मुंबईतल्या एका जुन्या चाळीमध्ये पाण्याचे प्रश्न, मोडकळीला आलेली इमारतीची स्थिती, लग्नानंतर मुलांचे विस्तारणारे संसार आणि त्यामुळे अपुऱ्या पडणाऱ्या जागा, यामुळे चाळीतल्या बहुतेक रहिवाशांच्या मनात मोठय़ा घराचं स्वप्न रुजू लागलं. हे स्वप्न हळूहळू तग धरू लागलं आणि काहींच्या मनात ते झपाटय़ाने जिवंत व्हायची धडपड करू लागलं. मग अशा अस्वस्थ माणसांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशांसारखी झाली आणि जिवाची ही तडफड अखेर इमारतीच्या पुनर्वकिासाचा पाया घालणारी ठरली. अखेर इमारत सोडून भाडय़ाच्या तात्पुरत्या जागांमध्ये जाण्याचा दिवस उजाडला..
चाळीतल्या सगळ्या बिऱ्हाडांची सामानाची बांधाबांध करण्यासाठी एकच धावपळ सुरू होती. शिर्केचा सहा वर्षांचा योगेश आईला आतल्या खोलीतून सामान आणून द्यायला मदत करीत होता. शेजारच्या आठवले आजोबांच्या घरातही सामानाची बांधाबांध करताना ‘अगं हे घेतलं का? ते राहूनच गेलं की’ असं म्हणून काही विसरायला नको, यासाठी सामानाची यादी आजोबा सारखी मनात आळवून बघत होते. सर्वच घरांत ही अशी धावपळ सुरू होती. सामान न्यायला आपला टेम्पोवाला कसा आला नाही, म्हणून कोणी वाट बघत होता, तर कोणी टेम्पोत आपलं सामान लावून घेण्याच्या धामधुमीत होता.  
चाळीतल्या शिर्के, माने, कांबळे, जुकर, देशपांडे, आठवले, अशा सगळ्यांचा, चाळीतला हा शेवटचा दिवस होता. चाळमालक, भाडेकरू आणि बिल्डर यांच्यात झालेल्या करारानुसार त्यांची चाळ बिल्डरला विकली गेली होती. ती पाडून तिथं टोलेजंग टॉवर उभारला जाणार होता. त्यासाठी या सर्वाना दुसऱ्या भाडय़ाच्या जागेत तात्पुरतं जाण्यासाठी बिल्डर पसे देणार होता. त्यामुळे इतकी र्वष एकमेकांच्या घरांना खेटून असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि रोज एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या सर्व कुटुंबांची आता निदान पुन्हा नवा टॉवर उभा राहीपर्यंत तरी पांगापांग होणार होती. जुकरांचा मधू, आपण नवीन लग्न होऊन टॉवरमधल्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार, याची स्वप्नं रंगवत होता, तर देशपांडेंना टॉवरमधल्या नव्या फ्लॅटचा वाढीव मेण्टेनन्स कसा भरायचा, याची विवंचना लागली होती. आठवले आजोबांच्या मुलाने आधीच वेगळी जागा बुक केली होती आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, की या टॉवरबिवर प्रकरणात आपल्याला काही रस नाही. कारण तिथं मिळून मिळून किती जागा मिळणार? त्यामुळे त्याने बिल्डरला सांगून ठेवलं होतं की, आपल्या वाटय़ाची जागा चाळीबाहेरच्या माणसाला विकून आपल्याला पसे दे. ते पसे घेऊनच तो थोडी मोठी जागा विकत घेणार होता. प्रत्येकाची स्वप्नं वेगळी, समस्या वेगळ्या आणि मनसुबे वेगळे. संध्याकाळपर्यंत एकएक करून सगळी कुटुंबं आपल्या सामानासकट आपापल्या घरी रवाना झाली. दुसऱ्या दिवशी ती चाळ पाडली जाणार होती. मरणपंथाला लागलेली आणि अवघ्या काही तासांचं आयुष्य उरलेली ती रिकामी एकाकी चाळ संध्याकाळी दिवे लागणीनंतर काळोखानं पोखरून गेल्यामुळे आणखीच भकास दिसत होती. रोज संध्याकाळी खेळणारी-बागडणारी मुलं, खोलीबाहेर टांगलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यातल्या तुळशीपाशी लागणारे दिवे, घराघरांतून निनादणारे रोजच्या डेलीसोप मालिकांच्या टायटल साँगचे सूर, असं आज काहीही नव्हतं. पसरलेली होती ती फक्त मोकळ्या खोल्यांमधली अंधारी स्मशान शांतता!
