रोज पहाटे फिरायला जाताना त्या रस्त्यावर एक जुना टोलेजंग दुमजली वाडा दिसत असे. काळय़ाकभिन्न दगडांमधून साकारलेल्या संरक्षक िभती. मोठा दरवाजा, दिंडी दरवाजा. दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंना बसण्यासाठी दगडी पडव्या. महिरप असलेल्या कमानदार उंच खिडक्या. त्यांना सागवानी लाकडांची बाहेरच्या बाजूला उघडणारी पाखे. वरच्या मजल्यावर नक्षीदार बाल्कनीचा दर्शनी भाग सागवानी लाकडातून कोरून त्यातूनच दोन वासे छताला नि छताखालच्या तुळयांना भिडवलेले. छताची रचना अशी, की बाल्कनीतल्या सागवानी नक्षीला पावसाच्या थेंबाचादेखील उपद्रव होऊ नये. वर डौलदार कौलारू छत आणि शिवाय त्या खाली चारी बाजूंनी गच्ची. कुतूहलवश एकदा त्या उघडय़ा दरवाजातून आत डोकावलो होतो. चित्रकाराला भुरळ पडावी असं भव्य अंगण दिसलं. एका टोकाला पाण्याचा नळ आणि मध्यभागी तुळशीवृंदावन होतं. एक आंबा होता. त्याभोवती बांधलेला दगडी पार. पलीकडे दूर उंबर आणि दत्तमहाराज आणि या सर्वाच्या तिन्ही बाजूंनी बिऱ्हाडांच्या खुणा. पण त्या दगडी भिंती आणि आंब्या-तुळशीचे, उंबर-दत्ताचे आशीर्वाद आणि त्या अज्ञात वास्तुविशारदाचं सारं कौशल्यदेखील त्या वाडय़ाला बिल्डरच्या कुदळीपासून वाचवू शकलं नाही. पुढचे तीनेक महिने वाडा हळूहळू भुईसपाट होत होता.
मात्र एका कोपऱ्यातलं एक बिऱ्हाड जागा सोडायला तयार नसावं. त्यांच्या दोन खोल्या शाबूत राहिल्या. नव्या नखरेल सिमेंटमधल्या वास्तूशी अनुरूप नसल्या तरी टिकून राहिल्या. नव्या उंच टॉवरसमोर त्या विरूप दिसत. पण हट्टाने उभ्याच होत्या.  
जुनं सोडवत नाही. पण ते टिकवून कसं धरलं असेल त्या माणसांनी? आता त्या दोन खोल्यांच्या बिऱ्हाडामध्ये िभती आणि छप्पर सोडून जुनं काय उरलं असेल? आता खिडकीतून पूर्वीसारखा सूर्योदय दिसत नसेल. पूर्वी पश्चिमेहून येणारी आंब्याची सळसळ ऐकू येणे हरवले असेल. शेजारपाजार तर नव्या इमारतीत चौथ्या मजल्यावर गेला आहे. घराच्या पिछाडीला दुकानांची रांग आणि पाìकगचा तळ आणि अहोरात्रची वर्दळ आहे. आता कदाचित त्या भिंतींच्या आत फक्त भूतकाळाचा आभास असेल.
जुन्याचा मोह मलादेखील सुटत नाही. कुणालाच सुटत नाही. म्हणूनच तुमच्याआमच्या मनात आठवणींची अडगळ साठत जाते. रात्री-अपरात्री कुठे रेडिओवरून ‘दिल एक मंदिर’ मधले गाणे ऐकू येते.
‘याद न जाये बीते दिनों की,
जाकर न आये जो दिन
दिल क्यों बुलाये, उन्हें दिल क्यों बुलाये..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंवा जगजितसिंगच्या आवाजात-
‘मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी.’
ऐकलं की आपण व्याकूळ होतो. माझ्या मते आपल्या सर्वाच्या मनात एक लहान, हट्टी मूल दडलेलं असतं. अमुक गोष्ट मिळणार नाही, म्हटल्यावर आपल्याला तिचाच ध्यास लागतो. भूतकाळात जाता येणार नाही, भविष्यकाळ आधी समजणार नाही म्हटल्यावर आपण जुन्यात रमायला लागतो, ज्योतिष्याला हात, कुंडली दाखवून भविष्य विचारू लागतो. आपण भूत असतो. वर्तमानकाळात जगणारे भूत. भूतकाळात खूप सुंदर गोष्टी असतील. पण त्यांना आपण फक्त दुरून न्याहाळू शकतो. उपभोगू नाही शकत. एका जुन्या अवतरणाचा आशय तेवढा आठवतो. की पृथ्वीवर सर्वत्र देवाने सुग्रास अन्न ठेवले आहे. पण मला ते खाता येत नाही, कारण मी मेलेलो आहे. मी फक्त वर्तमानात जगू शकतो.
िहदी सिनेमातल्या भुतांनादेखील जुन्या वास्तूमध्ये अधिक करमते. इंग्रजीत ‘द ओमेन’ आणि ‘द एक्झोर्सस्टि’मधली भुते जुन्या हवेल्या-किल्ल्यांमधून बाहेर पडतात नि अमेरिकेच्या चकाचक वास्तूत येतात. पण ‘गुमनाम’मधले शीर्षकगीत निर्जन बेटावरच्या हवेलीत रंगते.
‘गुमनाम है कोई, बदनाम है कोई
किसको खबर, कौन है वह
अनजान है कोई’
आणि ‘महल’मधले अशोककुमारसह आपल्याला भूल घालणारे गाणे कोण विसरेल..
‘दीपक बगर कैसे परवाने जल रहे हैं,
कोई नहीं चलाता,पर तीर चल रहे हैं
तडपेगा कोई कबतक बे-आस बे-सहारे
लेकिन ये कह रहे हैं, दिल के मेरे इशारे’

‘साहिब बीवी और गुलाम’मध्ये भुताटकी नाही. पण प्रेक्षकाला भूतकाळात ओढून नेणारी एकोणिसाव्या शतकातली हवेली आणि कृष्णधवल पडद्यावरून अपरात्री येणारी गीता दत्तच्या आवाजातली गूढ साद आहे.
‘कोई दूर से आवाज दे, चले आओ, चले आओ..

रात-रातभर इंतजार है, दिल दर्द से बेकरार है
साजन इतना तो ना तडपाओ, चले आओ, चले आओ’

‘वह कौन थी’सिनेमाची नायिका स्वत:भोवती गूढतेचे शुभ्र वलय पांघरून सामोरी येते. डॉक्टर नायक तिला प्रथम ‘भेटतो’ तो मुसळधार पाऊस पडत असताना अपरात्री एका पुराण्या हवेलीत. जिथे कोळीष्टके आहेत. आपोआप उघडणारी-बंद होणारी खिडक्यांची पाखे आणि दरवाजे आहेत. दचकविणारे संगीत आहे. साधनाला या सिनेमात दोन सुंदर गाणी मिळाली आणि तिने त्यांचे सोने केले.
‘नना बरसे, रिमझिम रिमझिम
पिया तोरे आवन की आस’

सिनेमात हे गाणे नुसतेच झपाटणारे गाणे म्हणून वापरले आहे. पण त्यातले एक कडवे सुन्या सुन्या घरात साजणाची वाट पाहणाऱ्या विरहिणीची व्यथा सांगते..
‘ये लाखों गम यह तनहाई
मुहब्बत की यह रुसवाई
कटी ऐसी कई रातें
न तुम आये न मौत आयी..’

पण दोघांचे लग्न झाले तरी त्यांच्यातल्या दुराव्यामुळे, रहस्याच्या न सुटलेल्या गुंत्यामुळे घराला घरपण येत नाही. ती स्वत:ला त्याच्यापाशी व्यक्त करू शकत नाही.
‘जो हमने दास्ताँ अपनी सुनायी आप क्यूं रोये?
तबाही तो हमारे दिलपे छायी, आप क्यूं रोये?’

प्रेमभंग झाला. गाव सोडून गेला. खूप वर्षांनी परत आला. प्रिय व्यक्तीच्या जुन्या घरापाशी गेला तर ओळखीच्या जुन्या खुणा परक्या झालेल्या असतात. घर कदाचित गायब झालेलं असतं किंवा असलंच तर पडीक होऊन बिल्डरच्या कुदळीची वाट पाहात असतं. तिथं व्यतीत केलेले आणि नंतर मनामध्ये खोलवर दडवलेले हळवे क्षण त्या बेसावध प्रसंगी बाहेर येतात. नूरजहाँच्या आर्त आवाजातलं गाणं अशा वेळी सहज ओठांवर येतं.  
‘आवाज दे कहाँ है, दुनिया है,

किस्मत पे छा रही है क्यूं रात की सियाही
वीरान हैं मेरी नींदें तारों से ले गवाही  
बरबाद मं यहां हूं, आबाद तू कहां है?..’

ज्या घरात जुना काळ गेला त्या घराची आजची अवस्था पाहून कवी नसलेला जयवंत दळवींच्या कथेतला आपूदेखील हळहळतो. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये आपला एकेकाळचा नांदता वाडा ओसाड झालेला पाहून म्हणतो,

‘परसात आता फुलझाड राहिलेले नाही. पूर्वी याच परसातून आमचे शेजारी वामनदाजी फुले नेत म्हणून मी त्यांच्याशी भांडत असे. आज येथे फूल नाही, फुलझाड नाही. इतकेच काय फुले तोडायला वामनदाजी नाहीत. त्यांची वयनीबायही नाही. त्यांचे घर नाही. वाऱ्यापावसाने ते पडून झडून गेले आहे. एखादी दुसरी तांबडमातीची िभत तेवढी उभी आहे. त्यावर खुरटे गवत उगवले आहे..’
गावातून िहडताना त्याला वाटते की-
‘भोवतालची झाडे विचित्र नजरेने पाहात आहेत. गावातल्या माणसांनीसुद्धा आता झाडांचीच रूपे घेतल्यासारखे वाटते. सगळीकडे मी खुळय़ासारखा वळून वळून पाहतो. पण कुठेच ओळख पटत नाही. मी परका झालो आहे. एकाकी झालो आहे. काळाच्या ओघात सारी रूपेच बदलून जात आहेत.’
पण अशा वेळी पु. शि. रेगे यांची एक कविता स्मरणरंजनाने व्याकूळ झालेल्या मनाला दिलासा देते. जुने घर पडले आणि नवीन घर उभे राहिले तरी त्याचे झपाटलेपण सरणार नाही. कारण ‘शिशिर ऋतूच्या पुनरागमे एकेक पान गळावया’ लागते तेव्हाच तारुण्याची नवी पालवीदेखील आतून जन्म घेत असते. रेगे म्हणतात,

‘हा वाडा जरी जमीनदोस्त झाला
तरी जग काही त्यानं नाहीसं होणार नाही
जिथं घर आहे, आसरा आहे,
तिथं आसपास दोन तरी कबुतरं घुमत राहिलेली दिसतील.

आणि अगदी मोडक्या, अपुऱ्या जागेतूनही
लोहाराच्या भात्याच्या चालीवर
श्वास आणि श्वास यांचं संगीत ऐकू येईल..’

हे यौवन, नवी पालवी आणि मीलनाचं, सृजनाचं संगीत वाहत्या नदीसारखं अजरामर आहे. आपण त्यातला एक वाहता थेंब आहोत. उगमापाशी आहोत की सागरापाशी, काय फरक पडतो?

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old house
Show comments