घर नीट, छान व आकर्षक असावे असे घरातील प्रत्येकाला वाटत असते. परंतु त्यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी ओळखून कामे केली पाहिजेत. घर आवरून नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी महिलांची आहे, असा एक गैरसमज असतो. ‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ या म्हणीतील हात कुणाचा असावा याची काही वेगळी व्याख्या सांगितलेली नाही! त्यामुळे प्रत्येकाने आवडीप्रमाणे आपल्या वाटय़ाचे काम ठरवून ते नियमितपणे करावे. आजकालच्या जमान्यात कुटुंबातील सदस्यांची संख्या ३-४ पेक्षा अधिक नसते, पण कामे मात्र भरपूर असतात. ज्या घरात हात फिरलेला नाही ते भिंतीवरील कोपऱ्यांमध्ये असलेल्या कोळीष्टकांवरून लगेच लक्षात येते. दिवाणखान्यातील दर्शनी भिंतींची साफसफाई करताना त्याच्या रंगसंगतीला धक्का न पोहोचेल याचा विचार सातत्याने मनात ठेवला तर हळुवारपणे काम करून ते साधता येते, पण त्यासाठी मानसिकदृष्टय़ा आपली तयारी असली पाहिजे.
मानवाला रंगज्ञान आधीपासून असले तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर कधी झाला, या प्रश्नाचे उत्तर इजिप्शियन किंवा भारतीय संस्कृतीत ५ ते १० हजार वर्षांपूर्वी तो झाला असावा असे आहे. इजिप्शियन संस्कृतीत शाही निळा रंग वापरला जात होता. काही प्राचीन गुहांमधून ४०- ५० हजार वर्षांपूर्वी काढलेली चित्रे आढळून आली आहेत. एका दक्षिण आफ्रिकी पुरातत्त्व शास्त्रज्ञाने १ लाख वर्षांपूर्वीचे पिवळ्या रंगाचे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे. अजिंठय़ाच्या गुहेत असलेल्या लेण्यांचे रंग २ ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे असावेत. मीनाक्षी मंदिरातील रंगीत चित्रे ४०० ते ५०० वर्षांपूर्वीची आहेत. काही दशकांपूर्वी आपल्या देशात व जगातच मर्यादित स्वरूपात रंग उपलब्ध होते. चुना व पिवळी माती किंवा नीळ यासारखे रंग आता काळाच्या ओघात लुप्त होत असताना अनेक रंगीबेरंगी कृत्रिम व नैसर्गिक रंग आपल्या तैनातीला आले आहेत. घरे रंगविण्याची पद्धत विसाव्या शतकात रूढ झाली. कारण रंगांची बाजारातील उपलब्धता वाढली. रंगांच्या दुनियेत जे बदल घडत गेले ते सर्वसामान्यांपर्यंत झपाटय़ाने पोहोचले.
घराची रंगसंगती प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे व ऐपतीप्रमाणे करीत असतो. पण रंगरंगोटी करताना जर रंगातच आपण बुरशीनाशक व वाळवीला प्रतिरोधके वापरली तर त्याचा चांगला उपयोग होऊ  शकतो. रंग तयार करताना त्यात कार्बनी द्रावणांचे प्रमाण जितके कमी असेल तेव्हढा तो रंग पर्यावरणास अनुकूल समजला जातो. रंगात नेहमी वापरली जाणारी अशी टरपेंटाइनसारखी द्रावणे आपल्या शरीरास घातक असतात. रंग लावल्यानंतर कित्येक महिने त्याचे अंश आपल्या पर्यावरणात मिसळत राहातात. रंगात कार्बनी द्रावण आहे की नाही ते रंगाच्या डब्याचे झाकण उघडताच लक्षात येईल.
ज्या रंगात कार्बनी द्रावणाचे प्रमाण अधिक असेल त्याचा उग्र असा भपकारा डबा उघडताक्षणी येतो. नाकावाटे या भपकाऱ्यातील रसायन आपल्या श्वासमार्गात घुसते व दम्यासारखे प्रलंबित विकार निर्माण होतात. रंगात असल्या द्रावणांचे जे अंश असतात ते अगदी कमी प्रमाणात असले तरी त्यांचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. म्हणून रंग निवडताना आपल्याला त्याचे थोडेसे रसायनशास्त्र माहीत असेल तर त्याचा चांगला उपयोग होतो. बाजारात आता कार्बनी द्रावण अजिबात नसलेले रंगदेखील उपलब्ध आहेत. दुधातील केसिन नावाच्या प्रथिनाचा वापर, असे रंग बनविण्यासाठी केला जातो. या रंगांच्या टिकाऊपणाला मात्र मर्यादा असतात. जवसाचे तेल रंगाच्या उत्पादनात महत्त्वाचे कार्य करते. हे तेल चटकन वाळते व म्हणूनच रंग लावण्यासाठी माध्यम म्हणून वापरले जाते. इतर खाद्य तेलांचादेखील वापर यासाठी केला जातो. पण ते रंग वाळायला खूप वेळ लागतो.
नैसर्गिकरीत्या जे विविध धातूंचे ऑक्साइड सापडतात त्यांचा विविध रंगांसाठी उपयोग केला जातो. टायटय़ानियम ऑक्साइडचा वापर पांढरा रंग म्हणून तर लोह ऑक्साइडचा वापर पिवळा, लाल किंवा ब्राऊन म्हणून केला जातो. क्रोमियम ऑक्साइडचा वापर हिरव्या व निळ्या रंगांसाठी केला जातो. विशेषत: स्वयंचलित वाहनांसाठी या रंगांचा उपयोग केला जातो. घरासाठी डिसटेम्पर किंवा तैल रंगांचा वापर करण्याकडे अधिक कल असतो. हे रंग सहजपणे पाण्याने धुता येतात.
घरातील विविध वस्तूंसाठी किंवा घरासाठी रंग ठरविताना रंगसंगती महत्त्वाची असली तरी आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी ते हानीकारक नाहीत, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. घरातील लहान मुले भिंती नखाने खरवडून तेच बोट तोंडात घालतात. त्याचा त्यांच्यावर परिणाम काय होईल? तैलरंग लावताना लहान मुलांनी व गरोदर स्त्रियांनी त्यापासून दूर राहाणे इष्ट असते. रंग चांगला वाळल्याशिवाय अशा घरी त्यांनी जाऊ नये. या रंगांच्या बाष्पीभवनातून जे अंश हवेत पसरतात, त्यामुळे डोळे चुरचुरणे, डोकेदुखी आणि चक्कर आल्यासारखे वाटणे असे दुष्परिणाम होऊ  शकतात. कार्बनी द्रावणांच्या वाफा त्याहीपेक्षा अधिक धोकादायक असतात. काही रंगांमुळे दम्यासारखे विकार बळावतात व काही रंगांच्या वाफा कर्कजन्य असतात. जागतिक आरोग्य संघटनेने विशेषत: कार्बनी द्रावणावर आधारित रंगांच्या वापरासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या घरात रंगकाम हाती घेणार असाल तर खालील गोष्टी कसोशीने पाळा.
*रंगकाम शक्यतो मान्सूनमध्ये करण्याचे टाळा. कारण हवेतील दमटपणामुळे रंग लवकर वाळत नाहीत व भिंतीवर किंवा वस्तूंवर त्याचा थर नीट बसतही नाही.
*    घर लहान असेल तर स्प्रे पद्धतीने रंग लावू नका.
*    ज्या वस्तूंना स्प्रे रंगकाम करावयाचे असेल ती स्प्रे सुविधा तिथे घेऊन जा.
*    मुलांनी व गरोदर स्त्रियांनी रंगकामाच्या ठिकाणी येऊ  नये. हे त्यांच्या भल्यासाठीच आहे.
*    रंग लावून झाल्यानंतर थोडा रंग उरला तर तो टाकून न देता जपून ठेवावा, म्हणजे कुठे टच-अपचे काम लागले तर तो वापरता येईल.
*    रंग लावण्यापूर्वी जर आधी तिथे काळसर डाग असतील तर ते बुरशी किंवा शैवाल यांच्या अस्तित्वाची निशाणी समजावी. त्या ठिकाणी भिंत खरवडून त्यावर आधी व्हिनेगारचा बोळा दोन-तीन वेळा फिरवावा व तो भाग पूर्ण कोरडा झाल्यावरच त्यावर रंग लावावा अन्यथा रंग वाळण्याआधीच पुन्हा बुरशीची किंवा शैवालाची वाढ सुरू होते.
*    जुने रंग खरवडत असताना त्यात शिसे असण्याची शक्यता असते. आजकालच्या रंगात शिसे नसावे असा कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही, हे म्हणावयास जागा आहे. या शिशापासून आपल्याला धोका संभवतो. म्हणून भिंती घासताना नाकावर व तोंडावर रुमाल किंवा वैद्यकीय मास्क लावणे आवश्यक असते.
*    आपल्या घराजवळ राहाणाऱ्या शेजाऱ्यांना आपण रंगकाम करीत असल्याची सूचना द्या. घरातील कोणाला रंगांची किंवा धुलिकणाचा अ‍ॅलर्जिक परिणाम होतो आहे असे वाटल्यास वैद्यकीय मदत त्वरित घ्या.
*    रंगकाम सुरू असेल तेव्हा घराची दारे खिडक्या उघडी ठेवा व पंखे सुरू ठेवा, त्यामुळे वायुवीजन व्यवस्थित होऊन रंगाच्या वाफा घरात कोंडून राहाणार नाहीत.
*    घरासाठी जे रंग वापराल ते पाण्यावर आधारित अ‍ॅक्रॅलिक इमल्शनचे असावेत.
*    जर पर्याय उपलब्ध असेल तर फक्त नैसर्गिक रंगांचाच वापर करा.  
डॉ. शरद काळे – सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र sharadkale@gmail.com