२० व्या शतकाच्या आठव्या दशकापासून भारतातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर क्षेत्रात (real estate) विशेषकरून व्यापारी आस्थापनांच्या टोलेजंग इमारतींकरिता काचेचे फसाड लावण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे. ही टूम परदेशांतील वास्तूंमधूनच प्रेरित झाली असावी. सिंगापूर, हाँगकाँग, चीन, थायलंड इत्यादी वा पश्चिमेकडील अनेक शहरांमध्ये अशा काचेच्या इमारती प्रचलित झाल्या आहेत.
अशा वास्तूंमुळे आस्थापनांच्या इमारती उठावदार, आकर्षक व मोहक दिसतात. त्यांच्या किमतीत व भाडय़ात भर पडावयास मदत होते. बाहय़ भिंतींना चाट दिल्याने इमारतींच्या वजनामध्ये (dead weight) खूप घट होते, जेणेकरून इमारत बांधणीमध्ये व पायाकरिता लाभ मिळू शकतो. शिवाय बाहय़ िभतीचा भाग काच वापरून घेतल्याने िभतीच्या जाडीऐवजी काचेची कमी जाडी आल्याने बाहय़ क्षेत्राच्या आकारांना (built up area) वाढीव रूप मिळून एफएसआयचा जास्त लाभ उठविता येतो. स्थावर क्षेत्राची विक्री वाढते. स्थपतींच्या नफ्यात वाढ होते ते वेगळेच. बांधकाम खर्चात २०टक्के जरी वाढ होत असली तरी स्थावर स्थपतींच्या उत्पन्नात ५ टक्केपर्यंत लाभ मिळतो. परंतु वसाहतींच्या (residential) वा चार-पाच माळय़ांच्या इमारतींना असे महाग काचेचे फसाड परवडण्यासारखे नाही.
वरील परिच्छेदात दर्शविलेले फायदे जरी असले तरी अशा इमारती बांधताना वा त्या बांधल्यावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्या थोडक्यात परदेशातून सामान आणल्यामुळे जकात खर्च, काचेची स्वच्छता ठेवणे आणि इमारतींची देखभाल करणे अशा गोष्टींमुळे खर्चात वाढ होते. पक्षी दिशा चुकवून काचेतल्या प्रतििबबावर लक्ष्य करून जोरात धडक देण्याची शक्यता असते.
वांद्रा-कुर्ला संकुलामध्ये अशा अनेक काचेच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. कारण तेथे व्यापारी आस्थापनांच्या इमारतीच जास्त आहेत. त्याशिवाय तेथील जमिनी भराव घालून बनविल्यामुळे पाइलच्या पायाशिवाय तेथे गत्यंतर नव्हते. पाइल्सच्या कामाला साध्या पायापेक्षा १५ ते २०टक्के वाढ होते. अशा प्रकारच्या यूटीआय व आयसीआयसीआय इमारतींच्या काचा लावण्यावेळी प्रस्तुत लेखकाचा ज्येष्ठ अभियंता म्हणून प्रकल्प व्यवस्थापनेत सहभाग होता.
वर उल्लेखिलेल्या दोन्ही काचेच्या इमारती मालकांनी आणि आíकटेक्ट अनुक्रमे कमल मलिक व राजा येदरी यांनी बांधायला घेतल्या. कंत्राटदार पर्मास्टिलिसा ही परदेशी आस्थापना व ईसीआयई ही बंगलोरची आस्थापना होती. असे काचेचे काम नाजूक व महत्त्वाचे असल्याने त्याची रचना, बांधणी व त्या इमारतीवर चढविणे (design, preparedness and installation) इत्यादी गोष्टी फार काळजीपूर्वक केल्या.
सूर्यपटलामधल्या प्रखर किरणांचा (ज्यात अल्ट्रॉव्हायोलेट, दृश्य प्रकाश व इन्फ्रारेड किरण असतात) काचेवर परिणाम होऊ नये म्हणून काचेवरील परावर्तन (Reflection), शोषण (Absorption) व आत शिरणारे किरण (Transmittance) असा रॅट (RAT) च्या समीकरणाचा तौलनिक अभ्यास करावा लागतो. असा अभ्यास पर्मास्टिलिसाने केल्याचे ते सांगत.
या कामाची रचना अशी असायला हवी, की काचा बसवून झाल्यावर इमारतींमध्ये उष्णता कमीत कमी असायला हवी, जेणेकरून वातानुकूलनाचा खर्च कमी होईल. तसेच बाहेरील आवाजाचे बंधन वा प्रदूषण होऊ नये हेही बघणे जरुरी असते. पर्मास्टिलिसा आस्थापना या अशा काचेच्या रचना कामात वाकबगार व आंतरदेशीय अनुभवी होती. हे काम झाल्यानंतर काचा साफ करणे व त्यांची देखभाल करणे इत्यादींकरिता खास अनुभवी आस्थापनांची नेमणूक करणे जरुरी असते. साफसफाईच्या वेळी काच विरघळणाऱ्या वा काचेला इजा पोचविणाऱ्या द्रव्यांचा वापर टाळणे जरुरी असते.
नीरी (National Environmental Engineering Research Institute) म्हणते त्यांच्या नरिमन पॉइंट, वरळी-परळ व वांद्रा-कुर्ला संकुलातील काही काचेच्या इमारतींच्या तपासाअंती इमारतीतील तापमान जास्त आढळले व एका काचेच्या इमारतीतले तापमान सभोवतालपेक्षा १७ सेल्सिअस अंशाने जास्त आढळले. मुंबईमध्ये हल्ली काचमय इमारती बांधण्याचे वातावरण असताना वरील सर्वेक्षणातून असे काही पर्यावरणविरुद्ध कारण सापडावे हे काचतंत्राचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. या काचेच्या इमारत पाहणीत असेही आढळले, की जमिनीपासून जसे उंचावर जावे तसे इमारतीबाहेरील व आतील उष्णतेत तफावत जास्त वाढत गेली. नीरी आणखी काही इमारतींचा तपास घेतल्यानंतर ठळक अशा निष्कर्षांप्रत पोचू शकेल.
काचेच्या इमारती हा विषय आता महत्त्वाचा बनला आहे. खरे म्हणजे इमारतीतील काचेची निवड व रचना पर्यावरणीयशील हवी आणि याच गोष्टीकडे अनेकजणांनी दुर्लक्ष केले आहे. या काचा खरोखरच उष्णता परावíतत करणाऱ्या असतील तर त्या सभोवतालचे तापमान नक्कीच वाढवीत असणार. याच काचा थंड हवामानातल्या इमारतींकरिता योग्य असाव्यात. कारण इमारतीमध्ये उष्णता व उत्सर्जति हवा थोपवून धरली जाईल व इमारतीमध्ये थंडी कमी भासेल.
फाऊंटनहेडचे वास्तुविशारद संदीप गोस्वामी पर्यावरणीय अनुभवातून म्हणतात, कोठलेही रचित (designed) जिन्नस मूलत: अयोग्य नसतात तर ते कसे वापरले गेले त्यावर त्यांची योग्यता अवलंबून असते. हे काचतंत्र मुंबईत इतक्या मोठय़ा हजारोंच्या निर्मितीत आणि ते कसेही न तपासता वापरले जात असल्याने पश्चिमी जगताची नुसती नक्कलच सुरू आहे. त्यामुळे इमारतीत उष्णता वाढल्याने वातानुकूलनांना लागणाऱ्या विजेचा खर्च वाढतो. योग्य ते उष्णतेचे नियमन साध्या काचेच्या लूव्हर्समधूनही साध्य केले जाईल.
बाहेरील गरम हवेचे काचेवर तडकण्यासारखे दुष्परिणामही संभवतात. सरकारी उंच इमारत समितीने दोन उंच इमारतींमध्ये २० मी. अंतराची शिफारस केली होती. परंतु मुंबईतील इमारती बऱ्याच ठिकाणी जवळच बांधल्या गेल्या आहेत. तसेच अग्निशमनाच्या दृष्टिकोनातून योग्य ते वायुविजनही ठेवलेले नसते.
काचेच्या इमारती तोऱ्यात उभ्या राहिलेल्या व अद्ययावत अशा वाटतात. परंतु त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर अग्निरक्षकांकडून शमन करण्याकरिता फार त्रासदायक व असुरक्षित बनतात. वांद्रा-कुर्ला संकुलातील फर्स्ट इंटरनॅशनल फिनॅन्शिअल सेंटरच्या १३ माळय़ाच्या काचेच्या मनोऱ्याला (बांधकाम चालू असताना) सप्टेंबर २०१२ मध्ये १२व्या माळय़ाला आग लागली व ती इमारत काचेच्या फसाडची असल्याने आग झपाटय़ाने ११व्या व १३व्या माळय़ापर्यंत पसरली. अग्निरक्षकांना आग विझविण्याकरिता वायुविजन मिळावे याकरिता त्यांना काही काचा फोडायला लागल्या. अग्निरक्षकांना योग्य ते वायुविजन न मिळाल्याने अतिउष्णता सहन करावी लागली. अशा काचेच्या अनेक टोलेजंग इमारती मुंबईत बनल्या आहेत व अग्निशमन करण्याकरिता बऱ्याच वेळेला अग्निरक्षकांना जिवावर उदार होऊन कठीण असे आव्हान स्वीकारावे लागत आहे.
वरील अनेक मुद्दे लक्षात घेऊन मुंबई पालिकेने काच इमारती बांधण्यास सध्या बंदी आणली आहे. मुंबई पालिकेच्या म्हणण्याप्रमाणे काचेच्या इमारतीत वायुविजन कमी झाल्याने जंतुबाधित (infectious) व श्वासाचे रोग व्हायची पण शक्यता असते. त्यामुळे आता काचेच्या इमारती तयार झाल्यावर इन्फेक्शन ऑफिसरकडूनही त्या तपासणे गरजेचे झाले आहे. हल्ली बाजारात काचांचे अनेक प्रकार आढळतात. थरांच्या (laminated) काचा, टेम्पर्ड काचा, टिन्टेड काचा, डबल ग्लेझ्ड वगरे. टेंपर्ड किंवा सुरक्षित काच तुटल्यानंतर तिचे तुकडे उडण्याचे भय राहात नाही. त्यावर चरे पडत नाहीत. अशी काच बनवायला त्यावर उष्णतेची एक प्रकारची प्रक्रिया करावी लागते. अशी बनलेली काच इमारतीच्या फसाडकरिता वापरतात. या काचक्षेत्राकरिता तज्ज्ञांकडून पर्यावरणशील व अग्निशमनावेळी योग्य अशा वायुविजनयुक्त (ventilation) काचांच्या रचना नक्कीच पुढे येतील असा विश्वास वाटतो. काचा कोठल्या व कशा वापरायच्या त्याची नियमावली बनली पाहिजे.
काचेच्या इमारतींचे फॅड
२० व्या शतकाच्या आठव्या दशकापासून भारतातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर क्षेत्रात (real estate) विशेषकरून व्यापारी आस्थापनांच्या टोलेजंग इमारतींकरिता काचेचे फसाड लावण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे.
First published on: 19-01-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern fashion of glass building