|| विश्वासराव सकपाळ
गृहनिर्माण संस्थेतील सामायिक जागा आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी..
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कारभार ज्या आदर्श उपविधीनुसार होत असे त्यात काही त्रुटी होत्या. ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार नवीन आदर्श उपविधी २०१३ मध्ये तयार करण्यात आला असून, आतापर्यंत बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या अधिमंडळाच्या वार्षकि बठकीत त्याबाबत रीतसर ठराव करून मंजूरही करून घेतला असणारच. अधिक सुस्पष्ट अशा या उपविधींमुळे व्यवस्थापकीय समितीकडे केवळ कार्यपद्धती म्हणून पाहिले जात होते. आता व्यवस्थापक समितीला नवीन आदर्श उपविधीने अधिकारही बहाल केले आहेत. या समितीवरील जबाबदारी वाढविण्याबरोबरच सहकारी गृहनिर्माण संस्थांना शिस्त लागावी या दिशेनेही आखणी केल्याचे दिसून येते. जुन्या आणि नव्या उपविधीवर नजर टाकल्यास यापूर्वी व्यवस्थापकीय समितीने करावयाची कामे व कर्तव्ये यावरच विशेष भर देण्यात आला होता. परंतु आता व्यवस्थापकीय समितीला फक्त अधिकारच नव्हे तर कामकाज, कर्तव्ये आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. याशिवाय सध्या सर्वत्र पुनर्वकिासाचे वारे वाहत असताना, व्यवस्थापकीय समितीची जबाबदारी स्पष्ट करून देताना त्यांना त्या अनुषंगाने कर्त्यव्याचीही जाणीव करून देण्यात आली आहे. काही कलमे नव्याने अंतर्भूत करून सध्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना स्पर्श करण्यात आला आहे. व्यवस्थापकीय समितीची कामे वाढली असून, त्यानुसार त्यांना अनेक बाबी निबंधकांना सादर कराव्या लागणार आहेत.
नव्या सुधारणा बाबतचा तपशील खालीलप्रमाणे
सभासद होण्यासाठी संस्थेला देय असलेली रक्कम व विहित नमुन्यात अर्ज करून हितसंबंध संपादन केल्याशिवाय अधिनियम, नियम व उपविधी यात तरतूद केल्याप्रमाणे असे हक्क वापरण्यास पात्र ठरणार नाही. अशा तऱ्हेने पात्र सभासदास संस्थेच्या सामायिक जागेचा वापर व उपभोग स्वत:साठी व कुटुंबासाठी करण्याचा पूर्ण अधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे इतर सभासदांना / सदनिकाधारकांना त्रास किंवा अडचण होईल अशा प्रकारे सामायिक जागेचा वापर करणार नाही. तसेच ज्या कारणासाठी सदरची सामायिक जागा असेल त्याच पद्धतीने वापरणे बंधनकारक आहे.
त्यामुळे संबंधित सामायिक जागेवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण किंवा बदल करता येणार नाही. मोकळी जागा ही सहकारी गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता असून, तिचा गरवापर किंवा अतिक्रमण करणाऱ्या संस्थेच्या सभासदांवर दरमहाच्या देखभालीच्या पाच पट देखभाल खर्च द्यावा लागेल. त्याबाबत अधिक माहिती घेऊ-
सामायिक जागा
संस्थेच्या सर्व अधिकृत सभासदांच्या वापरासाठी असलेल्या सर्व खुल्या जागा. सामायिक जागा म्हणजे संस्थेचे जिने, पायऱ्या उतरण्याच्या जागा, वाहने ठेवण्याच्या जागा, उद्वाहन, कॉरिडॉर, लॉबीज्, जिन्याखालील मोकळी जमीन, गच्ची, संस्थेच्या आवारातील मोकळी जमीन, हिरवळ, क्लब, सामायिक हॉल, तळघर इत्यादी उपविधी क्रमांक १६९ – ( अ ) :- संस्थेच्या सर्व सभासदांच्या वापरासाठी उपलब्ध असलेल्या सामायिक जागा कोणताही सदस्य स्वत:च्या वापरासाठी ताब्यात घेऊ शकणार नाही. अशा जागा ज्या कारणांसाठी आहेत त्याच कारणांसाठी र्निबधित करण्यात येतील. जो कोणी सदस्य वरील शर्तीचा, अतिक्रमण करून भंग करताना आढळेल त्याला हे अतिक्रमण मोकळे करावे लागेल; एवढेच नव्हे तर त्याला / तिला, त्याने / तिने जितका काळ अशा जागांवर अतिक्रमण केले असेल त्या कालावधीसाठी दरमहाच्या देखभालीच्या पाचपट देखभाल खर्च द्यावा लागेल.
सामायिक जागेचा गैरवापर
सदनिकेच्या प्रवेशद्वारासमोरील व आजूबाजूच्या जागेचा वापर संस्थेचे सभासद व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या चपला व बूट ठेवण्यासाठी करतात. बऱ्याचदा कुटुंबीयांची संख्या जास्त असल्यास किंवा त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांचा राबता जास्त असल्यास चपला व बुटांचा खच आजूबाजूच्या व समोरील सदनिकाधारकांच्या प्रवेशद्वारापर्यंत पसरलेला पाहावयास मिळतो. उद्वाहन असणाऱ्या इमारतींमध्ये जिन्याच्या पायऱ्यांचा वापर चपला / बूट व केराचा डबा ठेवण्यासाठी सर्रास केला जातो. पूर्वी प्रत्येक मजल्यावर सदनिकांच्या समोरील मोकळी जागा फारच कमी असे, परंतु आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुलात व पुनर्वकिास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर सदनिकेसमोरील तसेच उद्वाहनासमोरील कॉरिडॉर / लॉबीज प्रशस्त व लांब-रुंद असतात. परिणामी अशा संस्थेचे सभासद त्यांच्या कुटुंबीयांच्या चपला / बूट ठेवतात. तसेच चपला / बूट घालण्यासाठी बसताना छोटा सोफाही ठेवतात. काही जण सदनिकेबाहेरील मोकळ्या जागेत कृत्रिम फुलांचे फ्लॉवर पॉट्स, लाकडी हत्ती, स्वागत करणऱ्या लाकडी बाहुल्या, फूलझाडांच्या कुंडय़ा, समया व अन्य शोभेच्या वस्तू ठेवतात. संस्थेचे काही सभासद आवारातील मोकळ्या जागेचा वापर घरातील नको असलेले लाकडी सामान, फíनचर, कपाटे व अन्य जुन्या-पुराण्या वस्तू ठेवण्यासाठी करतात. काही सभासद तर त्यांच्या सदनिका पॅसेजच्या एका टोकाला किंवा उद्वाहनाच्या बाजूच्या पॅसेजला लागून असतील तर असे सभासद संपूर्ण पॅसेजच्या सुरुवातीस सुरक्षा-दरवाजा (सेफ्टी डोअर) बसवून संपूर्ण पॅसेज आत घेऊन त्याचा वैयक्तिक वापर करतात. संस्थेतील मोकळ्या आवाराचा व संस्थेच्या इमारतीमधील सामायिक जागेचा वैयक्तिक कारणांसाठी केलेला वापर अन्य सभासदांना अडचणीचा व त्रासदायक ठरतो. संस्थेचे मोकळे आवार व सामायिक जागा ही संस्थेची मालमत्ता आहे व तिचा वैयक्तिक कारणासाठी गरवापर करणे म्हणजे संस्थेच्या जागेवरील अतिक्रमणच आहे.
संस्थेच्या मोकळ्या जागेचा वापर व सामायिक जागांच्या वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन कारणाऱ्या सभासदांवर दंडात्मक कारवाई म्हणून जितका काळ अशा जागांवर अतिक्रमण केले असेल त्या कालावधीसाठी दरमहाच्या देखभालीच्या पाच पट देखभाल खर्च वसूल करण्याचा अधिकार व्यवस्थापकीय समितीस बहाल केला असला तरी संस्थेने अशी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी संबंधित सभासदाला एक संधी देणे योग्य ठरेल. सामायिक जागेचा गरवापर /अतिक्रमण कारणाऱ्या संबंधित सभासदाला व्यवस्थापकीय समितीने त्याला विहित मुदतीत सामान हलविण्यास सांगण्यात यावे व तसे करण्यास कसूर केल्यास नाइलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागेल, अशा आशयाचे पत्र देण्यात यावे. याउपरही जर त्याने सामान हलवले नाही तर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून संबंधित सभासदाला दंड आकारणीबाबत ठराव मंजूर करून घ्यावा व त्याच्या मासिक देयकात तेवढी रक्कम दाखवावी. सदरहू रक्कम न भरल्यास संस्थेच्या नियमाप्रमाणे त्यावर सरळ १८ टक्के दराने व्याज आकारण्यात यावे. सदरहू रक्कम त्याने न भरल्यास आवश्यक तेवढी थकबाकी जमा झाली की त्या सभासदाविरुद्ध कलम १०१ अंतर्गत वसुली दाखला मिळविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी.
vish26rao@yahoo.co.in