दक्षिण मुंबईत महाराष्ट्राच्या संस्कृतीची राजधानी म्हणून लौकिक असलेले गिरगाव आपल्या मराठी बाणा आणि अस्मिता याबाबत कायम आग्रही राहिलेले आहे. या विभागात आजमितीस शे-दीडशे वर्षांपूर्वीच्या अनेक जुन्या इमारती आहेत. काही अगदी जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेअंतर्गत बहुतांशी चाळींचा मागील सात-आठ वर्षांत पुनर्विकास होऊ लागला आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया, नियम, अटी काहीशा जाचक असल्यामुळे काही चाळींचा पुनर्विकास रखडलेला आहे. तसेच पुनर्वसन आणि भाडय़ाच्या मोबदल्यात काही रहिवाशी जरी स्थलांतरित झाले असले तरी ते नवीन घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व बदलांमध्ये जीवनशैलीसुद्धा बदलू लागली असल्यामुळे चाळ संस्कृती लुप्त होऊ लागली की काय, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे, हेही तितकेच खरे. चाळीचे मराठीपण, अस्मिता, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी जपण्याचे समाजकारण गेली अनेक दशके जपण्याचा वारसा पुढील टॉवर संस्कृतीत वाढवायचा आहे. हे एक प्रकारचे शिवधनुष्य आहे. गेली अनेक दशके सुख-समाधानाने नांदताना कितीही भिन्न मते, विचार असले तरी एकमेकांच्या गरजेला धावून जाण्याची वृत्ती, जुन्या परंपरा, रूढीची जपणूक करीत नव्या पिढीच्या संकल्पना व जीवनशैलीतील बदल स्वीकारून आपलेपणा, आत्मीयता टॉवर संस्कृतीत रुजवायची आहे. दिवसेंदिवस शहरांच्या बदलत्या परिस्थितीनुसार आणि वाढत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर व कॉस्मोपॉलिटन वातावरणात धर्मनिरपेक्ष भावनेतून मराठी संस्कृती आणि मराठीपण टिकविण्याची प्रबळ इच्छा आहे. अलीकडच्या काळात आपली संस्कृती, परंपरा व समृद्ध मराठी साहित्य जपण्याबाबत नुसत्याच घोषणा दिल्या जातात, पण त्या प्रत्यक्ष अमलात आणताना विविध धार्मिक उत्सव, सणवार, व्याख्यानमाला यांचा वारसा पुढील पिढीलासुद्धा मिळावा या उद्देशानेसुद्धा योग्य ती पावले उचलली जात आहेत. इतकेच काय, पण पुनर्विकास होताना विकासकाबरोबर त्या पद्धतीची बोलणी-चर्चासुद्धा सुरू आहे. अशा या समाजकारण वृत्तीला टॉवर संस्कृतीत भव्य असे व्यासपीठ असावे. चार माणसे एकत्र आली की मतभेद, बाचाबाची, भांडणे ही असावयाचीच, पण ती सर्व बाजूला सारून खुल्या दिलाने एकमतावर येणे ही चाळ संस्कृतीमधील शिकवण प्रत्यक्ष टॉवर संस्कृतीत अमलात आणावयाची आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे आपल्यातसुद्धा बदल होत असतात. हे बदल अंगीकृत करून नवे विचार, नवे आचार यांची सांगड घालून टॉवर संस्कृतीत मराठी अस्मिता आणि मराठीपणा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी गिरगावकर सज्ज आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले मनसुबेसुद्धा रचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा