घरखरेदी करताना विकासक, एजंट यांनी निर्माण केलेल्या भूलभुलैयात आपण पुरते अडकत तर नाही ना, याचा विचार करावा. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या अपेक्षा व गरजेनुसार घरखरेदी करावी.
स्वत:चे घर असावे असे वाटण्यात गैर काहीच नाही. मात्र ते आपल्या जीवनातील कुठल्या टप्प्यावर घ्यावे याबाबत भिन्न मते असू शकतात. पूर्वी मध्यमवर्गीय लोक मुला-बाळांची शिक्षणे, त्यांचे विवाह इत्यादींना अग्रक्रम देत असत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडेपर्यंत अनेक वर्षे भाडय़ाच्या घरात राहण्यामध्ये त्यांना कमीपणा वाटत नसे. पण काळ झपाटय़ाने बदलला आणि स्वत:चे शिक्षण संपून नोकरीला लागल्यावर लगेच किंवा दोन-तीन वर्षांत आपल्या स्वत:च्या घराचा विचार पुढील पिढी करू लागली. लग्न झाले असेल तर स्वत:च्या घरात राहण्याचा आनंद त्यांना सुरुवातीपासूनच मिळावा असे वाटू लागल्यास त्यात नवल ते काय? चांगले पगार मिळू लागल्याने जीवनशैली बदलली आणि जिथे नवरा-बायको दोघेही नोकरीत तिथे तर स्वत:च्या घरावरील कर्जाचे हप्ते भरण्याची क्षमता ही त्यांच्यात आल्याने अशा तरुण पिढीला लक्ष्य करून मोठय़ा शहरातील घरबांधणीला वेग आला. आणि तरुणाईला घरासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी बँकाही पुढे सरसावल्या. कर्ज मिळणे अत्यंत सुलभ झाले आणि ज्या दिवशी अर्ज त्या दिवशी कर्ज असा एकंदरीत सगळा माहोल जुळून आल्याने नोकरीपाठोपाठ लग्न आणि घर अशी साखळी तयार झाली.
घर घेण्याचा उद्देश
आपण घर का घेत आहोत हा साधा प्रश्न स्वत:ला विचारून स्पष्ट उत्तर मिळाल्यावर घर घेण्याचा विचार अवश्य करावा. घर पूर्ण झाले असेल किंवा ते बांधले जात असेल तर ते आपल्या गरजा आणि अपेक्षांची पूर्तता करते का, हेही पाहावे आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तर तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. अमेरिकेत घरांचे व्यवहार होताना खरेदी करणारा चार्टर्ड इंजिनीयरकडे जातो आणि त्याची फी भरून त्याच्याकडून घराची इत्थंभूत तपासणी करून घेतो. यासाठी जो फॉर्म असतो, त्यात शेकडो प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात आणि ज्या ज्या त्रुटी असतील, त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी (आर्थिकसुद्धा) कुणाची ते ठरवले जाते. यामुळे खरेदी करणाराच्या हिताचे रक्षण होते आणि वित्तपुरवठा करणारी बँकदेखील आश्वस्त होते. (आपल्याकडे अशी पद्धत कधी रूढ झाल्यास ती खरेदी करणाऱ्याचे हित पाहील अशी खात्री करावी लागेल.)
घर स्वत:साठी घेतले आहे हे निश्चित असेल तर आतील सुविधा आणि अंतर्गत सजावटी स्वत:ला हव्या त्या प्रकारे करून घेण्यात काहीच गैर नाही. पण आपण किती काळ राहणार आहोत, नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात किंवा देशात गेलो तर या घराचे काय करणार, याचाही विचार स्पष्ट हवा. आपण अंतर्गत सजावट करताना किंवा घरासाठी सामान (फर्निचर) घेताना उद्या हे घर भाडय़ाने दिल्यास किंवा विकल्यास आपण केलेला अतिरिक्त खर्च उगाच केला असा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ नये हे बघितले पाहिजे.
घर किती मोठे
घर घेताना ते दोन बेडरूमचे की तीन बेडरूमचे असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे खरेच आहे. परंतु तुम्ही मोठे तीन बेडरूमचे घर घ्यावे असे इस्टेट एजंट किंवा बिल्डर सुचवत असेल तर आपली गरज नक्की काय आहे याचा विचार आपणच करावा. सांगणारा ‘घर आत्ताच मोठे घ्या, आपण घर काही नेहमी नेहमी घेत नाही’ असे कोणी म्हणत असेल तर आता तेही दिवस गेले आहेत. गरजेनुसार आपण पुढे वेगळे आणि त्याहूनही आधुनिक घर वेगळ्या शहरात किंवा देशात घेऊ असे दिवस आले आहेत. त्यामुळे हे घर म्हणजे आपल्या आयुष्यातील एकमेव आणि शेवटचे घर असा विचार आज तरी करू नये. थोडक्यात, आपण या घरात किती वर्षे राहू याचा वस्तुनिष्ठ अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे सावधगिरी बाळगून आपल्या गरजेनुसार आणि ऐपतीनुसार व्यवहार म्हणून त्याकडे पाहण्यात आपले दीर्घकालीन हित आहे.
घर मोठे असेल आणि ते भाडय़ाने देण्याची वेळ आली तर अपेक्षित भाडे मिळेल काय याचा विचारही केला पाहिजे. कारण आपण केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात परतावा अपेक्षित असेल तर घराचे भाडे तेवढे येईल काय, याचा विचार आवश्यक आहे. कारण भरमसाठ भाडे भरण्यापेक्षा बँकेचे कर्ज काढून स्वत:चे घर घेऊन मासिक हप्ते भरण्याचे जे शहाणपण आपल्याकडे आहे, ते इतरांकडेही आहे हे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. कारण इथे खरा विरोधाभास आहे. जी गोष्ट आपण करीत नाही, ती इतर जण करतील ही अपेक्षा चूक आहे. तुमचे घर अमूक रकमेला भाडय़ाने जाईल असे सांगणारा खुशाल सांगेल, पण तो अनुभव येईलच याची खात्री देता येत नाही.
घर विकावे लागल्यास किती लवकर विकता येईल आणि किती किंमत येऊ शकेल याची जाणीव मोठे घर खरेदी करताना ठेवली पाहिजे. घर फार मोठे असेल तर अपेक्षित किंमत देऊन कुणी खरेदी करेल याची खात्री नसेल, पण तुलनेने लहान घर लवकर विकले जाण्याची शक्यता जास्त वाटते.
घराची किंमत किती
आपण जे घर खरेदी करतो त्याची वास्तविक किंमत काय असते हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. कारण या बाबतीत इस्टेट एजंट आणि बिल्डर जे सांगतात त्यावर सगळे विश्वास ठेवून व्यवहार करत असतात. आपल्या मानसिकतेचा विरोधाभास असा की जेवढी जास्त किंमत सांगितली जाते त्यावरून आपण घराची प्रतही ठरवत असतो. आणि कुठेतरी समाधानही होत असते.
यासंबंधी काही वर्षांपूर्वी मला एका आर्किटेक्ट मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. तो म्हणाला की, जेव्हा घरखरेदीचा व्यवहार होतो त्यानंतर तीन-चार महिन्यांनी घर खरेदीदाराला एक फोन कॉल येतो आणि ‘ते घर विकायचे आहे काय’ अशी विचारणा होते आणि खरेदी किमतीपेक्षा वाढीव असा आकर्षक आकडा सांगितला जातो. खरेदीदार इतक्या लवकर घर विकणार नाही याची खात्री असतेच. (थोडे थांबू या!) पण अवघ्या तीन महिन्यांत घराची किंमत वाढल्याचे ऐकून खरेदीदाराला आनंद होतो आणि ही वार्ता अनेकांपर्यंत तो पोचवतो. यामुळे विशिष्ट भागातील घरांचे दर सतत वाढत असतात. निदान ते वाढण्यास मदत होत असते. या गोष्टीतील मनोरंजक भाग म्हणजे बहुतेक वेळी खरेदीदारास आलेला फोन कॉल हा बिल्डरकडून ‘मॅनेज’ केलेला असतो, पण ते कळून येऊ शकत नाही.
