दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा सण म्हणून ओळखला जातो. भारतीय परंपरेत दिवाळीचे खूप महत्त्व आहे. दिवाळीत नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान आणि ताजा फराळ, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजा आणि आतषबाजी, पाडव्याला नवी खरेदी आणि भाऊबीजेला बहीण-भावांसाठी खास दिवस अशी एकापाठोपाठ रांग असल्यामुळे चैतन्य नुसते सळसळत असते. घर जर पाहुण्यांनी गजबजले तर त्याचे घरपण अजून खुलून दिसते. या घराच्या भिंती रंगविल्याने जितक्या खुलतात त्यापेक्षा कितीतरी अधिक आत राहाणाऱ्या माणसांच्या प्रसन्नतेने खुलतात. बालमंडळी फटाक्याच्या व फराळाच्या कल्पनेत गुंग असतात आणि हीच वेळ असते त्यांना मोठय़ांनी आपल्या वागणुकीने योग्य मार्गदर्शन करण्याची! सुटीच्या या उत्साहात त्यांच्या मनावर आपल्या पर्यावरणासंबंधी जर आपण योग्य धडे घालू शकलो तर दिवाळी योग्य रीतीने साजरी केल्याचे समाधान आपल्या सर्वाना मिळेल.
आवाजाचे आणि धुराचे प्रदूषण जसे वाहनांच्या माध्यमातून सातत्याने होत असते तसेच ते आपल्या दिवाळीत फटाक्यांच्या माध्यमातून होत असते. एकावेळी लक्षावधी किंवा कोटय़वधी लोक जेव्हा फटाके फोडतात तेव्हा या प्रदूषणाची तीव्रता प्रचंड वाढते. आणि यातील अनेक घटकांचे वातावरणातील अस्तित्व बराच काळ जाणवणारे असल्यामुळे त्यांचा दीर्घकालीन परिणाम प्राणीसृष्टी, मानवसृष्टी आणि वनस्पतीसृष्टीवर होत राहतो. वाहनांच्या कण्र्यामुळे जसा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो तसाच बहिरेपणा फटाक्यांच्या आवाजामुळे देखील येऊ शकतो. वास्तविक शोभेच्या दारूची निर्मिती मनोरंजनासाठी झाली होती. त्यात नळे आणि चंद्रज्योती यांचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. माणसाला रंगांचे अनादी कालापासून आकर्षण आहे. आपल्या चित्तवृत्ती विविध रंग दिसले की प्रसन्न होतात. युरोपातील किंवा अमेरिकेतील किंवा काश्मीरमधील हिवाळा सुरूहोण्यापूर्वी किंवा वसंताच्या आगमनसमयी सृष्टी जी रंगांची उधळण करते ती पाहण्यासाठी लोक लांबवर प्रवास करीत जातात. रंग आपल्याला निसर्गात जागोजागी दिसतात पण दरवेळी आपण त्या रंगांकडे आकर्षित होत राहतोच. शोभेचे दारूकाम यासाठीच शोधले गेले होते. पण आता वाढत्या लोकसंख्येमुळे ते वापरणाऱ्या मंडळींची संख्या वेगाने वाढली व त्यामुळे एका सुंदर कल्पनेचा विचका झाला आहे.
आज काल पारा आणि कॅडमियम युक्त फटाके बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. त्यांचा विषारी परिणाम पर्यावरणावर झाल्याशिवाय राहात नाही. फटाक्यांचा धूर नाकातोंडात जातो व त्याचे परिणाम विशेषत: लहान मुलांना अधिक भोगावे लागतात. कारण त्यांची श्वसनसंस्था नाजूक असते. मोठय़ा मंडळींना देखील ह्याचा त्रास होतो. मुलांना फुलबाज्या उडवायला आवडतात. त्यात मॅग्नेशियम, लोखंड किंवा जस्ताचा वापर करतात. सोडियम नायट्रेटसारखा ज्वालाग्राही पदार्थ व या धातूंपैकी एखादा यांचे मिश्रण लोखंडाच्या काडीवर लेप दिल्यासारखे चढविले की ही फुलबाजी झाली तयार! पण ही जळत असताना निर्माण होणारा धूर देखील अतिशय अपायकारक असतो. म्हणून तो मुलांच्या श्वसनात न जावा याची काळजी आई-वडिलांनी आवर्जून घ्यावयास हवी. या धुरात धातूंचे जे अतिसूक्ष्म कण फुलबाजा किंवा तत्सम शोभेची दारू जळताना निर्माण होतात ते फुप्फुसात जर गेले तर त्याचे दीर्घकालीन गंभीर परिणाम मुलांना पुढच्या आयुष्यात भोगावे लागतात. म्हणून हौस म्हणून जर सर्वानीच ही दारू उडविली तर आपल्या आजूबाजूची हवा किती प्रदूषित होईल याचा आपण गंभीरतेने विचार करण्याची गरज फार मोठी आहे. विशेषत: ज्या इमारतींमध्ये वायुवीजन व्यवस्थित नाही तिथे तर हे शोभेचे दारूकाम टाळणे सयुक्तिक राहील. मुंबईतील बहुतेक सर्वच ठिकाणी हा प्रश्न जाणवू शकतो.
वाहनांचाही आवाज
दिवाळीला घरामध्ये किंवा घरासाठी नवे काय घ्यायचे? दुचाकी घ्यावयाची की चारचाकी? मग चारचाकी घ्यावयाची असली तर ए क्लास की बी क्लास? की आपली एकदम सी क्लासच घेऊन टाकू, मग नंतर कटकट नको! अशा चर्चा अनेक ठिकाणी आता चालू असतील. कारच्या दुकानातील गर्दी पाहिली तर वाटते की भारतात आता फक्त कारचेच दिवस आहेत! तरुण पिढी बाईकच्या मागे लागणार यात आश्चर्य नाही पण हल्ली प्रत्येक व्यक्तीला वाहन हवेच हा जो अट्टहास विशेषत: शहरी भागांमध्ये दिसून येत आहे, त्याचे अतिशय दूरगामी परिणाम आपल्या समाजव्यवस्थेवर होणार आहेत. हे परिणाम सार्वजनिक आरोग्यावरचे असतील तसेच अर्थव्यवस्थेवर देखील होतील, यात शंका नाही. प्रत्येक ठिकाणी शून्य टक्के व्याज या नावाखाली मोठमोठय़ा आकर्षक जाहिराती करून ग्राहकांना भूल पाडली जाते व मग हळूहळू गोड बोलत त्यांच्या गळ्यात सॉफ्ट ए. एम. आय. मारले जातात व ते वाहन घरी येते. कोणीही बिनव्याजी पैसे देण्याइतके मूर्ख नसते हे साधे तत्त्व आपल्याला त्यावेळी समजत नाही. हे सर्व आकडय़ांचे खेळ असतात व एक प्रकारे भावनांशीदेखील खेळ असतात.
तरुण मुलाच्या नजरेत असलेली बाईकची ओढ माता-पित्यांना अस्वस्थ करते व आपण त्याला बाईक द्यायलाच हवी असा निर्णय घेतला जातो. काय बिघडलं त्याने बाईक घेतली तर? आपलाच मुलगा आहे ना, मग त्याला तरी दुसरे कोण देणार आहे? असा युक्तिवाद केला जातो. आजकाल तरुणाई वाटेल त्या अतिरेकी दिशेने जाऊ शकेल ही भीती मनात असतेच ती वेगळीच! मानसिकदृष्टय़ा आपला समाज अपंग होत आहे आणि त्यामुळे सहनशीलता आणि सर्वाना सामावून घेण्याची प्रवृत्ती हरवत
चालली आहे. ‘मी’ अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. समाजाची आर्थिक बाजू जशी सुधारत चालली आहे तशी ही दुसरी बाजू मात्र दुबळी होत चालली आहे! म्हणूनच आपल्या घरात एखादे वाहन का हवे
किंवा का नको, याची चर्चा करणे अतिशय गरजेचे आहे. वेगवेगळ्या जाहिरातींमधून सातत्याने आपल्या मनावर परिणाम होत असतो तो जर होऊ दिला
नाही आणि वस्तुस्थितीशी सुसंगत असा निर्णय आपल्याला घेता आला तर त्यासारखी चांगली दुसरी गोष्ट नाही.
आपले कार्यक्षेत्र आणि घर या दरम्यानचे अंतर, वाहन सुरक्षितपणे ठेवण्यासाठी दोन्हीकडील व्यवस्था आणि वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक पात्रता या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. केवळ वाहन चालविण्याचा परवाना मिळाला म्हणजे सर्व काही झाले असे अजिबात नसते. वाहन चालविण्यासाठी जी मनाची परिपक्वता लागते ती आपल्याकडे आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे असते. त्यात मद्याचे व्यसन असेल तर विचारायलाच नको! मोबाइलचे व्यसन वाहन चालविताना अजून वाईट. हे सर्व सांभाळून वाहनामुळे इतर कुणाला इजा तर होणार नाही ना हेही महत्त्वाचे आहे. अनेक नवशिक्या, व्यसनी किंवा अपरिपक्व चालकांमुळे बऱ्याच अश्राप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कर्कश्य भोंगा वाजवीत जाणे ही आणखी एक स्टाईल! गाडी सुरू करतानाच त्यांचा एक हात सातत्याने कण्र्याच्या बटनावर असतो तो गाडी बंद करेपर्यंत हटतच नाही. आपल्याला रस्त्यावरून जाताना सर्वानी अग्रक्रम द्यावा असे त्यांना वाटत असते. लाल सिग्नलची त्यांना तमा नसते. पोलिसाने हटकलेच तर त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग त्यांच्या परिचयाचे असतात. हेल्मेट घालून बाईक चालविणे त्यांना अपमानास्पद वाटते.
या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी रस्त्यांची एव्हढी प्रचंड कोंडी होऊ लागली आहे, की ती पाहिल्यावर वेळ, इंधन आणि पैसा यांचा हा प्रचंड अपव्यय देशाच्या अर्थकारणावर केवढा वाईट परिणाम करीत आहे हे जाणवून मन अतिशय अस्वस्थ होते. एकावर एक फ्लाय ओव्हर बांधले, विविध फ्री वे निर्माण केले म्हणजे देशाची प्रगती झाली का? केवळ हेच निकष वापरून समाज किती प्रग्ल्भ झाला आहे हे ठरविता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे खरं तर नकारार्थीच आहेत. पण वाहनाच्या बाबतीत मी एकटय़ानेच का हा विचार करावयाचा, इतरांनी का करू नये असला पोकळ युक्तिवाद मांडून आपण आपली सुटका करून घ्यावयाचा प्रयत्न करतो व हात झटकून टाकतो. माझे एक वाहन कमी करता आले तर, असा विचार अनेकांनी एकदम केला तर परिस्थितीत बरीच सुधारणा होऊ शकते. युरोपमधील सर्वच देशांमध्ये सायकल चालविण्याचे प्रमाण आज देखील खूप जास्त आहे. अगदी कडाक्याच्या थंडीत देखील सायकल चालविणारे असंख्य नागरिक आपल्याला लंडन, कलोन, बुडापेस्ट, व्हिएन्ना, हेलसिंकी आणि इतर अनेक युरोपियन शहरांमध्ये दिसतात. चीन देशात सायकली फार मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जातात. आपल्या देशातील वातावरण सायकल चालविण्यासाठी अतिशय चांगले आहे. पण आपल्या देशात सायकलींचा वापर म्हणावा तेवढा अजिबात होत नाही.
आपण आपल्या देशात आणि विशेषत: शहरांमध्ये मोटारीच्या आहारी गेलो आहेत असे दिसते. भारतातील चार चाक्या वाढण्याचे प्रमाण इतर विकसनशील देशांच्या मानाने फार जास्त आहे. गाडय़ांचे अनेक कारखाने त्यामुळे भारतात आले आहेत व नावाजलेल्या मोटारी येथे मिळू लागल्या आहेत. पण त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हळूहळू कोलमडू लागली आहे, हे लक्षात घ्यावयास हवे. भारतात अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योग्य तऱ्हेने झालेली नाही हे खरे असले तरी त्यात वाढ होण्याऐवजी खाजगी वाहनांमध्ये होणारी वाढ पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. या सर्व वाहनांसाठी लागणारे वाहन तळ आपल्याकडे करणे, त्यांच्या उत्सर्जनातून निर्माण होणारे प्रदूषित घातक झेलणे, त्यांच्यासाठी लागणारे प्रचंड इंधन आयात करणे या सगळ्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर खूप घातक परिणाम होत आहेत. अपघातांचे प्रमाण आपल्या देशात खूप वाढले आहे. वाहतूक पोलीस तरी किती आणि कुणाला आवरणार? सर्व दिशांनी जेव्हा वाहने येऊ लागतात व त्यांचे कर्णकर्कश भोंगे वाजू लागतात तेव्हा हे वाहतूक पोलीस वेडे होत नाहीत हे त्यांचे व आमचे नशीबच म्हणावे लागेल. या दिवाळीत म्हणून यंत्रचलित वाहन खरेदी न करता सायकल खरेदी केली तर दिवाळी साजरी झाली असे म्हणता येईल. शेवटी निर्णय ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे.
दिवाळी साजरी करताना सर्व वाचकांनी हे भान ठेवावे आणि आपली दिवाळी प्रदूषणमुक्त ठेवावी अशी कळकळीची विनंती आहे. आपली पुढची पिढी त्यामुळे निरोगी राहाणार आहे.
डॉ. शरद काळे- सह संचालक, जैवविज्ञान वर्ग,
भाभा अणुशक्ती केंद्र
sharadkale@gmail.com