शंकरनानाचं घर म्हणजे गावातला भलामोठा चौसोपी वाडा होता. घरात दहा-बारा बिऱ्हाडं होती. चोहोबाजूला दरवाजे होते. त्यामुळे घराचा दर्शनी भाग ओळखताच येत नसे. मधला वळईचा भाग तेवढा सामायिक होता. बाकी खोल्यांमध्ये प्रत्येक बिऱ्हाडाचा वावर असे. वर्षभरातले सारे सण वळईतच पार पडत. घरातल्या काही चुली आग ओकत, तर काही खोल्यांमधून धुरांचा भपकारा बाहेर येई. शंकरनानाकडे आलेला पाहुणासोयरा कोणत्या बिऱ्हाडात आलाय, हे शेजारच्यांना कळतही नसे.
वाडवडिलांची फार मोठी पुण्याई शंकरनानाच्या पाठीशी होती. त्यांच्या आशीर्वादामुळेच शंकरनानाचं कुटुंब सुखेनैव वावरत होतं. दारातल्या अंगणात पोरांचा गोतावळा नेहमीच जमलेला असे. प्रत्येक बिऱ्हाडात चुली पेटत असल्या तरी सारे सणवार मात्र एकत्रच गुण्यागोविंदाने साजरे होत. भाद्रपदातला गणपती एक, श्रावणातला नागोबा एक तशी चैत्रातली गुढीही एकच.
पुढल्या दारच्या अंगणातल्या तुळशीजवळ शंकरनानाची भलीमोठी गुढी उभी राहत असे. अख्ख्या गावातली ही सर्वात उंच गुढी. तिला पांढऱ्या-लाल चाफ्याच्या फुलांनी सजवले जाई. मध्येच आलेल्या एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने दोऱ्यात ओवलेली ही फुले भिंगरीसारखी गिरकी घेत. काठीच्या टोकाला बांधलेली फुलांची माळ कधी विळखा मारी, तर कधी काठीपासून लांब हेलकावे घेई. ही गुढी साऱ्या पंचक्रोशीचं आकर्षण होतं. तिच्याकडे पाहताना मान पार मागे दुमडावी लागे. गावातील आबालवृद्ध गुढीच्या पाया पडण्यासाठी इथं आवर्जून येत. आवतीच्या काठीची ही गुढी साऱ्या आसमंतात शोभून दिसे. गुळगुळीत तासलेल्या काठीचा मुगडा पाटावर ठेवून चारी बाजूंनी बांधल्यावर काठीच्या टोकाला पितांबर बांधून त्यावर अलगद गढूतांब्या ठेवला जाई.
 सूर्यनारायण डोक्यावर आलेला असे. गढूतांब्यावर त्याच्या पडलेल्या प्रकाशकिरणांनी डोळे दिपून जात. सर्व बिऱ्हाडांची विधिवत पूजाअर्चा होई आणि मग साऱ्यांचे नैवेद्य रांगेत लावले जात. शंकरनाना घरातल्या साऱ्या मंडळींना बाहेर बोलवी. त्याच्या आवाजात जरब होती. पहिल्या हाकेला कोणी बाहेर आलं नाही तर नाना ठेवणीतल्या शिव्याही हासडायचा.
एकामागोमाग एक सारे येऊन गुढीसमोर उभे राहिल्यावर शंकरनाना गाऱ्हाणे सांगे. त्याच्या भल्यामोठय़ा गाऱ्हाण्यात गावातील साऱ्या देवदेवता येत, तसे वाडवडीलही. मारुतीच्या शेपटासारखं लांबलेलं गाऱ्हाणं संपत आलं की ‘होऽय म्हाऽराजाऽऽऽ’चा एकमुखी सूर असमंतात घुमे.  
मग एकेक जण गुढीला नमस्कार करून घरात पळत. गुढीच्या पुढय़ात ठेवलेल्या साऱ्या नैवेद्यांना शंकरनाना एकदमच पाणी सोडी. तो घरात येईपर्यंत वळईत पंगत मांडली जाई. सारी मुलं एका पंक्तीत बसायची. मोठय़ांची पंगत वेगळी. जेवण वाढणाऱ्यांची पंगत शेवटी.
 साऱ्या कुटुंबात भिन्न मतप्रवाह असले तरी सारे सोपस्कार मात्र ठरल्यावेळीच होत. त्यात कुणासाठी कधी थांबणे नव्हते. अख्ख्या गावात शंकरनानाचा दरारा होता. त्याच्या घरातल्या माणसांची खरी गणती आताच होई. बरोब्बर ७४. दरवर्षी हा आकडा फुगतच जाई.
शंकरनानाचं ७४ माणसांचं भलंमोठं कुटुंब आता राहिलं नाही. दोन वर्षांपूर्वीच नव्वदीचं निरोगी आयुष्य जगून शंकरनाना गेला. तो गेला तसा त्याच्या घरातला धाकही गेला. मुलामुलांत मतभेद झाले. झाडा-जमिनीची वाटणी झाली. ऐक्यात बाधा आली. गणपतीची संख्या वाढली, तशी नागोबांचीही.
गेल्या वर्षी तर कहरच झाला. शंकरनानाच्या दारात १६ गुढय़ा उभ्या राहिल्या. त्याच्या काठय़ा आवतीच्या नव्हत्या. कोणाकडून तरी आणलेल्या वेडय़ावाकडय़ा काठय़ा होत्या त्या. त्यात पूर्वीची भक्कमता नव्हती. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार नव्हते. गढू तांब्या नव्हता आणि पितांबराची झळाळीही नव्हती.  
गुढीपाडव्याचा सण दरवर्षी येतो आणि जातोही; पण शंकरनानाने प्रेमाच्या धाग्याने बांधलेल्या गुढीची सर आता
येत नाही..    

Story img Loader