मनोज अणावकर

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात दिवसाचे बारा ते चौदा तास घराबाहेर राहून, घरासाठी पै पै जमवून शेवटी घरासाठीच द्यायला वेळ नसणारी मध्यमवर्गीय माणसं असोत. किंवा वडापावचा नाश्ता आणि कोणत्याशा रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवरचं जेवण जेवून पोटाची खळगी भरणारे कष्टकरी कामगार असोत. किंवा मग समाजातले उच्चभ्रू श्रीमंत असोत, आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून ते कसे वाढवावेत याविषयीची वित्तीय साक्षरता फार थोडय़ा लोकांमध्ये दिसते. सर्वसामान्यांचे गुंतवणुकीचे पर्याय हे बँक किंवा पोस्टातल्या मुदत ठेवी आणि काही अंशी विमा काढण्यापर्यंतच मर्यादित असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना गुंतवणूक कशी करावी, याचं मार्गदर्शन करायची मोठी गरज आज आहे. अशी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होते आहे. केंद्र सरकारने विमा क्षेत्र हे १०० टक्के परकीय गुंतवणुकीसाठी खुलं करायचा निर्णय घेतला आहे. देशाच्या ग्रामीण भागातही कर्जवितरण, विमा तसंच गुंतवणुकीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय. देशातल्या संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांच्या निरीक्षणानुसार ‘हाय नेट वर्थ इंडिविज्युअल्स’ अर्थात, राहत असलेली स्थावर मालमत्ता वगळता ज्यांच्यापाशी इतर गुंतवणुकीयोग्य तरल संपत्ती मोठय़ा प्रमाणावर आहे, अशा श्रीमंतांच्या संख्येत देशात मोठी वाढ होत असल्याचं केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारितल्या इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशन या संस्थेनं त्यांच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या ‘कंटक वेल्थ मॅनेजर्स’ या मुंबईतल्या अंधेरीच्या कंपनीचे संस्थापक आणि संचालक अभिषेक कंटक यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून या क्षेत्राबाबत तसंच त्यांच्या ऑफिसविषयी जाणून घेऊ या..

अशा प्रकारची गुंतवणुकीबाबत सल्ला देणारी कंपनी सुरू करावी, असं का वाटलं?

मी २००५ सालापासून विमा एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, विम्याचे वेगवेगळे पर्याय गुंतवणूकदारांना सुचवताना एक गोष्ट जाणवली, ती ही की- विमा हा आयुष्यातल्या अनेक अनिश्चिततांमध्ये सुरक्षा पुरवत असला, तरी अशी वित्तीय सुरक्षा हा एक पर्याय झाला, पण खऱ्या अर्थाने गुंतवणुकीचे इतरही पर्याय गुंतवणूकदारांना त्यांच्या त्यांच्या गरजांनुसार उपलब्ध आहेत आणि त्याविषयी त्यांना शिक्षित करणं गरजेचं आहे. त्यामुळे मग जीवन विम्यासोबतच सर्वसाधारण विम्याची उत्पादनं आणि म्युच्युअल फंड याविषयीही माहिती द्यायला सुरुवात केली. सर्वसाधारणपणे बँक आणि पोस्टातल्या फिक्स्ड डिपॉझिट्सकडेच बहुतेकांचा गुंतवणुकीचा खात्रीशीर पर्याय म्हणून ओढा असतो. पण या मार्गाने केलेल्या दीर्घ मुदतीच्या ठेवींमधून जास्तीत जास्त सहा ते सात टक्के इतकंच व्याज मिळू शकतं आणि जर बारकाईने विचार केला, तर वाढणाऱ्या महागाईमुळे पशाची किंमत जी कमी होते, त्यामुळे ठेवींचे पैसे परत मिळताना त्या पशांची किंमत त्या भविष्यकाळात कमी झालेली असते. त्यामुळे खरं तर आपल्या पशांमध्ये फार वाढ होत नाही. अर्थातच, गुंतवणूक करूनही वाहन, घराचं नूतनीकरण अशा गरजांसाठी अनेकांना शेवटी कर्जाचा आधार घ्यावा लागतो. माणसाची दुसरी मोठी गरज म्हणजे मुलांची शिक्षणं आणि त्यानंतर मुलांच्या लग्नकार्यातही मोठा खर्च होतो. शेवटी म्हातारपणी आपल्याला मुलांवर अवलंबून राहावं लागतं. कारण मुलांची शिक्षणं, लग्न यांसारखे मोठे खर्च भागवल्यानंतर आणि वाहन, घर यासारख्या गरजांसाठी घेतलेली र्कज फेडण्यात आयुष्य गेल्यानंतर जर आपल्या स्वत:साठी निवृत्तीनंतर हातात फारसं काहीच उरणार नसेल, तर आयुष्यभर केलेल्या अशा मुदत ठेवींमधल्या गुंतवणुकीला अर्थ काय? यासाठीच आयुष्याच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून जीवन विम्याचं संरक्षण घेतानाच मोठय़ा आजारपणातल्या मोठय़ा खर्चासाठी आरोग्य विम्यासारखे पर्याय निवडायची गरज असते. मात्र, एकूण वार्षिक उत्पन्नातून विम्याचे हप्ते आणि महिन्याचे घरखर्च आणि इतर खर्च वजा घातल्यानंतर म्हातारपणासाठी निवृत्तिवेतनाची तरतूद करण्यासाठी गुंतवणूक कशी करायची याबाबतचा सल्ला ग्राहकांना द्यायचा असं ठरवलं. अमेरिकेत वित्तीय सल्लागार होण्यासाठी असा अभ्यासक्रम करणं गरजेचं असलं, तरी भारतात अशी काही अट नव्हती. मात्र, एखादी गोष्ट करण्याआधी त्याचा सखोल अभ्यास करायला हवा आणि आवश्यक ते प्रमाणीकरण असलं, तर ग्राहकांना अधिक तंत्रशुद्धपणे सुयोग्य सल्ला देणं शक्य होतं. त्यामुळे मग २००८ साली सर्टफिाईड फिनॅन्शियल प्लॅनर होण्यासाठी असलेला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ‘कंटक वेल्थ मॅनेजर्स’ या आमच्या कंपनीची झपाटय़ाने वाढ व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी विलेपाल्रे इथे एका लहानशा जागेत एका कर्मचाऱ्यासह कंपनीचं ऑफिस सुरू केलं. २००८ साल हे आर्थिक मंदीचं वर्ष होतं. त्यामुळे अशा काळात एखाद्याला गुंतवणुकीविषयी सुचवणं हे खरं तर धोक्याचं होतं. त्यातच बँकांमधल्या मुदत ठेवींचा सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग सोडून म्युच्युअल फंडांसारखा तुलनेनं बाजाराच्या कलानुसार गुंतवणुकीचं मूल्य बदलणारा मार्ग स्वीकारायला लोक तयार नव्हते. मात्र, त्याचा एक फायदाही असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं. बाजार पडलेला असताना ज्या मोजक्या ग्राहकांनी आम्ही सुचवलेला म्युच्युअल फंडासारखा बाजाराधिष्ठित, पण शेअरबाजाराच्या तुलनेत सुरक्षित मार्ग स्वीकारला, त्यांचे गुंतवलेले पैसे २०१० सालानंतर वित्तीय बाजारातली परिस्थिती सुधारायला लागल्यानंतर  झपाटय़ाने वाढायला लागले. अशा ग्राहकांनी मग त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही याबाबत सांगायला सुरुवात केली आणि आमच्या ग्राहकसंख्येतही झपाटय़ाने वाढ झाली. आज आमची ग्राहकसंख्या एक हजारच्या घरात गेली असून, त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये केलेली गुंतवणूक ५० कोटींच्या घरात गेली आहे.

सध्याचं ऑफिस कधी घेतलं? इथली रचना कशी आहे?

जसजसा कामाचा व्याप वाढत गेला, तसं मग कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करणं गरजेचं झालं. तेव्हा मग पाल्र्यातलं ऑफिस लहान पडायला लागलं. तेव्हा गेल्या वर्षी म्हणजे २०१८ साली या ऑफिसमध्ये आलो. या ऑफिसमध्ये एकूण दहा जणांना बसून काम करता येईल, इतक्या वर्कस्टेशन्सची सोय आहे (छायाचित्र १). इथे जागा मोठी असल्यामुळे कधी कधी क्रीन लावून आम्ही गुंतवणूक कशी करावी, यावर आठ-दहा ग्राहकांच्या गटासाठी आम्ही सेमिनार आयोजित करतो. ऑफिसमध्ये आत शिरल्यावर समोरच छोटीशी रिसेप्शन एरिया आहे. त्याबाजूलाच वेटिंग एरिआ आहे. (छायाचित्र २) वेटिंग एरिआच्या बाजूला माझी केबिन आहे. (छायाचित्र ३) या केबिनमध्येच डिस्प्ले एरिआ केला आहे (छायाचित्र ४). मला मिळालेले पुरस्कार, सन्मानचिन्ह त्यात ठेवले आहेत. केबिनमधून बाहेर पडल्यावर ऑफिस एरिआत जाताना डाव्या बाजूला छोटी पँट्री आहे (छायाचित्र ५).

 

एवढय़ा ग्राहकांच्या नोंदी आणि त्यांचे व्यवहार म्हटलं की त्यांच्या फाईली आल्या, तेव्हा त्या रेकॉर्डच्या फाईलींसाठी लागणाऱ्या जागेचं नियोजन कसं केलं?

बहुतेक सर्व डेटा हा आम्ही ऑनलाइन स्टोअरेज अकाऊंटमध्ये ठेवतो. त्याचा अजूनही एक फायदा होतो. मी कधी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो, तरी कुठूनही मला फाइल्स बघता येतात. त्यामुळे तसा जागेचा प्रश्न येत नाही.

कोणत्या प्रकारचे रंग आणि प्रकाश हे तुम्हाला आवडतात?

सर्वसाधारणपणे मला भडक रंग आणि पिवळ्या प्रकाशाचे दिवे आवडत नाहीत. त्यामुळे पांढऱ्या-हिरव्या रंगाचं हे केबिनमधलं कॉम्बिनेशन आणि बाहेरही शांत रंग हे जास्त चांगले वाटतात. पांढरा प्रकाश देणारे दिवे मन प्रसन्न करतात.

कर्मचाऱ्यांना थोडा निवांतपणा मिळावा यासाठी तुम्ही काय करता?

कधी तरी महिन्या दोन महिन्यांतून एकदा आम्ही बाहेर जेवायला जातो. तसंच वर्षांतून एकदा पिकनिकही काढतो. त्यामुळे फ्रेश मूडने ते काम करू शकतात.

अभिषेक कंटक यांच्या ऑफिसबाबत जाणवलेले मुद्दे –

गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणाऱ्या या ऑफिसच्या रचनेमध्ये हे भपकेबाज अंतर्गत सजावटीवर उगाचच खर्च न करता त्याकरता आवश्यक तेवढीच गुंतवणूक केलेली आढळते. या ऑफिसची उभारणी ही शून्यातून निर्मिती करून झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या उन्नतीतून स्वत:च्या व्यवसायाची प्रगती साधण्याचं तत्त्व हे महत्त्वाचं वाटतं. अगदी लहान स्तरावरून सुरुवात करूनही वेगाने प्रगती कशी साधता येऊ शकते, याचं उदाहरण असलेलं हे ऑफिस अनेक छोटय़ा व्यावसायिकांना मार्गदर्शक ठरू शकतं.

इंटिरिअर डिझाइनर

anaokarm@yahoo.co.in

Story img Loader