नवीन घरात राहायला आल्यानंतर पुढल्या अंगणात गुलाब, मोगरा, जास्वंदी, शेवंतीची फुलझाडे लाऊन आम्ही बाग तयार केली. जाईचा वेल मांडवावर चढविला होता. संध्याकाळी जाईची फुले फुलू लागत व त्याचा मस्त सुगंध दरवळत असे. रोजच्या पूजेला तसेच गौरी-गणपतीला दारची फुले मिळू लागली. मागच्या अंगणात भाजीपाला होत असे.
बार्शीलाइट रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यावर माझे वडील कुटुंबकबिला घेऊन पेणला दाखल झाले. निवृत्तीनंतर स्वत:चे घर असावे आणि ते पेणलाच बांधायचे, असे माझ्या वडिलांनी पक्के ठरविले होते. पेणला प्रभूआळीत आमच्या आजोबांचे घर होते. पण आर्थिक अडचणींमुळे ते त्याकाळी विकावे लागले व त्यांना भाडय़ाच्या घरात राहावे लागले. ही सल माझ्या वडिलांना बोचत होती. म्हणून पेणलाच स्वत:चे घर घ्यायचे असे त्यांनी मनोमन ठरविले होते.
१९४२ सालचे पेणगाव म्हणजे जुनीच, पण प्रशस्त घरे, खडी-मातीचेच; पण स्वच्छ रस्ते, उत्तम हवापाणी, ताजा व स्वस्त भाजीपाला, मुंबईला दळणवळणासाठी रस्ता तसेच समुद्रीमार्ग इत्यादी सोयी उपलब्ध होत्या. गावही तसे निसर्गरम्य होते. गावाबाहेरून भोगावती नदी वहात गेलेली. गावाची रचना पूर्वापार जातवार असल्यामुळे प्रभूआळी, कासारआळी, कुंभारआळी, परीटआळी, कोळीवाडा, मुस्लिममोहल्ला इ. आळ्या तसेच ब्राह्मण वस्ती असलेल्या झिराळआळी, हनुमानआळी, दातारआळी, देवआळी अशी विभागणी होती. याशिवाय नंदीमाळनाका, चावडीनाका, तीनबत्तीनाका अशी रस्ते जोडणाऱ्या चौकांना नावे होती.
आम्ही तात्पुरते राहाण्यासाठी बाजारपेठेत एक घर भाडय़ाने घेतले होते. माझे वडील नवीन घर विकत घेण्यासाठी घरे व जागा पाहात होते. त्यांना प्रभूआळीत वासकर गुप्ते यांचे घर विकायचे असल्याचे कळले. ते नागपूरला असत. त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर ते पेणेला आले व घराचा व्यवहार होऊन त्यांचे घर आमच्या मालकीचे झाले. घर जुनेच असले तरी जमीन ५ गुंठे होती. घर प्रशस्त होते. मागेपुढे अंगण, आंब्याची, नारळाची झाडे, समोर एकदम मोकळी जागा, खेळती हवा, वारा, भरपूर उजेड आणि विशेष म्हणजे ते रस्त्यापासून १५ फूट उंचावर होते. आम्हा सर्वानाच ते खूप आवडले. घराचा पाया ताशीव दगडांचा असल्यामुळे त्याला दुरुस्तीची गरज नव्हती. भिंती मात्र जुन्या असल्यामुळे त्या पाडून नव्या बांधणे, लाकडी दरवाजे-खिडक्या बदलणे, छप्पर दुरुस्त करून मंगलोरी कौले बसवणे वगैरे कामे होईपर्यंत १९४३ चा एप्रिल महिना उजाडला. गुढीपाडव्याला गणपतीपूजन झाले. प्रत्यक्षात अक्षय्यतृतीयेच्या दिवशी आम्ही आमच्या नव्या घरात राहावयास गेलो. आपले स्वप्न साकार झालेले पाहून माझ्या वडिलांना जो हर्ष व समाधान झाले, ते त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षांने जाणवत होते.
आमचे पेणचे घर उंचावर असल्यामुळे चढावाच्या पाऊलवाटेने जाऊन पायऱ्या चढल्यानंतर लांबलचक पडवी लागे. पडवीच्या दोन्ही टोकांवर एक एक खोली होती. याच आमच्या अभ्यासाच्या खोल्या. पडवीतून पायऱ्या चढून आत गेल्यावर मुख्य घराची ओटी व तिच्या दरवाजातून आत माजघरात (हॉलमध्ये) प्रवेश करता येत असे. माजघर चौकोनी व भरपूर मोठे होते. त्यालगत उजवीकडे लांब-रुंद असे स्वयंपाकघर होते. माजघराच्या डाव्या बाजूस समोरासमोर दोन खोल्या होत्या. त्यातील एका खोलीचा न्हाणीघर म्हणून वापर होई व दुसरी खोली कोठीची खोली- म्हणजेच स्टोअररुम म्हणून वापरात होती. हीच खोली कालांतराने बाळंतिणीची खोली म्हणून ओळखली जाऊ लागली. आईवडिलांच्या सर्व लेकीसुनांची बाळंतपणे इथेच झाली. घरात कुठेही लाद्या वगैरे नव्हत्या. सर्व खोल्यांतून जमिनीला दर आठ दिवसांनी शेणाचे सारवण घालावे लागायचे. बांधकामाच्या वेळी स्वयंपाकघरात सीमेंटकाँक्रिटचा कोबा करवून घेतला होता. कालांतराने माजघरात शहाबादी फरशा बसवल्या व इतर खोल्यांतून कोबा केला. माजघराच्या दरवाज्यातून मागील अंगणात जाता येत असे. तिथे विहीर, आंबा, पेरू, सीताफळ, मोसंबी, लिंबू, नारळ अशी झाडे होती. माजघरात गौरी-गणपती बसत. नातेवाईक मंडळी जमत. जेवणाच्या पंक्ती उठत. रात्री आरती दणक्यात होत असे. माझी आई स्वयंपाक अतिशय चविष्ट करत असे. तिच्या हातचे मोदक, दिवाळीतले खाजाचे कानवले अप्रतिम असत.
घराला लागून एक वाढीव भाग होता. तेथेही हॉल-किचन बनवलेले होते. त्या भागावर माडी होती. तिचा उपयोग आम्हा मुलांना खेळायला, दंगा करायला होत असे. शौचालये घराबाहेर होती. आमच्या पूर्वीच्या मालकांनी जागेचा एक कोपरा मागील तरेआळीतील रहिवाशांना मंदिरासाठी दान दिला होता. तिथे गावदेवी मंदिर आहे.
नवीन घरात राहायला आल्यानंतर पुढल्या अंगणात गुलाब, मोगरा, जास्वंदी, शेवंतीची फुलझाडे लाऊन आम्ही बाग तयार केली. जाईचा वेल मांडवावर चढविला होता. संध्याकाळी जाईची फुले फुलू लागत व त्याचा मस्त सुगंध दरवळत असे. रोजच्या पूजेला तसेच गौरी-गणपतीला दारची फुले मिळू लागली. मागच्या अंगणात भाजीपाला होत असे. पावसाच्या सुरुवातीला माझी आई भेंडी, गवार, पडवळ अशा भाज्यांची बियाणी लावीत असे. श्रावणात घरच्या भाज्या उपलब्ध होत. दारी भाजीचे तसेच अळूवडीचे अळू आई लावीत असे. अंगणात केळीची लागवड केली होती. या झाडांना शे-दीडशे केळ्यांचे लोंगर लागत. गौरी-गणपती, दिवाळी, होळी या सणांसाठी सर्वजण एकत्र जमत असू. हे पाहून वडिलांना आनंद वाटे.
पुढे बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या. आम्ही तीन भाऊ नोकरीनिमित्त पेण शहराच्या बाहेर होतो. माझा धाकटा भाऊ मात्र स्थानिक नोकरी असल्याने त्याच घरात राहात असे. कालांतराने या घरात सुखासमाधानाने दीर्घ आयुष्य उपभोगून वयाच्या ८४ व्या वर्षी माझे वडील १९८० साली कालवश झाले. १९८६ साली आईही निवर्तली. आम्हालाही वयपरत्वे पेणला जाणेयेणे जमेना. घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. अखेर ३ वर्षांपूर्वी आमच्या वडिलांनी उभी केलेली ही वास्तू अत्यंत व्यथित अंत:करणाने आम्ही विकली.
आमचे पेणचे घर विकले त्या घटनेला ३ वर्ष झाली. असा एकही दिवस जात नाही की पेणच्या घराची आठवण येत नाही. अजूनही अंगणात फुललेली फुलबाग डोळ्यांसमोर येते. त्यात फुललेल्या हिरवा चाफा, गुलाब, मोगऱ्याच्या, जाईच्या फुलांचा सुगंध दरवळू लागतो. आईने स्वहस्ते पिकवलेल्या व शिजवलेल्या भाज्या, वालाचे बिरढे, माशांची कालवणे, उकडीचे मोदक, दिवाळीचा फराळ, खाजाचे कानवले, पुरणाच्या तेलपोळ्या यांची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळते. पावसाळ्यात तर पेणचा पाऊस खूप आठवतो. पावसाची काळोखी, आजूबाजूची हिरवीगर्द झाडी व थंड वातावरण. घर उंचावर असल्यामुळे थंडी जरा जास्तच. घरात कोळशाची शेगडी पेटवून दुपारच्या वेळी आईवडील शेकत बसलेले असायचे. आम्ही शाळेतून परतल्यानंतर पावसात भिजलेले कपडे आई ताबडतोब बदलायला लावायची. हातपाय धुवून आल्यानंतर काहीतरी गरमागरम पदार्थ खाऊ घालायची.
दिवाळीत पुढचे अंगण खणून त्यात मुरमाची माती घालून चोपण्याने चोपून गुळगुळीत केले जायचे. त्यावर शेणाचे सारवण घालून ते वाळल्यावर माझ्या बहिणी त्यावर ठिपक्यांच्या मोठमोठय़ा रांगोळ्या काढत व रंग भरायला आम्हाला बोलावीत. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या व माझ्या लग्नानंतर माझ्या पत्नीने काढलेल्या रांगोळ्यांचा पट आजही डोळ्यासमोरून सरकतो. माझे वडील शिस्तप्रिय होते. पण आम्हा मुलांना क्वचितच मार देत. त्यांची पेटंट शिक्षा एकच- दंगा-मस्ती केली की बखोटे धरून भिंतीच्या कोपऱ्यात तोंड करून उभे करीत. माझ्या भावाला या शिक्षेमुळे रडू येई. मला मात्र या शिक्षेची गंमत वाटून हसू येई.
आज वर्षांमागून वर्षे लोटली, पण आजही ती शिक्षा आठवली की हसूही येते आणि रडूही येते. त्या पाणावलेल्या डोळ्यांपुढून पेणचे घर आणि त्या आठवणी धूसर होत जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा