वास्तुशास्त्र घराच्या सोयीस्कर, उत्तम, इकोफ्रेंडली रचनेपुरतीच अंगीकारायची बाब आहे. ही मुख्य गोष्ट लक्षात ठेवली तरी होणारी फसवणूक टळेल. छोटय़ा-मोठय़ा समस्यांत श्रद्धा म्हणून मानसिक बळ यावे यासाठी हात जोडणे, नतमस्तक होणे निराळे व त्या सोडविण्यासाठी वास्तुदोषांचे निवारण करण्याची दुकाने उघडून बसलेल्या या स्वयंघोषित वास्तुतज्ज्ञांकडे जाणे निराळे.
‘वास्तुशास्त्र’ या नावाखाली फक्त वास्तूविषयी नव्हे तर मानवी जीवनातील विविध समस्यांवर बुद्धीला पटणार नाहीत असे निखालस चुकीचे अशास्त्रीय उपाय सुचविले जातात. संगणकाचा वापर करणारे, नेटसारख्या आधुनिक संपर्कमाध्यम वापरणारे सुशिक्षित लोक इतके अंधश्रद्धाळू कसे? हा प्रश्न पडावा.
कॉस्मिकरेंज, निगेटिव्ह एनर्जी , वैश्विक ऊर्जा, अग्नितत्त्व अशा इंग्रजी-मराठी शास्त्रीय शब्दांचा भडिमार करून हा सारा मामला शास्त्रशुद्ध बठकीवर आधारलेला आहे, हे भासविण्याचा वृथा प्रयत्न केला जातो. बुद्धिप्रामाण्यवादाशी फारकत घेतलेल्या या लेखनात, कार्यक्रमात कुठेही वास्तवाचे चित्रण नसते. राक्षसी गतीने वाढवत नेलेल्या जागांच्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाची झालेली ससेहोलपट, त्याची परवड, त्याच्या समस्या याला कुठेही वाचा फोडली जात नाही. उलट वराहमिहीरच्या चार लाख जपाने घराचे स्वप्न साकार होते, असा भंपक सल्ला दिला जातो. पार्किंग चार्जेसपोटी बिल्डर्स आकारत असलेली कारच्या किमतीपेक्षा मोठी रक्कम ही कशी लूटमार आहे, हे वास्तव मांडण्याऐवजी कारच्या वास्तुशास्त्रात लोकांना गुंगवत ठेवले जाते. वाढती महागाई व जागांचे भडकविलेले भाव यामुळे सामान्य माणसाची आज कुचंबणा होत आहे. वर आणखी त्याच्या श्रद्धांना कुरवाळून भाबडेपणाचा गरफायदा घेऊन त्याची ही दिशाभूल नेमकी कशासाठी व कोणासाठी चालवली आहे? त्याने नेमके कोणाचे उखळ पांढरे होत आहे? यावर आता विचारमंथन होणे गरजेचे आहे. जुन्या ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा हे मंथन अधिक वास्तववादी ठरेल.
एकोणिसाव्या शतकात सुधारक विचारांचे थोर समाजसेवक गोपाळ गणेश आगरकर घरी परिस्थिती नव्हती म्हणून रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करत असत. आज एकविसाव्या शतकात अभ्यास न करणाऱ्या मुलासाठी पिवळ्या घोडय़ाला चणाडाळ खायला घालावी, अभ्यासाच्या टेबलावर पवित्र गंगाजल भरून चांदीची वाटी ठेवावी वगरे वास्तुशास्त्राच्या आधारे उपाय सुचविले जात आहेत. आगरकरांनी अत्यंत हलाखीच्या आíथक परिस्थितीत नुकसान सोसून अंधश्रद्धा व खुळचट रूढी-परंपरा यात रुतलेल्या समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ‘सुधारक’ हे मुखपत्र सुरू केले. आज वृत्तपत्रांतून अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे वास्तुशास्त्र याविषयी लेखन निव्वळ लोकांना फसवून स्वत:च्या तुंबडय़ा भरण्यासाठी बिनदिक्कत केले जाते.
परंपरेतून आलेली मानसिकता, जगण्याच्या कोलाहलात रोज भिडणाऱ्या समस्या, त्यावरचे उत्तर शोधताना झालेली दमछाक, त्यात आलेले अपयश, नैराश्य व सरतेशेवटी जाणवणारी अगतिकता यामुळे सर्वसाधारणपणे माणूस आपल्या आकलनापलीकडे ‘काहीतरी’ अस्तित्वात असते व ते जे काही असते तेच सर्व भल्या- बुऱ्या बाबींचे नियंत्रण करत असते, या चुकीच्या निष्कर्षांप्रत येतो. घडणाऱ्या घटनांची सांगड डोळे झाकून वास्तुशास्त्र ज्योतिष यांच्याशी घालतो. वर आम्हाला तसे अनुभव आले आहेत त्यामुळे आमचा विश्वास आहे या चुकीच्या भूमिकेवर ठाम राहतो. मूठभर स्वार्थी, पोटार्थी धंदेवाईक माणसे नेमक्या याच मानसिकतेचा गरफायदा घेत असतात. त्यापकी काहीजण प्रथितयश, प्रसिद्ध व उभी हयात अभ्यासात घालविलेले, व्यासंग असलेले, वास्तुतज्ज्ञ वगरे पदव्या धारण करणारे निष्णात तज्ज्ञ असतात. त्यांनी पुरातन ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो. त्यांच्याकडे समस्यांवरचे उपायही असतात. रत्न, खडे, यंत्रे अशी सामुग्री असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाच्या मनात नेमके काय ठुसठुसते, त्याला काय हवे आहे त्याचा अचूक अंदाज त्यांना असतो. त्यामुळेच तर ते ‘तज्ज्ञ’ ही बिरुदावली मिरवतात. रस्त्यावर पोपट घेऊन बसणाऱ्या कुडमुडय़ा ज्योतिषाचा कुठला आला आहे इतका पुरातन ग्रंथांचा अभ्यास? त्यामुळे तो रस्त्यावर झाडाखाली बसतो. तर माध्यमांचा वापर करून जोरदार जाहिरात करणारे संधिसाधू ‘तज्ज्ञ’ असल्याचा आव आणत स्वत:ची दुकाने थाटतात. या सर्वाचा व्यवसाय एकच- लोकांच्या अंधश्रद्धेचा गरफायदा घेऊन पोट भरणे.
वास्तुशास्त्रामध्ये घरात पुरेशी हवा, उजेड कसा येईल, एखाद्या खोलीमध्ये उजेड नको असेल तर कसा टाळता येईल, ऊन-पावसाचा त्रास कमी कसा होईल याचे मार्गदर्शन असते. वास्तुशास्त्र या विषयाचा आवाका इतका मोठा नाही की त्याचा खूप अभ्यास वगरे करायला लागेल वा घर घेताना कोणा वास्तुतज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी पाचारण करायची गरज भासेल. दोन-चार सहज जाणवणाऱ्या गोष्टी. उदा. वाऱ्याची दिशा, उन्हाची तिरीप, इथले हवामान, त्याला सोयीची रचना लक्षात घेतल्या तरी पुरेसे आहे. पश्चिम दिशेने अधिक वारा वाहतो हे सांगायला वास्तुतज्ज्ञाची गरज काय? पण या तथाकथित तज्ज्ञांनी समाजात वाहणाऱ्या वाऱ्यांचा स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.
वस्तुतज्ज्ञ वास्तुशास्त्रानुसार सल्ला देताना घरातील फोन, मोबाइलजवळ हिरवा हत्ती कानावर झोपवून ठेवावा, त्याची सोंड फोनजवळ ठेवावी हा सल्ला देतात. ऋषीमुनींच्या काळात कोणते फोन होते? कोणते मोबाइल वापरात होते म्हणून त्यांनी (ऋषीमुनींनी) हा सल्ला दिला? तसेच हा हत्ती काच, लाकूड, माती, तांबे, लोखंड यांसारखे विविध धातू, कचकडे, मेण, फायबर ग्लास, अॅक्रेलिक यापैकी कशाचा हवा? त्याचे मार्गदर्शन नको करायला? कारण प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत.
शास्त्राचे अत्यंत तोकडे ज्ञान असलेल्या मात्र, शास्त्रातील शब्दांचा वापर करून समाजाला ठकविण्याची विलक्षण हातोटी साधलेल्या या तथाकथित तज्ज्ञांना हे कुठून कळायला? हा अंधश्रद्धांचा चिखल चिवडला तर अशी अनेक विसंगतीपूर्ण उदाहरणे सापडतील. यातील विसंगती म्हणजेच हेतुपरत्वे केलेली फसवणूक होय. आणि ती वास्तुतज्ज्ञांकडे सल्ला मागायला जायच्या आधी लक्षात घ्यावी. अन्यथा घरातील तिजोरी वास्तुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठेवली तरी ती रिकामीच राहणार, त्यातील लक्ष्मी त्यांच्याच तिजोरीत जाणार हे नक्की!
तसेच काही अंधश्रद्धांचे समर्थन शास्त्रीय शब्दांचा आधार घेऊन केले जाते. असा आधार घेतला जाताना निखालस चुकीच्या बाबी मांडल्या जातात. उदा. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये. ही पूर्वापार चालत आलेली गरसमजूत. या समजुतीला कसा शास्त्राचा आधार आहे हे दाखविताना मानवी मस्तक हे उत्तर ध्रुव असल्याने दक्षिणेकडे पाय केल्यास म्हणजेच उत्तरेकडे डोके केल्यास मस्तकाचा उत्तर ध्रुव व पृथ्वीचा उत्तर ध्रुव हे समान ध्रुव एकत्र आल्यास रक्ताभिसरणात गडबड होऊन त्रास होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये. ही समजूत अंधश्रद्धा नसून त्याला शास्त्रीय आधार कसा आहे हे ठसविले जाते. वास्तविक मानवी देहात चुंबकीय शक्ती नसतेच. त्यामुळे मस्तक म्हणजे उत्तर ध्रुव हे तर्कट अजब आहे. रक्तातल्या लोहामुळे शरीरामध्ये चुंबकीय शक्ती येते ही अगाध माहिती शरीरशास्त्राच्या कुठल्या पाठय़पुस्तकात वा मान्यताप्राप्त आधुनिक वैद्यकीय ग्रंथात आहे? तसेच समान ध्रुव दूर लोटण्याच्या शक्तीचा जर रक्ताभिसरणावर परिणाम होत असेल तर जवळ खेचून घेण्याच्या शक्तीचा काहीच परिणाम का होत नाही? तसेच या तथाकथित स्वयंघोषित तज्ज्ञांना अजिबात माहीत नसणारी शास्त्रीय बाब म्हणजे पृथ्वीचे ‘भौगोलिक’ व ‘चुंबकीय’ ध्रुव पूर्णत: वेगळे असतात ही होय. पृथ्वीचा ‘चुंबकीय उत्तर ध्रुव’ प्रत्यक्षातल्या दक्षिण दिशेच्या जवळ असतो. ‘चुबकीय दक्षिण ध्रुव’ प्रत्यक्षातल्या उत्तर दिशेला (भौगोलिक उत्तर धृवाजवळ) असतो. त्यामुळे दक्षिण दिशेला पाय म्हणजेच उत्तरेला डोके ठेवून झोपले की मस्तक हा उत्तर ध्रुव प्रत्यक्षात पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर नव्हे, तर दक्षिण ध्रुवाजवळ येणार. (त्यामुळे त्यांच्याच थिअरीप्रमाणे सांगायचे झाल्यास कोणतेच नुकसान होणार नाही.) येथे सर्वसामान्य माणूस अर्थातच खोलात तर जात नाही उलट चटकन विश्वास मात्र ठेवतो.
वास्तुशास्त्र घराच्या सोयीस्कर, उत्तम, इकोफ्रेंडली रचनेपुरतीच अंगीकारायची बाब आहे. ही मुख्य गोष्ट लक्षात ठेवली तरी होणारी फसवणूक टळेल. छोटय़ा-मोठय़ा समस्यांत श्रद्धा म्हणून मानसिक बळ यावे यासाठी हात जोडणे, नतमस्तक होणे निराळे व त्या सोडविण्यासाठी वास्तुदोषांचे निवारण करण्याची दुकाने उघडून बसलेल्या या स्वयंघोषित वास्तुतज्ज्ञांकडे जाणे निराळे.
आधीच जागांचे भाव राक्षसी गतीने वाढवून काप्रेट एरिया वाटेल तसा फुगवून वेगवेगळ्या सुविधांसाठी अवाच्यासव्वा दर आकारून केली जाणारी ही लूटमार सामान्य माणसाला देशोधडीला लावणारी आहे. गृहकर्जाचे ओझे पाठीवर लादून स्वत:च्या घराकडे नेणाऱ्या बिकट मार्गाने प्रवास करताना वास्तुशास्त्रवाल्यांचे पेंढार टाळून मार्गक्रमण करावे, हे श्रेयस्कर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा