शतायुषी कौन्सिल हॉलच्या आवारातील नवीन विभागीय आयुक्त कार्यालय
प्रशासकीय इमारत म्हणजे एक तर जुन्या इंग्रजी शैलीच्या इमारतीमध्ये दाटीवाटीने फायलींच्या ढिगाऱ्यांची, लोंबणाऱ्या विद्युतवाहिन्यांची, जमेल तिथे लाकडी प्लाय ठोकलेली, वाढत्या पसाऱ्याला कशीबशी सामावणारी, कमी उजेडाची, भिरभिरणाऱ्या पंख्याची इमारत! किंवा नवीन आरसीसीमध्ये बांधलेली, कोपऱ्यात पानांच्या पिचकाऱ्यांची, नवीन असलेली तरी सामान्य सामग्रीमुळे लवकरच जुनाट वाटणारी इमारत. हा पायंडा नव्या पिढीसाठी बदल घडवणारी नवी कौन्सिल हॉलची प्रशासकीय इमारत ही सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा मिलाफ असलेली एक परिवर्तन ठरणारी असेल अशी आशा आहे आणि तीसुद्धा जुन्या सौंदर्यपूर्ण इमारतीच्या प्रांगणात!
भारतामधील मुख्य प्रशासकीय इमारती या इंग्रजांच्या काळातील ऐसपैस आणि भरभक्कम इमारती आहेत. इंग्रजांनी स्वत:ची प्रशासकीय पद्धत भारतीय भूमीवर राबवताना त्यासाठी बांधलेल्या इमारती ‘महत्त्वपूर्ण ठळक इमारती’ अशीच त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जातील अशा उभारल्या. व्हिक्टोरियन काळातील गॉथिक शैलीच्या इमारती स्थानिक सामग्री आणि कारागिरांकडून घडवताना त्यांच्या खर्चाचा ताळमेळ फारसा राखला नसल्याचे अनेक कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. गॉथिक शैलीच्या इमारती साकारताना वास्तुकारांनी त्यावरील वैशिष्टय़पूर्ण कलाकुसरीमध्ये स्थानिक नैसर्गिक घटकांचाही खुबीने अंतर्भाव केला. फेड्रिक स्टिव्हन्सने अनेक अशा सौंदर्यपूर्ण इमारती मुंबईमध्ये उभारून मुंबईला एक वैशिष्टय़पूर्ण चेहरा दिला. पुण्यामध्येही विद्यापीठ, सेंट पॉल्स चर्च, सेंट्रल बिल्डिंग, अभियांत्रिकी महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय, जनरल पोस्ट ऑफीस अशा अनेक इमारती आपले पाश्चिमात्य शैलीचे ठळक अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकी कॅन्टोन्मेंटच्या पश्चिमेला असलेली कौन्सिल हॉलची सुबक, लाल वीटकामातील प्रमाणबद्ध कमानींची इमारत हमखास लक्ष वेधून घेते. सरकारी अधिकाऱ्यांचा राबता असलेली कौन्सिल हॉलची इमारत ही पुणे जिल्हय़ाच्या प्रशासकीय कार्यालयांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
१८७०मध्ये उभारलेल्या व्हेनेशियन गॉथिक शैलीतील इमारतीचे रेखांकन अभियंता मेलीस यांनी केले होते. कॅन्टोन्मेंटच्या पश्चिमेला रुपये ५०,८७५/- किमतीला जमीन खरेदी करून त्यावर रुपये १,२२,९४० खर्च करून कौन्सिल हॉलची शानदार इमारत उभी राहिली. बॉल डान्ससाठी ही खास जागा होती. १८८६मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या पुत्राच्या वाढदिवसानिमित्त येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बॉल नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
पुण्यासह पाच जिल्हा आयुक्तांचे कार्यालय या इमारतीमध्ये प्रस्थापित करण्यात आले आहे. ८० फुटी लांब, ४० फूट रुंद व ४० फूट उंची असलेला भव्य सभागृह इमारतीमधील सर्वात महत्त्वाची जागा आहे. छताला सफेद रंगामध्ये कलाकुसरीच्या कामाला सोनेरी वर्ख लावल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. खिडक्यांना रंगीत (स्टेन्ड ग्लास) काचांमध्ये पानाफुलांचे आकर्षक नक्षीकाम आहे. उत्तरेकडील रोझ विंडोमधील काचांची रंगकला मूळ स्वरूपात असून त्यातील रंगीबेरंगी भारतीय पानाफुलांच्या रचनेमध्ये इंग्लंडच्या राणीच्या मुकुटाची प्रतीमा व स्टार ऑफ इंडिया हे मानचिन्ह ‘परमेश्वर आम्हास प्रकाश दाखवो’ असे ब्रीदवाक्य आहे.
इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींभोवती मुबलक जागा व बगीचा असे. व्हेनेशियन गॉथिक शैलीमध्ये बांधलेल्या कौन्सिल हॉलच्या भोवतीचा परिसरही भरपूर मोकळा होता. जसा आयुक्त कार्यालयाचा कारभार वाढत गेला त्यानुसार भोवतीच्या मोकळय़ा जागेत जशी गरज पडेल तशा छोटय़ा छोटय़ा इमारती बांधल्या गेल्या. मे २००९ मध्ये पुण्याचे पालकमंत्री व जिल्हा आयुक्त, जिल्हाधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराच्या वाढत्या प्रशासकीय कार्यालयांच्या गरजा लक्षात घेऊन छोटय़ा छोटय़ा विखुरलेल्या इमारतींऐवजी सर्व कार्यालये एकाच इमारतीमध्ये सामावण्याचा निर्णय घेतला. नवीन इमारत ऐतिहासिक कौन्सिल हॉलच्या प्रांगणात असल्याने त्यासाठी विशेष दक्षता घेऊन जुन्या इमारतीची शान तशीच राखून पर्यावरणपूरक नवीन इमारत बांधण्याचे ठरले. पंधरा निरनिराळय़ा खात्यांना सामावणारी नवीन इमारतीची व्याप्ती जुन्या ऐतिहासिक इमारतीपेक्षा तिप्पट असली तरी इंग्रजी एल आकाराच्या जमिनीवरील व्याप्तीमुळे व अस्तित्वातील प्रचंड वडाच्या झाडामुळे ती ऐतिहासिक इमारतीशी कुठेच स्पर्धा करीत नाही. आयनॉक्स सिनेमा थिएटर समोरून प्रवेशद्वार असलेली नवीन इमारत अस्तित्वातील जुन्या इमारतीचा योग्य मान राखून स्वत:च्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुशैलीची ग्वाही देते. नवीन इमारतीला एक बाजूला उघडणारे व्हरांडे असल्यामुळे भरपूर उजेड व खेळती हवा इमारतीमध्ये असणार आहे.
इमारतीचा प्रवेश हा तीनमजली उंच काचेने आच्छादित लोखंडी छत्रीवर बांधलेल्या घुमटाकार प्रशस्त जागेतून आहे. कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना उपयुक्त अशी व प्रशासकीय औपचारिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल अशी ही वैशिष्टय़पूर्ण जागा. थर्मल पॉवर प्लान्टमधील टाकाऊ राखेपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक फ्लाय अॅश विटांपासून इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. व्हरांडे व उंचीचा घुमट हे कार्यालयातील हवेचे संतुलन राखण्यास पूरक ठरणार आहेत. इमारतीला ४० विंड स्कूप्स (चिंचोळय़ा जागेतून थंड हवेच्या लहरी इमारतीच्या अंतर्गत भागात आणण्यासाठी) तयार करण्यात आले आहेत. इमारतीमधील वातानुकूल यंत्रणेचा भार कमी करून नैसर्गिक सुसहय़ हवा इमारतीमध्ये खेळती ठेवण्यासाठी अशा विंड स्कूप इमारतीमध्ये पुण्यात पहिल्यांदाच इमारतीच्या वास्तुशिल्पाचा एक भाग म्हणून आरेखित करण्यात आल्या आहेत. इमारतीमधील स्वच्छतागृहे मोक्याच्या जागी असूनही नजरेआड आहेत. सध्या कुठल्याही प्रशासकीय इमारतीला भेडसावणारा वाहनतळाचा प्रश्न येथे तळघर व इमारतीच्या मागील बाजूला मुबलक सुविधेसह करण्यात आला आहे. जेणेकरून ऐतिहासिक काळापासून इमारतीसमोरील बगिचाच्या जागेवर आक्रमण होणार नाही. इमारतीला लपेटणाऱ्या व्हरांडय़ांना स्टेनलेस स्टीलच्या नाजूक लयदार रेषांच्या रेलिंगमुळे व त्याखालील सिरॅमिक काचांमधील नक्षीदार रेखांकनामुळे वैशिष्टय़पूर्ण उठाव निर्माण झाला आहे. इमारतीची व्याप्ती व आकार यामुळे निर्माण झालेल्या घनआकाराला हे घटक सात्त्त्विक, सौम्य परिमाण देतात. मनोरा व इमारतीच्या गोलाकार घनतेचा डौल आतील जागांच्या उपयुक्ततेसह आधुनिक इमारतीने सांभाळला आहे. जुन्या इमारतीची कुठलीही प्रतिकृती न साकारता तिच्याशी आपलं सोयरं मात्र हक्काने टिकवले आहे.
सौंदर्यपूर्ण विशिष्ट शैलीच्या ऐतिहासिक व महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आधुनिक सुविधांनी सुसज्ज, परंतु ऐतिहासिक इमारतीचा मान राखणारी इमारत उभी करणे ही वास्तुकारासाठी आव्हान होते. अस्तित्वातील ऐतिहासिक इमारतीच्या शैलीचा बारकाव्याने अभ्यास करून नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये त्यातील घटक, प्रमाणबद्धता यांचा चाणाक्षपणे अंतर्भाव करताना नवीन इमारत ही स्वत:चे वैशिष्टय़ जपणारी, परंतु ऐतिहासिक इमारतीशी स्पर्धा न करता तिचा मान द्विगुणित करणारी असावी, अशी संकल्पना राबवताना तिची निर्मिती संवेदनशीलतेने करणे ही महत्त्वाची बाब आहे. इमारतीच्या रेखांकनामध्ये या सर्वाचा सांगोपांग अंतर्भाव करताना तिची स्वत:ची अशी विनम्र ओळखही असणे महत्त्वाचे आहे. सर्व स्तरांवर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या पुणे व भोवतीच्या जिल्हय़ांच्या वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता त्यांचा विस्तारित कारभार सामावण्यासाठी एक सुसज्ज इमारत ऐतिहासिक इमारतीचा छोटा भाऊ असायला हवा. सध्या परिस्थितीत पर्यावरणपूरक ग्रीन इमारतीची संकल्पनाही नवीन इमारतीमध्ये राबवताना सामग्री व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. इमारतीमध्ये विजेच्या वापराचा भार प्रमाणित ठेवण्यासाठी, हवेचे संतुलन राखण्यासाठी मूळ डिझाइन संकल्पनेमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण अशा इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ऐतिहासिक इमारतीशेजारी नवीन इमारत आपली वैशिष्टय़पूर्ण ओळख स्वतंत्रपणे तरीही सौम्यपणाने जपत परिसरामध्ये सहजतेने सामावली आहे.
बाळासाहेब खेर हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ऑगस्ट असेंब्लीचे पहिले अधिवेशन पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये १९ जुलै १९३७ पासून सुरू झाले. त्याला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून लवकरच जुनी महत्त्वपूर्ण इमारत आपल्या मूळ डौलदार स्वरूपात जनतेच्या सेवेत रुजू होईल.
ऐतिहासिक संदर्भ- महाराष्ट्र गॅझेटियर, पुणे जिल्हा.
सार्वजनिक बांधकाम खाते- खंड ५६१-१८६८ ते १८६९