चित्रकार म्हणूनच जगण्याच्या धडपडीत जागेमुळेही निराश होण्याच्या, खचून जाण्याच्या वेळा आल्या. पण म्हणून चित्रनिर्मिती सोडून द्यावी असे कधीही वाटले नाही. वेगवेगळ्या वास्तूंच्या म्हणजेच तात्पुरत्या स्टुडिओंच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या मनात जाग्या आहेत.
पंचवीस वर्षे आर्थिकदृष्टय़ा अतिशय अस्थिरतेच्या खाचखळग्यांतून वाट काढीत चित्रकार योगेश रावळ सन २०००मध्ये पाचशे चौरसफुटांच्या स्वत:च्या हक्काच्या स्टुडिओत काम करू लागले. हा आनंद त्यांच्यासाठी अवर्णनीय होता. येथे आल्यावर अल्पावधीतच त्यांच्या आगळ्या वेगळ्या कलानिर्मितीसाठी त्यांनी स्टुडिओ आणि स्टोरेज अशी स्वतंत्र विभागणी केली. कामासाठी मोकळी जागा मिळावी म्हणून एक-दोन भिंती पाडल्या. वेगवेगळ्या प्रकारचे लाइट्स लावले. साधनसामुग्री ठेवायला लहान-मोठे रॅक्स व शेल्फ केले. या मूलभूत किमान सोयी केल्या आणि ही जागा स्टुडिओ म्हणून सज्ज झाली.
रावळ यांनी कोलाज, ड्रॉइंग, पेंटिंग, पिंट्रमेकिंग, शिल्पकला अशा कलाशाखांत, आधुनिक शैलीत काम करीत सृजनशील कलेच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यातही पतंगांच्या रंगीत कागदांनी म्हणजेच टिशू पेपर्सनी कोलाज करणे ही त्यांची खासियत! आर्ट गॅलरींमधील चित्रप्रदर्शनात व अन्यत्र लागलेल्या त्यांच्या कोलाजमध्ये दिसणारा तंत्रविषयक सखोल पाठपुरावा उल्लेखनीय आहे. या कोलाजची सुरुवात विद्यार्थी असताना आíथक तंगीतून झाली. १९७५ मध्ये ते शिकत असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वार्षकि चित्रप्रदर्शनाला चित्र पाठवायचे होते. तीन रंग घेण्याइतकेही पसे जवळ नव्हते. पण निर्मितीची ऊर्मी होती. आहे त्यात काहीना काही करून बघण्याची, दाखविण्याची जिगर होती. जवळच्या पाच रुपयांत पतंगांच्या रंगीत कागदांचे भेंडोळे घेता आले. प्लायवूडवर ते चिकटवून चित्र तयार झाले. पशांअभावी फ्रेम करणे शक्य नव्हते. आसपास कुठे तरी जुन्या खिडकीची चौकट पडून होती. ती साफसूफ करून नीट केली. चौकटीला तांब्याच्या धातूच्या काही तारा बसविल्या. फ्रेमशिवायच चित्राला आवश्यक असणारी आगळी चौकटही तयार झाली व कलाकृती प्रदर्शनासाठी रवाना झाली. नावाजलीही गेली. रंग, फ्रेम यांच्या संकल्पनाच बदललेल्या या कलाकृतीतून सर्वाना चकित केले. रावळ यांची ही निर्मिती तंत्रदृष्टय़ा रूढ कलाकृतींपेक्षा वेगळी होती. त्यांच्या पुढच्या वाटचालीत ही घटना महत्त्वाची ठरली.
पतंगांचे रंगीत कागद दुकानात दिसायला कितीही आकर्षक असले तरी कलानिर्मितीचे माध्यम म्हणून वापरायला तकलादू, विसविशीत आहे. कलाकृतींचे आयुष्य वाढविण्यासाठी व त्या टिकाऊ होण्यासाठी ते काही प्रक्रिया लाकडी पृष्ठभागावर करतात. प्लायवूडला सिमेंट प्रायमरचे सात- आठ थर (कोट) देतात व ते घासतात. त्यावर ऑइल बेस सिमेंट प्रायमर लावतात. त्यामुळे ऑइल प्लायवूडमध्ये जिरून तो मजबूत बनतो.
टिशू पेपर्सचे नियोजित तुकडे चिकटवण्यासाठी फेव्हिकॉल, सेल्युलोज वापरतात. रंगांच्या विविध छटा मिळविण्यासाठी टिशू पेपर्सचे पाच ते पंचवीस थर ते एकमेकांवर चढवितात. पिक्चर व्हाíनशही लावले जाते. अर्थात सृजनशील निर्मितीप्रक्रियेतील हे तांत्रिक टप्पे आहेत. या कागदांच्या शेड्स सतत उपलब्ध नसतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या छटांचे, दर्जाचे टिशू पेपर्स मिळतात. परत तशाच प्रकारचा वेगवेगळ्या किंवा तशाच रंगांचा कागद मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे शेल्फमध्ये टिशूपेपर्सचा भरपूर स्टॉक केलेला आहे. पूर्वीची खिडकीची चौकट आता नसली तरी जुने दरवाजे, खिडक्यांच्या चौकटींचा व फळ्यांचा उपयोग ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या कलाकृतींसाठी करतात. त्याचाही स्टॉक स्टुडिओत केलेला आहे. ह्या लाकडांची योग्य ती निगा राखलेली असते. प्लायवुडवर केलेली रंगीत कलाकृती ते ह्या चौकटीत बसवितात. काही वेळा तीन-चार चौकटी एकत्र जोडून एक मोठे स्ट्रक्चर केलेले असते व त्यात कोलाजवर्कची लहान लहान पॅनल्स असतात. सध्या सुरू असलेल्या कामात, दरवाज्याच्या फळ्यांवर खिळे, स्क्रू यांचा उपयोग करून त्यातून प्रतिकात्मक आशय सूचित केला आहे.
रावळ यांचा स्टुडिओ व घर मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथे एकाच कॉम्प्लेक्समध्ये आहे. पहाटे साडेपाच वाजताच ते स्टुडिओवर जातात. नऊपर्यंत घरी येऊन इतर कामे व जेवणानंतर पुन्हा स्टुडिओ असा दिनक्रम असतो. स्टुडिओवर अधूनमधून सुताराची गरज लागते. बाकी कोणाची ये-जा नसते. पत्नी जयाची त्यांच्या कोलाज वर्कच्या कामात बरीच मदत असते. जयाताई भोपाळच्या. तेथे सिरॅमिक शिकल्या. म्हणूनच रावळ यांच्या स्टुडिओत सिरॅमिकचे व्हील आहे. वेळ मिळेल तसे जयाताईंचे सिरॅमिकचे कामही सुरू असते.
रावळ यांचा जन्म सौराष्ट्रातील वाकनेर येथे १९५४ मध्ये झाला. शालेय शिक्षण मुंबईत दादरला झाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून ते प्रथमवर्गात उत्तीर्ण झाले. पिंट्रमेकिंगमधील कलेच्या उच्चशिक्षणासाठी १९७९-८० मध्ये फ्रान्स गव्हर्न्मेंटची स्कॉलरशिप मिळून ते पॅरिसला गेले. १९७३ ते ९० या काळात त्यांना बारा पारितोषिके मिळाली. त्यांची स्वत:ची सात वैयक्तिक प्रदर्शने झाली. पंचवीस समूह प्रदर्शनांत व बारा आर्टस्टि कॅम्पमध्ये त्यांचा सहभाग होता. मुंबईतील ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी, सांताक्रूझ-वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेल, भोपाळचे विधानभवन इत्यादी ठिकाणी त्यांच्या कलाकृती प्रदíशत झाल्या आहेत. काही योजना, प्रकल्प यांत त्यांचा सहभाग होता. त्या त्या वेळी काही ठिकाणी तात्पुरती जागा मिळून स्टुडिओ उभा केला जाई. कामासाठी स्वत:ची लहानशीही स्वतंत्र जागा नव्हती. चित्रकलेच्या क्षेत्रात अस्तित्वासाठीचा जीवनसंघर्ष तीव्र होता. त्यातच घरची आíथक परिस्थिती साधारणच. रावळ अकरा वर्षांचे असतानाच वडील गेले. दादरच्या एका खोलीत अकरा जणांच्या कुटुंबातही लहानपणीची चित्रकलेची आवड सर्वानी जपली. उत्तेजन दिले, पण कुटुंबाच्या व कलेच्या वाढत्या गरजांत ते कायमकरिता शक्य नव्हते.
चित्रकार म्हणून घडण्यात पहिले पलू पडले जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्टुडिओत. शिकण्याच्या त्या सुमारासच रावळ त्यांच्या मित्राच्या खोलीवर त्यांचे काम करीत व राहतही असत. ही खोली घराजवळ डिसिल्व्हा हायस्कूलपाशी होती. आíकटेक्ट मित्राची ही खोली त्या वेळी खूप काही होती. हक्काचा निवारा, स्टुडिओ, रंगांबाबत केलेले विविध प्रयोग, अनेकांच्या भेटीगाठी, चर्चा, यासाठी ते मुक्तद्वार होते. १९७४ ते ८२ च्या जडणघडणीत या लहानशा वास्तूचे मोठे महत्त्व होते.
१९७९-८० मध्ये ते उच्चशिक्षणासाठी पॅरिसला गेले. ‘पिंट्रमेकिंग’ या कला माध्यमाच्या, एकोल द बुर्झा येथील अद्ययावत स्टुडिओत ते शिकत होते. तेथे लिथो, एचिंग, सिल्कक्रीन अशा प्रत्येक माध्यमासाठी आवश्यक त्या आकाराचे वेगवेगळे स्टुडिओ होते. प्रा. विल्यम हेत्तर हे जागतिक पातळीवरचे पिंट्रमेकर. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या पंधराशे चौ. फुटांच्या स्टुडिओत एचिंगची दहा यंत्रे होती. देशोदेशीच्या विद्यार्थ्यांना ते तपशीलवार तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करीत. पॅरिसला भाषेच्या अडचणीमुळे रावळ इतरांच्या संपर्कात फारसे नव्हते. आपसूकच कलेबद्दलचा अधिक मूलभूत विचार केला व तो चित्रांतून मांडला गेला.
पॅरिसहून परतल्यावर १९८२ ते ८८ या काळात नेहरू सेंटर येथे ‘फाईन आर्ट व पिंट्रमेकिंग अर्काइव्ह’ या प्रकल्पासाठी सीनिअर आर्टस्टि म्हणून नोकरी मिळाली. नेहरू सेंटरचे बांधकाम त्या वेळी सुरू होते. वेगळ्या प्रकारच्या कामाचा अनुभव व वेतन मिळालेच. शिवाय यातील काही काळ ऑफिसच्या कामाव्यतिरिक्तच्या वेळेत स्वत:चे काम करण्याची मुभा मिळाली. राहण्याची सोयही तेथेच झाली.
१९८९ ते ९३ जुहू येथील शहा हाऊसच्या संपूर्ण स्टडीरूममध्ये जमीन, भिंत, फíनचर असा सर्वत्र कोलाजचा वापर करावयाचा होता. ह्या कामासाठी रावळ तेथे जाऊन राहिले. राहण्यासाठी एक खोली मिळाली आणि जागेचा प्रश्न काही काळ सुटला. त्या वेळी एका योजनेअंतर्गत भारतातील अनेक खेडय़ापाडय़ांतील कारागीर तेथे जाऊन दोन ते सहा महिने राहत होते. पंधरा वर्षांत तीनशे कारागीर कुटुंबे तेथे राहून गेली. ते आपल्या कारागिरीचे नमुने तेथे करीत. बस्तर, मधुबनी, झुल्फिकार, राजस्थानचे पाथरवट अशा अनेकांचे काम रावळ यांना जवळून बघण्याची मोलाची संधी मिळाली. त्याचा निश्चितच चांगला परिणाम त्यांच्या कामावरही झाला.
१९९६ ते २००० मध्ये त्यांचे वास्तव्य भोपाळमध्ये झाले. भोपाळच्या विधानभवनाचे काम चार्लस् कोरिया यांनी केले. तेथे विविध माध्यमांतील कलाकृती लावण्यासाठी एक आठवडय़ाचा आर्टस्टि कॅम्प आयोजित केला होता. सहभागी कलाकारांना दहा हजार रुपये मिळणार होते. त्यासाठी रावळ तेथे गेले होते. त्यातून पुढे तेथेच एक मोठे पॅनल करण्याचे एक कामही मिळाले. त्यावेळचा स्टुडिओ तेथे होता. त्यांची पत्नी जया व त्यांचे प्रेमसंबंध जुळले ते याच काळात. त्या कामातून मिळालेल्या पशात भोपाळला स्वत:ची जागा घेणे शक्य झाले. कालांतराने मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय झाल्यावर ती जागा विकली. आता आयुष्याला स्वास्थ्य आहे. ते मुंबईत आपल्या स्वत:च्या स्टुडिओत काम करतात. सध्या ते एअर इंडियासाठी मोठे ‘कोलाज’ करण्याच्या कामात मग्न आहेत.
चित्रकारांच्या खडतर जीवनाची अशीही एक बाजू! पण त्याबद्दल रावळ यांची कोणतीही तक्रार नाही, कटुता नाही. चित्रकार म्हणूनच जगायचे, चित्रे काढायची या निष्ठेने त्यांनी सर्व समस्यांचा मुकाबला केला. पण येथील तरुण पिढीने चित्रकला क्षेत्राकडे वळताना दहादा विचार करावा, असे त्यांना वाटते. एकंदरीत पाहता चित्रकार म्हणूनच जगण्याच्या धडपडीत जागेमुळेही निराश होण्याच्या, खचून जाण्याच्या वेळा आल्या. पण म्हणून चित्रनिर्मिती सोडून द्यावी असे कधीही वाटले नाही. वेगवेगळ्या वास्तूंच्या म्हणजेच तात्पुरत्या स्टुडिओंच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या मनात जाग्या आहेत. विरोधाभास असा की त्या तात्पुरत्या स्टुडिओत निर्माण झालेल्या कलाकृतींना आपापले कायमस्वरूपी निवासस्थान मिळून गेले; मात्र त्यांची निर्मिती करणारा चित्रकार मात्र अनिवासीच! प्रतिकूल परिस्थिती व अस्थिरतेमुळे ज्या खाचखळग्यांतून जावे लागले, त्या तात्पुरत्या स्टुडिओंनीही त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध केले. कलाही अधिकाधिक बहरत, कसदार, प्रगल्भ होत गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा