अॅड. तन्मय केतकर
सध्या बहुसंख्य लोकांच्या निवासाचे आणि व्यवसायाची ठिकाणे ही सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये आहेत. म्हणूनच सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात सोसायटीच्या कारभाराविषयी महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती असणे गरजेचे आहे. सोसायटीमधल्या अनेक मुद्द्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो मासिक देखभाल खर्च, त्याची थकबाकी आणि वसुलीचा.
इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेप्रमाणेच सोसायटीचा दैनंदिन आणि दीर्घकालीन कारभार सुरळीत चालण्याकरिता पैशांची आवश्यकता असते आणि त्याची उभारणी सदस्यांकडूनच मुख्यत्वे मासिक देखभाल शुल्काद्वारे करण्यात येते.
मासिक देखभाल शुल्क देणे हे सदस्यांचे कर्तव्य आहे, तर त्या पैशांचा यथायोग्य विनियोग करणे हे सोसायटीचे आणि कार्यकारी समितीचे कर्तव्य आहे. बरेचदा याबाबतीत सदस्य आणि सोसायटी समितीमध्ये वाद निर्माण होतात आणि काही वेळेस त्या वादाची परिणती सदस्याने मासिक देखभाल शुल्क थकविण्यात होते.
याबाबतीत लक्षात घ्यायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सोसायटी कारभार आणि समितीबद्दल तक्रारी असतील तर त्याबाबत स्पष्टीकरण मागण्याचा, तक्रार करण्याचा आणि गरजेनुसार त्याविरोधात यथार्थ ठिकाणी दाद मागण्याचा अधिकार सदस्यास असला, तरी त्या कारणाने मासिक देखभाल शुल्क थकविण्याचा अधिकार सदस्यास प्राप्त होत नाही.
सदस्याने मासिक देखभाल शुल्क थकविल्यास, सोसायटी त्या थकीत रकमेच्या वसुलीकरिता रीतसर कायदेशीर कारवाई करू शकते. प्रथमत: सदस्याला थकीत रकमेचा भरणा करण्याची नोटीस देऊन संधी देण्यात येते, तरीसुद्धा थकीत रकमेचा भरणा न केल्यास त्याविरोधात कलम १०१ अंतर्गत रीतसर वसुली प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. कलम १०१ अंतर्गत प्रकरण दाखल झाल्यावर, सोसायटी आणि सदस्य उभयतांना आपापले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. सोसायटीने थकीत रक्कम आणि वसुलीचा अधिकार कागदोपत्री आणि गुणवत्तेवर सिद्ध केल्यास, थकीत रकमेच्या वसुलीकरिता वसुली दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर सदस्याच्या चल-अचल संपत्तीचा ताबा आणि लिलाव करून थकीत रक्कम वसूल करता येऊ शकते. अर्थात या वसुली दाखल्याला रीतसर कायदेशीर आव्हान द्यायची संधीदेखील सदस्याकडे असल्याने, आव्हान दिले जाते का? आव्हानात काय आदेश होतात हे मुद्देसुद्धा या संदर्भात महत्त्वाचे ठरतात.
थोडक्यात काय, तर सदस्याच्या काही तक्रारी असल्या तर त्याकरिता त्याला सोसायटी समिती आणि त्यांनी दाद दिल्यास इतरत्र दाद मागता येते, मात्र आपल्या तक्रारी असल्याच्या कारणास्तव मासिक देखभाल शुल्क थकविल्यास आणि त्याविरोधात कायदेशीर कारवाई झाल्यास, चल-अचल संपती जप्ती आणि लिलावाची नामुष्की येऊ शकते हे लक्षात घेऊन, शक्यतोवर मासिक देखभाल शुल्क विनाकारण न थकविण्याची काळजी सदस्यांनी घ्यावी.
tanmayketkar@gmail.com