झोपत असत. त्या काळी बऱ्याच पेईंग गेस्ट तरुण मंडळींनी आपली दिनचर्या त्या बाकड्यावरच काढली. आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर उपनगरात जागा घेऊन मोठे झाल्याची उदाहरणे मी स्वत: चाळीत राहिल्यामुळे पाहिली आहेत.

गिरगावात गोरेगांवकर चाळीत आम्ही लहान मुले बाहेरच्या बाकड्यावर टेबल टेनिस खेळत होतो. पत्ते, व्यापार डाव, बुद्धिबळ असे अनेक खेळ बाकड्यावर बसून खेळलो आहोत. दुपारच्या उन्हात घरोघरी बायका आपापल्या बाकड्यावर पापड, चिकवड्या व उन्हाळी बेगमीची कडधान्ये वगैरे वाळवत असत, त्या काळातसुद्धा चाळीतील चार-पाच बाकडी एकत्र आणून छोटे स्टेज करत होतो. त्यावर सत्यनारायणाची पूजा, श्रीकृष्ण जन्मोत्सव वगैरे असे छोटेमोठे उत्सव साजरे करत होतो. शारदोत्सव साजरा करताना हमखास कीर्तनाच्या दिवशी तबला, पेटी वाजवणाऱ्या साथीदारांकरिता तळमजल्यावरील बाकडी कीर्तनकार बुवांच्या दोन्ही बाजूला मांडून छान उपयोग करत होतो.

संध्याकाळच्या वेळेला मजल्यावरील बायका एखाद्या घरच्या प्रशस्त बाकावर बसून चाळीतीलच इतर बायकांसंबंधी गॉसिप गप्पा मारताना दिसायच्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत कोणाला काही खासगी गप्पा मारायच्या असतील तर त्या दोन व्यक्ती बाहेर बाकावर बसून खासगीत गप्पा मारत असत. जरा हटके उपयोग सांगायचा झाला तर पूर्वी दाढी व केस कापण्याचा कार्यक्रम बाहेरच्या बाकड्यावरच बसून होत असे. आम्ही तरुण वयात आलेली मंडळी नाटक, सिनेमा किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलो की रात्री उशीर होईल म्हणून घरच्यांना त्रास नको म्हणून गादी, उशी बाहेरच्या बाकावरच टाकून ठेवायला सांगायचो. घरातील एखादी ब्रह्मचारी व्यक्ती कायमच बाहेरच्या बाकावर झोपत असे.

एक जबरदस्त फायदा रहिवाशांना होतो, तो म्हणजे चाळीत बऱ्याच घरी बाहेरच्या बाकड्यावर माणसे झोपत असल्यामुळे घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या चोरांपासून संरक्षण मिळत असे. त्यामुळे जागेअभावी रहिवासी बऱ्याच वस्तू चपला, बालद्या, जुने सामान, कपडे बाहेरच्या गॅलरीत ठेवत होते.

चाळीतील काही रहिवासी तर गॅलरीतील छोटे बाक घरात आणून त्यावर गणपतीची स्थापना करत. बाकड्याभोवती उत्तम आरास करत. त्यानिमित्ताने बाकड्याला सुबक रंग लावला जाई. दिवाळीत साफसफाई करण्यासाठी आजूबाजूचेही बाकडे घेऊन जात होते. ज्येष्ठ नागरिक निवांतपणे बाहेरच्या बाकावर वर्तमानपत्र वाचताना दिसत होते. माझी आजी त्या काळी हिवाळ्यात सकाळी बाकावर येऊन उन्हात बसत असे. आमच्या चाळीत पूर्वी एक रहिवासी होते त्यांना बाहेर ठेवलेल्या बाकाचा अभिमान होता. का तर- त्या बाकड्याची वरची फळी ६×५ अशी अखंड होती. त्या बाकावर ढेकूण होत नाहीत असे ते सांगायचे. बाकड्यावर मुलांनी नाचलेले त्यांना आवडत नसे. एवढेच काय बादली, ओले कपडे, जड सामान ठेवले तर ओरडायचे.

घराबाहेर गॅलरीत ठेवलेल्या दणकट बाकड्यांनी चाळीतील लोकांना पिढ्यान्पिढ्या साथ दिली आहे. काही कारणानिमित्त आम्ही आमची चाळीतील जागा भाड्याने देताना त्या व्यक्तीला ते बाकडे नीट जपून वापरा, खराब करू नका असे वडिलांनी खास बजावल्याचे आठवते. त्या बाकड्याशी माझी भावनिक जवळीक आहे, कारण माझ्या आजीने मला लहानपणी काऊ-चिऊ दाखवत त्या बाकावर घास भरवले होते.

tatyadongre@gmail.com