प्रीती पेठे इनामदार
हल्ली पुनर्विकसित होऊ घातलेल्या इमारतीच्या सदनिकांचा आराखडा जर तुम्ही पहिलात तर त्यात एक हॉल असल्यास डायनिंगचा एक कोपरा, एक छोटेसे स्वयंपाकघर व जेवढ्या बेडरूम्स तेवढे टॉयलेट्स आढळतील. त्यातील एक सामायिक, बाकी सर्व अटॅच्ड. घरातील सर्व सदस्यांना उपयोगी पडेल अशी सामायिक सुविधांसाठी जागाच नसते. जुन्या आराखड्यांमध्ये मात्र कॉमन पॅसेज हा घराचा एक महत्त्वाचा घटक असे. त्यात शौचालय व न्हाणीघर वेगवेगळे असून, सर्व कुटुंबाला मिळून त्यांचा एकच संच असे. वॉश बेसिन व आरसा हे त्या रुंद पॅसेजमध्ये स्थिरावे. तिथेच वॉशिंग मशीन व एखादे छोटे कपाटही राहत असे, त्यामुळे घाई गडबड न होता एका वेळेस ३-४ सदस्य तिथे आपापली सकाळची कामे उरकू शकत. आणि हे करत असताना सदस्यांची उठल्यापासून एकमेकांशी नजरा नजर, स्पर्श, भेट, बोलणे, मस्करी याला वाव मिळे. डायनिंग हॉल किंवा स्वयंपाक घरात सदस्य एकत्र बसून अन्न ग्रहण करीत. हॉलमध्ये एकत्र टीव्ही बघत. या आराखड्याने बहाल केलेल्या एकत्रपणामध्ये कुटुंबाचे धागे घट्ट विणले जात.
नवीन इमारतींमध्ये सदनिकांच्या शयनगृहांना स्वयंपूर्ण करण्याकडेच सर्वांचा कल दिसतो. कितीही छोटी बेडरूम असली तरी त्यात १ डबल बेड, १ वॉर्डरोब व १ स्टडी टेबल असतेच. आणि हो, त्याला अटॅच्ड टॉयलेट. खाणं-पिणं सोडून इतर कुठल्याही कारणासाठी खोलीधारकाला खोलीच्या बाहेर यायची, कुटुंबातील अन्य सदस्यांशी संवाद साधायची गरजच उरत नाही. करमणुकीसाठी स्वत:चा मोबाइल किंवा खोलीतला टीव्ही असतोच. सर्व प्रसाधनांच्या वस्तूही आपापल्या वेगळ्या. संसाधनांचा वाढीव वापर व अपव्यय वाढवणारा घरांचा आराखडा आता अतिथीगृहाचे प्रारूप घेऊ लागला आहे. कुटुंब व्यवस्थेवरच थेट परिणाम करू लागलाय.
या गोष्टीची जाण असणाऱ्या आमच्यासारख्या काही सदस्यांनी, आमच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या वेळी, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नवीन आराखडा तयार होत असताना विकासकासमोर इतर मुद्द्यांबरोबर या विषयीही मांडणी केली. एक म्हणजे, वॉशिंग मशीन व वॉश बेसिन कॉमन पॅसेजमध्ये असावे. दुसरे, कॉमन टॉयलेटचे शौचालय व न्हाणीघर वेगवेगळे द्यावे. पण असे सुटे सुटे केले तर त्याला जागा जास्त लागत असल्यामुळे तो तसे करायला उत्सुक दिसेना. त्यासाठी एखादे अटॅच्ड टॉयलेट कमी करावे म्हटले तर बाकीचे सदस्य ते सोडायला तयार होईनात. टॉयलेट्स व स्वयंपाकघरे ही एकावर एक अशी सरळ रेषेत असायला लागतात. बहुतांश सदनिकाधारकांचे एकमत झाले तरच रूढ झालेल्या संरचनेत बदल करता येतो. त्यामुळे आमचा दुसरा मुद्दा बहुमताअभावी आधीच बारगळला.
अटॅच्ड टॉयलेट ही पाश्चिमात्य देशांतून आलेली संकल्पना (एनसूट बाथरूम) आपल्या सामान्यांच्या मनात इतकी रुळली आहे की ते नसेल तर प्रचंड गैरसोयीचे भासू लागते. त्यात कमीपणा वाटायला लागतो. पुढारलेपणाच्या नावाखाली भारतीय शौचालय आधी हद्दपार झाले. नंतर त्याचे अपार फायदे लक्षात येऊनही लोकांचे कमकुवत गुडघे, आता तो प्रकार परत आणू देत नाहीत. व्यक्तिगत सोयीसाठी ४ बाय ७ च्या अगदी छोट्याशा जागेत दात घासणे, शौचास जाणे व अंघोळही करणे, अशी आरोग्यशास्त्राला फारशी पसंत नसलेली व कौटुंबिक स्वास्थ्याला फारशी पूरक नसलेली व्यवस्था आपण अनिवार्य असल्याप्रमाणे स्वीकारलेली आहे.
शहरांच्या वाढत्या वस्त्यांमुळे सार्वजनिक जागा आक्रसत गेल्या. शहरी समाजाला भेटी-गाठी, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक उपक्रम, यांसाठी मोकळ्या जागा कमी पडू लागल्या. त्याच्या जोडीला शहराचे सर्वात छोटे एकक असलेले घर, इथेही कुटुंबाने एकत्रितपणे आनंद-उपभोग घेण्याच्या जागा कमी होऊ लागल्या. असे असताना माणसे एकटी पडून मानसिक आजार वाढीस लागले आहेत यात आश्चर्य ते काय? शहराचा ढाचा, शहर विकासक व राजकारणी यांच्या हातात असतो. पण घराची संरचना आपल्याच हातात असते. तिथे रूढ झालेल्या चुकीच्या समजुतींना आपणच मुरड घालायला हवी.
सांगायचे राहिलेच, आमचा पहिला मुद्दा मात्र आम्हाला अमलात आणता आला. आम्हीही संरचनेचे काही पर्याय बनवून विकासकाच्या आर्किटेक्टशी वारंवार चर्चा केली. शेवटी ज्यात वॉश बेसिन व वॉशिंग मशीन सामावू शकेल असा रुंद सामायिक पॅसेज देणारा आराखडा सर्वानुमते मंजूर झाला.
(नगर नियोजन तज्ज्ञ व वास्तुविशारद) ● preetipetheinamdar@gmail. com