गणपती विसर्जन करताना आपण त्याला भरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने हात जोडून निरोप द्यायला. घराच्या दारात, खाली मान घालून उभे असताना पुनरागमनायच म्हणून त्याला निरोप देतो तो या भावनेने आणि खात्रीने की, तू काही काळाने, आमच्या घरात सुखशांती आणण्यासाठी परत येणार आहेस, त्यासाठी तुला आज निरोप देतोय! जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत असताना, प्रत्येक बिऱ्हाडकरूच्या मनात अशाच भावना असणार नाही का?

अप्पांनी आल्या आल्या काकूंना सांगितलं, ‘‘चला गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पुढल्या महिन्यात जागा खाली करायला लागणार.’’ गेली जवळपास दोन वर्षं, सोसायटीच्या पुनर्विकासाचा विषय सोसायटीत गाजत होता. तशी लहानशीच, म्हणजे वीस जणांचीच सोसायटी, बहुतेक सभासद चाळींतून ब्लॉकमध्ये राहायला आलेले. तेव्हा सगळे आपल्या घराला ब्लॉकच म्हणत, नंतर मग त्याचे फ्लॅट झाले. आणि घरांना बिऱ्हाड म्हणत. अजूनही ते आपल्या सोसायटीच्या घरांबद्दल बोलताना बिऱ्हाडच म्हणतात. बहुतेक नोकरपेशाचे लोक, कुटुंबाचा आकारसुद्धा अगदी सुटसुटीत, ‘हम दो हमारे दो’च्या हिशेबात बसणारे. थोडक्यात, सर्वच घरातून काटकसरीतून समाधान शोधणारी कुटुंबे.

या अशा सुखी समाधानाने जगणाऱ्या कुटुंबांचे कुटुंब प्रमुख इमानेइतबारे आपला नोकरी व्यवसाय करून आता पेन्शनीत पोहचलेले. काही इहलोकीची यात्रा संपवून पुढे मार्गस्थ झालेले. बहुतेक घरात मुलाबाळांची शिक्षणे पूर्ण करून बहुतेक घरात सुना नातवंडेसुद्धा आलेली. एक दोन घरं सोडली तर आधुनिक काळाला अनुसरून घरातील मुलगे एकतर परदेशी गेलेले किंवा शहरात आपल्या कुटुंबासह इतरत्र वेगळे राहू लागलेले… कालौघात इथल्या कुटुंबांबरोबरच सोसायटीची इमारतसुद्धा वृद्ध झालेली. तिच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू झालेल्या, मध्यंतरी लहान सहान दुरुस्त्या किती झाल्या याला गणनाच नाही. तिच्यावर अंतरा अंतराने मोठी ऑपरेशनसुद्धा पार पडलेली. इथले मूळ घरमालक आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याबरोबरच सोसायटी बिल्डिंगच्या प्रकृतीचीही काळजी त्यांच्या परीने घेत होते, पण आता त्यांचेच पाय लटपटू लागल्यावर इमारतीची काळजी कोण घेणार हा प्रश्न सगळ्यांना भेडसावू लागला आणि हो-ना (यातला ‘ना’ च जास्त) करता, अखेर सोसायटी पुनर्विकासासाठी काढायची (हा ‘काढायची’हा शब्दसुद्धा खास) ठरले. आणि वर्षं दोन वर्षांच्या घमासान चर्चांच्या अनेक फेऱ्या पार पडल्यावर, सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आज एकदाचा पक्का झाला आणि आता महिन्याभरात इमारत रिकामी करून बिल्डरच्या ताब्यात देण्याचे पक्के झाले. म्हणून मीटिंगहून आल्या आल्या घर रिकामे करून देण्याचा विषय अप्पांनी काकूंजवळ काढला.

काकू म्हणाल्या, ‘‘आता हे इतकं… इतक्या वर्षांपासून साठवलेलं सगळं सामान दुसरीकडे हालवायचं या नुसत्या कल्पनेनंच छाती दडपून गेलीय! माहित्येय मला, आपण ते सगळं सामान पोहचवून देणाऱ्या कंपनीकडे सोपवणार आहोत. पण म्हणून काय झालं, आपल्या वयाला नुसत्या घराचं सामान हलवण्याच्या कल्पनेनेच दमून जायला होतंय.’’

अप्पा म्हणाले, ‘‘तुला आठवत का गं! आपण गिरगावातल्या चाळीतून येताना किती मोजकं सामान आणलं होतं. तू आणि मी ट्रेन पकडून बोरिवलीला या घरी आलो आणि मग हातगाडीवाला आपलं सामान हातगाडीवरून घेऊन येथे आला. त्यापूर्वी ते सामानसुद्धा, आधी काही दिवस आणून चाळीत आजूबाजूच्या बिऱ्हाडातून आपण ठेवून दिलं होतं. प्रत्येक नवीन गोष्टी घेत असताना आपल्याला त्याचं केवढं अप्रूप आणि कौतुक! कोणाकोणाच्या ओळखी काढून चार पैसे कमी पडतील तेथून उरापोटावरून सामान आणून घर सजवत नेलं. पण आता त्यात मन गुंतवून चालणार नाही. पण हेही खरं! जिकडे जाऊ तिकडेसुद्धा पुन्हा संसार म्हटलं की सामान हवंच ना? पण आता आपल्याला दोघांना लागेल इतकं नव्हे, तर पुरेल इतकंच सामान न्यायचं, हे मात्र पक्कं लक्षात ठेवू या. शक्यतो सामानासकट मिळणार असेल अशाच एखाद्या जागेच्या शोधात राहू आणि इथलं बहुतेक सामान इथेच सोडून देऊ.’’

काकू म्हणाल्या, ‘‘आज संध्याकाळी निखिलचा नेहमीसारखा फोन येईल, नाही आला तर तुम्ही करा आणि सर्व हकिकत कानावर घाला.’’ अप्पा म्हणाले, ‘‘ते तर करायलाच हवं. त्याचा नाही आला तर मी फोन करीन. त्याला तर सर्व कळवायलाच हवं. पुढचे सोपस्कार आपल्याला थोडेच झेपणार आहेत, त्याच्यावर सोपवलं की आपण निर्धास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे, जुन्या वस्तूंची पाठवणी आणि ने-आण, हल्लीच्या भाषेत ‘शिफ्टिंग’ हा विषय आपण पूर्णपणे निखिलवर सोपवून देऊ, तो करील ती पूर्वदिशा! कारण, आज घराचे मालक आपण असलो, तरी नंतर तोच मालक होणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण काही घरावर तुळशीपत्र वगैरे ठेवत नाही, आपण ते कृतार्थ भावनेनं, आनंदानं, पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत आहोत. अगं, आपल्या माळ्यावर बघ किती सामान आहे. त्यातलं नव्याण्णव टक्के सामान गेल्या वीस-पंचवीस वर्षांत खाली काढलेलं नाही, कारण कधीतरी उपयोगाला येईल म्हणून ठेवलेल्या वस्तू गेल्या वीस-पंचवीस वर्षांत एकदाही खाली काढलेल्या नाहीत आणि आता आपल्याला यानंतर त्याची गरज पडेल याची सुतराम शक्यता दिसत नाही. कोणाला हव्यात का म्हणून विचारायला जाण्यात अर्थ नाही, हल्ली गरजवंत शोधणेसुद्धा मोठे कठीण काम आहे. पण एखादी तशी संस्था असेल, जी गरजूंसाठी अशा गोष्टी स्वीकारत असेल तर चांगलंच आहे. तशी कुठे असेल तर शोधू. पण एक गोष्ट नक्की, नवीन घर- जे अजून दोन-पाच वर्षांनी उभं राहणार आहे, तिथे या घरातील वस्तू निरुपयोगी ठरणार नसल्या तरी त्या, त्या वास्तूला साजेशा नसणार हेही नक्कीच; तेव्हा आपल्याला कितीही वाटलं तरी त्यांचा आपला सहवास इथेच संपणार आहे तो कायमचाच! हे तुला आणि मला स्वीकारायला हवं. तेव्हा तू तुझ्या मनाची वेळीच तयारी करून ठेवलेली बरी. अगं ज्या घरात अर्धेअधिक आयुष्य घालवलं ते घरच आता जागेवर राहणार नाही, तेथे या जुन्यापुराण्या वस्तूंची काय कथा? तेव्हा काळाचा महिमा म्हणून आता आपण जड अंत:करणाने का होईना या सर्वांतून भावनिक गुंतवणूक आपल्याच हातांनी काढून घेण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

गणपती विसर्जन करताना आपण त्याला भरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने हात जोडून निरोप द्यायला. घराच्या दारात, खाली मान घालून उभे असताना पुनरागमनायच म्हणून त्याला निरोप देतो तो या भावनेने आणि खात्रीने की, तू काही काळाने, आमच्या घरात सुखशांती आणण्यासाठी परत येणार आहेस, त्यासाठी तुला आज निरोप देतोय! जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत असताना, प्रत्येक बिऱ्हाडकरूच्या मनात अशाच भावना असणार नाही का? मला वाटतं, तशाच असायला हव्यात. आज या नांदत्या घराला निरोप देतोय, ते पुनरागमनायच म्हणून… पुनश्च तुझी तितक्याच भक्तिभावाने, आदराने प्रतिष्ठापना होईल, पुनश्च तुझी नव्याने छानशी आरास करू. तुझ्या छत्रछायेखाली पुन्हा एक कुटुंब नांदू लागेल. एका पिढीचं विसर्जन होत असताना, पुढची पिढी नव्या घराच्या मखरात बहरू लागेल. त्या आधी जुन्या वस्तूंचं निर्माल्य गंगार्पण करायला हवं.

काकू, अप्पांना म्हणाल्या, ‘‘थोडक्यात, आता या घरी मंत्रपुष्पांजली म्हणण्याची वेळ झाली आहे असंच म्हणायला हवं. प्रसादाचा पेढा, आता तृप्त मनाने पुढच्या पिढीच्या हातात ठेवायला हवा.

gadrekaka@gmail. com