घरात अनेक अशा गोष्टी आपण जमवलेल्या असतात, ज्या आपण बऱ्याच काळात उपयोगात आणलेल्या नसतात. त्यांचा उपयोग करून झालेला असतो, किंवा त्यांची उपयुक्तता आपल्या दृष्टीने संपलेली असते. या गोष्टी वाटून टाकल्या किंवा त्यांचा नव्याने उपयोग केला तर?
आपलं घर ही एक अजब गोष्ट असते. त्याच दगड-विटा आणि माती, मात्र तरी आपल्या घरी आल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं. का होतं असं? प्रत्येक घरातली माणसं त्या दगड-विटांच्या वास्तूला आकार देत असतात आणि त्यामुळेच वास्तूला आपलेपणा येतो. माया, ऊब, प्रेम  यामुळे घर अधिक सुरक्षित वाटतं. मात्र, कितीतरी अशी माणसं आपल्या अवतीभवती वावरत असतात, ज्यांना घर नसतं. घर असलंच तरी अनेक अभावांनी ते भरलेलं असतं. आपण आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी अशा माणसांना दिल्या तर? आपल्या घराची माया, ऊब आणि सुरक्षितता त्यांच्यापर्यंत वस्तुरूपाने पोहोचवली तर? आपल्यालाही घर होण्याचं सुख मिळेल, यात शंकाच नाही.
बालपण दे गा देवा
आपण सगळेच आपल्या बालपणीच्या आठवणींत रमून जातो. लहानपणीची खेळणी, पुस्तकं, कपडे आणि काय काय आपण जपून ठेवतो. मात्र, जसजसे आपण मोठे होतो तसतसा हा सगळा संसार मागे पडत जातो. नेमकं हेच हेरून श्वेता चारी या धडाडीच्या एका मुलीने मुंबईत ‘टॉयबँक’ नावाची संस्था सुरू केली.
*‘प्रत्येक लहानग्याला खेळणी मिळणं, हा त्या लहान मुलाचा किंवा मुलीचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं मला वाटतं. आपल्या घरी अनेक अशी वापरात नसलेली खेळणी असतात. खुळखुळे, बाहुल्या, चेंडू, बॅट, लाकडी खेळण्यांपासून ते पार अनेकविध मेकॅनोपर्यंत अनेक खेळणी आपल्याकडे बिनवापराची पडून असतात. अनेक मुलांना आर्थिक, सामाजिक कारणांमुळे खेळणी खेळायला मिळतच नाहीत. आपण आपल्याघरची चांगली, पण वापरात नसलेली खेळणी या गरजू मुलांना भेट म्हणून दिली तर? या विचारातून मी एका संस्थेची उभारणी केली. मुंबईत आणि इतर काही शहरांतून ‘टॉयबँक’ खेळणी गोळा करते. नवी, जुनी अशी अनेक खेळणी अनेक माणसं दान करतात. ही खेळणी वापरण्यायोग्य असावीत, त्यांत विषारी रंग वापरलेले नसावेत, मुलांना इजा होईल, अशी ती खेळणी नसावीत. शिवाय बंदूक, कमनीय बांध्याच्या बाहुल्या आणि पीळदार बाहुले अशा विशिष्ट विचारांचा प्रभाव पाडणारी खेळणी स्वीकारू नयेत,’ अशी काही ठोस नियमावली आखल्याचं श्वोता सांगते.
*‘टॉयबँके’त जमवलेली ही खेळणी शहरातल्या अनाथालयांतून, रस्त्यावरच राहणाऱ्या लहान मुलांसाठी किंवा अनेक गरीब वस्तीतल्या मुलांसाठी पुरवली जातात. संस्थेचे स्वयंसेवक आणि कार्यकत्रे ही खेळणी सुरेख पद्धतीने गिफ्ट-पॅक करून मुलांना देतात. श्वेता आपला अनुभव सांगताना म्हणते, ‘‘मुलांना खेळणी मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यांत जे समाधान, आनंद आणि एक चमक दिसते ती माझ्या कामाची खरी पावती असते.’ श्वेता पुढे खेळण्यांचं महत्त्व अधोरेखित करताना सांगते की, ‘‘त्या खेळण्याशी खेळल्याने त्या लहानग्याला आनंद तर मिळतोच मात्र एक मूल म्हणून खेळण्यांची असणारी भूक मी भागवू शकते. खेळण्यांचं महत्त्व बालविकासात अनन्यसाधारण आहे, तेव्हा एक खेळणं दान करून तुम्ही आणि मी एका व्यक्तीच्या विकासात हातभार लावत असतो हे विसरून चालणार नाही.’’
रद्दी ते स्वयंसिद्धी
आपल्या घरची अनेक प्रकारची रद्दी आपल्याला थोडेफार पसे मिळवून देते, मात्र त्यासाठी महिनाभर जागा अडवते. अनेक सामाजिक संस्था आणि आता तर विविध राजकीय व्यक्तीदेखील लोकसहभागातून पसे उभारण्यासाठी वृत्तपत्रांची रद्दी जमवताना दिसतात.
मात्र अनेक सामाजिक संस्थांनी रद्दी जमवत आपल्या लोकांसाठी स्वयंसिद्धीचा मार्ग खुला केला आहे. बंगळूरच्या ‘समर्थनम् ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड’ या अंधांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने रद्दी आणि इतर सुक्या कचऱ्याचा कल्पकतेने वापर केलेला आहे. ‘समर्थनम्’देखील इतरांप्रमाणे ही रद्दी दान स्वरूपात किंवा पसे देऊन गोळा करते आणि विकते आणि त्यातून पसे मिळवते. एक पाऊल पुढे टाकत संस्थेने अनेक अंध स्त्रिया आणि पुरुषांना कागद बनवण्याचे प्रशिक्षण देऊन या रद्दीपासून कागद बनवण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपासून अधिक काळ संस्था अनेक कंपन्यांना तयार, हॅण्डमेड कागद विकत होती. साहजिकच या प्रक्रियेत संस्थेने काही अंध व्यक्तींना प्रशिक्षण दिले आणि स्वयंपूर्ण केले आणि स्वत: चालवीत असलेल्या अनेक सामाजिक प्रकल्पांसाठी पसा उभा केला.
वस्त्र नवीनीकरण
एक नव्याने कळलेला, आणि मला भावलेला प्रकार म्हणजे विविध कपडे, विशेषत: साडय़ांपासून अनेक नवी प्रॉडक्ट्स तयार केली जातात. मी स्वत: याचा अनुभव घेतला. भिन्नमती विद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना टेलिरगचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विविध कापडी उत्पादनं बनवून घेतली जातात. मी माझ्या तीन जुन्या झालेल्या जीन्स संस्थेला दिल्या आणि संस्थेने मला त्यापासून उत्तम प्रकारच्या सहा पिशव्या दिल्या. प्रत्येक पिशवी मीच विकत घेतली, त्यामुळे मला ती फक्त २०० रुपयांना मिळाली. जीन्स फक्त संस्थेला दिल्या तर त्यापासून बनवलेल्या ट्रेण्डी पिशव्या, बॅग्स आणि वॉलेट्स संस्था बाजारात अधिक किमतीला विकून त्यापासून मिळालेल्या पशातून प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याचा खर्च भागवते.
मुंबईतल्या अनेकविध संस्था साडीपासून सुबक पिशव्या, पडदे, रजई, लहान बाळांसाठी दुपटी आणि कपडे, हातरुमाल, टेबलक्लॉथ अशा अनेक वस्तू बनवून विकतात.
मी घर झालो
मी महाविद्यालयात असताना अनेक घडय़ाळं आणि कॉलेज-बॅग्ज अगदी हौसेने घेतलेल्या. पुढे मोबाइल आला आणि घडय़ाळ वापरायचं मी सोडूनच दिलं. महाविद्यालयीन दिवसांचा उत्साह सरला आणि दर आठवडय़ाला नवी बॅग बदलून आलटूनपालटून वापरायची पद्धत बदलली. खूपशा घडय़ाळांचं आणि या उत्तम असलेल्या मात्र वापरात नसल्यामुळे पडून असलेल्या बॅग्जचं करायचं काय हा प्रश्न होता.
अंधेरीत काम करणाऱ्या ‘प्रयास – एक कोशिश’ या संस्थेच्या संपर्कात आलो. आपल्या ‘उतरण’ या प्रकल्पांतर्गत ही संस्था होतकरू महाविद्यालयीन मुलांसाठी उत्तम काम करते. त्यांच्या एका आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी माझ्याजवळच्या बॅग्ज आणि घडय़ाळं त्यांना दिली. त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे सामान आपुलकीने वापरलंच आणि मला त्याबद्दल पत्राने लिहून आभारही मानले. त्यातल्या एका पत्राने माझे डोळे उघडले. बारावीत जाणाऱ्या या मुलाने लिहिलं होतं, ‘तुम्ही दिलेल्या घडय़ाळामुळे आता माझा अभ्यास उत्तम होतो. माझ्याजवळ हातात बांधायचं घडय़ाळ असल्याने मी वेळेत पेपर सोडवण्याचा, उत्तरं वेळेत लिहून पूर्ण करण्याचा सराव मी कुठेही करू शकतो.’ हा सराव कुठेही कशाला करायला हवा, हा प्रश्न माझ्या मनात येतो तोपर्यंत मी पुढचं वाक्य वाचलं, ‘मी एका कंपनीत कुरियर टाकायचं काम करतो. तेव्हा वेळ मिळेल तिथे, कधी ट्रेनच्या प्रवासात, तर कधी दुपारी झाडाखाली बसून डबा खाल्ल्यावर मी सराव करू शकतो.’ त्या घडय़ाळाच्या रूपाने माझ्या घरातली सुरक्षितता, सराव करण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि निश्चितता त्या विद्यार्थ्यांला मिळाली होती.
आपल्या घरातल्या विनावापराच्या अनेक गोष्टी आता मी नियमितपणे वाटतो. कारण आता मला घर होण्यातलं सुख कळायला लागलं आहे..

Story img Loader