हल्ली घरासभोवतालची जागा फरशीने अथवा सीमेंटच्या गिलाव्याने आच्छादित केलेली असते. पावसाळ्यात तयार होणारे तेथील शेवाळ ही बहुधा घरोघरीची समस्या असते. ही बाब काही वेळेस डोकेदुखी वाटू लागते. या समस्येवरील काही उपाययोजनांचा आपण विचार करू.
शेवाळाच्या वाढीसाठी पूरक ठरणाऱ्या बाबी म्हणजे- पुरेसा ओलावा, वनस्पतींना लागणाऱ्या पोषक तत्त्वाची उपलब्धता, सूर्यप्रकाश, तसेच मुळे रुजण्यासाठी योग्य असा पृष्ठभाग, पावसाळ्यातला ओलावा आणि वाहत्या दूषित पाण्याबरोबर येणारे शेवाळाला पोषक असे घटक शेवाळाची वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. तुंबलेल्या गटाराचे पाणी, फुटलेले सांडपाण्याचे पाइप, कचऱ्याच्या ढिगामधून येणारे ओघळ, वृक्षावरून पडणारे पाणी, मातीच्या पृष्ठभागावरून वाहात येणारे प्रवाह या सर्वामधून शेवाळाला लागणारी द्रव्ये कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध होतात. जिथे जिथे शक्य होईल तिथे या बाबींना अटकाव केल्यास शेवाळाच्या उपद्रवाला थोडाफार प्रतिबंध होऊ शकेल. अर्थात स्थानिक परिस्थितीनुसार परिणाम अवलंबून राहील. परंतु एकदा शेवाळ जर का जमलेच तर त्याचे उच्चाटन करणे हे बरेच तापदायक ठरू शकते.
हार्डवेअरच्या दुकानात मिळू शकणारे फरशी घासण्याचे ब्रश वापरून शेवाळाचे थर खरडून काढणे हा सरळ धोपट मार्ग झाला. हा अर्थात कष्टाचा, त्रासदायक आणि विलंब लागणारा उपाय आहे. समस्येची व्याप्ती ज्यास्त प्रमाणात असेल तर हा पर्याय अशक्यप्राय असू शकेल. तसेच शेवाळाची शिल्लक राहिलेली मुळे पुन: पुन्हा जोम धरून वाढू शकतात.
काही जण मोरी साफ करण्यासाठी उपलब्ध असणारे हायड्रोक्लोरिक आम्ल वापरून शेवाळ काढून टाकण्याचा खटाटोप करतात. हे आम्ल तीव्र स्वरूपाचे असून यामुळे सीमेंटच्या पृष्ठभागावर विरघळण्याची क्रिया होते. यामुळे शेवाळ जरी निघण्याची परिणती होत असली तरी फरशीची हानी होतेच, शिवाय हा उपाय करण्यात काही धोके आहेत. सदर आम्ल हे दाहक (corrosive) आहे, हाताळण्यात निष्काळजीपणा झाल्यास शरीराला इजा होऊ शकते. संपर्कात येणाऱ्या धातूच्या वस्तू, कपडे यांना क्षती होऊ शकते. पर्यावरणालाही नुकसान करणारा हा पर्याय टाळणे उत्तम.
काही जण वाण्याकडे मिळणारी सुती कपडे सफेद करण्याची तथा पिण्याचे पाणी अथवा पोहोण्याचे पाणी शुद्ध करण्यात वापरली जाणारी ब्लीचिंग पावडर शेवाळाचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगात आणतात. सर्वसामान्यत: उपयोगात येणारी पावडर (commercial quality) हिच्यात अंदाजे ३० टक्क्यांपर्यंत उपलब्ध (available)) क्लोरिनचे प्रमाण असू शकते. हा वायू स्वरूपातील जहाल पदार्थ अत्यंत दाहक असून तो विषारी आहे. श्वासाबरोबर शरीरात गेल्यास गंभीर स्वरूपाची इजा पोहचू शकते, त्याची विरंजक क्रिया (bleaching ) तसेच त्याच्या दाहकतेमुळे संपर्कात येणाऱ्या कपडय़ाचे आत्यंतिक स्वरूपाचे नुकसान होऊ शकते. याची हाताळणी प्रशिक्षित लोकांमार्फत झालेली उत्तम. ही पावडर शेवाळयुक्त पृष्ठभागावर पसरली जाते. काही काळानंतर खराटय़ाच्या साहाय्याने धुऊ न टाकली जाते. . Oxidative दाहक प्रक्रियेने शेवाळाचा नाश होतो हे खरे असले तरी यापासून होणाऱ्या सर्वसाधारण अन्य नुकसानीचे प्रमाण फार आहे, हेही तितकेच खरे. एक तर ही पद्धती खर्चीक आहे, वापरण्यात अनेक प्रकारचे धोकेसंभवतात. विरंजन प्रक्रियेमुळे रंगाचे नुकसान होऊ शकते. क्लोरिनची अशा प्रकारची संयुगे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक कारणांमुळे अत्यंत हानिकारक आहेत.
तिसरा पर्याय म्हणजे चुनकळी. चुना हा हार्डवेअर अथवा पेंटच्या दुकानात उपलब्ध होतो. कमी खर्चाचा भिंतीना लावण्याचा रंग म्हणून याचा घरगुती उपयोग केला जातो. कृषी तथा बागायती क्षेत्रात वापर होतो. मुख्यत्वे बोर्ड मिश्रण तयार करण्यासाठी याचा उल्लेख येथे एवढय़ासाठी की त्याचा संबंध आपल्या चर्चेशी निगडित आहे. कळीचा चुना हा चुनखडीपासून बनवला जातो. उष्णतेच्या साहाय्याने चुनखडी (alcium carbonate) चे रूपांतर चुन्यामध्ये (calcium oxide) केले जाते. हा चुना जेव्हा पाण्यात विरघळला जातो तेव्हा त्याचे रूपांतर अल्कली (calcium hydroxide) मध्ये होतो. चुनखडीवर जर योग्य रीतीने प्रक्रिया केली नसेल तर अल्कलीचे प्रमाण पुरेसे नसते आणि त्यापासून अपेक्षित परिणाम मिळणार नाही. हे सर्व विस्ताराने देण्याचे कारण शेवाळाचा नाश शेवटी हा वापरल्या जाणाऱ्या चुन्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. उत्तम दर्जाचा चुना पाण्यात टाकल्याबरोबर उष्णता निर्माण होते. पाण्याला उकळी फुटते. असा चुना त्याच्या दाहकतेमुळे काळजीपूर्वक हाताळावा लागतो. विशेषत: डोळ्यांचा तथा चामडीचा संपर्क कटाक्षाने टाळावा. चुना वापरण्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब म्हणजे हा सुरक्षित पर्याय आहे. त्याचे अंश हे हवेतील कर्बन डाय ऑक्साइड शोषून घेतील व त्याचे रूपांतर पुन्हा चुनखडीमध्ये होईल. चुनखडी हा तुलनात्मकदृष्ट्या एक निर्धोक आणि बऱ्याच अंशी निष्क्रिय असा पदार्थ आहे.
शेवाळाचा प्रादुर्भाव झालेल्या पृष्ठभागावर चुन्याची भुकटी भुरभुरावी व काही काळानंतर ओलावा नसेल तर थोडे पाणी शिंपडून खराटय़ाच्या अथवा मोरी घासण्याच्या ब्रशने नीट पसरून तो धुऊन काढावा. शेवाळ या दरम्यान बऱ्यापैकी उखडले जाते व धुतले जाते. शिल्लक राहिलेल्या चुन्याचा अंशामुळे शेवाळाची काही काळ वाढ होण्यास प्रतिबंधही होतो.
शेवाळाची समस्या जर जास्तच तीव्र असेल तर चुन्याच्या प्रक्रियेनंतर पृष्ठभागावर मोरचुदाचे (अंदाजे ०.१ ते ०.५ टक्के) सौम्य द्रावण बनवून त्यावर शिंपडावे. शिल्लक राहिलेले चुन्याचे अंश व मोरचुद यांचे द्राव्य असे शेवाळनाशक बोडरेसंयुग तयार होईल त्याचा परिणाम अधिक दीर्घकाळ टिकू शकेल.
शेवाळावर या उपरोक्त उपायाची परिणामकारकता ही वापरल्या गेलेल्या रसायनाची गुणवत्ता, प्रक्रियेचा कालावधी, वातावरण इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून राहील. प्रयोगाअंती आपणास त्यात सुधारणा करता येतील. रसायने ही शक्यतो माहीतगार माणसाकडून हाताळली जावीत अथवा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली त्याचा उपयोग करावा. डोळ्यांच्या संपर्कात ती येणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यावी. वापरल्या गेलेल्या रसायनाचा अथवा ती धुऊन टाकलेल्या पाण्याचा योग्य निचरा होईल याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. वापरण्यात येणारी साधने धुऊ न स्वच्छ करावीत. दाहक रसायनांच्या तीव्र द्रावणाच्या संपर्कामुळे वनस्पतीवर वा जीवजंतूंवर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवाळामुळे पाय घसरून होणारे अपघात, सुचविलेल्या उपायांनी काही अंशी टाळता येतील.
शेवाळ
हल्ली घरासभोवतालची जागा फरशीने अथवा सीमेंटच्या गिलाव्याने आच्छादित केलेली असते. पावसाळ्यात तयार होणारे तेथील शेवाळ ही बहुधा घरोघरीची समस्या असते.
आणखी वाचा
First published on: 26-07-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modss