गौरी प्रधान
सध्या फर्निचर या विषयावर लिखाण सुरू असताना खरं तर मला इतर कोणताही विषय मधे आणायचा नव्हता. परंतु प्रसंगच असा झाला की, मला विषयांतर करून या विषयाबद्दल लिहिणं भाग पडत आहे.
काही दिवसांपूर्वी एका नातेवाईकांकडे जाणं झालं. तिथे त्यांच्याबाबत घडलेला एक किस्सा ऐकून धक्काच बसला. झालं असं, त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी आवरून त्यांची पत्नी आणि मुलगा कामासाठी बाहेर पडले. हे माझे नातेवाईक सेवानिवृत्त असल्याने त्या दोघांच्या घाईच्या वेळेत न आवरता नंतर ते दोघे बाहेर पडल्यावर नेहमीप्रमाणे अंघोळीला गेले. आत गेल्यावर एक सवय म्हणून त्यांनी दरवाजा लॉक केला. आता अंघोळ झाल्यावर ते बाहेर निघणार बाथरूममधून, पण बाथरूमचे दार काही केल्या उघडेना. बराच वेळ प्रयत्न करूनही लॉक काही उघडलेच नाही. बरं, बाथरूमच्या खिडकीतून कोणाला आवाज द्यावा, तर इमारतीचे बांधकाम नवीन असल्याने अजूनही बरेचसे लोक राहायलाच आले नव्हते. या सगळ्या परिस्थितीमुळे सकाळी सात वाजता अंघोळीला गेलेले हे गृहस्थ संध्याकाळी पत्नी घरी येईपर्यंत म्हणजे तब्बल अकरा तास बाथरूममध्ये अडकून पडले.
तसे पाहिले तर गृहसुरक्षा या विषयावर मागेच एक सविस्तर लेख लिहिला होता. परंतु त्या दिवशीचा तो प्रसंग ऐकून माझ्या असं लक्षात आले की गृहसुरक्षेबद्दल बरीच जागरूकता वाढली आहे, पण घरातील माणसांच्या सुरक्षेचा, त्यातूनही वयस्क, लहान मुले आणि घरात एकटय़ा राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा वैयक्तिक सुरक्षा दृष्टिकोनातूनही विचार होणे जरुरी आहे.
वैयक्तिक सुरक्षेचा विचार करता घराचे इंटिरियर करतानाच घरात कोण कोण आणि कोणत्या परिस्थितीत राहणार आहेत याचा विचार करून त्या त्या प्रकारे सुरक्षेचे उपाय केले गेले पाहिजेत.
इथे नमूद केलेल्या प्रसंगाप्रमाणे, जर घरात एकटीच व्यक्ती राहणार असेल तर बेडरूम, बाथरूम आणि स्वयंपाकघर या सर्व ठिकाणी बेल बसवून घ्याव्यात- ज्यांचा बझर एक तर घराबाहेर पॅसेजमध्ये किंवा शक्य झाल्यास वॉचमनच्या केबिनमध्ये बसवावा. या आपत्कालीन अलार्मचे बटन चुकून कोणाकडून दाबले जाऊ नये याकरता हात मारताच पटकन फुटेल अशा काचेच्या बॉक्समध्ये ते बसवणे सोयीस्कर.
घरात एकटेच असताना शक्यतो बाथरूम लॉक न करणे किंवा केलेच तर बाथरूमच्या आत मोबाइल फोन घेऊन जाणे हाही एक सुरक्षेचा उपाय होऊ शकतो. अशा वेळी इंटिरियर करत असतानाच मोबाइल अडकवता किंवा ठेवता येईल अशी सोय बाथरूममध्ये करायला काहीच हरकत नाही. शौचालय, बाथरूम अशा ठिकाणी शक्यतो अॅटोमॅटिक लॉकपेक्षा दरवाजाला आतील बाजूने सरकवण्याची कडी बसवून घेणेदेखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले. शेवटी काय घर छान किती दिसतंय यापेक्षाही सुरक्षित किती हे जास्त महत्त्वाचे.
वरील घटनेसोबतच गेल्या काही दिवसांत घडलेल्या आणखी दोन घटनांनी घरातील वैयक्तिक सुरक्षेबद्दल आणखी विचार करण्याची गरज निर्माण केली. त्यातील पहिली घटना पुण्याजवळील देवाची उरळी येथे दुकानांना आग लागून आत माणसे होरपळून मारण्याची होती. दुसरी नुकतीच अहमदाबाद येथे बिझनेस सेंटरला आग लागून कोचिंग क्लासेसमधील मुलांच्या जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडलेल्या मुलांची, तर तिसरी घटना भर मुंबईत सिलिंडरच्या स्फोटात पंधरा वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूची. यापैकी दोन घटनांमध्ये तर मुख्य दरवाजांना बाहेरून कुलूप घातलेलं होतं आणि बाहेर पडण्यास दुसरा पर्यायी मार्गच उपलब्ध नव्हता. तर एका प्रकारात पर्यायी मार्ग उपलब्ध होता, पण तो सुरक्षित नव्हता.
फ्लॅट सिस्टीममध्ये राहताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवल्या जातात. सुरक्षेसाठी ते योग्यही आहे पण, इथे नमूद केल्याप्रमाणे जेव्हा केव्हा आग लागण्याचे वैगेरे प्रसंग येतात, तेव्हा याच लोखंडी जाळ्या बचावकार्यात मोठा अडथळा ठरतात. म्हणूनच लोखंडी जाळ्या बसवून घेताना त्यातील एखादा भाग उघड-बंद करता येईल असं बनवून घ्यावा. आणि त्याची चावीदेखील पटकन मिळेल अशा जागी ठेवावी.
घराचा आराखडादेखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार मोठी भूमिका पार पाडतो. सलग एका बाजूने पॅसेज आणि दुसऱ्या बाजूला ओळीने सर्व खोल्या असणाऱ्या घरांमध्ये सर्व खिडक्या साधारणपणे एकाच बाजूला असतात, त्यापेक्षा ज्या घरांमध्ये दोन विरुद्ध दिशांना खोल्या असतात आणि त्याचप्रमाणे खिडक्या असतात ती घरे आपत्कालीन परिस्थितीत सुटका करून घेण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतात.
आपल्या जिवाची आणखी काळजी घेताना, घरात जर वयस्क, लहान मुले किंवा अपंग व्यक्ती असतील तर घर बाहेरून कुलूपबंद करून जाणे टाळा. मुख्य दरवाजाच्या कडय़ादेखील त्यांना सहज उघडता येतील अशा उंचीवर लावा. घरातील फायर स्प्रिंकलर्स कोणत्याही परिस्थितीत बरे दिसत नाहीत म्हणून फॉल्स सीलिंगने झाकू नका. तसेच त्यांची तोंडेदेखील आपल्या सोयीने इकडेतिकडे फिरवू नका. गॅसची शेगडी, विजेची उपकरणे यांच्या योग्य वापराचे प्रशिक्षण घरातील लहान मुलांनादेखील अवश्य द्या. घरातील फोनमध्ये जवळचे पोलीस ठाणे, अग्निशमन दलाचे क्रमांक आपत्कालीन कॉल यादीत सर्वात वर ठेवा.
आणि सर्वात महत्त्वाचे, अगदी इंटिरियर डिझाइनशी संबंधित नसले तरी सांगेन, आपले शेजारी हे आपले सर्वात पहिले सुरक्षारक्षक आहेत त्यामुळे मी-माझंच्या युगातही शेजारी संबंध दृढ करा, अगदी आपला स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनदेखील!
घरात एकटीच व्यक्ती राहणार असेल तर बेडरूम, बाथरूम आणि स्वयंपाकघर या सर्व ठिकाणी बेल बसवून घ्याव्यात- ज्यांचा बझर एक तर घराबाहेर पॅसेजमध्ये किंवा शक्य झाल्यास वॉचमनच्या केबिनमध्ये बसवावा. या आपत्कालीन अलार्मचे बटन चुकून कोणाकडून दाबले जाऊ नये याकरता हात मारताच पटकन फुटेल अशा काचेच्या बॉक्समध्ये ते बसवणे सोयीस्कर.
(इंटिरियर डिझायनर)
pradhaninteriorsllp@gmail.com