बदलती शहरं :
आ पल्या सभोवतालच्या वातावरणात प्रतिकूल बदल झाले की पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे मानवानेही आदिम अवस्थेपासून अनुकूल वातावरणाच्या किंवा पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ वेळोवेळी स्थलांतर केलं आहे. त्यातूनच नवनवीन भूभागांचा शोध लागून कालौघात नवनवीन शहरं उदयाला आलीत. सध्याच्या काळात अशा प्रकारे विकसित होऊन लांबच लांब पसरलेली शहरं, त्यांची उपनगरं किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात माणसांना नोकरी-धंद्याच्या निमित्ताने स्थलांतर करावं लागतं.
ऊन, पाऊस नि वारा यांच्यापासून आसरा पुरवणारा तो निवारा एवढाच ‘घर’ या शब्दाचा अर्थ संकुचित नाही, कारण तसं असतं तर आदिम अवस्थेपासून आजतागायत माणूस एकेकटा राहताना दिसला असता. परंतु शारीरिक आणि भावनिक सोबतीची गरज असलेल्या माणसाने आपल्या समूहप्रियतेचं दर्शन घडवत कुटुंबसंस्था उदयाला आणली. त्यातूनच अशा कुटुंबाचं वसतिस्थान असलेल्या वास्तूच्या माध्यमातून ‘घर’ या संकल्पनेनं आकार घेतला. पतीपत्नी, आईवडील, बहीणभाऊ अशा वेगवेगळ्या नात्यांची सुरेख भावनिक गुंफण जिथे पाहायला मिळते, ते घर! या घरातल्या माणसांच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दु:खाचे वैशाख वणवे पेटतात तेव्हा तेव्हा याच नात्यांच्या माध्यमातून हे घर त्या दु:खावर हळुवार फुंकर घालून मनाला वैशाख पौर्णिमेच्या घनदाट चांदण्याप्रमाणे शीतलतेनं न्हाऊ घालतं, शांत करतं. घरच्या बाळगोपाळांना परीक्षेत मिळालेलं यश असो, मोठय़ांना त्यांच्या नोकरीत मिळालेली बढती असो किंवा व्यवसायात मिळालेलं यश असो, नाहीतर घरी टी.व्ही., म्युझिक सिस्टीमसारखी आणलेली एखादी नवी वस्तू असो, यातून मिळणाऱ्या लहानमोठय़ा आनंदात वेळोवेळी हे घरही सामील होत असतं. म्हणूनच अनेक र्वष ज्याच्या संगतीत घालवलीत आणि ज्याच्या साक्षीनं सुखदु:ख भोगलीत ते घर सोडून जाताना घरातल्यांच्या मनात या सर्व आठवणींचं काहूर माजतं. एखाद्या जिवलग मित्राला कायमचं दुरावल्यावर जितकं दु:ख होतं, तितकंच दु:ख हे घर सोडून जाताना होतं.
तरीही अपरिहार्यता म्हणून माणसांना घर बदलावं लागतं. कधी नोकरीत दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यामुळे, कधी जागा अपुरी पडत असल्यामुळे, तर कधी स्वभावभिन्नतेमुळे संबंध बिघडण्यापेक्षा वेगळं राहून नाती टिकवण्यासाठी, अशा अनेक कारणांमुळे माणसं घर बदलतात. हे घर बदलताना मग बऱ्याचदा एकाच घरात राहणारी माणसं मोत्यांच्या एखाद्या सुंदर माळेतले मोती ज्याप्रमाणे विखरून इतस्तत: पसरावेत आाणि स्वतंत्र व्हावेत तशी स्वतंत्र होतात. सध्याच्या काळात मोबाइल आणि लँडलाइनचे फोन, इंटरनेट इत्यादी आधुनिक संवाद साधनांमुळे जग जवळ आलं आहे, असं म्हटलं जातं. परंतु पूर्वी रोज संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर एकमेकांशी साधला जाणारा थेट संवाद, हसतखेळत सर्वानी एकत्र गप्पा मारणं, दिवसभरातल्या घटनांमुळे कधी मन खिन्न झालं असेल, तर पाठीवरून मायेचा हात फिरल्यामुळे मिळणारा आधार, या सर्व गोष्टींना अजून तरी डिजिटल ई-पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे जग कितीही जवळ आलं तरी प्रत्यक्ष जवळिकीमधून मिळणारा मानसिक आधार माणसांमधली भौगोलिक अंतरं वाढल्यामुळे तुटत चालल्याचंच चित्र दिसतं आहे. निदान आठवडय़ातून एकदा तरी दूर गेलेल्या आपल्यांना भेटावं, अशी इच्छा असते. परंतु ते दरवेळी शक्य होतंच असं नाही. कारण, अफाटपणे विस्तारणाऱ्या मुंबईच्या एका भागात आपण राहात असू आणि आपलं ऑफिस जर आपल्या घरापासून दूर असेल, तर आठवडाभर ऑफिसला जाऊन येण्यातच आपले बारा-चौदा तास खर्च होत असतात. त्यामुळे मग घरातल्या कामांसाठी एकच सुट्टीचा दिवस मिळत असल्यामुळे कोणाकडे जाणं शक्य होत नाही. पगाराचे आकडे वाढत आहेत आणि कर्जाचे वेगवेगळे आणि सुलभ पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे माणसं आपली घरं उभारत आहेत. परंतु पूर्वीप्रमाणे हसतखेळत एकत्र राहून आयुष्यातल्या संकटांना एकीच्या बळानं सामोरं गेल्यामुळे, घरातल्या कामांची श्रम विभागणी झाल्यामुळे न जाणवणारा ताण आता असह्य़पणे जाणवू लागला आहे. अनेक कारणांनी आज येत असलेल्या ताणाचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे.
परंतु यावर उपाय शोधणं कठीण असलं, तरी अशक्य मात्र नाही. बदलीमुळे परगावी जावं लागतं तेव्हा पर्याय नसतो. परंतु मुलांना सुट्टय़ा लागल्या की, अनेक जण आपल्या मूळ घरी जातात. आपल्याला तितकी रजा मिळणं शक्य नसेल तर मुलांना तरी पाठवतात. त्यामुळे नात्यांमधले हे भावनिक रेशमी बंध टिकून राहायला मदत होते. मोठी जागा हवी म्हणून किंवा स्वतंत्र राहण्यासाठी वेगळं होण्याचा पर्याय निवडतानासुद्धा एखाद्या नवीन इमारतीत फ्लॅटचं ग्रुप बुकिंग केलं, तर वेगळं राहूनही भौगोलिक सामिप्य टिकवता येतं. शिवाय ग्रुप बुकिंग करत असल्यामुळे घरांच्या किमतीतही सूट मिळवता येते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकीचा फायदा मिळतच असतो. नव्या इमारतीत जागा घेणं शक्य नसेल, तर किमान एकाच परिसरात तरी घर शोधावं. त्यामुळे नेहमीचं जाणंयेणं राहतं.
शेवटी बदल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे स्थलांतर आवश्यक बनलेल्या बदलत्या जीवनशैलीला दोष देण्यापेक्षा त्यावर उपाय शोधला, तर माणूस आपला आनंद टिकवून ठेवू शकतो.
स्थलांतर
आ पल्या सभोवतालच्या वातावरणात प्रतिकूल बदल झाले की पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे मानवानेही आदिम अवस्थेपासून अनुकूल वातावरणाच्या किंवा पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ वेळोवेळी स्थलांतर केलं आहे. त्यातूनच नवनवीन भूभागांचा शोध लागून कालौघात नवनवीन शहरं उदयाला आलीत.
आणखी वाचा
First published on: 09-02-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migration