मालकांनी माझीपण छान काळजी घेतली. वेळच्या वेळी आतून-बाहेरून रंग लावला जायचा. मुळातच माझ्या उभारणीत ब्रिटिशकाळातला सच्चा माल वापरला गेला असल्यामुळे, मीसुद्धा मालकांना फार त्रास देण्यास कारणीभूत झाले नाही. आता आजूबाजूला नव्याने बांधलेल्या इमारतींच्या पाइपातून गळणारं पाणी, तुटलेल्या फरशा, खिडक्यांना लावलेल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या जड जाळ्या बघितल्या की मला त्यांची फार कीव येते. आता माणसांच्या तब्येतींप्रमाणे इमारतीही ढासळत चाललेल्या दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी १९३६ सालापासून मुंबईत दिमाखाने उभी आहे. गेल्या ८५ वर्षांत हे मुंबई शहर व इथली माणसं कशी बदलत गेली त्याची मी साक्षीदार आहे. भोवतालची स्थिती बघून कधी माझा जीव सुखावला, तर कधी प्रचंड दुखावला.

माझा सर्वोच्च आनंदाचा दिवस म्हणजे जेव्हा माझ्या मालकांनी निवृत्त झाल्यावर स्वत:च्या पुंजीतले पैसे वापरून मला- ‘निवृत्ती सदन’ उभारलं. तेव्हा मुंबईचा बराचसा भाग शेती, टेकडय़ा व गावठाणं असाच  होता. मुंबईचा विस्तार व विकास करायच्या योजनेनुसार बऱ्याच भागांतील जमिनी सरकारने लोकांना घरं बांधण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. असाच एक प्लॉट घेण्यासाठी मालकांनी केलेला पत्रव्यवहार अजूनही त्यांच्या नातवाने जपून ठेवला आहे. त्यातील पालिकेच्या अधिकाऱ्यांची नम्र व अदबीची भाषा आता बघायला मिळेल की नाही शंकाच आहे. एकाही पैशाची मागणी न करता करार झाला व मुंबईतील सगळ्यात नावाजलेल्या आर्किटेक्ट व बांधकाम करणाऱ्या कंपन्यांनी मला रूप द्यायला सुरुवात केली. प्रथम छोटंसं मॉडेल करून घेण्यात आलं, ते आजही मालकांच्या दिवाणखाण्यात शोकेसमध्ये डौलानं उभं आहे. मालकांचं शेवटचं पोस्टिंग पुण्यात होतं; परंतु त्यांचे गिरगावातील मोठे जावई बांधकामावर लक्ष ठेवून होते. भेसळीचं सिमेंट तेव्हा अस्तित्वातच नव्हतं. सगळ्यात उत्तम असं सागाचं लाकूड खिडक्या, दारं व जिन्यासाठी वापरलं. चकचकीत इटालियन मोझाईक लाद्या व सर्व खिडक्या-दारांना पितळ्याच्या कडय़ा! माझ्यात भरपूर उजेड व वारा खेळेल याची काळजी घेतली गेलेली. तळमजला व वर दोन मजले असा माझा अवतार! ९ डिसेंबर १९३६ रोजी निमंत्रित आप्तेष्टांच्या उपस्थितीत झालेल्या वास्तुशांतीचं आमंत्रण मालकांच्या वारसदारांनी अजूनही संग्रही ठेवलं आहे. मी तेव्हाच मालकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा निश्चय केला, जो आजपर्यंत पाळते आहे. 

१९३६ साली मालक पुण्याहून सहकुटुंब या स्वत:च्या घरात राहायला आले ते एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात व अभिमानात! तेव्हाच्या प्रसिद्ध चौधरी कंपनीकडून फर्निचर आणून घर सजवलं गेलं. जज्जसाहेबांचंच घर ते. घरात सभ्य, शांत, घरंदाज वातावरण! आजच्या मालकांचे पाहुणेसुद्धा म्हणतात, ‘या घरात व इमारतीत खूप चांगल्या व्हाइब्ज येतात.’

मालक मूळ मुंबईचे. पेशाने वकील, पण सब-जज्ज म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेले. निवृत्त झाल्यावर मात्र परत मुंबईतच कायम राहण्याच्या हेतूने आले. मालक स्वभावाने कडक, सडेतोड बोलणारे व अत्यंत शिस्तप्रिय, जसे जज असावे तसे. माझ्या मालकीणबाईपण मुंबईच्या तेव्हाच्या एका नामवंत वकिलाची कन्या! नाना चौकातील सेंट कोलंबा शाळेत सातवीपर्यंत शिकलेल्या. वाचनाची व लोकसंग्रह करण्याची आवड असलेल्या अत्यंत हुशार बाई! मालकांचा रुबाबदार चेहरा आणि मालकीणबाईंची ठेंगणी, पण स्मितभाषी मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून अजूनही हलत नाही. अशा सुशिक्षित जोडप्याच्या रूपवान, हुशार मुली चांगल्या शिकूनसवरून, लग्नानंतर सुस्थळी पडलेल्या बघण्याचं भाग्य मला लाभले, हे काही कमी नाही.

मालकांचा विचार असा होता की, दुसऱ्या मजल्यावर स्वत: राहायचं व उपजीविकेचं साधन म्हणून खालचे चार ब्लॉक भाडय़ाने द्यायचे. टू-बीएचकेसाठी भाडं अवघं ५० रुपये!  भाडेकरू मिळाले तेसुद्धा सभ्य. गेल्या ८५ वर्षांत, त्यांच्यासुद्धा तीन पिढय़ा याच घरात मोठय़ा झालेल्या मी पाहिल्या. भाडेकरूंनीसुद्धा मला तेवढय़ाच प्रेमाने व आदराने वागवलं. माझ्या अंगणात कचरा टाकला नाही की घाण केली नाही, की नको ती तोडफोड केली नाही. 

ते दिवस, विशेषत: गौरीगणपतीचे, फारच प्रसन्न, आनंदी व उत्साही! मालक घरी पूजेचा गणपती बसवत. सर्व मुली,जावई, नातवंडे पाच दिवस येऊन- जाऊन असायचे. फुलं, प्रसाद व फळं घेऊन यायचे. मालकीणबाईंची सर्वाची सरबराई करताना धांदल उडायची. माझ्याच एका भिंतीला चिकटून गणपतीची मूर्ती स्थानापन्न झाली की काचेच्या भावल्या, प्राणी, फ्लॉवर पॉट, ताजमहालाच्या आकाराचे सुंदर दिवे यांची आरास बघून मला अवर्णनीय आनंद व्हायचा. गौरीला मटणमाशाचा नैवेद्य व सगळ्यांनाच मेजवानी! एक दिवस सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी नटूनथटून प्रसादासाठी यायचे. ती फॅशन परेड बघून माझे डोळे सुखावत असत.

मालकांनी माझीपण छान काळजी घेतली. वेळच्या वेळी आतून-बाहेरून रंग लावला जायचा. मुळातच माझ्या उभारणीत ब्रिटिशकाळातला सच्चा माल वापरला गेला असल्यामुळे, मीसुद्धा मालकांना फार त्रास देण्यास कारणीभूत झाले नाही. आता आजूबाजूला नव्याने बांधलेल्या इमारतींच्या पाइपातून गळणारं पाणी, तुटलेल्या फरशा, खिडक्यांना लावलेल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या जड जाळ्या बघितल्या की मला त्यांची फार कीव येते. आता माणसांच्या तब्येतींप्रमाणे इमारतीही ढासळत चाललेल्या दिसतात.

काही गोष्टी मात्र मला दु:ख देऊन गेल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४८ च्या सुमारास सरकारने नवा रेंट कंट्रोल अ‍ॅक्ट लागू केला व माझ्या मालकांच्या आर्थिक स्थितीवर गदा आली. चार भाडेकरूंकडून भाडय़ाचे जे काही दोनशे रुपये यायचे त्यात मालकांचं व्यवस्थित भागत होतं; पण ज्या भाडय़ावर ते जगत होते, ती भाडीच या कायद्याने होती त्याच पातळीवर गोठवून टाकली. महागाई वाढतच होती, पण उत्पन्न वाढत नव्हतं. इतकंच नाही तर भाडेकरू कमी भाडी देऊन स्वत:ची भरभराट करून घेत होते. परवडत नाही म्हणून मालकांनी गाडी विकून टाकली, पण भाडेकरूंकडे नव्या गाडय़ा आल्या. इतकं कमी भाडं मिळूनसुद्धा इमारत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी व खर्च मात्र मालकाच्या डोक्यावर. कायद्यानी भाडेकरूंना इतकं संरक्षण दिलं की तेच जणू मालक बनले. भाडी वाढवता येत नाहीत व आपलीच जागा आपल्याला परत घेता येत नाही, अशी गळचेपी झाल्यावर माझ्या मालकांना घर बांधून चूक केली असंच वाटायला लागलं. त्यांनी काही भाडेकरूंच्या पिढय़ान्पिढय़ा पोसण्याच्या हेतूने घर बांधलं नव्हतं. मुलींच्या मदतीमुळे मालक कसंबसं आपला खर्च भागवत होते. १९४० पूर्वी बांधलेल्या आजूबाजूच्या सर्वच इमारतींच्या घरमालकांची हीच स्थिती झाली आहे, असं मी ऐकलं.

१९६२ पासून ते २००७ या काळात मात्र मला दु:खदायी दिवस बघावे लागले. मातृपितृवत मालकांच्या, मालकीणबाईंच्या निधनानंतर मला फार पोरकेपण आलं. नशिबानी त्यांची एक मुलगी इथे राहायला आली व माझ्या जिवात जीव आला. तिच्या मृत्यूनंतर, आता तिच्या मुलाकडे बघून मी जगतेय. मी त्यांच्या वारसदारांच्या मागे भक्कमपणे उभं राहावं अशी मालकांचीही इच्छा असणार हे मी जाणून आहे.

हळूहळू भाडेकरूंच्या घरात काय काय बदल होत होते तेही मी ऐकत होते. भिंतींना कान असतात म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. कायद्यानीच संरक्षण दिल्यामुळे, भाडेकरूंची चालू पिढी, आपल्या असलेल्या/ नसलेल्या वारसदारांसाठी ३ील्लंल्लू८ कशी टिकवून धरता येईल याचं नियोजन करण्यात गुंतली आहे. त्यांच्या क्लृप्त्या ऐकल्यात तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. सगळ्यांचं उद्दिष्ट एकच- येनकेनप्रकारेण जागा घरमालकाकडे परत जाऊ द्यायची नाही. भाडेकरूंनी जागा बळकावली तर तो त्यांचा हक्क, पण मालकाने स्वत:च्या मालकीची जागा परत मागितली तर तो निष्ठुरपणा!

हे सर्व बघून मला मालकांसाठी फार वाईट वाटतं. खरं तर जगात कुठल्याच भाडय़ाने घेतलेल्या गोष्टीवर आपण मालकी हक्क गाजवू शकत नाही. हा कायदाच किती एकतर्फी आहे. ज्यांची इमारत बांधण्यात एक पैशाचीही गुंतवणूक नाही, ज्यांनी पागडी/ डिपॉझिट दिलेले नाही, जे भाडेकरू पिढय़ान्पिढय़ा ८०-८५ र्वष जवळजवळ फुकटात राहिलेत, त्यांना हा कायदा इतकं संरक्षण देतो, की मालकांना स्वत:साठी जागा हवी असली तरी त्यांना काढण्यासाठी कोर्टात जावं लागतं किंवा जागा सोडण्यासाठी मालकालाच त्यांना पैसे द्यावे लागतात. जर ३ील्लंल्लू८ विकली तर आलेल्या पैशातला मोठा हिस्सा द्यावा लागतो. हा कसला अन्यायी कायदा? स्वत: गुंतवलेल्या पैशावर मालकाला परतावा तर नाहीच, पण बाजारभावाप्रमाणे भाडं का जागेची किंमतही मिळत नाही. मालकाने तरी कसा वाढत्या खर्चाचा मेळ बसवावा? म्हणूनच माझी रंगरंगोटी व डागडुजी पुढे पुढे ढकलली जाऊ लागली. इमारत १९४०च्या आधी बांधली गेली व भाडेकरूंनी स्वत:च्या मालकीच्या घराची इतक्या वर्षांत सोय केली नाही, हाच मालकाचा गुन्हा! याच्या उलट, अलीकडे नव्याने बांधलेल्या इमारतींचे मालक मात्र बाजारभावाने भाडी व किंमत कायदेशीरपणे मागू शकतात. हा कुठचा न्याय?

असंच चालू राहिलं तर मात्र माझ्या मालकांना इच्छेविरुद्ध मला  विकण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. आजूबाजूच्या माझ्या वयाच्या किती तरी इमारती पाडल्या गेल्या आहेत. आता ‘मेरा नंबर कब आयेगा’ याचीच मी वाट बघतेय. माझ्यावर सुरुंग लावला जाईल तो दिवस माझ्या व मालकांच्या आयुष्यातला सर्वात कठीण आणि दु:खाचा दिवस असेल. शेवटची एक इच्छा, की नव्या इमारतीला माझंच नाव दिलं जावं. काही तरी माझी आठवण राहावी. देवाकडे एकच प्रार्थना- नव्या इमारतीत माझ्या मालकांना, जुन्या व नव्याने राहायला येणाऱ्यांना सुखशांती व समाधानी आयुष्य लाभो!

– स्नेहा

vasturang@expressindia.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Originally from my time in the british era autobiography of a building akp