मुंब्रायेथील शीळफाटय़ाजवळ ६ एप्रिलला लकी कंपाउंडमध्ये एक सात मजली इमारत पत्त्याचा मनोरा कोसळतो तशी कोलमडली. परिणामी ७४ जणांचा नाहक बळी गेला. मनोऱ्यामध्ये राहण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. त्यांची चूक काय तर परिस्थितीमुळे आलेली हतबलता, की साधा पत्त्याचा मनोरासुद्धा आपल्या उभ्या आयुष्यात, कसा उभा राहतो याचे अज्ञान? संसार सांभाळता सांभाळता थोडय़ा मोठय़ा जागेत (फुकट मिळणाऱ्या) विश्रांती घेण्यात जाण्याचे स्वप्न ‘लकी कंपाउंड’मध्ये क्षणभंगुर ठरेल किंबहुना ‘चिरविश्रांती’ची सोय बिल्डरने किती कमी कालावधीत केली याचा अंदाजच कोणालाही आला नाही, ही खरी शोकांतिका आहे. सध्या स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टी ‘मेड इन चायना’ या लेबलखाली उपलब्ध असतात. पण तो माल विकणारे त्याची गॅरंटी कधीच देत नाहीत. चीनमध्ये, इतर देशात महिन्या-दोन महिन्यांत इमारती उभ्या करतात. पण ते तंत्रज्ञान आपल्याकडे कोणी आत्मसात केले आणि त्याचा रिझल्ट काय लागला हे आपण मुंब्य्राच्या निमित्ताने पाहिले.
खोटी डिग्री घेऊन समाजात वावरणारे डॉक्टर्स, इंजिनीअर्स, आर्किटेक्ट हे एक वेळ धारावीतील आरोग्य सांभाळतील, इंजिनीअर्स दोन मजली इमारत बांधतील, त्यांचा खोटेपणा कधी ना कधी उजेडात येईल. पण पैशाच्या जोरावर (मग कुठल्याही मार्गाने मिळविलेला असो) झालेला बिल्डर, ना त्याचे शिक्षणाचे प्रमाणपत्र ना कोठलेही लायसन, मोकाटपणे इमारतीवर इमारती उभ्या करत सुटले असल्याची आकडेवारीच सांगते. त्यांना पाठीशी घालणारे कोण आहेत हे तर आता उघडच झाले आहे. कदाचित एखादा त्यातला म्हणेल, ‘होत असतात’ असे छोटे-छोटे अपघात गेलेल्यांच्या नशिबी तेवढेच आयुष्य होते.’
एकंदरीत येत असलेल्या माहितीवरून ‘नेमके काय चुकले’ याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. कुठल्याही सोसायटीने, चाळीत राहणाऱ्यांनी पुनर्विकासाकडे जाताना खबरदारी घेण्याची आवश्यकता वाटते. प्रत्येक गोष्टीची कुंडली मांडण्यास त्यातील कुठले ‘ग्रह’ अनुकूल वा प्रतिकूल आहेत, याची सुरुवातीस पडताळणी करणे आवश्यक आहे.
जागा/जमिनीची कुंडली
प्रस्तावित इमारतीची जमीन कुणाच्या मालकीची आहे. त्याची सरकारदरबारी काय नोंद आहे. जमिनीचा ‘उपयोग’ कशासाठी आहे, जमीन तंटामुक्त आहे का? आपल्या जमिनीमध्ये जा-ये करण्याकरिता आवश्यक रस्ता आहे का? पावसाळ्यात जमीन पूर्ण पाण्याखाली तर नसते ना? जमिनीचा पूर्वइतिहास काय आहे. नदीकाठी, समुद्राकाठी वनक्षेत्राजवळ, आदिवासींची आहे काय या सर्व गोष्टींची सखोल चौकशी आवश्यक ठरते. जमिनीची ‘भार-वाहकता’ (Safe Bearing Capacity) किती आहे हे जाणूनच मग इमारत बांधकामासाठीच्या ‘पाया’चे नियोजन ठरते. थोडक्यात आपले कंपाउंड कसे आहे, याची माहिती घेणे.
इमारतीची कुंडली
जमिनीच्या उपयोगाप्रमाणे प्रस्तावित इमारतीचे नियोजन आहे किंवा कसे? राहण्याच्या जागेसाठी इमारत बांधून त्यात फॅक्टरी / उद्योगधंदा करण्यास सुरुवात केली तर आपले ‘ग्रह’ फिरले याची पुरती जाणीव असावी. इमारत काळ्या मातीत उभी करण्याचे नियोजन असल्यास ‘पायलिंग’चा पाया अत्यावश्यक आहे. इमारत बांधताना जमीन विषयाचे तज्ज्ञ (Geo Technical Engineer) यांचा सल्ला प्रत्येक इमारतीसाठी घेणे शहाणपणाचे अन्यथा आपणदेखील ‘लकी सभासद’ होण्यास पात्र होऊ शकतो. मुंब््रय़ामध्ये नेमकी पहिली चूक येथेच झाली.
सर्वच इमारतीचा पाया हा गवंडी-आर्किटेक्ट नव्हे तर अभियंताच ठरवितो. इमारतींना सांगाडा, त्या इमारतीच्या प्रस्तावित उपयोगितेनुसार तयार होत असतो. अधिकृत इमारतीकरता प्रस्ताव संबंधित भागातील सरकारी यंत्रणेकडून संमत करून घेण्याचे काम आर्किटेक्ट/ इंजिनीअरकडून होणे अपेक्षित असते. अशी पद्धत न अवलंबिता झालेले काम लकी कंपाउंडप्रमाणे अनधिकृत ठरते, हे सांगणे न लगे. सांगाडा व इतर बांधकाम करताना वापरली जाणारी वाळू-खाडी, समुद्रातील तर नाही ना तसेच सिमेंट (खाली पडलेले सिमेंट गोळा करून सिमेंट गोण्यातून भरलेले तर नाही ना) खात्रीपूर्वक विक्रेत्याकडून आणले किंवा कसे या सर्वाची कुंडली वेळोवेळी तपासणे अत्यावश्यक असते. बांधकाम सुरक्षित व पक्के होण्याकरिता लागणारा वेळही कमी महत्त्वाचा नसतो. उतावीळपणाचे परिणाम लकी कंपाउंडमध्ये सहज लक्षात येतात. बांधकामासाठी वापरले जाणारे पाणीदेखील कसे असावे यासाठी मार्गदर्शक-नियम असतात. क्षारयुक्त, खाडी, समुद्राचे पाणी बांधकामासाठी वज्र्य मानले जाते. लकी कंपाउंडच्या इमारतीने कोठले पाणी वापरले गेले याची महिती पुढे येणे आवश्यक आहे.
आजकाल सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या बांधकामाबद्दल बोलणारे (अभियंता नसलेले) समाज- सेवक- पुढारी प्रबळ झालेले दिसतात. बिचाऱ्या बिल्डरला / कंत्राटदारांना अनेक आव्हाने झेलावी लागतात. दुर्दैवाने त्यांचे ‘बळ’ वाढविता वाढविता, इमारतीचे ‘बळ’ घटून जाते. इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत त्या इमारतीभोवती कुठल्या घरात कोणते ‘ग्रह’ फिरत असतील किंवा असतात याचा अंदाज (Estimate) बिचाऱ्या अभियंत्याला येत नसतो. या सर्वावर कढी म्हणजे ‘अभियंत्या’शिवाय इतर स्वत:ला जबाबदार म्हणविणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील ‘अनधिकृत’ इमारती एक तर दिसत नाहीत. किंवा काळा चष्मा घालूनच समाजात वावरतात. यावर उपाय म्हणून अभियंत्यांचे बळी दिले जातात, हे आपण प्रत्येक वेळी पाहतो. अभियंत्यांनी बेजबाबदार वागणे मात्र केव्हाही अयोग्यच.
बिल्डरची कुंडली
या कुंडलीतील सर्व घरात बहुधा ‘भाग्यवान ग्रह’ फिरत असावेत. पात्रतेबद्दलचा निकष म्हणजे तो ‘दखल’पात्र असणे आवश्यक झाले आहे. मात्र तो ‘दखल’ आपली/ आपल्या इमारतींची घेतो किंवा अन्य कोणाची हे पडताळणे जरुरीचे. कसे या प्रश्नास उत्तर नसते. ते आपापल्या कुंडलीत दडलेले असते. मुंब्य्राच्या निमित्ताने ‘दखलपात्र’तेचे जळजळीत अंजन प्रत्येकाच्याच डोळ्यात घातले आहे. कदाचित खालील ओळी मनात येऊ शकतात,
‘दिव्य’त्वाची देत प्रचीती। तेथे कर ‘त्यांचे’ भरती।।
असे ‘दिव्य-जळजळीत’ अंजन डोळ्यात घालणारा आपणास चालणार का? याचे उत्तर शोधण्यासाठी ‘मोह’ सोडून ‘वास्तव’ जाणणे जरुरीचे आहे. त्याचा पूर्वइतिहास-क्षमता, मनुष्यबळ, या गोष्टी जाणाव्यात.
अधिकाऱ्यांची कुंडली
ही कुंडली बुहुधा ब्रह्मदेवच बनवीत असावा. विद्येने संस्कारित झालेला पण ‘सांगून बघतो’ किंवा ‘बघून सांगतो’ असा धोशा लावणारा, तुम्हा-आम्हा- प्रत्येकासाठी ब्रह्मदेवाचा Representative च. त्याच्याकडे ‘अधिकृत’पणे येणाऱ्या प्रस्तावाचाच तो विचार करणार. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘अनधिकृत’ कामाचे प्रस्ताव हे ‘अनधिकृत’ यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडे जात असतात किंबहुना तिथेच त्या प्रस्तावांची ‘दखल’ घेतली जाते. सर्वसामान्यांना नियमांचे ज्ञान नसल्याने अधिकाऱ्यांना सुशिक्षित- आर्किटेक्ट/ अभियंत्यांची गरज भासते. सर्वसामान्य कुंडली व अधिकाऱ्यांच्या कुंडलीतील ग्रह स्थिरस्थावर झाले की पुढील कार्याचे शुभमंगल होते. मुंब्य्रातील कुंडली या दृष्टीने शुभमंगल नव्हती, हे स्पष्ट झाले आहे असे दिसते.
नेमके काय चुकले?
मुंब्रायेथील शीळफाटय़ाजवळ ६ एप्रिलला लकी कंपाउंडमध्ये एक सात मजली इमारत पत्त्याचा मनोरा कोसळतो तशी कोलमडली. परिणामी ७४ जणांचा नाहक बळी गेला. मनोऱ्यामध्ये राहण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.
First published on: 20-04-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra illegal building collapse what went wrong