दुसरा दिवस उजाडला. चाळ आज सुरुंग लावून पाडली जाणार होती. चाळीच्या आजूबाजूचा परिसर तसा थोडासा मोकळा असल्यामुळे हा परिसर निर्मनुष्य करून चाळीच्या तळमजल्याला खणून त्यात हा सुरुंग पेरला जाणार होता. हातोडय़ाचे घाव घालून पाडायला बराच वेळ लागत असल्यामुळे, आधीच ठरवलेल्या योग्य प्रमाणात सुरुंगाची दारू पेरून फक्त हीच इमारत पडेल याची तजवीज करणारं, इमारत पाडण्याचं हे नवं तंत्रज्ञान वापरलं जाणार असल्याचं बिल्डरनं सांगितलं होतं. भारतात हे तंत्रज्ञान नवीन असलं तरी परदेशात ते यशस्वीपणे वापरलं जातं, असं सांगून लगतच्या परिसराला धोका नसल्याचा निर्वाळाही त्यानं दिला होता. दुरूनच चाळीचं शेवटचं दर्शन घेऊन तिच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी चाळीतली काही कुटुंबं आली होती. आजूबाजूच्या परिसरातले काही जण इमारत पाडण्याचा हा नवीन प्रकार पाहण्यासाठी कुतूहलापोटी मुद्दाम आवर्जून आले होते. कोणी तरी बातमी आणली की, तळमजल्यावरच्या कुळकण्र्याच्या घरात सुरुंग ठेवला जातो आहे आणि ‘माझ्याच मेलीच्या घराचा वापर सगळ्यांची घरं पाडण्यासाठी केला जातोय’, असं म्हणून कुळकर्णी काकू एकदम रडायलाच लागल्या. आपल्यापुरता विचार करायची वृत्ती कुळकर्णी काकूंना अजून शिवली नव्हती. त्यामुळेच त्यांना रडू आवरेना. थोडय़ाच वेळात प्रचंड कडकडाट करीत ती चाळ एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसऱ्या मजल्यावरचं कोपऱ्यातलं आपलं घर कोसळताना पाहून िशदेंच्या आठ-दहा वर्षांच्या विजयालाही रडू कोसळलं. त्या नव्या टॉवरची ती नांदी होती. एखाद्या गोष्टीच्या विनाशात बऱ्याचदा दुसऱ्या नव्या गोष्टीची मुळं रुजत असतात. पण विजयाला ते सहन झालं नाही. शेजारीच उभ्या असलेल्या आपल्या बाबांना तिने प्रश्न विचारून भंडावून सोडलं. ‘बाबा ही चाळ जुनी झाली होती, तर ती पाडून पुन्हा तिकडे नव्याने चाळच का बांधत नाहीत? चाळ पाडल्यावर टॉवरच बांधला पाहिजे का? नवीन चाळ बांधली, तर आपण पुन्हा सगळे पहिल्यासारखे एकत्र राहू शकणार नाही का?’ पण तिच्या प्रश्नांना तिचे बाबा काय उत्तर देणार होते? चाळ बिल्डरला विकायला विरोध करणाऱ्यांमध्ये सुरुवातीला तेही होते, पण अखेरीला बहुमताच्या रेटय़ापुढे, बिल्डरच्या दबावापुढे त्यांचं काहीही चालू शकलं नव्हतं.
चाळ पडली. सगळे आपापल्या तात्पुरत्या घरांमध्ये राहायला लागले आणि स्थिरावले. पुढे दीड-दोन वर्षांत टॉवर उभा राहिला. आठवले आजोबा मुलाच्या नव्या मोठय़ा जागेत राहायला गेले. त्यामुळे ते या नव्या टॉवरमध्ये परतलेच नाहीत. देशपांडेंनीही टॉवरमधली आपली जागा विकून विरारला कमी मेण्टेनन्सची जागा बघून ते तिथं राहायला गेले. जुकरांच्या मधूचं मधल्या काळात लग्न झालं; परंतु टॉवरमधली जागा अपुरी पडणार म्हणून त्यानेही ती जागा विकली. काही कुटुंबं सोडली, तर अशाच प्रकारे चाळीतले बरेच जण पांगले. चाळ सोडून तात्पुरत्या जागेत राहायला जाताना पुन्हा टॉवरमध्ये आल्यावर काय काय करायचं याच्या आणाभाका या चाळीतल्यांनी चाळ सोडून जाताना घेतल्या होत्या. त्या सगळ्या तिथंच विरून गेल्या आणि चाळीतले सगळे पांगले, ते कायमचेच!
या चाळीची ही गोष्ट म्हणजे मुंबई, पुणे, नाशिकमधल्या अनेक जुन्या चाळी, वाडे आणि इमारतींचं प्रातिनिधिक चित्रच आहे. हे चित्र बदलायचं असेल, तर जुन्या इमारतींमधल्या रहिवाशांनी होता होई तो, इमारत दुरुस्तीचा अथवा ते शक्य नसेल, तर स्वयंविकासाचा मार्ग स्वीकारावा. अशा प्रकारे स्वत:च एकत्र येऊन आपल्या इमारतीचा विकास साधणं हे कठीण जरूर आहे, तसंच सर्वानी एकत्र येऊन हे करणं तर त्याहून अधिक कठीण आहे, असं काही जण म्हणतील. पण पुनर्वकिास अशा प्रकारे साधला, तर अनेकदा पुनर्वकिास करताना मिळणाऱ्या जादा एफएसआयचा फायदा एखाद्या बिल्डरच्या खिशात जाण्याऐवजी त्यांनाच तो मिळू शकतो. त्यामुळे कर्ज काढून मुख्य शहरापासून लांब कुठं तरी त्याच शहराच्या तथाकथित उपनगरांमध्ये जाण्याऐवजी आवश्यक तो निधी उभारून, आहे त्याच जागी त्यांना मोठी जागा मिळू शकेल. यासाठी आíथक संस्था आणि बँकांकडून अशा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या विशेष योजना सुरू व्हायला हव्यात. सरकारनंही अशा प्रकारच्या स्वयंविकासाला चालना देण्यासाठी रहिवाशांना अधिकाधिक प्रोत्साहन देणाऱ्या नवनव्या योजना सुरू केल्या पाहिजेत. अशा प्रकारे नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींना, नवीन इमारतींसाठी वाढीव दरानं लागू होणारा भरमसाट कर आकारला जाणार नाही, यासाठी कायदेशीर तरतूद करणं आवश्यक आहे. आताच्या काळात पगाराचे आकडे वाढत आहेत आणि कर्जाचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठय़ा जागा घेण्याकडे कल वाढतो आहे. याचा अर्थ वन रूम किचन किंवा वन बीएचके घेणारा वर्ग समाजातून नष्टच झाला आहे, असा होत नाही. परंतु अनेकदा जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवे टॉवर बांधताना असा ग्राहक अस्तित्वातच नसल्याचं कारण देऊन केवळ दोन बीएचके, तीन बीएचके किंवा त्याहूनही मोठय़ा जागाच बांधल्या जात आहेत. त्यामुळे मूळच्या इमारतीत राहणाऱ्या माणसांना आपल्याला बिल्डरकडून मिळणाऱ्या जागेपेक्षा थोडी मोठी जागा घ्यायची असेल, तर अशा जागा त्याच टॉवरमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध नसल्यानं आणि फार मोठय़ा जागा बजेटमध्ये बसत नसल्यानं स्थलांतर करावं लागतं. त्यामुळे मुंबईतल्या दादर, माहीम, गिरगावसारख्या किंवा पुण्यात गावातल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ यांसारख्या अथवा नाशिकमधल्या कॉलेज रोडसारख्या पांढरपेशा मध्यमवर्गीय भागांमधून हळूहळू हा वर्ग समूळ उच्चाटन होण्याच्या मार्गावर आहे.
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या गृहविषयक धोरणात या दृष्टीनं काही महत्त्वाचे बदल होणं आवश्यक आहे. टॉवरमध्ये लहान जागा बांधण्याचं सक्तीचं केलं गेलं असलं, तरी अशी सक्ती करताना या इमारतींच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत लहान जागांच्या क्षेत्रफळाचं प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक असणं आवश्यक आहे. कारण एक मोठा फ्लॅट मागाहून दोन लहान फ्लॅटमध्ये विभागून ते निरनिराळ्या व्यक्तींना विकणं शक्य नाही. परंतु मोठय़ा फ्लॅटची गरज असणारी व्यक्ती शेजारचे दोन किंवा तीन लहान फ्लॅट विकत घेऊन ते आतून जोडमू शकते. अशा प्रकारे लहान जागा बांधायला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्वयंविकास करू इच्छिणाऱ्या मूळ इमारतीतल्या रहिवाशांना जादा एफएसआय द्यावा, तसंच बांधकामासाठी आíथक मदत द्यावी. इमारत जुन्या झाल्यामुळे त्या पुन्हा उभारणं गरजेचं आहे, परंतु ते करीत असताना तिथल्या मूळच्या रहिवाशांच्या आíथक मर्यादा आणि गरजा लक्षात घेणं आणि या रहिवाशांचं त्या इमारतीतलं अस्तित्व धुळीला मिळणार नाही, याची काळजी घेतली जाणं आवश्यक आहे. तसं झालं तरच जुनं ते सोनं म्हणता येईल, अन्यथा सर्वच बाबतीत केवळ जुने जाऊ द्या मरणालागूनी.. या वृत्तीमुळे आपण सर्व गमावून बसू…

Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
new luxurious administrative building of thane municipal corporation will be constructed on site of Raymond Company residents oppesed
निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधींची घरे घेतली पण, तेच नष्ट होतेय
Story img Loader