|| रजनी अशोक देवधर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घराच्या तीन बाजूला पऱ्ह्यचे जणू नसíगक कुंपण, समोरच्या रस्त्यापलीकडे कातळ, एकेकाळी लालचुटुक मातीचे रस्ते असलेल्या गावाच्या मधोमध वसलेले.. कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातले दापोली तालुक्यातील देगाव गावातले कोष्टय़ाच्या माळावरील इंदिराबाई ऊर्फ वहिनींचे घर वस्तीपासून तसे दूर नाही, मात्र खूप मोठे आवार आणि कुंपणाच्या पलीकडे पऱ्ह्य असल्याने इतर घरांपासून काहीसे वेगळे झाले आहे. फणसू गावालगतच्या गावाच्या वेशीवरून देगाव गावात आल्यावर गावाकडे सरळ चालत राहिले की मुख्य रस्त्यावरून आत डावीकडे हाकेच्या अंतरावर दाट वृक्षांनी वेढलेले ग्रामदेवतेचे झोलाईचे देऊळ नजरेस पडते. झोलाई देवीचे दर्शन घेऊन पुढे गेले की रस्त्यालगत डावीकडे आहे एक छोटीशी टेकडी. ती मागे टाकल्यावर येते गावापासून जरा दूर असलेली बुद्धवाडी. नंतर कातळ वाडी, मग मराठवाडी, बाजूला गुरवांची घरे, नंतर इंदिराबाईंचे ऊर्फ वहिनींचे घर. कुंपणालगत पऱ्ह्य.. पावसाळ्यात फेसाळत्या पाण्याने दुथडी भरून खळाळत वाहणारा. नीरव शांततेत नादमाधुर्य देणारा. घरामागे आहे गणपतीचे देऊळ, शेजारी िपपळाचा पुरातन वृक्ष आणि भोवताली टेप ऊर्फ टेकडय़ा, करवंदाच्या जाळ्या, कुडा, किंजळ, कुंभ, काजू, आंबा, खैर अशा झाडांनी हिरव्यागार झालेल्या, त्यांच्या मधून वाहणारी पाताळी नदी; घराच्या भोवती पावसाळ्यात खळाळून वाहणाऱ्या पऱ्ह्य सामावून घेत डोंगर रांगांमधून नागमोडी वळणे घेत ऊनवाऱ्याच्या खाडीमधे विलीन होणारी. घरासमोरचा रस्ता पुढे कोंड नामकवाडीकडे जातो ही गावाची दुसऱ्या बाजूची शेवटची वस्ती आणि तेथून पुढे गावाची वस्ती संपते. आणि डोंगरातून आधी चढत, तर नंतर वळणावळणाने उतरत जाणारा घरासमोरचा तो रस्ता उन्हवरे गावात खाडीपाशी जातो. निसर्गरम्य देगाव गावातील कोष्टय़ाच्या माळावरील ते कौलारू घर इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर नामक एका आगळ्या कर्मयोगिनीचे. सुमारे सात दशक तिच्या वास्तव्याने धन्य झालेले, तिच्या संस्काराने देखणे झालेले..
घराच्या कुंपणाचे फाटक उघडून आत गेले की दोन्ही बाजूला रम्य उपवन जणू इतक्या नाना विविध वृक्षांच्या, फुलझाडांच्या हिरवाईची सुंदर आल्हाददायक लागवड आणि त्यातून मधोमध जाणारा रस्ता. त्याच्या पायऱ्यांवरून खाली उतरले की सारवलेले अंगण आहे. तेथून घरात आल्यावर लागते मोठी पुढची पडवी. घराचे जोते चांगले तीन फुटांहून उंच, त्यामुळे पडवीतून ओटीवर मुख्य घरात जाताना जांभा दगडाच्या तीन उंच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून ओटीवर आलं की पायऱ्यांजवळ एक दगडासारखा मजबूत लाकडी खांब आहे. ओटीवरचा घराच्या अंतर्भागात घेऊन जाणारा दरवाजा माजघरात उघडतो. माजघराच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर उजव्या बाजूला खोली, स्वयंपाकघर आणि माजघराला जोडणारी मागची पडवी, घराच्या कडेला असलेल्या बाजूच्या पडवीतील तीन खोल्या वर माळा असे ऐसपस प्रशस्त घर. तितकेच प्रशस्त अंगण व मागचे परसू. पुढच्या पडवीतून घरात आल्यावर ओटीवरच्या माजघरात उघडणाऱ्या मोठय़ा लाकडी दरवाजाची नक्षीदार कलाकुसरीची चौकट आणि दरवाजावरच्या भिंतीवर विराजमान झालेले लंबकाचे दोन बाजूला मोरांची सुंदर नक्षी असलेल्या लाकडी चौकटीतले घडय़ाळ घरातील माणसांची सौंदर्यदृष्टी दर्शविणारे. तर घराचा पुढच्या अंगणात उघडणारा पुढच्या पडवीतला मुख्य दरवाजा, माजघराचे पुढच्या ओटीवर आणि मागच्या पडवीत उघडणारे दोन दरवाजे आणि मागच्या पडवीतला परसात उघडणारा मागचा दरवाजा असे चार दरवाजे एकासमोर एक येतील अशी रचना; घराची सुरेख आखणी दर्शविणारे आहेत. पुढच्या अंगणातील कुंपणाचे फाटक, अंगण आणि मागच्या परसातील विहीर या घराच्या दोन बाजूच्या परिसरांना जोडण्यासाठी अशी रचना करण्यात आली आहे. मागच्या परसातील विहिरीच्या रहाटाजवळ असलेल्या व्यक्तीला पुढच्या अंगणातील मुख्य फाटकातून आत घराकडे येणारी व्यक्ती दिसावी, मागच्या परसातून घरापुढच्या अंगणातील वावर कळावा, घराच्या मुख्य अंतर्भागातून म्हणजेच माजघरातून घरापुढचे अंगण, फाटक आणि मागचे परसू दोन्ही परिसर दिसावेत यासाठी अशा चार दरवाजांची एकासमोर एक रचना करणे हे कुशलतेने घराचा आराखडा रेखताना केलेले चातुर्य सहसा कुठल्या घरात न आढळणारे. कोकणातील या घरात त्या काळातही फारशा पाहायला न मिळणाऱ्या आगळ्या गोष्टी आहेत. तिथे माळ्यावर धान्य साठविण्याचे, दोन जाड लाकडी अजस्र महाकाय हडपे (पेटारे) आहेत. लांबी रुंदी सहा व चार उंची तीन फूट असे हे अवजड वजनदार हडपे अर्थातच घर बांधल्यानंतर माजघरातील छोटय़ा लाकडी जिन्याने माळ्यावर नेले नाहीत तर घर बांधताना भिंती बांधायच्या आधी लाकडी जाड फळ्यांपासून तयार करून घरातल्या खांबांचा आधार घेऊन विराजमान केले गेले आहेत. ओटीवरचा लाकडी मजबूत खांब आणि भिंतीतल्या जांभा दगडाच्या खांबांनी अवजड हडप्यांना आधार दिला आहे. घराच्या मागच्या पडवीत गावात त्या काळात एकमेव असलेले भात भरडण्याचे जाते ऊर्फ घरट दिसते. धान्य दळण्यासाठी जाती तेव्हा घरोघरी असत, मात्र भात भरडण्यासाठी गावात फक्त या घरात घरट होते. गावातल्या बायका भात भरडण्याच्या कामासाठी तेव्हा येत. घरट आकाराने मोठे व जड असल्याने जात्याप्रमाणे बसून नाही तर उभे राहून फिरवायला लागते. घरट ओढायला दोन जणी लागत. घरटाचा सात फूट लांब उंच दांडा घरटात घट्ट ठोकून त्याचे वरचे टोक घराच्या कौलाच्या खालच्या लाकडी वाश्यावर केलेल्या वर्तुळाकार भोकात अडकवायचे व दांडा धरून घरट दोघींनी ओढायचे की घरट फिरते राहून फोलपट बाजूला होत तांदूळ मिळतो. तांदूळ उखळात घेऊन कांडला की उरलीसुरली तूस कोंडा वेगळा होऊन भात करण्याजोगा हातसडीचा सकस रुचकर तांदूळ तयार होतो. स्वयंपाकघरात खलबत्ता, पाटा वरवंटा, जातं तेव्हा सगळीकडेच असायचं. मात्र या घरात भात भरडण्यासाठी घरट आणि कांडण्यासाठी दगडी उखळ-मुसळही आहे. मागील परसात विहिरीजवळ पाणी साठविण्याचे साठ /सत्तर लिटर क्षमतेचे दगडी द्रोण तिथे आहेत. कुठेही जोडकाम, गिलावा न करता अखंड दगडातून खोदून काढलेली ही पाणी साठवणीची मोठी गोलाकार भांडी हे जुन्या काळातील वैशिष्टय़ तिथे जतन केलेले पाहायला मिळते. इंदिराबाई गोंधळेकर अवघ्या ३६ वर्षांच्या असताना पती निधनाची कौटुंबिक आपत्ती त्यांच्यावर आली, मात्र या कणखर स्त्रीने दु:ख बाजूला सारत न डगमगता चिकाटी व मेहनतीची कास धरत हिकमतीने सात मुलं वाढविली. त्यांना सचोटी व श्रमसंस्कार देत उच्चशिक्षित केले. गोंधळेकर घराणे सुधारक पुरोगामी विचारसरणीचे, इंदिराबाईंचा पती विद्याधर पुरोगामी विचारसरणीचा, स्पृश्यास्पृश्य भेदभाव न मानणारा. दापोलीतील तत्कालीन श्रेष्ठ समाजसुधारक बाबा फाटक यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात मेलेल्या गुरांची कातडी सोलण्याच्या कामातही सहभागी होणारा, त्याच्या निधनानंतर इंदिराबाईंनी खडतर परिस्थितीतून जाताना त्याचे पुरोगामी, समतेचे आणि माणुसकीचे विचार स्वत: अंगीकारत वाढवले, मुलांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत नेले. स्वत:च्या मुलांची कुटुंबाची जबाबदारी निभावताना आजूबाजूच्या गरजू लोकांना मदतीचा हात दिला. धार्मिक कर्मकांडांचे नव्हे तर सचोटी, समानता, श्रमसंस्कार त्यांच्यात उत्तम रुजविले. उत्तम मूल्ये आणि सामाजिक भान दिले. रंजल्यागांजल्यांना मदतीचा हात देत पायावर उभं करण्यासाठी साहाय्य करणे, सक्षम करणे हे विचार कृतीतून रुजविल्यामुळे त्यांचा मुलगा मुकुंद गोंधळेकर यांनी ‘राजमाची ग्राम सहाय योजना’ व मुलगी स्मिता जोशी यांनी ‘बांधिलकी’ या संस्थांच्या निर्मितीद्वारे अविरत काम करून आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला समाजसेवेचा वाटा दिला आहे. घरात सुबत्ता आल्यानंतरदेखील चिरतरुण निकोप प्रकृती राखून असलेल्या इंदिराबाईंनी स्वावलंबन व श्रमांशी अजिबात फारकत घेतली नाही. नव्या-जुन्या विचारांची व्यावहारिक सांगड घालत समतोल राखला हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांनी नातवंडा-पतवंडांसारखे झाडेमाडे यांच्याशीही मत्र राखले. एक एकराच्या मोठय़ा कंपाउंडमधल्या साऱ्या झाडांची निगराणी, विचारपूस करताना सकाळी बागेतली ताजी फुले आणून तबकात, फुलदाणीत सजवायची तर दुपारी रिकाम्या वेळात विळीवर बसून माडाच्या झावळ्या सोलत हीर काढून खराटे बनवायचे, त्यांच्या बागेतला, कोकणचा राजा असलेला हापूस आंबा त्याचे उत्पादन, व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी स्वत: लक्ष घालायचे हे सर्व नवीन शिकण्याची आंस असलेली, सतत कार्यरत राहिलेली ही कर्मयोगिनी शेवटपर्यंत म्हणजे १०१ वयापर्यंत या घरात करत राहिली. तिने व उत्तम संस्काराने घडविलेल्या तिच्या मुलांनी १९४१ साली बांधलेली ही पाऊणशे वयाची कोकणातील ही जुनी वास्तू नव्या-जुन्या शैलीचा संगम करून अधिक देखणी केली आहे.
deodharrajani@gmail.com