नावीन्याच्या ध्यासातून घर आकर्षक, दर्जेदार करण्याकडे अधिक कल असतो. या ध्यासातूनच मग अनेक संकल्पना, कल्पनाविष्कार आकाराला येतात. मॉडय़ुलर किचन हासुद्धा असाच एक गृहसजावटीतला सुंदर, उत्कृष्ट आविष्कार आहे..
मनुष्याला सतत नावीन्याचा ध्यास असतो. नवनवीन, चांगलं, दर्जेदार करून, शोधून त्याचा आपल्या जीवनात समावेश करण्याची त्याला आस असते. हे सूत्र त्याने स्वत:च्या घराच्या बाबतीतही चपखल अवलंबलेलं आहे. कालौघात म्हणा किंवा नावीन्याच्या ध्यासाने म्हणा किंवा बदलत्या जीवनशैलीची गरज म्हणा, आज घराचा चेहरामोहरा संपूर्णत: बदललेला दिसतोय. अत्याधुनिक, आकर्षक, सुटसुटीत, उबदार घर ही संकल्पना आज दृढ झालीय. असं चित्र साकारण्यासाठी मग अनेक आधुनिक कल्पनाविष्कार, रचना आकाराला येतात, येत आहेत. मॉडय़ुलर किचन हीसुद्धा अशीच एक उत्कृष्ट, दर्जेदार संकल्पना! आज अधिकाधिक घरांचं स्वयंपाकघर हे या अत्याधुनिक किचन पद्धतीने साकारलेलं आहे.
आपल्याकडे पूर्वी स्वयंपाकघरात फडताळं, कप्प्यांची कपाटं अशी मांडणी होती. त्यातही नेहमीची वापरातली भांडी, साठवणीचे डब्बे ठेवण्यासाठी कपाटं, तूप, लोणी, फराळाच्या पदार्थासाठी वेगळं कपाट, त्याला कुलपाची सोय, असा सगळा सरंजाम होता. त्या वेळची स्वयंपाकघरं छान प्रशस्त alt होती. मात्र आजची स्वयंपाकघरं ही आकाराने खूपच छोटी आहेत. मग अशा स्वयंपाकघरांना सुटसुटीत, नीटनेटकं, वावरण्यास सोयीचं करण्यासाठी मॉडय़ुलर किचन पद्धती आकाराला आली. यातील सुयोग्य रचनात्मक मांडणीमुळे हा ट्रेण्ड सहजतेने सर्वमान्य झाला. स्वयंपाकघरातल्या पसाऱ्याची सुरेख मांडणी म्हणजे मॉडय़ुलर किचन अशी त्याची व्याख्या केली तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मुळात हा ट्रेण्ड स्त्रीवर्गात लोकप्रिय झाला तो यातील उपयुक्ततेमुळे. मॉडय़ुलर किचनमुळे स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू नीट, आकर्षक पद्धतीने मांडता येते. प्रत्येक वस्तूसाठी इथे जागा आहे. आपल्या गरजांनुसार, स्वयंपाकघरातील भांडी, इतर वस्तू यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केल्याने स्वयंपाकघर सुंदर, सुटसुटीत दिसतं. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे किंवा वस्तू जिथल्या तिथे ठेवल्याने स्वयंपाकघरात काम करताना श्रम, वेळ यांची बचत होते. मॉडय़ुलर किचन येण्याच्या आधी आपल्याकडे भांडय़ांसाठी मांडणी असायची. स्टेनलेस स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमचा स्टॅण्ड बहुतेक घरांमधून दिसायचा. भांडी, चमचे, ताटं जागच्या जागी ठेवली जायची. पण हे ओंगळवाणं दिसायचं. त्यापेक्षा मॉडय़ुलर किचनमध्ये भांडी, वस्तू जागच्या जागी ठेवल्या जाऊन इतरांच्या नजरेस पडत नाहीत. मॉडय़ुलर किचनमध्ये बास्केट्स, ट्रॉलीज्, पुलआऊट्स, टॉल युनिट्स, स्पाइस रॅक, थाली रॅक असे अनेक प्रकार असून भांडी, ताटं, वाटय़ा, पेले, चमचे, धान्यांचे डब्बे यांची व्यवस्थित मांडणी करता येते. स्वयंपाकघरात काम करताना प्रत्येक वस्तू चटकन हाताशी मिळाल्याने काम करणं सोयीचं होतं.
आता मॉडय़ुलर किचनच्या तांत्रिक बाजू लक्षात घेऊया. आज बाजारात मॉडय़ुलर किचनचे नामांकित ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. आपल्या गरजांनुसार  आणि किचन प्लॅटफॉर्म (ओटय़ाची रचना) खालच्या जागेच्या आकारमानानुसार ट्रॉलीज् बसवल्या जातात. या ट्रॉलीज् किंवा बास्केट्स क्रोमियम आणि निकेलच्या बनवलेल्या असून, या मटेरियलचे ग्रेड असतात. जसे की, २०२, ३०४ किंवा ३१६. यातील ३१६ ही ग्रेड म्हणजे सगळ्यात चांगली ग्रेड! मॉडय़ुलर किचनसाठी लागणाऱ्या मटेरियलचे उत्पादन हे गोवा राज्यात मोठय़ा प्रमाणावर होते.
या बास्केट, ट्रॉलीज यांचे दरवाजे हे एमडीएफ म्हणजेच मीडियम डेन्सिटी फायबर किंवा मरिन प्लायपासून बनवले जातात. यातील एमडीएफमध्ये भुसा वापरलेला असतो. त्यामुळे यापासून बनवलेले दरवाजे फुगण्याचे किंवा वाकण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच एमडीएफपेक्षा मरिन प्लायचा वापर करावा. चांगल्या प्रतीच्या मरीन प्लायमुळे मॉडय़ुलर किचनचा टिकाऊपणा वाढतो.
ब्रॅण्डेड कंपन्यांकडून मॉडय़ुलर किचन करून घेणं शक्य होत नसेल तर बास्केट, ट्रॉलीज् हव्या त्या आकारातील करून घ्याव्यात व त्यावर सुताराकडून वरची दारं बनवून घ्यावीत. हे काम आपल्या आवडीनुसार करून घेता येतं. शिवाय हे खिशाला परवडणारंसुद्धा आहे.
मॉडय़ुलर किचन हे ईझी टू क्लीन आहे, स्वच्छ करायला एकदम सोप्पं. ते जास्तकाळ टिकवायचं असेल तर दर सहा महिन्यांनी बास्केट, ट्रॉलीज् स्वच्छ करून त्यांना नीट ऑयिलग करावं. स्वच्छता, देखभाल यामुळे मॉडय़ुलर किचनचा टिकाऊपणा वाढवता येतो. वेळ, श्रम यांची बचत करायची असेल तर आधुनिकतेचा साज असलेल्या मॉडय़ुलर किचनला आपल्या स्वयंपाकघरात स्थान द्यायलाच हवं.