भारतातील राजवाडे ज्या राजांनी बांधले त्या राजांच्या नावांवरून वा ते जिथे बांधले गेले तेथील गावांवरून प्रसिद्ध झाले आहेत. पण इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावलेला एखादा राजवाडा केवळ त्याला असलेल्या दरवाजांच्या संख्येवरून प्रसिद्ध व्हावा, हे नवलच नाही का? असे नाव पडलेला १८३७ च्या अखेरीस बांधलेला एक राजवाडा-हजारद्वारी पॅलेस-पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आजही दिमाखात उभा आहे.
पश्चिम बंगाल आणि त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतळामधील काही ऐतिहासिक आणि कलेच्या दृष्टीने श्रेष्ठतम असलेली स्थळं बघण्यासाठी मी यावेळी कोलकोत्याची वाट धरली. भारतातील सर्वात जास्त मुस्लीम वस्ती असलेला प्रथम क्रमांकाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुíशदाबादमध्ये हा हजारद्वारी राजवाडा आहे. राजेशाही वास्तू सोडल्यास या शहराची आता रया गेली आहे. हे जिल्ह्याचे शहर आज जरी एखाद्या खेडेगावासारखे दिसत असले तरी आठराव्या शतकाच्या सुरुवातीस हे नगर बंगाली सुभ्याची राजधानी असल्याने खूप गजबजलेले असे.     
१९८५ मध्ये म्युझियममध्ये रूपांतर केलेला हा देखणा राजवाडा, त्या काळी किल्ला निझामत या संकुलातील बडा कोठीच्या जागेवर बांधला गेला आहे. १८२४ ते १८३८ या कालावधीत बंगालच्या सुभ्याचा नबाब व मिर जाफरचा वंशज असलेल्या निझाम हुमायूँ जा याच्या विनंतीनुसार ब्रिटिश आर्किटेक्ट कर्नल डंकन मॅक्लाइड याने हा वैभवशाली राजवाडा ४१ एकरांवर बांधला. या संकुलात हजारद्वारी पॅलेसव्यतिरिक्त, निझामत इमामबाडा, क्लॉक टॉवर, मदिना व चौक या मशिदी, बच्चाबळी तोफ इत्यादी वास्तू आहेत.
हजारद्वारी राजवाडय़ासमोर असलेला ६८० फूट इतक्या प्रचंड लांबीचा  इमामबाडा यापूर्वी लाकडाचा होता. तो आगीत जळल्यामुळे १८४७ मध्ये पुन्हा बांधला गेला. या सध्याच्या इमामबाडय़ाच्या पायात मक्का येथून माती आणून घालण्यात आली. गरीब शिया पंथियांचे धार्मिक कार्यक्रम या वास्तूत होताना त्यांनाही ते उत्सव मक्केत झाल्याचे समाधान मनोमन मिळावे, हा त्यामागे हेतू होता.
हजारद्वारी पॅलेससमोर ठेवलेली ७,९०० किलोग्रॅम वजनाची ‘बच्चाबळी’ तोफही नबाब मुर्शिद कुलीखान याने ढाक्क्याहून आपली राजधानी बदलली तेव्हा  इथे आणली.  मुर्शिदाबादमध्ये निमक हराम देवडी (जिथे सिराजचा वध झाल्याचे सांगतात), खुशबाग, निझामतकिला, मोतीझिल या दुय्यम वास्तूही पाहाण्यासारख्या आहेत, पण इंडो-युरोपियन शैलीत बांधलेला, अद्यापही भक्कम असलेला, तीन मजली हजारद्वारी प्रासाद हेच मुर्शिदाबादचे मुख्य आकर्षण आहे. दर्शनी असलेल्या दोन माळ्याच्या उंचीच्या कंगोरे असलेल्या जबरदस्त डॉरीक खांबांमुळे या राजवाडय़ाच्या भव्यतेत भर पडली आहे. बाजूने वाहणाऱ्या भगीरथी नदीमुळे हा परिसर रमणीय झाला आहे, यात शंका नाही. नबाबाचे आणि
उच्च ब्रिटिश अधिकाऱ्यांचे निवासस्थान, दरबार इ. कारणांसाठी या पॅलेसचा वापर होत असे.
राजवाडय़ाच्या पुढील बाजूस असलेल्या लांबलचक ३७ पायऱ्या थेट पहिल्या मजल्यावर जातात. यातील तळाची पहिली पायरी शंभर फुटांवर लांब आहे. सुरुवातीच्या पायरीच्या दोन्ही बाजूस ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक असलेले दोन विक्टोरियन सिंहाचे पुतळे त्यावेळच्या परंपरेप्रमाणे आíकटेक्टने योजलेले दिसतात. अशा तऱ्हेने सिंह योजण्याची कल्पना कोलकात्यातील विक्टोरिया मेमोरिअल आणि मुंबईच्या व्ही.टी. येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील कचेरीजवळही आढळते. राजवाडय़ातील तळमजल्यावरील प्रवेश मात्र पायऱ्याच्या बाजूने आहे.
तळमजल्यावर आत गेल्यावर लगेच दिसणाऱ्या लढाईच्या चित्रावरून त्या काळी लढाया कशा लढल्या जातात याची आपल्याला थोडीतरी कल्पना येते.  
राजवाडय़ाच्या आतील भागातील खोल्यांना उजेड मिळावा म्हणून इमारतीच्या मध्यभागी चौकाची केलेली योजना योग्य वाटते. त्यावेळी नबाब वापरत असलेल्या उंटाच्या व घोडय़ाच्या प्रशस्त गाडय़ा तळमजल्यावर ठेवल्या आहेत. औरंगझेबची कन्या झेबुंनिसा हिच्यासाठी वापरात असलेली डोली, आबुल फजल याने लिहिलेली अस्सल ऐने अकबरी व अकबरनामा हे ग्रंथ इथे ठेवले आहेत. तळमजल्यावरील शोकेस मध्ये ठेवलेल्या राजवाडय़ाच्या  हस्तिदंतातील प्रतिकृतीमुळे राजवाडा समजण्यास मदत होते. तसं मुर्शिदाबाद हे स्थान पहिल्यापासून हस्तिदंतावरील कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. शस्त्रगारातील त्यावेळच्या २७००शस्त्रांपकी काही शस्त्रं तिथे एका ठिकाणी ठेवलेली दिसली. सिराज-उद-दौला व त्याच्या आधी नबाब असलेला आजोबा यांनी वापरलेली तलवारही इथे बघायला मिळते. इंग्रजी सिनेमात तलवारीच्या द्वंद युद्धात वापरत असलेली वेतासारखी असणारी सरळसोट लवचीक तलवार मी इथेच प्रथम बघितली.
आसामचा जाडजूड बारा फुटी बांबू त्या म्युझियममध्ये  ठेवण्याचे प्रयोजन मात्र कळले नाही. इथे एक गमतीदार आरशाची जोडी दिसली. त्यात एका आरशासमोर वावरणाऱ्या (उपऱ्या) व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब दिसत तर नाही, पण दुसऱ्या (राजवाडय़ातील) व्यक्तीला मात्र त्या व्यक्तीच्या हालचाली  दिसतात. हा चोर पकडणारा आरसा आणि येथील दरबार हॉलमधील ८० फूट उंच घुमटातून लटकणारे ९६ दिव्यांचे प्रचंड झुंबर या दोन वस्तू इतर कोठेही न आढळणाऱ्या गोष्टींपकी आहेत. स्काय लाइट देणाऱ्या घुमटाच्या आतील बाजूस केलेली स्टको पेंटिंग्ज पाहातच राहावी अशी आहेत. जगात मोठय़ा असलेल्या झुंबरांपकी इंग्लंडमध्ये असलेल्या झुंबराखालोखाल याचा क्रमांक लागतो.
पहिल्या मजल्यावर महत्त्वाच्या व्यक्तींची पेंटिंग्ज ठिकठिकाणी ठेवली आहेत. त्यात दस्तुरखुद्द आर्किटेक्ट डंकन साहेबांचेही एक पेंटिंग आहे. या राजवाडय़ाची आणखी एक गंमत म्हणजे या राजवाडय़ाचे नाव हजारद्वारी असले तरी त्यातील सर्वच दारं काही खरी नाहीत. काही दारं शत्रूला वा परक्या व्यक्तीला फसविण्यासाठी खोटी आहेत हे मी वाचलं होतं, उत्सुकता होती ती फसवी दारं कशी बनविली असतील, कशी दिसत असतील ती पाहाण्याची. येथील प्रत्येक खऱ्या दारावरील अध्र्या भागाला लाकडी लुवर्स लावली आहेत. दरवाजा बंद केल्यावरही आतील दिवाणखाण्यात हवा खेळती राहावी हा त्यात उद्देश असावा. पहिल्या मजल्यावर पॅसेजमध्ये  उघडणारं एक फसवं दार मी जवळून पाहिले. बांधकामातच बनविलेलं ते नकली बंद दार लांबून खरोखरच असली वाटत होतं. महालाच्या खिडक्यादेखील त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे जमिनीच्या पातळीपासून सुरू होणाऱ्या(फ्रेंच िवडो) योजल्या आहेत. समोरील इमामबाडय़ाच्या खिडक्यांनाही तीच ट्रीटमेंट दिली आहे. कमरेइतक्या (सील लेवलच्या) उंचीवर  पॅसेजमधील िभतीवर रंगविलेली धावती मोहक वेलबुट्टी वाटेत उघडणाऱ्या दरवाजाला त्याच्या डोक्यावरून वळसा घालून पुढे चालू ठेवण्याची  कल्पना छान वाटली. िभतीवर लटकावलेल्या चित्रातील व्यक्ती बघणाऱ्याने कोठूनही बघितले तरी ते चित्र आपल्याकडे बघतं आहे, असं भासविणारी युक्तीची ठरावीक चित्रे इथेही आढळली.
हा राजवाडा पाहिल्यावर मला मुंबईतील फोर्ट येथील एशियाटिक लायब्ररीची झटकन आठवण आली. ज्यांनी हजारद्वारी पाहिला नाही, ते मुंबईतील या वास्तूचे कौतुक करत राहातील.

Story img Loader