नीलिमा धुमाळे मरळ
आमची ही घरातली गच्चीपण खूपच मोठी- ती मस्त, छान संगमरवरी फरशांची! माझ्या मुलानं खूप घरं बघितल्यावर हे घर पसंत केलेलं. मुला-सुनेनं स्वयंपाकघराची खोली काढून बेडरूम मोठं केलं आणि स्वयंपाकघर गच्चीवरच छान प्रकारे सुसज्ज करून घेतलं. स्वयंपाकघर येथेच असल्यानं जरी जेवण बनवायला मावशी आली तरी माझा बहुतेक वेळ येथेच जातो. मला स्वयंपाकाची आवड असल्यानं मी काहीतरी बनवण्याची लुडबूड करतच असते. या गच्चीवर मस्त मोठा लाकडी झोपाळाही आहे. आता या वयात मी बागेत जाऊन झोके घेऊ शकत नाही, ते शोभणारही नाही, पण इथे मी माझ्या नातवाबरोबर मस्तपैकी मोठे-मोठे झोके घेते व मनातील इच्छा पूर्ण करते. मी जेवतेपण झोपाळ्यावर बसूनच!
समोर भलामोठा माशांचा टँक आहे. त्यात गुबगुबीत गोल्ड – फिश तसेच पापलेटसारखे दिसणारे काळ्यावर पांढऱ्या रेषा व पांढऱ्यावर काळ्या रेषा असणारे एंजल नावाचे मासे अजून बरेच काही प्रजातींचे मासे आहेत. इकडून-तिकडे सुळकन् जाणारे मासे झोपाळ्यावर निवांत बसून बघण्यात काय मजा येते ते शब्दांत सांगता येत नाही. एवढेच नव्हे तर सकाळी उठल्यावर केबलच्या वायरवर रोज आठ-दहा तरी पोपट रांगेनं बसलेले असतातच! गच्चीत लाल, गुलाबी पांढरे केशरी प्रत्येक रंगाच्या गुलाबाच्या कुंड्या आहेत, तसंच गोकर्ण, गुलबक्षी, कर्दळ, मोगरा, तुळशी अशी विविध प्रकारची झाडेही आहेत. दुपारी येथे काळ्याभोर रंगाचे पक्षी येतात, ते जरी रंगीबेरंगी नाहीत तरी त्यांचं सारखं शेपूट हलवणं मनाला मोह पाडते.
हेही वाचा >>>घरात असावे ग्रंथाचे कपाट!
खाली शंकराचे, मारुती शीतलामाईचे देऊळही आहे आणि बाजूला दोन भलेमोठे वटवृक्ष आहेत. त्यांच्या फांद्या आमच्या गच्चीपर्यंत आल्या आहेत. वडाला आणि उंबराला जेव्हा फळं लागतात तेव्हा तर काही विचारायलाच नको एवढे विविध पक्षी येतात आणि त्यांचा किलबिलाट ऐकताना मन अगदी मोहून जातं. एप्रिल-मे महिन्यात कोकिळांच्या गुंजनानं कान तृप्त होतात. आंब्याला मोहोर लागलेला असतो तेथे उभे राहून कैऱ्यांनी भरलेला तो आम्रवृक्ष पाहताना मनात लहानपणीसारखे परत दगड मारून कैऱ्या पाडण्याचा मोह होतो. असा हा घरातील आल्हाददायक जागा मनाला सुखावून जातो.
● nmsk22773@gmail.com