सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत आघाडीवर असणारे नाशिक आता मुंबई-पुण्याशी स्पर्धा करण्याइतपत सक्षम होण्याच्या मार्गावर आहे.
राज्यातच नव्हे, तर देशात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या नाशिकचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत आघाडीवर असणारे नाशिक आता मुंबई-पुण्याशी स्पर्धा करण्याइतपत सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही शहराचा विकास हा खरे तर दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून असतो. त्यात नाशिक तसूभरही मागे नाही. सुवर्ण चतुष्कोनातील मुंबई, पुणे व औरंगाबादशी जोडणारे रस्ते जसजसे विस्तारित होऊ लागले, तसा नाशिकच्या विकासाला विलक्षण वेग प्राप्त झाला. मध्य रेल्वेच्या मार्गावरील या शहरात अत्याधुनिक विमानतळदेखील आकारास आले आहे. यामुळे हवाई नकाशावरही नव्या थाटात नाशिक पुन्हा झळकणार आहे.
मुंबई, पुण्यापाठोपाठ विकसित होणारे शहर अशी ख्याती मिळविताना नाशिकने आपले वेगळेपण टिकवून ठेवले ते आल्हाददायक वातावरणामुळे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकची कधी काळी इंग्रजांनाही भुरळ पडली होती. या ठिकाणी सहजपणे पोहोचता यावे म्हणून त्यांनी लष्करी आस्थापना आणि चलार्थ मुद्रणालयाची स्थापना करून मुंबईशी त्याचा निकटचा संबंध राहील याची काळजी घेतली. त्या अनुषंगाने नाशिकरोड ते मुंबई दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पायाभरणी झाल्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच विकासाच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या नाशिकने आज कृषी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्राबरोबर वाइन निर्मितीतही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील हा विस्तार स्थावर मालमत्ता क्षेत्रास ऊर्जा देणारा ठरला. गोदा काठावरील ऐतिहासिक व प्राचीन मंदिरे, बारा ज्योतिर्लिगातील एक त्र्यंबकेश्वर, उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी सप्तशृंगी देवी आणि दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिक पर्यटन केंद्र ही खरे तर नाशिकची पूर्वापार चालत आलेली ओळख. ही मूलभूत ओळख कायम ठेवत नाशिकने अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. मुंबई, पुणे व सुरत या औद्योगिकदृष्टय़ा विकसित शहरांपासून नाशिक हे समान अंतरावर आहे. विशेष आर्थिक प्रकल्प, प्रस्तावित दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, वाहन उद्योगातील बडय़ा उद्योगांचे सान्निध्य यामुळे औद्योगिक क्षेत्रात नाशिक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. औद्योगिक विकासाला शेतीचे पाठबळ जसे लाभले, तसेच शैक्षणिक संस्थांच्या विस्तारामुळे कुशल मनुष्यबळही स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले. अलीकडच्या काळात देशाची वाइन निर्मितीची राजधानी म्हणूनही नाशिकने नवीन ओळख निर्माण केली. या सर्व घडामोडींचा परिणाम शहरीकरणाचा वेग वाढण्यात होऊन स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
नाशिक-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अवघ्या काही तासांत सुखद व जलदपणे मुंबईहून नाशिक गाठणे प्रत्यक्षात आले आहे. या विस्तारीकरणाने नाशिक-इगतपुरीदरम्यानचे अंतर संपुष्टात आल्याची साक्ष त्या ठिकाणी आकारास येणारे गृह प्रकल्प देतात. पुणे व औरंगाबाद शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. एरवी नाशिक-पुणे हा कंटाळवाणा प्रवास समजला जायचा. पण संगमनेर शहरातील बाह्य़ वळण रस्त्याच्या निर्मितीमुळे शहरातील कोंडीतून वाहनधारकांची सुटका झाली. सिन्नर-राजगुरूनगर रस्त्याचे काम वेगात सुरू असून नाशिक-सिन्नर टप्प्याचे काम सिंहस्थापूर्वी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण झाल्यास नाशिक-पुणे दरम्यानचा प्रवासाचा कालावधी बराच कमी होईल. त्याचा लाभ उद्योजक व व्यापारी आस्थापनांना होणार आहे. औरंगाबादला जोडणाऱ्या महामार्गाचा बहुतांश टप्पा विस्तारित झाला असून काही भागाचे काम केवळ शिल्लक आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जायचे असेल तरी चौपदरी रस्त्याची व्यवस्था आकारास येत आहे. यामुळे अवघ्या २५-३० मिनिटांत हा प्रवास दृष्टिपथास येईल. नाशिक-दिंडोरी व पेठ महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे गुजरात फारसे लांब राहिलेले नाही.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील नाशिकरोड स्थानकामुळे रेल्वे मार्गे नाशिकला पोहोचणे सुलभ आहे. उद्योग विस्तारासाठी हवाई वाहतूक व्यवस्था अनिवार्य ठरते. स्थानिक उद्योजकांच्या मागणीनुसार नाशिक-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ओझरस्थित नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच हे काम पूर्ण झाले असून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी पुन्हा सज्ज झाले आहे. या विमानतळावर ‘हॉपिंग फ्लाइट’ची सेवा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या पद्धतीने सेवा कार्यान्वित झाल्यास देशातील प्रमुख महानगरांशी नाशिक हवाईमार्गे जोडले जाईल.
नाशिक शहरातून बाहेर जाणारा प्रत्येक रस्ता चौपदरी असावा यावर कटाक्ष ठेवण्यात आला आहे. यामुळे महापालिकेची हद्द ओलांडून आसपासच्या भागात वास्तव्य करण्याचाही विचार होत आहे. वाडिवऱ्हे, ओझर, त्र्यंबक रस्ता, भगूर, शिंदे, पळसे आदी भागांत नव्याने साकारले जाणारे निवासी प्रकल्प त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. पंचतारांकित सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या लगत विशेष आर्थिक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे सिन्नरची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. चार वेशीच्या आत वसलेल्या सिन्नरच्या सभोवती नवनवीन बांधकाम प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याने गावाची हद्द कधीच ओलांडली आहे. तशीच स्थिती नाशिकलगतच्या ओझर व जानोरी परिसरात आहे. कृषी व औद्योगिक मालाची परदेशात थेट वाहतूक करता यावी यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जानोरी येथे हॅलकॉन कार्गो कॉम्प्लेक्स अर्थात मालवाहतूक सेवा केंद्र अस्तित्वात येत आहे. या केंद्रालगत नाशिक विमानतळ असल्याने या दोन्ही घटकांनी ओझर सभोवतालच्या गुंतवणुकीचा दृष्टिकोन बदलला आहे.
नाशिकमधील जागेसंदर्भात अधिक माहितीसाठी  एसएमएस करा – SIBA to 56161

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा