घर नवीन असो किंवा जुनं, इथे फर्निचर, फ्रीज, टीव्ही, भिंतीवरचं घडय़ाळ अशा अनेक महत्त्वाच्या वस्तूंबरोबरच आणखी एक वस्तू अतिशय गरजेची असते, ती म्हणजे आरसा! घरात आरसा नाही, असं घर सापडणं कठीण गोष्ट आहे. इंटीरिअरमध्ये तर आरशाला घराचं आणि तिथल्या सजावटीचं सौंदर्य वाढवणारी ‘सौंदर्यपूर्ण वस्तू’ असं मानलं गेलंय. त्यामुळेच आमच्या दृष्टीने इंटीरिअरमध्ये आरशाचा वापर अतिशय योग्य रीतीने आणि आकर्षक पद्धतीने करावा लागतो. जेणेकरून त्या खोलीचं किंवा एकूणच वास्तूचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येतं.
पूर्वी आरसा म्हटला की, कुयरी, करंडा ठेवायच्या पेटीत लहानसा ‘तो’ त्यांच्या जोडीने विराजमान झालेला दिसायचा. फार फार तर अगदीच बडी असामी असेल तर त्याच्या पत्नीसाठी एक आरसा लावलेलं कपाट, टेबल असायचं. तिथे सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू जसे की, दागिने, काजळ, पिंजर, कंगवा ठेवला जायचा. काळ बदलला तसं घराचं आणि घरातल्या माणसांचं आकारमानही बदललं. इनमीन मोजकीच तीन माणसं, त्यांची कपाटं आणि या कपाटाला असणारा लांबलचक आरसा. पुढे इंटीरिअर ही संकल्पना जनमानसात रुजल्यावर बेडरूममधल्या अवजड कपाटांची जागा वॉर्डरोबने घेतली आणि या वॉर्डरोबची शोभा वाढवण्यासाठी तिथे आरशाची बठक मांडण्यात आली. वॉर्डरोबची शोभा वाढवणं किंवा सौंदर्य प्रसाधनं ठेवण्याचं ड्रेसिंग टेबल याला आरसा लावला जाऊ लागला. आज वॉर्डरोबला किंवा ड्रेसिंगला आतून किंवा बाहेरून आरसा लावला जातो. पण इंटीरिअरमध्ये आरशाचा वापर फक्त एवढय़ापुरताच मर्यादित नाही, तर त्याचा वापर अतिशय अभ्यासपूर्णरीत्या आणि त्याचे गुणधर्म लक्षात घेऊन करावा लागतो.
इंटीरिअरमध्ये आरसा हा कोणत्याही वास्तूचा (घर, दुकान, मॉल वगरे) दर्जा, सौंदर्य वाढविण्यासाठी उपयुक्त असून, जागेची लांबी-रुंदी मोठी भासवणे हा याचा मुख्य गुणधर्म आहे. जागेचं आकारमान मोठं भासविण्यासाठी आरसा हा हुकमी एक्का आहे. वास्तूमध्ये याचा योग्य प्रकारे वापर केला तर आकारमानाच्या बाबतीत आभासी प्रतिमा सुरेखरीत्या निर्माण करता येते. आरसा कोणत्याही जागेत कसाही बसवता येतो. फक्त ड्रेसिंग आणि वॉर्डरोबसाठीच नव्हे, तर एकूणच सजावटीला अधिक उठावदार करण्यासाठीसुद्धा त्याचा वापर होतो.
याचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हा प्रकाश परावर्तित करतो. तसंच भिंतींवरचे आर्ट इफेक्ट किंवा स्पेशल इफेक्टना अधिक उठावदार करतो. आरसा प्रकाश परावíतत करत असल्यामुळे डायिनग, डार्क कॉर्नर्स, जिथे नसíगक प्रकाश कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी हा आवर्जून लावावा. यामुळे जागा प्रकाशमान होते. तसेच आरसा खिडकीच्या बाजूला किंवा समोर लावला तर खोली अधिक प्रकाशमान होते. घर अभिरुचीसंपन्न दिसावं याकरिता अनेक जणं सीिलग, कॉलम्स, स्टेअरकेस जवळच्या भिंतीवर आरसे लावतात. ही रचना मोठय़ा प्रशस्त घरांमध्ये अधिक मोहक दिसते. आरशाची जागा अशा पद्धतीने बसवायला हवी की, त्यामुळे फोकल पॉइंट म्हणून होईल. तसंच नको असलेल्या अनावश्यक वस्तूंचं प्रतिबिंब (रिफ्लेक्शन) दिसणार नाही, याची दखल घ्यावी.
आज बाजारात आरशासाठी लागणाऱ्या फ्रेम्समध्येही वैविध्य आहे. लाकडाची फ्रेम तर आहेच, पण याबरोबरच अ‍ॅल्युमिनियम, मार्बल फ्रेम्समध्येही आरसा बसवला जातो. पण अनेकजणं फ्रेम्स नसलेला आरसा लावण्याला पसंती देतात. अशा पद्धतीने आरसा लावताना त्याच्या कडा व्यवस्थित पॉलिश केलेल्या असाव्यात.  
आरशाचा वापर बिनचूकपणे केला तर सौंदर्याचा आस्वाद घेण्याबरोबरच एकूणच वास्तूला अभिरुचीसंपन्न देखणं सौंदर्य प्राप्त होतं.  

Story img Loader