माझ्या स्वत:च्या आठवणी तयार होण्याआधीच्या आठवणींमधून- म्हणजे आई, जुने शेजारी, घरात काम करणारी बबीची आई, आत्या, काका यांच्या आठवणींमधून मला ठाण्याच्या आमच्या ‘मोडक्या’ घराची कल्पना येते. ज्या दूरच्या नातेवाईकांनी ते घर दाखवलं होतं, ते दादांना म्हणाले होते, ‘‘अहो, तुमच्या वैजनाथच्या घराचा गोठाही बरा असेल. मला ही जागा तुम्हाला दाखवायला खरं तर अगदी लाज वाटते आहे, पण माझ्या पाहण्यात ही एकच जागा या भागात आहे.’’ दादा, वहिनींनी जास्त चिकित्सा न करता जागा घेतली. दादा, वहिनी, १ वर्षाची मी, इंदू आत्या, मालू आत्या, बापू आणि जाऊन-येऊन मुकुंदमामा. पाणी वाडीत लांब असलेल्या विहिरीवरून आणावं लागे. घर पहिल्या मजल्यावर होतं. इमारत असंख्य टेकूंच्या जोरावर तग धरून होती. चुना लावलेल्या भिंती आणि मोडकळीस आलेली गॅलरी. माझा स्वभाव जुन्या आठवणी (वस्तूरूपातल्य), पुस्तकं, वह्या, खडू, पेन्सिली-सगळं सांभाळून ठेवण्याचा. वहिनीचा तसा नसावा. वहिनीची आई ती सात वर्षांची असताना गेली. ती खूप हुशार आणि टॅलेंटेड असणार असं मला वाटतं. वहिनी ४-५ वर्षांची असताना तिने शिवणाच्या क्लासमधे स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या बक्षिसाचा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळवला होता. हा कुंकवाचा करंडा मी मोडक्या घराच्या गॅलरीतून खाली रस्त्यावर फेकून दिला होता, तो काही परत मिळाला नाही. वहिनीचे वडील-नाना पार्ल्याला राहात. ते मधेमधे आपल्याकडे काम करणाऱ्या कारकुनांना ठाण्याला पाठवीत आणि टेकू किती वाढले आहेत ते विचारीत. दरवेळी एखाददुसरा वाढलेलाच असे. तर असं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं घर. हे मला वाटतं स्वयंपाक घर, दोन खोल्या आणि एक गॅलरी असं होतं. मालकांनी लवकर दुसरी आधुनिक, सुंदर बिल्डिंग बांधली. या बिल्डिंगमध्ये आम्ही थोडे दिवस दोन खोल्यांच्या जागेत आणि लवकरच तीन खोल्यांच्या जागेत राहिलो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा