माझ्या स्वत:च्या आठवणी तयार होण्याआधीच्या आठवणींमधून- म्हणजे आई, जुने शेजारी, घरात काम करणारी बबीची आई, आत्या, काका यांच्या आठवणींमधून मला ठाण्याच्या आमच्या ‘मोडक्या’ घराची कल्पना येते. ज्या दूरच्या नातेवाईकांनी ते घर दाखवलं होतं, ते दादांना म्हणाले होते, ‘‘अहो, तुमच्या वैजनाथच्या घराचा गोठाही बरा असेल. मला ही जागा तुम्हाला दाखवायला खरं तर अगदी लाज वाटते आहे, पण माझ्या पाहण्यात ही एकच जागा या भागात आहे.’’ दादा, वहिनींनी जास्त चिकित्सा न करता जागा घेतली. दादा, वहिनी, १ वर्षाची मी, इंदू आत्या, मालू आत्या, बापू आणि जाऊन-येऊन मुकुंदमामा. पाणी वाडीत लांब असलेल्या विहिरीवरून आणावं लागे. घर पहिल्या मजल्यावर होतं. इमारत असंख्य टेकूंच्या जोरावर तग धरून होती. चुना लावलेल्या भिंती आणि मोडकळीस आलेली गॅलरी. माझा स्वभाव जुन्या आठवणी (वस्तूरूपातल्य), पुस्तकं, वह्या, खडू, पेन्सिली-सगळं सांभाळून ठेवण्याचा. वहिनीचा तसा नसावा. वहिनीची आई ती सात वर्षांची असताना गेली. ती खूप हुशार आणि टॅलेंटेड असणार असं मला वाटतं. वहिनी ४-५ वर्षांची असताना तिने शिवणाच्या क्लासमधे स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या बक्षिसाचा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळवला होता. हा कुंकवाचा करंडा मी मोडक्या घराच्या गॅलरीतून खाली रस्त्यावर फेकून दिला होता, तो काही परत मिळाला नाही. वहिनीचे वडील-नाना पार्ल्याला राहात. ते मधेमधे आपल्याकडे काम करणाऱ्या कारकुनांना ठाण्याला पाठवीत आणि टेकू किती वाढले आहेत ते विचारीत. दरवेळी एखाददुसरा वाढलेलाच असे. तर असं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं घर. हे मला वाटतं स्वयंपाक घर, दोन खोल्या आणि एक गॅलरी असं होतं. मालकांनी लवकर दुसरी आधुनिक, सुंदर बिल्डिंग बांधली. या बिल्डिंगमध्ये आम्ही थोडे दिवस दोन खोल्यांच्या जागेत आणि लवकरच तीन खोल्यांच्या जागेत राहिलो.

हेही वाचा >>>मनाला शांतावणारी जागा…

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Daughter Gifted Her Father Little Ring
‘हे माझं स्वप्न होतं…’ लेकीनं दिवाळीनिमित्त दिलं खास, महागडं गिफ्ट; VIDEO तून पाहा बाबांची पहिली रिअ‍ॅक्शन
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला

तीन खोल्यांच्या जागेला खिडक्या दोनच होत्या, मात्र गॅलऱ्या तीन होत्या आणि दरवाजे पाच. आईने खिडक्या, दरवाजे पडद्याने सजवले होते. मागच्या गॅलरीतून ते पुढच्या आणि मधल्या खोलीच्या उंबरठ्यापर्यंत एक पॅसेज असावा अशी मोकळी जागा होती. क्रॉस व्हेंटिलेशनमुळे त्या भागात छान वारा येत असे . वहिनीला दुपारी कधी झोप येत नसे. चटई घालून ती या मधल्या पॅसेजमध्ये पुस्तक वाचत पडायची. सुट्टीच्या दिवसांमध्ये माझा मुक्काम वहिनी जवळ चटईवर असे. ती आमच्यासाठी खूप पुस्तकं विकत घेत असे. आनंद आणि चांदोबाची ती वर्गणीदारच होती. स्वत: कासवाच्या गतीनं त्या गोष्टी वाचायला नको वाटे. वहिनी त्या कशा भराभर, न अडकळता वाचीत असे. स्वत:ला वहिनी इतकं भर भर वाचता येत नसल्याने वहिनीने सगळ्या गोष्टी वाचून दाखवाव्यात म्हणून माझा आग्रह असे. तिने तेव्हा जर तो हट्ट पुरवला नसता, तर केवढ्यातरी बालवाङ्मयाला त्या योग्य वयात आम्ही मुकलो असतो असं वाटतं. वहिनीने वाचून दाखवलेल्या कितीतरी गोष्टी अजूनही आठवतात. या घरात राहात असतानाच माझं लग्न झालं. वहिनी कालांतरानं दुसऱ्या घरात राहायला गेली. लग्नापूर्वीच्या दारं, खिडक्यांचा हिशोब आता संपला. आता माझ्या संसारातल्या खिडक्या, दारांचा नवीन हिशोब सुरू झाला होता. पहिलं घर दिल्लीला होतं- करोल बागेत. तीन मोठ्या खोल्या, तिन्ही मोठ्या खोल्यांच्या पुढे एक मोठी गॅलरी. स्वयंपाकघर म्हणजे एका वेळी फक्त एकाच माणसाला वेगवेगळ्या कोनात उभं राहता येईल असं टिचभर. बाहेरच्या रस्त्याच्या बाजूला उघडणारी एक खिडकी आणि बेडरूमला चार खिडक्या-एकूण पाच खिडक्या आणि पाच दरवाजे असलेल्या या घरात माझा मुक्काम एखादं वर्षच होता.

हेही वाचा >>>दंड आकारणीचे विधिनिहाय विश्लेषण

माझं नंतरचं घर नेफा म्हणजे भारताच्या नॉर्थ-ईस्ट सीमेवरच्या रोइंग या चिमुकल्या, पण महत्त्वाच्या गांवातलं. दिल्लीत माझं राहणं वर्षभरातच संपलं. मोहनची बदली नेफामध्ये म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व (ईशान्य) सीमेवर भारताच्या हद्दीतल्या हिमालयातल्या उंच सरहद्दी जवळच्या रोइंग या छोट्याशा गावात झाली. भारतीय सरकारचं हिमालयाच्या दुर्गम भागात रस्ते बांधायचं काम सुरू होतं. मी वर्षाच्या मुलीला याच आमच्या घरात घेऊन गेले. मला तो पहिला प्रवास अजून चांगला आठवतो. मुंबईहून विमानाने कलकत्त्याला, तिथून दुसऱ्या विमानानी दिब्रूगढला तिथून जीपनीं तिनसुखियामार्गे सदियाला. सदियाहून ब्रह्म्पुत्रा पार करून धोलामार्गे जीपने रोइंगला. पावसाळ्याचे दिवस नसले तर हा प्रवास १२-१३ तासांमधे पुरा होत असे. घर छानच होतं. तिकडच्या इतर घरांप्रमाणे हे घरही जमिनीपासून २-३ फुटांवर बांधलेलं होतं. हिमालयाच्या या भागात लॅंड-स्लाइड्स खूप होतात. नुकसान कमी व्हावं म्हणून घरं पातळ भिंतींची बांधलेली असतात. जमिनीपासून मोकळ्या ठेवलेल्या भागात कोंबड्या ठेवता येत. ट्रायबल कॉन्ट्रॅक्टर दुभत्या गाई भाड्याने देत. त्यांना खाऊ-पिऊ घाला, त्यांचं दूध वापरा. आमच्याकडे असलेले नेपाळी कुक, माळी त्यांची चांगली काळजी घेत. स्वयंपाक घरात फ्लोअरिंग कॉन्क्रीट्चं, बाकीकडे लाकडाचं. स्वयंपाक घरात उभ्याचा ओटा, पण जाळायला लाकडं. महिन्यातून एक-दोन वेळा साखळीला बांधलेला हत्ती मोठा ओंडका मागच्या अंगणात आणून टाकत असे. माळी, इतर नोकर तो फोडून त्याचं सरपण करीत. ऑफिसची जीप महिन्यातून दोन वेळा (पावसाळा नसताना) तिनसुखिया, दिब्रूगढपर्यंत जात असे. सर्वांचं थोडंथोडं वाणसामान येत असे. या घराला १० दारं आणि १५- १६ खिडक्या होत्या. मग तिनसुखियाहून खैतान नावाच्या दुकानातून पडद्याचं कापड आणून गावातल्या शिंप्याकडून सगळ्या खिडक्या, दरवाजांना पडदे शिवले होते. नेफामधे तीन वर्षं राहिल्यावर आम्ही आलो मुंबईला. थोडे दिवस वडाळ्याच्या ६-७ खिडक्या आणि ७-८ दरवाजे असलेल्या घरात राहून मग आम्ही माहीमला राहायला आलो. माहीमच्या घराला सगळ्या गॅलऱ्या खोल्यांमधेच घेतलेल्या होत्या, मात्र आमच्याच फ्लॅटला स्वतंत्र अशी गच्ची होती. गच्ची फारच छान होती. विद्या आणि जीतेंद्र अभिषेकी एकदा आमच्याकडे आले होते. परत जात असताना अभिषेकी विद्याला म्हणाले, ‘‘मला अशी गच्ची असलेली जागा मिळाली तर माझा रोजचा रियाज किती चांगला होईल.’’ माहीमच्या घराला खिडक्या भरपूर होत्या-एकूण १२. दरवाजे होते ७. माहीमची जागा आमची मुंबईतली किंवा भारतातली म्हणा- शेवटची जागा. भारत सोडून आम्ही गल्फमधल्या दुबईजवळच्या शारजामधे तीन वर्षं आणि शेजारच्या मस्कतमधे तीन वर्षं मोठ्या, मोठ्या जागांमध्ये राहिलो. खिडक्या उघडायची संधी फारशी मिळत नसे. पण घराला खिडक्या, दरवाजे भरपूर असत. शारजाला तीन घरांना मिळून ३१ खिडक्या आणि २१ दरवाजे होते. मस्कतच्या दोन घरांना मिळून २० दरवाजे आणि ९ खिडक्या होत्या. मात्र वाळवंटामधे एअरकंडिशनिंगला पर्यायच नसल्याने घराला खिडक्या असल्या तरी त्या उघडून स्वच्छ हवा आत घ्यावी, अशी परिस्थिती माझ्या ३ वर्षांच्या मुक्कामात एकदाही उद्भवली नाही.

मस्कतमार्गे आम्ही अमेरिकेला येऊन पोचलो, त्यालाही आता ३०-३५ वर्षं झाली. अमेरिकेला आल्यावर पहिल्यांदा आम्ही फ्लॉरिडाला एका अपार्टमेंटमध्ये राहिलो. आमचा भवताल नीट जाणून घेतला. पुढे काय करायचं याची मनात तयारी केली, आणि सध्या राहतो, त्या घरात आलो. घर चांगलं होतं, पण अगदी काहीं टिप-टॉप कंडिशनमध्ये नव्हतं. १३ खिडक्या आणि ११, १२ दारं असलेल्या या घराने खूप माणसं पाहिली आहेत. सुरुवातीला घरातल्या प्रत्येक माणसाला आपल्या आवडीने घर सजवण्याची पूर्ण मुभा होती. मुलांनी आपली स्वतंत्र घरं बांधल्यावर आता घर स्वच्छ, आवरलेलं ठेवण्याची जबाबदारी आमची.

● naupada@yahoo.com