आधुनिक जीवनशैलीनुसार घरबांधणीतही आमूलाग्र बदल होत आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षणासाठी जन्मभूमी सोडून देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक होणाऱ्यांसाठी सुटसुटीत, आरामदायी, खिशाला परवडणारी किंवा आकाराने छोटी घरं असणं ही गरज बनली आहे. यातूनच स्टुडिओ अपार्टमेंट ही संकल्पना मूळ धरू लागल्याने आज अनेक बांधकाम व्यावसायिक वन, टू बीएचकेबरोबरच स्टुडिओ अपार्टमेंट बांधतानाही दिसतात. आपल्या गिरणगावातील किंवा चाळीतल्या खोल्या कशा असतात. एकच खोली त्यात एका बाजूला चूल मांडलेली, त्याच खोलीत आणखी एका कोपऱ्यात छोटंसं बाथरूम, मग या खोलीतच सर्व कुटुंबकबिला सामावलेला.
स्टुडिओ अपार्टमेंटसुद्धा यापेक्षा काही वेगळं नाही. फक्त फरक हा की, स्टुडिओ अपार्टमेंटचं आकारमान चाळीतल्या खोलीपेक्षा बऱ्यापकी मोठं असतं. तसंच इथे टॉयलेटची (वॉटर क्लोझेट) सोयसुद्धा आतच असते आणि अर्थातच हे स्टुडिओ अपार्टमेंट एकदम चकचकीतपणे बांधलेले, एकदम परफेक्ट लुक असणारे असतात. वन रूम किचनशी थोडंसं मिळतं-जुळतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच अशी घरं आज चांगलीच पसंतीस उतरत आहेत. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक किंवा नवविवाहित जोडप्यांसाठी स्टुडिओ अपार्टमेंट हा अतिशय चांगला पर्याय आहे. मात्र समस्त कुटुंबकबिल्यासाठी स्टुडिओ अपार्टमेंट रास्त ठरणार नाही.
आता घर म्हटलं की, सजावटसुद्धा आलीच. तर आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. मात्र सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की, स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये इंटिरिअर करताना प्रॅक्टिकली विचार करून ते सजवावं लागतं. म्हणजे असं की, गरजांना प्रथम प्राधान्य, तुमच्या स्वप्नातल्या घराला प्रत्यक्ष साकार करण्याची ही जागा नाही. कारण हे घर प्रशस्त नसतं आणि आपल्याला घर जसं सजवायचं आहे तसं ते इथे सजवता येत नाही. स्टुडिओ अपार्टमेंट एक तर गरजेमुळे किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने घेतलेलं असतं. काही ठरावीक काळापुरतं. म्हणूनच इथे गरजांना अग्रस्थानी ठेवून त्यानुसार आकर्षक इंटिरिअर करावं लागतं. तसंच स्टुडिओ अपार्टमेंट स्वत:च्या मालकीचं आहे की भाडय़ाचं आणि त्याचा वापर कोण करणार आहे, त्यानुसार इथलं इंटिरिअर ठरतं. जर स्टुडिओ अपार्टमेंट हे भाडय़ाचं असेल तर त्यात तोडफोड करता येत नाही. फोल्डिंग, स्लायिडग, पार्टशिन तसंच मल्टीपर्पज फíनचर ही तंत्र वापरून घराची मांडणी व्यवस्थित करता येते. विद्यार्थी, नोकरदार बॅचलर्स एकत्र मिळून राहत असतील तर प्रत्येकाच्या सामानाची मांडणी योग्यपणे करणं महत्त्वाचं असतं. तसंच अशा घरामध्ये सोफा कम बेड किंवा फोल्डिंग बेडची सोय करण्यापेक्षा तीन ते चार गाद्या टाकून चक्क भारतीय बठक करावी. रात्री याच गाद्या वेगळ्या करून प्रत्येकाची झोपायची सोय होऊ शकते. सकाळी सीटिंग आणि रात्री बेड हा फंडा एकदम मस्त आणि स्वस्त आहे.
स्टुडिओ अपार्टमेंट समजा मालकीचं असेल तर आपण आपल्या गरजांनुसार, बजेटनुसार हे घरसुद्धा अतिशय सुनियोजितपणे सजवू शकतो. मात्र स्टुडिओ अपार्टमेंटचं आकारमान लक्षात घेऊन तिथे इंटिरिअर करावं लागतं.  
भारतीय बठक अशा छोटय़ा घरांसाठी केव्हाही उत्तमच! पण सोफा कम बेडही चालू शकतो. आपल्याला हव्या त्या आकारात, आवडीनुसार तो बनवून घेता येईल. खोलीच्या एका बाजूला सुटसुटीत पण आकर्षक असं किचन करता येतं. जागा प्रशस्त असेल तर पार्टशिनही करता येईल. स्टोअरेज आणि वॉर्डरोब करताना तिथे जास्तीत जास्त सामान राहील आणि घरात कमीत कमी पसारा होईल अशा पद्धतीने ते बनवून घ्यावं. नवविवाहित जोडपं राहणार असेल तर किचन हे अतिशय व्यवस्थित असणं गरजेचं आहे. एका स्त्रीला किचनमध्ये लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व वस्तू जागच्या जागी मिळणं महत्त्वाचं असतं. शिवाय पार्टशिन असणंही जरुरीचं आहे. कारण घरात पाहुणे आले किंवा मित्रमंडळी आली तर कपडे बदलायला पार्टशिन असेल तर ते जास्त सोयीचं ठरतं.  
स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये इंटिरिअर करताना शोभेच्या वस्तूंची खूप जंत्री करून चालत नाही, मुळात तशी ती नसावी. मोजक्याच पण आकर्षक वस्तू ठेवूनही आपलं घर सुंदर करू शकतो. वॉल हँिगग्ज, पेंटिंग्ज, दरीज या वस्तूंची कल्पक मांडणी केली तर स्टुडिओ अपार्टमेंटसुद्धा साजिरं गोजिरं करता येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा