आपल्या संस्कृतीमध्ये नद्या, सागर, महासागर आणि जलस्रोत असलेल्या अन्य जलाशयांना श्रद्धायुक्त स्थान आहे. त्यामुळे त्यांचे ऋ ण मानून त्याचे पूजन करण्याचा प्रघात आहे. याला हजारो वर्षांच्या आर्यकालीन संस्कृतीपासूनचा इतिहास आहे. प्राचीन काळी भारतभूमीवर आगमन झाल्यानंतर या अज्ञात आर्यानी नदीकाठच्या परिसराची स्थैर्यासाठी निवड करून भारतीय संस्कृतीला विश्वमान्यता दिली.. थोडक्यात काय तर, पाणी हेच जीवन असल्याने त्याला देवस्वरूप मानले  गेले.

पाण्याचे हे महत्त्व एकदा मान्य केल्यावर मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठय़ा विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यातील काही विहिरींना त्यांच्या भव्यतेसह कलापूर्ण वास्तूचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. गुजरातमधील पाटण नगरी नजीकची ‘रानी की बाव’ या विहिरीवर तर जागतिक वारसा वास्तूची मोहोर उमटली आहे. इतकी ती असामान्य कलाकृती पूर्णरीत्या बांधली गेली.

सध्याच्या औद्योगिकीकरणाच्या धबडग्यात शहरीकरणाचा आधुनिक चेहरा धारण करतानाही मुंबईसारख्या प्रगत शहरात आजही काही विहिरी त्यांच्यातील जलसाठय़ाबरोबर पूर्वापारचा इतिहास, संस्कृतीचे मोल जपून आहेत. त्यांनाही वारसा-वास्तूंचे मोल आहेच. त्यांपैकी मुंबईतील हुतात्मा चौक ते चर्चगेट मार्गावरील ‘पारशी बावडी’ ही विहीर आता तीन शतकांची उमर पार करतेय.. बावडी म्हणजे विहीर. भिकाजी बेहरामजी नावाच्या धार्मिक श्रद्धावान पारशी माणसाचे नाव जरी या बावडीला असले तरी ‘पारशी बावडी’ नावानेच ही विहीर सर्वत्र ओळखली जाते.

हुतात्मा चौक ते चर्चगेट या वीर नरिमन मार्गावर मध्यवर्ती टेलिग्राफ कार्यालयाच्या समोर तसेच फॅशन स्ट्रीटच्या वळणावर प्रथमत: आपल्याला दिसेल ते एक लोखंडी फाटक. त्याच्यावरच भिकाजी बेहरामजींच्या नावाचा फलक आहे. या बंदिस्त बावडीच्या प्रांगणात पारशी समाजाव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश निषिद्ध, अशा आशयाची सूचनाही वाचावयास मिळते. वास्तविक पारशी समाज म्हणजे मुळात परोपकारी, दानशूर आणि पुरोगामी असून, ही सूचना प्रदर्शित करण्यामागे धर्माचे अधिष्ठान असलेल्या या देवस्वरूप बावडीचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न असल्याने, तसा कुणीही आतमध्ये प्रवेश करण्याचा आततायीपणा करण्याचे धाडस करणार नाही.. याला कारण समाजमनातील पारशी बांधवांबद्दलचा कृतज्ञता भाव आहे. जिज्ञासू, पर्यटक, प्रवासी फाटकाच्या दर्शनी भागीच आत डोकावून या विहिरीचं लांबूनच दर्शन घेऊन मार्गस्थ होतात.

या बावडीच्या सभोवतालची संरक्षणासाठी उभारलेल्या भिंतीवर दर्शनीभागी एक कमान लागते. त्यावर पारशी धर्मीयांच्या तत्त्वप्रणालीनुसार काही बोधचिन्ह आढळतात. सतत वाहत्या, गजबजलेल्या रस्त्यालगत असूनही बावडी सभोवतालचा सारा परिसर स्वच्छ आणि दुर्मीळ शांततेचा आहे हे विशेष. यातून पारशी धर्मीय कसे शांतताप्रिय आहेत याचे दर्शनही घडतेच. बावडीच्या सभोवतालच्या बाकावर बसून शांततेत, चित्ताची एकाग्रता साधत हातातील जपमाळ ओढत बसलेले सर्व वयोगटातील पारशी बांधव प्रार्थनेत एकाग्र झालेले दिसतात.

सुमारे ३०० वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या या बावडीला इतिहास आहे. १८ व्या शतकाच्या प्रारंभी भिकाजी बेहरामजी नावाचा एक पारशी गृहस्थ पोटापाण्यासाठी गुजरातच्या भरुच नगरीतून मजल-दरमजल करत मुंबईकडे येत होता. तो काळ म्हणजे मराठे विरुद्ध गुजरातच्या सुल्तानाच्या युद्धधुमश्चक्रीचा काळ होता. काही एक गुन्हा नसताना पापभिरू बाळबोध स्वभावाच्या भिकाजी बेहरामजीला मुसलमान समजून तुरुंगात ठेवले गेले. पण बऱ्याच काळाने या बेहरामजीने आपल्या प्रामाणिक वागणुकीने प्रशासनाला वास्तुस्थिती समजावून दिल्यावर त्याची निदरेष मुक्तता झाली. अन्याय होऊनही भिकाजी बेहरामजीने प्रशासनकर्त्यांविषयी उद्रेक – कटुतेची भावना मनात ठेवली नाही.

मुंबई महानगरीत व्यापार-उद्योग करून स्थिरावल्यावर समाजऋ ण फेडण्यासाठी या पारशी बावाजीने इ. स. १७२५ मध्ये या विहिरीचे खोदकाम पूर्ण करून तहानलेल्या पांथस्थांचीही सोय केली, तेव्हापासून त्याच्या नावानेच भिकाजी बेहराम बावडी म्हणून ही विहीर सर्वत्र ओळखली जातेय. तोपर्यंत मुंबई परिक्षेत्रात खासगी मालकीच्या अनेक विहिरी होत्याच. तरी या पारशी बावडीला श्रद्धास्थानाचे महत्त्व प्राप्त व्हायला कारणही तसच घडले.

१८व्या शतकाच्या प्रारंभी अरबी समुद्राचे पाणी आजच्या चर्चगेट रेल्वेस्थानकापर्यंत येत असे, तेव्हा त्याच्या नजीकच्या या विहिरीत गोडय़ा पाण्याचा साठा कसा? या चमत्काराने सर्वत्र आश्चर्याची भावना निर्माण झाली. आणि पाठोपाठ हे एक श्रद्धास्थान म्हणून सर्वश्रुत झाले. समाजऋ ण मानणाऱ्या पारशी समाजाने अनेक बावडय़ा बांधल्या असल्या तरी श्रद्धेचे स्थान मात्र या पारशी बावडीला आजतागायत आहे.

पारशी धर्मीयांनुसार ‘आवा’ नावाचा एक पवित्र महिना आहे. अग्नीप्रमाणेच जलपूजेलाही या धर्मात अग्रस्थान असल्याने ‘आवान याझद’ ही जलदेवता ओघानेच श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाते. या आवा महिन्यात पारशी बांधव प्रार्थनेसाठी बावडीला हजेरी लावतात. जेडीला प्रत्येक शुक्रवारी जो कुणी या बावडीजवळ दिवा प्रज्ज्वलित करून प्रार्थना करेल त्याची मनोकामना पूर्ण होते, अशी एक श्रद्धा पारशी समाजाबरोबर इतर धर्मीयांतही आहे.

आपल्या देशात अल्पसंख्याक असूनही सरकार दरबारी कोणतीच मागणी न करता समाजाला देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पारशी बांधवांचा मुंबई नगरीच्या  जडणघडणीत खूप मोठा सहभाग आहे. त्यांनी सामाजिक ऋ ण मानून उभारलेल्या अनेक लोकोपयोगी वास्तूंना वारसा स्थळाचा लौकिक आहेच, त्यापैकी या पारशी बावडीला ‘अ’ श्रेणीचा वारसावास्तू दर्जा प्राप्त झालाय.

पारशी समाजाला शांततेबरोबर निसर्गसहवासाची अनोखी ओढ आहेच. त्यानुसार या बावडीचे जतन-संवर्धन करताना या ऐतिहासिक विहिरीवर दगडी सुशोभीकरणाचा साज असून, जोडीला स्टेनग्लासयुक्त आवरणाने त्याचे सौंदर्य खुलवले गेले आहे. बावडीच्या एकूण बांधकामातून पारसी समाजाच्या ‘झोरास्ट्रियन’ धर्मतत्त्वप्रणालीचही अनोखे दर्शन घडते. या बावडी वास्तूच्या माध्यमातून गजबजाटाच्या वातावरणातही चार घटका नामस्मरण करून समाजऋ ण फेडण्यासाठी परोपकार जपण्याचा संदेशही देण्याचा प्रयत्न वाखणण्यासारखा आहे. या बावडीचे संवर्धन जतन करताना त्या मूळ बांधकामाला बाधा येणार नाही यासाठी पारशी समाज नेहमीच सजग-दक्ष आहे.

arun.malekar10@gmail.com

Story img Loader