मला आठवतं मोठ्ठं अंगण. अंगणात कडूलिंब आणि शेवग्याचं झाड. बाजूला विहीर. दोन प्रशस्त खोल्या, एक स्वयंपाकघर आणि ओसरी असलेलं असं माडीचं घर. माडीवर दोन खोल्या, ओसरीच्या बाजूला दोन ओटे, ओटय़ावरून माडीवर जाण्यासाठी पायऱ्या. अंगणात दोन-तीन म्हशी- माडीवर राहणाऱ्या गवळणीच्या होत्या. मला समज आली ती याच घरात. घरामागे कार्तिकस्वामीचं मंदिर होतं. कार्तिकमासात आमच्या घरी येणाऱ्यांची वर्दळ जास्त असायची. आम्ही रोज पहाटे उठून जायचो मंदिरात. आम्ही लावलेल्या झेंडूंचं फूलझाडही बहरलेले असल्यामुळे वातावरणात उत्साह असायचा. असंच एका वर्षी आम्ही गंमत म्हणून मक्याचे झाडं लावलं. त्याला भरपूर कणसं लागली. ती दाण्यांनी भरायला लागल्यावर आमचा आनंद द्विगुणित व्हायला लागला. दर आठवडय़ाला लवाजम्यासोबत येणारी माकडांची फौज त्याकडे दुर्लक्ष करायची. त्यामुळे आम्ही निवांत होतो. परंतु त्यांनी एक दिवस सर्व कणसं पळवली. आम्ही भावंडं अंगणातल्या म्हशींच्या पोटाखाली खेळायचो. त्यांनी कधी आम्हाला इजा केली नाही, उलट त्या आम्हाला खेळू द्यायच्या. मी चौथीत असताना हे घर आम्हाला बदलावं लागलं; तेव्हा कळलं हे घर आमचं नव्हतं. आम्ही भाडय़ाने राहात होतो. आता दुसरं घर..
अचलपूरातच, पण नदीच्या पलीकडे अब्बासपूऱ्यात मातीचं घर. मोठी खोली. स्वयंपाक घर. ओसरी आणि अंगणात फूलझाडं. त्यात एक मोठं पारिजातकाचं झाडं. घराच्या भिंती आणि जमीन शेणाने आणि पांढऱ्या मातीने सारवलेल्या असायच्या. पारिजातकाचा सुगंध अजूनही आठवणीत आहे. त्याच्या जोडीला शेणामातीचा सुगंध होता. दोन वर्षांत तेही घर बदललं आम्ही. जवळच असलेल्या राममंदिराच्या आवारात असलेल्या एका खोलीच्या घरात आम्ही राहायला गेलो. मंदिर मोठं होतं आणि भव्य परिसरही. तेथे कडूलिंब, पिंपळ, वड अशी झाडं होती. त्यावर निरनिराळे पक्षी असायचे. विशेषत: पोपटांची संख्या जास्त होती. त्यांचे घरटे मंदिराच्या घुमटावरील दगडी मूर्तीच्या खाचे खडगेत होते. त्यामुळे मंदिराचा घुमट अगदी कळसापर्यंत पोपटांनी सजवलेला वाटायचा नेहमी.
या मंदिरात आम्हाला बराच विरंगुळा असायचा. रामाची आरती, दोहे आणि हनुमानचालिसा तोंडपाठ झाले होते.
एक दिवस बाबांनी आम्हा सर्वाना सुखद धक्का दिला. स्वत:चं घर घेतल्याचं सांगितलं. स्वत:चं आणि हक्काचं आपलं घर! केवढा आनंद झाला सर्वाना. आम्ही ते बघायला गेलो. राममंदिराच्या उजव्या बाजूच्या रस्त्यापलिकडे असलेलं आमचं घर! एक विटांची भिंत. त्याला दोन लाकडी कवाडं (दार) असलेला दरवाजा आणि बाजूला थोडी वर असलेली एक खिडकी असं प्रथम दर्शनी दिसलं. आम्ही बाहेरच उभं होतो. मन मात्र आत जाऊन खिडकीतून डोकावू पाहात होतं. अशा उतावीळपणाने आम्ही दरवाज्यातून आत शिरलो. छोटंसं अंगण. समोर एक आणि उजव्या बाजूला एक अशा दोन ओसऱ्या. त्यामध्ये कोपऱ्यात विहीर. समोरच्या ओसरीच्या मध्यभागी असलेलं दार उघडून आत गेलो. ती एक मोठी खोली. आतल्या बाजूला स्वयंपाकघर. अंगणात पेरूचं झाड. आम्हाला घर आवडलं. ‘हे आपलं घर’ या विचारानेच किती हरखून गेलो होतो तेव्हा. उजव्या बाजूच्या ओसरीच्या भिंतीत एक सुबक डिझाइन केलेला कोनाडा होता तेथे आम्ही गणपतीची स्थापना केली. त्या ओसरीच्या अध्र्या भागात चार फूट भिंत कम पार्टीशन करून बैठकीची जागा केली. अशी थोडीफार डागडुजी करून आम्ही राहायला गेलो. त्या छोटय़ा भिंतीला मी स्वत: शेण, माती आणि गवत एकत्र पायांनी मिसळून गिलावा केला होता. काही दिवसांनी समोरच्या ओसरीच्या जागी (स्र्’ं२३ी१्रल्लॠ) एक छोटी अभ्यासासाठी खोली बांधली. ते विटांचं बांधकाम बाबांनी आणि मी मिळून केलं होतं तेव्हा विटा रचणं शिकलो. तो पेशा नसतानाही आपल्या घरातील भिंतीच्या प्रत्येक थराला आपला स्पर्श आहे, हे मात्र सुखद होतं. पाण्याचा प्रश्नच नव्हता. विहिरीला भरपूर पाणी. स्वच्छ, शुद्ध पाहिजे तेव्हा आणि आवश्यक तेवढं..
मुख्य दरवाजातून आत शिरल्यानंतर डाव्या बाजूला पाय धुण्यासाठीची जागा. त्याला लागूनच पेरूचं झाड. त्यावर पोपटांचा आणि चिमण्यांचा किलबिलाट. काही दिवसांनी मी लिंबूची कलम लावली तेही बहरलं, भरपूर लिंबू पाहिजे तेव्हा ताजे मिळायचे. या परिसरातही माकडांचा वावर असायचा. सर्वसाधारण पंधरवडय़ात त्यांची फेरी असायची. फळांची चंगळ करून पळायचे. त्यासोबत कौलारू छप्प्रांची वाट लावून जायचे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ते व्यवस्थित फेरून घ्यावं लागे. तेव्हा मीही फेरणाऱ्यांच्या सोबत घरावर चढून त्या कामाचा आनंद लुटायचा. घराची साफसफाई, रंगरंगोटी आम्ही भावंडं मिळून करायचो. दिवाळीला सर्व दरवाज्यांवर वेलबुटी आणि बैठकीला खास वेगळा रंग असायचा. तीन फुटावर एक नक्षीदार पट्टा रंगविण्यात आणि गणपतीचा सुबक कोनाडा रंगविण्यात आम्हाला फार मौज वाटे.
घरातील भिंतीला भरपूर कोनाडे होते. दिवे लावणीच्या वेळी रोज प्रत्येक दरवाज्याच्या दोन्ही बाजूच्या कोनाडय़ात दिवे लावायचो. तेव्हा जनावरांच्या परतीचा नाद.. समोरच असलेल्या राममंदिरातील टाळ आणि घंटा. पक्षांचा किलबिलाट शेणामातीचा सुगंध. घरोघरी पेटलेल्या मातीच्या चुलीतील लाकडांचा धूर पिंपळाच्या झाडाच्या पानांचा आवाज, हे वातावरण अजूनही साद घालतं.
घरात कपडे, पिशव्या अडकवण्यासाठी खुंटय़ा होत्या. आलेले पत्र किंवा इतर महत्त्वाचे कागद अडकवण्यासाठी तारेचा वापर करायचो. आमच्या घरात फर्निचर नसल्यातच जमा होतं. फक्त अभ्यासासाठी टेबल- खुर्ची, टेबलाला पुस्तकं ठेवण्यासाठी कप्पे होते. ते आम्ही भावंडं वाटून घेत असू. अभ्यासाच्या पुस्तकाचा पसारा कमी असायचा तेव्हा. पाटी हेच महत्त्वाचं साधन होतं. त्यापैकी मला आवडणारी चित्रकलेची वही आणि पाटी! अभ्यास करता करता पाटीवर चित्र काढून पुसायची सोय असायची.
आमचं हे घर हवेशीर, मोकळं, आटोपशीर, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असलेलं होतं. लाकडी फळींचे दरवाजे, कौलारू छप्पर असल्यामुळं घर बंद केल्यावरही हवा आणि प्रकाश खेळता असायचा. त्यातून पडणारे कवडसे हा एक मजेशीर विरंगुळा होता. ते जिवंत वाटायचे. त्यात बाहेरील झाडांच्या हलणाऱ्या पानांच्या प्रतिमा दिसायच्या. या उनसावलीच्या खेळावरून आम्ही वेळ ठरवायचो.
आमच्या घरासमोरचा रस्ता जवळच असलेल्या ‘नौबाग’ रेल्वे स्टेशनकडे जायचा. त्यामुळे गावाच्या एका टोकाला घर असूनसुद्धा येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असायची. बाबांचं चित्रकलेचं साहित्य बैठकीत असायचं. बाबा चित्र रंगवीत असताना मी अगदी तल्लीन व्हायचो. त्यांना लागेल ती मदत करण्यास मी तत्पर असायचो. आमचा अभ्यास केरोसीनचा दिवा-कंदिलाच्या प्रकाशात व्हायचा. काही दिवसांनी आमच्याकडे विजेचे दिवे आले तेव्हा रात्रीचा प्रकाश वाढला.
उन्हाळ्यात  आई रात्रीचा स्वयंपाक अंगणात मोकळ्या हवेत करायची, तिनेच केलेल्या मातीच्या चुलीवर. आम्हीही अभ्यास आणि वाचन अंगणात खाटल्यावर करायचो.
घर सावरण्यासाठी आणि अंगणात सडा टाकण्यासाठी शेण लागे ते आम्ही स्वत: गोळा करून आणायचो. असे मातीच्या सान्निध्यात बालपणापासून दहावीपर्यंत होतो. त्यानंतर सुटीतच घरी येणे होई. मुंबईला शिकायला आल्यापासून सुटीतही घरी जाणे शक्य नसे. सुटीच्या कालावधीत मी काही कमिशन काम करून अभ्यासाचा खर्च भागवायचो. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर करिअरसाठी स्ट्रगल सुरू होतं. घराकडे कल असूनसुद्धा वेळ मिळत नव्हता. चित्रकलेला मुंबईशिवाय पर्याय नव्हता. वडिलांसारखं अध्र्यावर शिक्षण सोडून जायचं नव्हतं मला. कारण त्यांच्यातील दबत गेलेला चित्रकार पाहिला होता मी. बाकी भावंडही इकडे-तिकडे स्थायिक होत गेली.
एक दिवस कळलं घर विकताहेत. दु:ख झालं. तेथे रचलेला मातीचा थर, भिंतीचा गिलावा, पेरूचं आणि लिंबूचं झाड. लाकडी फळींचे दरवाजे. कुलूपवजा घरातील संस्कृती. हा स्पर्श, सुगंध आणि नाद असलेला लाकूड, माती, प्रकाश, हवा, पाणी असलेली ऊर्जात्मक वास्तू झाली होती ती..
खरंच वास्तू ही चार भिंतीची नसून त्या अवकाशात तेथे राहणाऱ्यांची ऊर्जा एकवटून त्याची वास्तू बनते व त्यावरच ती टिकते.
माझ्या मुंबईच्या घरात, नव्हे फ्लॅटमध्ये पारिजातकाचं झाड, कोणाडय़ात पणती आणि मातीचा भास निर्माण करणारी भिंत माझ्या बालपणीच्या घराच्या आठवणी तेवत ठेवतात नेहमी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा