मोहन गद्रे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय निवडावासा वाटेल, अधिक सोयीचा वाटत असल्यास त्यांनी तो अवश्य निवडावा. पण चाळ पद्धतीने ज्यांना वृद्धापकाळात सहज सहनिवासात आपण अधिक आनंदी राहू शकू किंवा आपल्या वारसांना, आपल्याला वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक टिकेला तोंड द्यायची वेळ येणार नाही, असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी हा एक पर्याय असावा असे वाटते.

एकत्र कुटुंबपद्धती मागे पडून त्यानंतरची  एक अख्खी पिढी आता वृद्धत्वात वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीतले फायदे-तोटे यावर चर्चा होऊ शकेल, पण त्यातून काही ठोस बाहेर पडेल असे वाटत नाही. केवळ चर्चे करता त्याचा उपयोग होऊ शकतो. तेव्हा त्याबद्दल बोलण्यापेक्षा वास्तव लक्षात घेऊन, जेष्ठांच्या वास्तव्यासाठी जास्तीत जास्त सोयीचा निवारा तयार करता येईल, किंवा तसा करता येऊ शकतो का? यावर विचार केल्यानंतर मला एक पर्याय सुचला, तो विशद करावा, म्हणून हा लेखनप्रपंच.

एकंदर, समाजाच्या मनाचा अंदाज घेतला तर आजही समाजात वृद्धाश्रम हा पर्याय सहजासहजी स्वीकारला जात नाही. आपल्यावरचे संस्कार आपल्याला त्या पर्यायाला मान्यता द्यायला सहजासहजी तयार होत नाहीत. ज्या आई-वडिलांनी त्यांच्या उभारीच्या वयात खस्ता खावून आपल्याला इतके मोठे केले, त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात, आपल्यापासून कुठेतरी दूर नेवून ठेवायचे ही कल्पना पुढल्या पिढीला सहन होत नाही, त्याच बरोबर अशा परिस्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर काढणे वाटते तितके सोपे नाही, आणि  त्या उत्तराने समस्या सुटणारही नाही. म्हणून कालाय तस्मै नम: म्हणत बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच सेवाभावी संस्थानी, काही खासगी व्यक्तींनी, त्यांच्या संकल्पनेप्रमाणे, त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे, वृद्धाश्रम सुरू केले आहेत. काही येत्या काळात नव्याने उभे राहतील. ज्यांना जी व्यवस्था योग्य वाटेल, त्या आर्थिक गणितात बसेल, ते तेथे जाऊन राहू लागले आहेत किंवा भविष्यात राहतील.

हेही वाचा >>> पुणे: व्यवसाय, निवासासाठी उत्तम पर्याय

पण असेही बरेच वृद्ध आहेत, ज्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय नको आहे. मुले दूर राहतात, त्यांची राहती इमारत पुनर्विकासात आहे, ज्यांना आपल्या पेन्शन म्हणा किंवा अन्य मार्गाने होणाऱ्या मासिक प्राप्तीला पेलू शकेल असे घर हवे आहे, ते लहान असेल तरी आता त्यांना ते पुरेसे ठरू शकते, गावी जाऊन राहणे हा पर्याय उपलब्ध असला तरीही काही कारणाने तो पर्याय स्वीकारणे अशक्य आहे, ज्यांचे आजपर्यंतचे सर्व आयुष्य शहरी भागात जगण्यात गेले आहे, त्यांना ग्रामीण भागातील कायमचे वास्तव्य सहज स्वीकारणे कठीण जाते, आपल्या मुलाबाळांसकट आपला वृद्धापकाळ जावा म्हणून ज्यांनी मोठय़ा जागेची तरतूद, पूर्वीच केली आहे, आता त्यांचा त्या बाबतीत भ्रमनिरास झाला आहे म्हणा किंवा अन्य काही कारणाने ते यापुढे शक्य नसल्याच्या खात्रीने आता तेवढय़ा मोठय़ा आकाराच्या स्वतंत्र घराची म्हणा किंवा सदनिका स्वरूपाची जागा म्हणा त्यांना आवश्यकता राहिलेली नाही.

वरील सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर मला वाटतं, आता हवे आहेत, चाळ सिस्टीमसारखे वृद्ध निवारे. ज्यात प्रत्येक सगळी घरे एकमेकाला जोडलेली असतील, प्रत्येक घरात एक पुढची खोली, लहानशी स्वयंपाक खोली, स्वतंत्र शौचालय, बाथरूम, सर्व घरासमोर एक विनाअडथळा लांबच लांब गॅलरी, उत्तम दर्जाची सुरक्षा यंत्रणा, इमारत कितीही उंच असायला हरकत नाही, त्याला लिफ्ट असाव्यात आणि त्या स्ट्रेचर सहज मावू शकेल इतक्या मोठय़ाच असाव्यात. तळ मजल्यावर दवाखाना, दातांचा दवाखाना, मेडिकल शॉप, सर्व किराणा मालाचे दुकान, पॅथॅलॉजी, सलून  आणि नॅशनलाईज बॅंक, पार्किंगची सोय हवीच असे नाही. नकोच (कधी काळी भेटायला येणाऱ्यांची काळजी का वाहावी आणि त्यासाठी कायम आर्थिक झळ ज्येष्ठांनी का सोसावी, हा प्रश्न). जो तो आपल्या आवडीनुसार आणि कुवतीनुसार आपल्या इतर गरजा, उदा. टीव्ही, फ्रीज, एसी वगैरे घेऊ शकतो.

शहरांमध्ये, घरपोच डिलीव्हरी आणि घर कामगार मिळण्याची उत्तम सोय आज सहज उपलब्ध आहे, हा एक मोठाच दिलासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ज्येष्ठ निवारे भाडेतत्त्वावरचेच असावेत. कारण उतार वयात मालकी हक्कच मोठा चिंतेचा आणि त्यापासून होणाऱ्या असंख्य व्याधींना कारणीभूत ठरतो आहे, हा अनुभव बहुतेकांच्या गाठीशी जमा झालेला असू शकतो. बहुतेकांना स्वतंत्र ब्लॉकमध्ये राहण्यात आता काही स्वारस्य उरलेले नाही, अशी परिस्थिती असू शकते. तशी शक्यता नाकारता येणार नाही.

हेही वाचा >>> ‘पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा’

सहकार आणि सरकारी या दोन्ही पद्धतीने उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांचे अनुभव लक्षात घेता, असे प्रकल्प हे खासगीच असावेत. असे म्हणावेसे वाटते. त्यासाठी शासनाने काही सवलती किंवा अनुदान द्यावे. पण हस्तक्षेप नसावा.

ज्यांना वृद्धाश्रमाचा पर्याय निवडावासा वाटेल, अधिक सोयीचा वाटत असल्यास त्यांनी तो अवश्य निवडावा. पण चाळ पद्धतीने ज्यांना वृद्धापकाळात सहज सहनिवासात आपण अधिक आनंदी राहू शकू किंवा आपल्या वारसांना, आपल्याला वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक टिकेला तोंड द्यायची वेळ येणार नाही, असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी हा एक पर्याय असावा असे वाटते. तो परिपूर्ण असेल असा दावा नाही. त्याबद्दल नियम अटी ठरवताना सर्व काळजी घ्यावी लागेल. हे विसरता येणार नाही. आजुबाजूला असलेल्या सामाजिक कौटुंबिक वस्तुस्थितीच्या निरीक्षणातून मला हा एक पर्याय सुचवावासा वाटला. त्यावर विचारमंथन व्हायला वाव आहे, आणि तसे ते व्हावे. ही इच्छा आहे.

gadrekaka@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old age homes for senior citizen alternatives homes for senior citizen zws