प्रत्यक्ष घर विकण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला विक्रीतून किती रक्कम मिळणार याचा खरा अंदाज येतो. ‘घर विक्रीसाठी आणखी थोडे थांबा, मार्केट डाऊन आहे’ वगैरे कारणे देऊन विलंब होऊ शकतो आणि अपेक्षित किंमत मिळत नाही असाही प्रत्यय येऊ शकतो. त्यात परत भांडवली लाभावर आयकर आणि तो कमी करण्यासाठी लटपटी अशा गोष्टी उद्भवतात आणि विक्री करणारा कधीकधी हतबल होतो. शेवटी व्यवहार पूर्णत्वाला नेण्यासाठी तडजोड करून निर्णय घ्यावा लागतो आणि खरा अनुभव गाठीस येतो.
गुंतवणूक म्हणून घर
गुंतवणूक म्हणून घर ही विचारसरणी खूप जुनी असावी असे वाटत नाही. पण आपल्याकडे ही गेल्या पंचवीस-तीस वर्षांत विशेष लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे स्वत:ला राहण्यासाठी हवे असो वा नसो, पण लठ्ठ पगाराची नोकरी किंवा आमदनी असल्यास लगेचच गुंतवणूक म्हणून घर खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढीला लागलेली दिसते. वडिलार्जित घर असलेल्या एकुलत्या मुलाने नोकरीत लागल्यावर सात-आठ वर्षांत गुंतवणूक म्हणून दोन घरे तीही वेगळ्या शहरात खरेदी केल्याची उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. त्याहून विशेष म्हणजे या दोन्ही घरांची काहीतरी व्यवस्था वडिलांना करायला सांगून ही मुले आता अमेरिकेत गेली असून तिथेही त्यांनी घर घेतल्यास आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी अशी गुंतवणूक म्हणून घेतलेली घरे भाडय़ाने न देता बंदही ठेवली जातात. त्यामुळे कित्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये तीस-चाळीस टक्के फ्लॅट कायम बंद राहून त्यांच्या मालकांचा कोणत्याच प्रकारे संस्थेच्या व्यवस्थापनात सहभाग नसतो. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनात सभासदांनी सहभागी होण्याची जी अंतर्भूत धारणा आहे; त्याबाबतीत गुंतवणूक म्हणून घेतल्या जाणाऱ्या घरांचे योगदान हे नकारात्मक (निगेटिव्ह) आहे असे म्हटल्यास वावगे नाही, पण यावर उपाय नाही अशी परिस्थिती आहे. मग जे सभासद प्रत्यक्ष राहात असतात त्यांच्यावरच संस्था चालवण्याची सर्व जबाबदारी येऊन पडते. या संदर्भात आणखी एक बाब म्हणजे सामाजिक विचार करता अशी हजारो (लाखो?) घरे बंद ठेवल्याने ती भाडेकरूंसाठीसुद्धा उपलब्ध नसतात. पन्नास-साठ वर्षांपूर्वी जी घरे असत त्यात मालकाने राहण्याव्यतिरिक्त बंगल्याच्या काही खोल्या (किंवा जागा असल्यास आवारात आऊट हाऊस म्हणून बांधकाम करून) भाडेकरूंसाठी ठेवल्या जात असत. या राहणीतून अनेकांची सोय होऊन एक सामाजिक गरजही भागत असे. पण आता ज्या प्रकारची गृहनिर्मिती मोठय़ा शहरात होत आहे त्यात असा सामाजिक विचार लयास गेला असून, प्रत्येकजण स्वत:पुरते आणि फक्त स्वत:पुरते पाहात असतो. उलट स्वत:चे खासगी जीवन जपण्याच्या नादात शेजार नकोच आणि असल्यास त्याबद्दल बेफिकीर राहण्यात धन्यता मानली जाते.
सुविधांची खैरात
नवीन आकार घेणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेकदा अमुक एक तारखेपूर्वी बुकिंग केल्यास हे मोफत ते मोफत
असे सांगून प्रत्यक्ष त्या वस्तू दिल्याही जातात. माझ्या माहितीत असे एक उदाहरण आहे की, जिथे बिल्डरकडून सर्व बाथरूममध्ये इलेक्ट्रिक गीझर्स मोफत बसवून देण्यात आले. परंतु महिन्याभरात त्यातील दोन बंद पडले तर त्यातील एक सर्व प्रयत्न करूनही कधीच सुरू करता आला नाही. त्या वसाहतीत असा अनुभव अनेक खरेदीदारांना आला. याचा आपण असा अर्थ लावू शकतो की, कुठल्यातरी कंपनीचे हलक्या दर्जाचे (न विकले गेलेले) गीझर बिल्डरने मोठय़ा संख्येत आणि म्हणून कमी दरात खरेदी करून ते बसवून दिले आणि याप्रकरणी त्या दोन्ही कंपन्यांचा फायदा होऊन मधल्यामधे ग्राहक मात्र भरडला गेला. मोफत म्हणून मिळणाऱ्या अनेक वस्तूंबाबत असा अनुभव अनेकांना येत असेल. पण यासाठी तक्रारी करत न्यायालयापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळसुद्धा कित्येकांकडे नसतो, हे वास्तव आहे.
नवीन होणाऱ्या सर्वच गृहनिर्माण प्रकल्पात हल्ली क्लब हाऊस, तरणतलाव, बगीचा, जॉगिंग ट्रॅक, जिम इ. सुविधा दिल्या जातात आणि ते काळानुसार योग्य आहे यात शंका नाही. यानिमित्ताने मोकळी जागा पर्याप्त राहून सर्वाना उत्तम वातावरण मिळते हेही खरे आहे. परंतु या सर्व सुविधा बिल्डर आपल्याला देत आहे अशी भावना न ठेवता यावरील सर्व गुंतवणूक खरेदीदार करीत असून पुढे या सर्व सुविधा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी- चालवण्यासाठी लागणारा आवर्तित खर्चही आपल्यालाच द्यावयाचा आहे, याची जाणीव सर्वानी ठेवणे आवश्यक आहे. आणि प्रत्यक्ष राहायला आलो किंवा नाही आलो तरीही हा खर्च आपल्यालाच करायचा असतो. या संदर्भात आणखी एक मुद्दा म्हणजे या सुविधा घेताना आपली जीवनशैली काय आहे, आपल्याला पोहणे आवडते का, जिममध्ये जाण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का असेह प्रश्न स्वत:ला विचारावेत. आजकाल कित्येकांना कामाचे तास जास्त असतात. येण्या-जाण्याच्या वेळा अडनिडय़ा असतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी मग विश्रांती जास्त आवश्यक वाटते तर कित्येकजण वीकेंड म्हणून कुठेतरी बाहेर जाणे, शॉपिंग मॉल, चित्रपट इ. पर्याय निवडतात. हे सर्व होताना आपण बिल्डरकडून घेतलेल्या किती सुविधांचा वापर काय प्रमाणात करतो हेही बघावे लागेल. पाहणी केली तर निम्मे अधिक सभासद किंवा त्यांचे कुटुंबीय या सुविधांचा उपयोग करत नाहीत असे वास्तव समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. यात काही जण असेही असतात की, जिममध्ये जाण्याऐवजी ते स्वत:च व्यायामाची साधने खरेदी करून स्वत:ची सोय घरीच करतात. एकंदरीत याबाबत साकल्याने विचार करण्याची गरज वाटते.
घरे किती?
राहण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून याव्यतिरिक्त इतर कारणांसाठीसुद्धा घरखरेदीचे प्रमाण वाढताना दिसते. नवीन कल्पनांतून घरबांधणी प्रकल्प होत असतात. यात वीकेंड होम (सेकंड होम), फार्म हाऊस, वृद्धावस्थेसाठी घर-स्टुडिओ अपार्टमेंट किंवा असिस्टेड लिव्हिंगसाठी वन बेडरूम हॉल, किचन असे पर्याय उपलब्ध असतात. अशा सर्व प्रकल्पांची निवांत, निसर्गाच्या कुशीत, तळ्याच्या काठी, डोंगराच्या पायथ्याशी, प्रदूषणमुक्त, भरपूर प्रकाश, भरपूर मोकळी हवा इ. विशेषणे लावून जाहिरात केली जाते. आणि अनेकजण गुंतवणूक म्हणून किंवा स्वत:च्या उपयोगासाठी म्हणून निवड करीत असतात. हासुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न आहे यात शंका नाही. परंतु माणसाला ज्याप्रमाणे पोटाची मर्यादा असल्याने जेवताना कुठेतरी थांबावे लागते तद्वतच घरे कितीही बांधली तरी प्रत्येकाला एकावेळी एकाच घरात राहता येते हे वास्तव आहे. त्यामुळे स्वत:साठी घेतले तरी अशी किती घरे असावीत याचा विचार केला जावा असे वाटते.
या विषयावर माझ्या आर्किटेक्ट मित्राला मी एकदा सहज छेडले आणि विचारले की, ‘‘तुम्ही बिल्डिंग व्यवसायातले लोक एकामागोमाग एक असे प्रकल्प आणता तेव्हा मनात विचार येतो की, माणसाला एवढी घरे खरोखरच कोणत्याही कारणास्तव हवी असतात काय? आणि तुम्ही लोकांनी असा माहोल तयार केला आहे की, सगळेच लोक घर खरेदी, करण्याच्या मागे लागलेले दिसतात, हा सगळा काय प्रकार आहे?
यावर माझ्या मित्राने शांतपणे उत्तर देताना व्यवहारातील एक उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘‘आपल्याला लिहिण्यासाठी चांगल्या अवस्थेतील एकच पेन पुरेसे असते. पण जेव्हा आपल्या जवळ पेनची संख्या वाढते तेव्हा आपले एखादे पेन सोडले तर बाकी सर्व विनाकारण, रिफील नसलेली- संपलेली इकडेतिकडे पडलेली असतात. आपले त्यांच्याकडे लक्षही नसते आणि जेव्हा कुणाचा फोन येतो, काहीतरी लिहून घ्यायचे असते आणि पेनवर पेन शोधत असतो, पण एक धड हाती येऊन उपयोगाचे नसते. अनेक निरुपयोगी हाती लागतात आणि या गोंधळात जे चालू असते तेही पेन हाती येत नाही आणि आपण चरफडत राहतो. घरांचे तसेच होतेशेवटी एकच कामी येते. आपल्याला आज आनंद देणाऱ्या वस्तू जशा अतिरिक्त होत जातात तसे आपले त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आणि शेवटी शेवटी तर त्या वस्तू आपल्याला दु:खदायक ठरतात. पण लोकांच्या हातात पैसा खेळत असल्याने त्याचा विनियोग कसा करायचा हा प्रश्न असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचा प्रश्न सहज सोडवला आहे.’ माझ्या आर्किटेक्ट मित्राने दिलेले उदाहरण मला पटले. लोक पैसे मोजायला तयार असतील तर कोणता व्यावसायिक मागे राहील?
ग्राफिक्स – विलास उतेकर

Story img Loader