विश्वासराव  सकपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना साथरोगाच्या कटू आठवणी विसरून जाण्याच्या आधीच गेल्या काही दिवसातच कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे ‘हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’ चा आजार बळावयाचे प्रमाण मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण पनवेल या महानगरपालिका क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उपरोक्त महानगरपालिका क्षेत्रात कबुतरांना उघडय़ावर खाद्यपदार्थ टाकू नयेत अशा आशयाच्या सूचना ठिकठिकाणी प्रदर्शित करून नागरिकांना सावधानतेचा जाहीर इशारा देण्यात आला आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया अत्यंत अभावात्मक आहे. माणसांच्या प्रतिकारशक्तीचा आजार निर्माण करून  फुप्फुसाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम करणारा रोग आहे.

(अ )  रोगाचा प्रादुर्भाव :—   कावळे, चिमण्या व मैना या पक्ष्यांपेक्षा कबुतर या पक्ष्याचा आपल्याला खूपच उपद्रव होतो. त्यामुळे श्वसनसंस्थेचे, फुप्फुसाचे, छातीचे व अन्य गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.

यासाठी आपण कबुतर या पक्ष्यापासून होणाऱ्या त्रासाची, नुकसानीची, आरोग्यविषयक तक्रारींची व गंभीर स्वरूपाच्या आजाराची व कबुतरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊ. कबुतर हा पक्षी खिडकीवरील मोकळी जागा, इमारतीचे सज्जे, वळचणी व वातानुकूलित यंत्रांच्या पृष्ठभागावर बसतात, फिरत राहतात व आपली घरटी बांधतात. तसेच वरील ठिकाणी आपली पिसे गाळतात व विष्ठा टाकतात त्यामुळे त्यामध्ये तयार होणाऱ्या बुरशीपासून त्या भागातील हवा दूषित होते व तेथे राहणारे लोक तीच दूषित हवा श्वासाद्वारे शरीरात घेत असतात. वरवर निरुपद्रवी दिसणारा हा पक्षी प्रत्यक्षात मात्र  प्राणनाशक आजारांचा वाहक आहे हे आपल्याला कळून चुकेल.

कबुतरांची घरटी, त्यांचे वास्तव्य, त्यांनी गाळलेली पिसे, त्यांची विष्ठा ज्यामध्ये अमोनिया व अ‍ॅसिड असते आणि त्यामुळे (१) हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया  व  (२) बर्ड फेन्सियर्स लंग यासारखे रोग होण्याचा धोका संभवतो. रहिवासी इमारती, शाळा / महाविद्यालये व अन्य कार्यालयीन इमारतींमध्ये कबुतरांच्या वास्तव्यामुळे व घरटय़ांमुळे किंवा कबुतर मरून पडल्याने अशा ठिकाणी माश्या, पिसवा, गोचिड, कोळी, किडे इत्यादी कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ज्याच्यामुळे त्रासदायक दंश, रात्री झोप न येणे आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

(ब)  सर्वसाधारण लक्षणे :-  फ्लूप्रमाणे लक्षणे. सर्दी, ताप, अस्वस्थ वाटणे, सांधेदुखी, शारीरिक श्रम केल्यावर धाप लागणे, खोकला व वजन कमी होणे.

वैयक्तिक स्तरावर घ्यावयाची काळजी

वरीलप्रमाणे लक्षणे आढळून आल्यास प्रथम वैद्यकीय सल्ला घेणे. जरूर भासल्यास, महानगरपालिकेच्या साथीच्या रोगासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र विभागात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषध / उपचार घ्यावेत.    

(क)  प्रतिबंधक उपाययोजना :-  आरोग्य व सुरक्षिततेचा धोका कमी करणारी, दीर्घकाळ टिकणारी व अत्यंत परिणामकारक अशी खास व्यावसायिक उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध आहे. या अभिनव व प्रगत अशा उपाययोजनांमुळे कबुतर व इतर पक्ष्यांना वस्ती करण्यास तसेच घरटी बांधण्यास मज्जाव होतो. या नावीन्यपूर्ण प्रणालीमध्ये पक्ष्यांना कोणत्याही प्रकारची इजा / जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

  •     बर्ड नेट  (पक्षीजाळी)  :-  कबुतरे व अन्य पक्ष्यांपासून आपल्या वैयक्तिक घराचे, इमारतीचे किंवा कार्यालयाचे संरक्षण करण्यासाठी पॉलीइथिलीन नेटची उभारणी करून प्रतिबंध करणे. वेगवेगळय़ा पक्ष्यांसाठी वेगवेगळय़ा प्रकारची व आकारांची पॉलीइथिलीन जाळी जी स्टील आणि जी. आय. स्क्रू व वायरद्वारे सहजपणे बसविता व काढता येते. काळय़ा रंगाची जाळी अधिक लोकप्रिय आहेत. परंतु दगडी रंगाची किंवा पारदर्शक जाळीसुद्धा उपलब्ध आहे. जेव्हा पक्षीजाळी बसविली जाते तेव्हा ती प्रत्यक्षात दिसून येत नाही व घराच्या / इमारतीच्या बाह्य सौंदर्याला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. पक्षीजाळी बसविल्याने पक्ष्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा होत नाही. जाळीमुळे त्यांना फक्त प्रवेश करता येत नाही.     
  •    बर्ड स्पाक्स  (पक्ष्यांसाठी टोकदार खिळे असलेला पत्रा )  :-  वरच्या दिशेस टोक सदरहू असलेली व स्टीलचे खिळे असलेली प्लेट (पत्रा) वातानुकूलित यंत्राच्या पृष्ठभागावर, सज्जे, वळचणी व तत्सम ठिकाणी बसवून पक्ष्यांना प्रवेश व बसण्यास  / राहण्यास प्रतिबंध केला जातो. यामध्ये खिळय़ांची टोके बोथट केली असल्यामुळे पक्ष्यांना इजा होत नाही.
  •    ‘पक्षी निर्मूलन रसायन’:- पक्ष्यांसाठी अत्यंत परिणामकारक असे  ‘पक्षी निर्मूलन रसायन’ बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या वासाने पक्षी त्या ठिकाणी बसण्यास  / राहण्यास येत नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा नुकसान होत नाही. (हे रसायन लहान मुलांच्या हाताशी लागणार नाही याची काळजी घ्यावी. )    

पक्ष्यांपासून उद्भवणाऱ्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खबरदारीचे उपाय योजणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी-

  •    कबुतरांच्या शहरातील अस्तित्वामुळे पसरणाऱ्या गंभीर आजाराच्या विरोधात लोकांची मानसिकता तयार करणे व त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. बहुतेक लोक अजूनही याबाबत अनभिज्ञ आहेत.
  •    प्रसारमाध्यमांनी याबाबत प्रभावीपणे आवाज उठविला पाहिजे तरच लोकांना सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व कळेल.
  •    मुंबई शहर, उपनगरे व अन्य शहरांत कबुतरांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे ती श्वसनसंस्थेचे विकार, छातीचे विकार व अन्य रोग पसरण्याची धोक्याची घंटा आहे. त्याला प्रमुख कारण आहे आपली सामाजिक परिस्थिती. कबुतरांना धान्य खाऊ घातल्याने आपल्याला स्वर्गात निश्चित जागा मिळते हा त्यामागचा समज आहे. पण असे केल्याने ते स्वत:साठी व इतरांसाठी गंभीर आजारास प्रोत्साहन देऊन येथेच ‘नरकयातना’ भोगण्यास मदत करीत आहेत याची त्यांना वेळीच जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्व पक्षीप्रेमी संघटना व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कबुतरांना धान्यांची पोतीच्या पोती खाऊ घालून त्यांची संख्या अनेक पटीने वाढविण्याच्या वृत्तीस आळा घातला पाहिजे. या उपर कबुतरांना धान्य खाऊ घालणे ज्यांना इतके महत्त्वाचे व आवश्यक वाटत असेल त्यांच्यासाठी कार्यालये व निवासी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी एका स्टीलच्या ट्रेमध्ये चिमूटभर धान्य प्रतीकात्मक रीतीने कबुतरांसाठी घालण्याची सोय करावी व उरलेले धान्य आश्रमशाळा किंवा दुर्गम आदिवासी खेडय़ात पाठवावे.

दररोज पोतीच्या पोती धान्य मंदिर परिसरात, तसेच रस्त्यावर, उघडय़ा जागेत व सोसायटीच्या आवारात कबुतरांना खायला टाकले जाते. कबुतरे तरी दिवसाकाठी किती धान्य खाणार, त्यामुळे उरलेले धान्य तसेच पडून राहते आणि लोकांच्या पायदळी तुडविले जाते. त्यावर उंदीर व घुशी ताव मारतात व उरलेले धान्य तसेच पडून कुजून जाते. अशा धान्य खाऊ घालण्याच्या प्रथेमुळे कबुतरांबरोबरच उंदीर व घुशी यांची संख्या वाढण्यास पर्यायाने हातभार लावला जात आहे.