चित्रकलेत स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या शिंदे दाम्पत्याच्या स्टुडिओविषयी..
फाइन आर्टच्या क्षेत्रात पती-पत्नी दोघेही चित्रकार असणे तुरळक! त्यातही दोघांचे स्वतंत्र काम जोमदारपणे सातत्याने सुरू असणे तर अपवादानेच आढळते. शिंदे पती-पत्नी अशा अपवादात्मक दाम्पत्यांपैकी! समकालीन आधुनिक कलाक्षेत्रात दोघांनाही मान्यता आहे. त्यांच्या पेंटिंग्जना मागणी आहे. दोघांचे कलाविष्कार भिन्न असले तरी त्यांच्या निर्मितीचे प्रेरणास्थान ‘निसर्ग’ आहे. दोघांची सात संयुक्तिक प्रदर्शने झाली आहेत. शिवाय वैयक्तिक व समूह चित्रप्रदर्शनांची संख्या तीसहून अधिक आहे. येथवर ते सहजासहजी पोहोचले नाहीत. त्यामागे अव्याहत निर्मिती, अथक परिश्रम, कलागुण इत्यादी बाबी आहेत. या दोघांच्या स्टुडिओंचा परिचय आपण करून घेणार आहोत. दोघांचा विवाह १९८३ मध्ये झाला. सुरुवातीला त्यांचा स्टुडिओ व घर एकाच ठिकाणी, एकत्रच होते. आता विलास शिंदे यांचा स्टुडिओ मीरारोडला आहे, तर जिनसुक शिंदे यांचा स्टुडिओ पवई येथे आहे. जिनसुक कोरिअन आहेत. त्यांचा जन्म, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन पातळीवरचे कलाशिक्षण दक्षिण कोरियातील! विलास साताऱ्यातील एकांबे गावचे. त्यांचे कलाशिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९७८ मधे पूर्ण झाले. बडोदा युनिव्हर्सिटीतून १९८० मध्ये पोस्ट डिप्लोमा घेतला. हे दोघे भेटले ते पॅरिसमध्ये. ‘प्रिंट मेकिंग’ या कलामाध्यमातील विशेष शिक्षणासाठी जिनसुक १९८० ते ८३ मध्ये पॅरिसला होत्या. तर पेटिंग व प्रिंट मेकिंगच्या विशेष शिक्षणासाठी विलास १९८१  साली पॅरिसला रवाना झाले. तेथील प्रा. हेन्तर यांच्या ‘प्रिंट मेकिंगच्या’ स्टुडिओत शिक्षण घेताना त्या दोघांची मैत्री दृढ होत गेली. देश, वंश वेगळे असले तरी कलेचे गोत्र जुळले आणि दोघे पॅरिसलाच विवाहबद्ध झाले. पॅरिसच्या वास्तव्याने कलेच्या कक्षा विस्तारल्याच; शिवाय आयुष्याचा जोडीदारही तेथेच भेटला. त्यांनी कला हाच प्रपंच मानला. बाकी सर्व त्यापुढे दुय्यम ही खूणगाठ मनाशी बांधली. त्याच निष्ठेने आजपर्यंतच्या तीस वर्षांची वाटचाल केली. संसार जाणीवपूर्वक दोघांपुरता मर्यादित ठेवला. दैनंदिन आहार, भांडीकुंडी इतर चीजवस्तू, फर्निचर अगदी बेताचे, आटोपशीर व सुटसुटीत ठेवण्याकडे दोघांचाही कल. चित्रकार व्हायचे की इतरांसारखे सर्वसाधारण आयुष्य स्वीकारायचे हा निर्णयच घेतला पाहिजे. चित्रकलेखेरीज इतर गस्ता वाढवीत गेले तर चित्रांबद्दलची आत्मीयता किंवा निर्मितीची ओढ थांबून इतरच वाढणार, अशी त्यांची धारणा आहे.
पॅरिसच्या शिक्षणानंतर विलास शिंदे नवपरिणितेसह भारतात परतले. मुंबईतील कालिना परिसरात चित्रकार दाम्पत्याच्या सहजीवनाची सुरुवात झाली. उमेदवारीच्या त्या काळात विलास यांनी काही काळ नोकरी केली. पण नंतर मात्र नोकरी न करता चित्रकार म्हणून आपले बस्तान बसविले. भारतात परतल्यावर लगेचच दोघांचे पहिले संयुक्त प्रदर्शन १९८४ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत भरविले. या प्रदर्शनाची सर्व निर्मिती, तयारी कालिन्यातील त्यांच्या स्टुडिओत झाली. पाचशे चौरस फुटांच्या त्यांच्या त्या फ्लॅटला घरापेक्षा स्टुडिओ म्हणणेच अधिक सयुक्तिक आहे. या वास्तूतील हॉल, किचन, बेडरूम अशी विभागणी करणाऱ्या भिंतीच त्यांनी पाडून टाकल्या. किचनचा मांड ओटय़ापुरताच मर्यादित ठेवला. ओटय़ाच्या समोर जराशाच अंतरावर पलंग! किचनच्या एका भिंतीलगत ‘प्रिंट मेकिंग’ या कलामाध्यमात काम करण्यासाठी ‘एचिंग प्रेसचे’ मशीन ठेवले. या माध्यमासाठी आवश्यक असणाऱ्या अ‍ॅसिटोनचा वास कायम त्या जागेत असायचा. याशिवाय बसण्यासाठी दोन मोठे आणि बहुउद्देशीय एक टेबल! उरलेली जागा पेंटिंग व प्रिंटिंगच्या निर्मितीसाठी! हा स्टुडिओ तळमजल्यावर असल्याने त्या जागेला मागचा दरवाजा होता. बाहेर छोटेसे अंगण होते. अंगणात थोडी झाडेझुडपे होती. दोघांची तेथे ऊठबस असे. निसर्गाचे ते लहानसे अस्तित्व विलासना त्यांच्या गावची सावली देई. या वास्तूत उभयतांनी अव्याहत झपाटून सपाटून काम केले. या वास्तूत जवळजवळ वीस वर्षे त्यांनी आपल्या कलेचा प्रपंच जोपासला आणि वाढवला. सुरुवातीच्या काळात तर पोटात भूक कडकडल्यावरच म्हणजे रात्री बारालादेखील गॅसवर कुकर चढायचा. एक वाजता खाऊन झाले की परत पहाटे चापर्यंतही काम सुरू राहायचे.
काही वर्षांत विलास मोठे कॅनव्हास रंगवू लागले. साहजिकच अधिक जागेची गरज निर्माण झाली. स्वत:ला परवडेल अशी जागा मीरारोडला एका कॉम्प्लेक्समध्ये चौथ्या मजल्यावर घेतली. सातशेचौरस फुटांचा हा टेरेस फ्लॅट २००० साली घेतला. त्या वेळी तेथे चार तळी होती. तळ्यात कमळे होती. दूरवर नॅशनल पार्कचे डोंगर दिसत. तेथून विविध पक्ष्यांचे थवे निघत. पावसाळ्यात तेथील वातावरण टवटवीत मनोहर होऊन जाते. मीरारोडच्या त्या परिसरातही त्यांना त्यांचे गाव भेटल्यासारखे वाटते. या वास्तूतील भिंती पाडून जागा मोकळी, प्रशस्त केली आहे. पूर्वीचा ‘एचिंग प्रेस’ आता तेथे हलला आहे. या माध्यमात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या झिंक प्लेट्स, प्रिंट इंक, दोन रोलर, फेल्ट (विशिष्ट कापड), हत्यारे, रंग इत्यादी साहित्य जवळच्याच लोखंडी रॅकवर ठेवले आहे.
स्टुडिओ, पेंटिंग याबद्दलच्या त्यांच्या गरजा बदलत गेल्या. काही बाबतीत अनुभवाने त्यात बदल केले. अलीकडे दिवसभरच्या नैसर्गिक उजेडात चित्र रंगविण्यास ते प्राधान्य देतात. चित्रनिर्मितीत बऱ्याच शारीरिक हालचालींचा अंतर्भाव असतो. त्यामुळेही संध्याकाळनंतर थोडा थकवा येतो. अलीकडे सहसा रात्री पेंटिंग करीत नाहीत. त्यांच्या चित्रप्रक्रियेची सुरुवात ‘अ‍ॅक्सिडेंटल रिझल्ट’ मिळवून केली जाते. अ‍ॅक्रेलिक रंगाचा पातळ पारदर्शक थर ते कॅनव्हासवर लावतात. मग एक वेगळ्या प्रकारचा ब्रश, रंग तयार केलेल्या लहान बादलीत बुडवतात. त्या ब्रशने रंगांचे सपकारे किंवा शिंतोडय़ासारखा स्प्रे करून घेतात. अ‍ॅक्सिडेंटल म्हटले तरी इतक्या वर्षांच्या सरावाने, अनुभवाने कशाप्रकारे काय साधने वापरली की कॅनव्हासवर काय उमटेल याचा अंदाज आलेला असतो. स्वत:ला अपेक्षित असलेला परिणाम साधेपर्यंत ते अशा प्रकारे रंगांचे थर चढवतात आणि त्यातूनच त्यांच्या मनातील संकल्पना विकसित करतात. मोठे कॅनव्हास बऱ्याचदा ते जमिनीवर पसरतात. त्याच्या बाजूने गुडघ्यांवर बसत किंवा कधी वाकून चित्र रंगवितात. काही वेळा त्यांच्या फ्लॅटच्या गच्चीत कॅनव्हास नेऊन तेथे एकदोन बेताच्या उंचीच्या स्टुलांवर तो ठेवून मग रंगभरणी करतात. एका वेळी एकच चित्र पूर्ण करून मग दुसऱ्या चित्राकडे वळतात. तथापि मोठमोठे कॅनव्हास करण्यापूर्वी लहान लहान कॅनव्हासवर त्यांच्या संकल्पनेचा रियाज करून घेतात. त्यांना संगीताची आवड आहे. स्टुडिओतल्या एकांतात त्यांना सुरांची साथ असते. त्यात भीमसेन जोशी, बेगम अख्तर, बडे गुलामअली खाँ अशा वेगवेगळ्या सुरावटी असतात. कधी कोरिअन पारंपरिक संगीताची धून असते. सुरांनी स्टुडिओ भारलेला असतो. कधी कधी कलानिर्मितीच्या श्रांत, अनामिक क्षणात जाणिवा पुसट होतात. स्वत:चे अस्तित्व त्यांना जाणवेनासे होते. नकळत डोळे ओलावतात, अश्रू ओघळतात. स्टुडिओलगतच्या गच्चीमुळे सूर्याची कोवळी किरणे, पौर्णिमेचा चंदेरी प्रकाश, पावसाच्या धारा, वृक्ष, पक्षी अशी निसर्गाची विविध रूपे ते प्रत्येक वेळी जणू नव्याने अनुभवतात. या कशाचेही प्रत्यक्ष चित्रण त्यांच्या अभिव्यक्तीत नसते. पण ती निसर्गाची स्पंदने कुठे ना कुठे, अप्रत्यक्षपणे उमटलेली असतात. सर्जनाच्या ऊर्मीत त्यांना कधी थरार जाणवतो, कधी अंगावर रोमांच उभे राहतात, कधी शरीरात हलकी कंपने जाणवतात. अशा क्षणांना कधी सामोरे जात तर कधी त्यांच्यासह किंवा त्याशिवायही चित्रनिर्मिती आणि चित्रनिर्मितीचे चिंतन अविरत सुरू असते.
या वर्षी विलास शिंदे साठीत प्रवेश करीत आहेत. प्रदर्शनांच्या चित्रांची तयारी स्टुडिओत जोरदार सुरू आहे.
जिनसुक शिंदे यांचा स्टुडिओ
जिनसुक हा चित्रकर्तीचा स्टुडिओ आणि उभयतांचे राहते घर. सन २००७ पासून पवईच्या एरियात आहे. नऊशे चौरस फुटांची ही प्रशस्त जागा बाविसाव्या मजल्यावर आहे. खिडकीतून  पवई-विहारलेकचा विस्तृत परिसर दिसतो. या इमारतीच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ, आखीव रेखीव, अनेक सोयींनी युक्त व बऱ्याच झाडाझुडपांचा आहे. दरवाजा उघडल्यावर दिसणारा हॉल म्हणजेच जिनसुक यांच्या स्टुडिओ. अर्थात स्टुडिओचा पसारा म्हणजे इतर साधनसामग्री दुसऱ्याही खोलीत पोहोचवली आहे. प्रस्तुत छायाचित्रात त्या स्वत:, त्यांची साधनसामग्री असलेले ड्रॉवरचे कपाट आणि पेपर कटर दिसत आहे. ड्रॉवरमध्ये वेगवेगळे बरेच पेपर्स, रंगसाहित्य आहे. त्या पावडरच्या स्वरूपातील ‘चायनीज स्टोन कलर’ पाण्यात मिसळून स्वत: तयार करून घेतात. रंगांची घनता आणि छटा याबाबत विशेष काळजी घेतात. कागदांवर रंग लावताना कधी त्या सपाट रंग देतात, तर कधी उजळ गडद रंगछटेच्या ग्रेडेशनप्रमाणे रंगवितात. काही वेळा त्यात दोन-तीन वेगवेगळ्या रंगछटांचे मिश्रण असते. हे करताना रंग-माध्यमाच्या अनेक शक्यतांचा वेध घेतात. रंगविलेल्या कागदांच्या लांब-बारीक पटय़ा त्या पेपरकटरने कापतात. काही वेळा या पट्टय़ांना थोडा आकार दिलेला असतो. या कापलेल्या पट्टय़ांमधून त्या त्यांची वैशिष्टय़पूर्ण निर्मिती करतात. त्यांनी केलेल्या चित्ररचनेचे दोन पारदर्शक अ‍ॅक्रेलिक शीट्समध्ये सँडविच केले जाते. त्यामुळे त्यांची चित्रचौकटही इतरांपेक्षा वेगळीच दिसते. चित्रपद्धतीचे त्यांचे हे तंत्र बरेच कष्टप्रद आहे. या प्रकारच्या त्यांच्या सर्व प्रक्रियांना एक ते चार महिने लागतात.
या वास्तूतून दिसणारे विशाल आकाश, विस्तृत परिसर, घरात शिरणाऱ्या वाऱ्याच्या झुळका या नैसर्गिक घटकांचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या कलाकृतींवर होतोच अशी त्यांची धारणा आहे. त्या आसमंतातील अंधूक प्रकाशापासून रात्रीच्या गडद अंधारातील; जमीन ते आकाशीच्या विविध घटकांतील रंगांचा बदल त्या एकाच चित्रचौकटीत प्रभावीपणे अविष्कृत करतात. अशा वेळी झाड, दगड, जलाशय यांचे आकारवैशिष्टय़ त्यांना महत्त्वाचे नसतात तर रंगछटेतील बदल त्या तरलतेने टिपतात. सध्याच्या चित्रांत रंगविलेल्या कागदांच्या पट्टय़ा त्यांनी एका कडेवर उभ्या केल्या आहेत. चिकटवताना त्या जवळजवळ ठराविक अंतरावर लावल्या आहेत. त्यामुळे निर्माण झालेली लय व पुनरावृत्ती वेगळीच सौंदर्यानुभूती देतात. जिनसुक यांच्या कलानिर्मितीत नेहमीच सर्जकता व कौशल्य यांचा मेळ असतो.
पवईच्या या स्टुडिओची जागा घेताना काम कसे घडत गेले हे त्या कोरिअन उच्चारांच्या इंग्लिशमध्ये उत्साहाने सांगतात. त्यांच्या कलात्मकतेचा आविष्कार दोन-तीन ठिकाणी दृष्टीस आला. सूर्यप्रकाश, उजेड यांचे त्यांना इतके आकर्षण आहे की बाविसाव्या मजल्यावरच्या भरपूर उजेडाच्या त्या घर कम स्टुडिओला पडदे नाहीत. त्याऐवजी बेडरूमच्या एका खिडकीला झाडांच्या डहाळ्या नीटनेटक्या कापून भरपूर कोरडय़ा करून जोडल्या आहेत व पडद्यासारखा त्यांचा आडोसा केला आहे. दुसऱ्या बेडरूमच्या खिडकीत काचेचा त्रिकोणी ठोकळा आहे. उजाडले की सूर्याची किरणे या लोलकावर येऊन परावर्तित होतात. या किरणांचे अनेक नाजूक सप्तरंगी कवडसे बेडरूमच्या भिंतींवर पसरतात. ही कल्पना जिनसुक यांचीच. नैसर्गिक रंगांच्या  या सप्तरंगी शिडकाव्यात त्या चित्रकर्तीच्या दिवसाची सुरुवात होते. सप्तरंगांचा हा शिडकावा मीही बघितला आणि भारावून गेले.
पन्नाशी पार करताना या चित्रकार दाम्पत्याच्या आयुष्याला स्वास्थ्य आले. पण स्वस्थ राहणे त्यांच्या स्वभावात नाही. पूर्वीची धावपळ, दगदग आता नसली तरी आपल्या स्टुडिओत दोघेही कलानिर्मितीत मग्न आहेत. घरातील, स्टुडिओतील सर्व कामे स्वत:च करतात. कोणी नोकर, कोणावर अवलंबून असणे त्यांना रुचत नाही. स्टुडिओसाठी जागा घेतल्या पण आपल्या आर्थिक आवाक्याचा विचार करूनच. डोक्यावर कर्जाचा ताण घेऊन कलानिर्मिती झाली नसती.
कलेतील आपापली स्वतंत्र कलावैशिष्टय़े जपत आणि जोपासत दोघांनी एकाच वेळी बरोबरीने वाटचाल केली. कलाक्षेत्रात आपापले स्थान निर्माण केले. हे सर्व अजिबात सोपे नाही. स्वतंत्र स्टुडिओ असलेले हे एक वेगळे सहजीवन.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा