स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणालीचा अंगिकार करून त्रिस्तरीय संविधान शासन यंत्रणेचा स्वीकार केला. त्याप्रमाणे घटनेनुसार अनुक्रमे देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती, लोकनियुक्त प्रतिनिधींचे दोन सभागृहांचे संसद भवन आणि न्यायसंस्था अशा स्तरावर आधारित देशाचा राज्यकारभार चालेल हे निश्चित झाले. आज सहा दशकांनंतरही याच पद्धतीने आपली शासन यंत्रणा कार्यरत आहे. राष्ट्रपतींना जरी सर्वोच्च अधिकार असले तरी लोकनियुक्त प्रतिनिधी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे स्थान अनन्यसाधारण असून त्यांच्या कार्यप्रणालीवर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर उमटणे आवश्यक असते.
देशाचे सर्वप्रथम नागरिक, तीनही सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना घटनेने विशेषाधिकार बहाल केले आहेत; त्या राष्ट्रपतींचे दिल्लीतील शाही निवासस्थान, संसदेचे गोलाकार सभागृह आणि सर्वोच्च न्यायालयाची भव्य इमारत या तीनही वास्तूंना भव्यता, कलात्मकतेसह इतिहासही आहेच. त्यातील राष्ट्रपती भवनाच्या इमारतींनी आपला सहस्रचंद्रदर्शन सोहळा बघितला आहे. सुमारे १३० हेक्टर भूखंडावर उभी असलेली ही नेत्रदीपक इमारत म्हणजे ब्रिटिशांनी बांधलेली राजवाडासदृश टोलेजंग वास्तू आहे.
पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश राजप्रतिनिधींसाठी दिल्लीत नव्याने वसवलेल्या राजधानीत एक राजवाडा स्वरूपाची शाही इमारत उभारायचे निश्चित झाल्यावर १९ वर्षांच्या बांधकामानंतर इ.स. १९३१ साली ही इमारत उभी राहिली, तेव्हा तिचे नाव होते- ‘व्हाइस रिगल लॉज’. मात्र भारतीय स्वातंत्र्यानंतर या राजप्रासादाचे रूपांतर राष्ट्रपती भवनात होऊन ते राष्ट्रपतींच्या निवासाबरोबर त्यांच्या कार्यालयासाठीही आजतागायत ओळखले जात आहे.
इ.स. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केल्यानंतर जो देशव्यापी उद्रेक निर्माण झाला, त्यावर राजधानी कोलकात्याहून नियंत्रण ठेवणे अशक्य झाल्याने दिल्लीला राजधानीचे स्थलांतर करायचे ठरले. तेव्हा व्हाइसरायच्या शाही प्रतिष्ठेला साजेशी कलात्मक आणि टोलेजंग वास्तू हवी, या कल्पनेतून ही देखणी वास्तू उभारली गेल्याचा इतिहास आहे. व्हाइसराय म्हणजे ब्रिटिश राणीचा प्रतिनिधी होताच ना! दिल्लीस राजधानी स्थलांतरित करताना ब्रिटिश शैलीच्या अनेक प्रशासकीय, निवासी इमारती बांधणे क्रमप्राप्त होते. पण त्यात जास्तीत जास्त लक्ष केंद्रित झाले ते व्हाइसरायचा राजवाडा आणि सचिवालय या इमारतींवरच. पण ही इमारत बांधताना दिल्लीवर प्रभाव टाकणाऱ्या मुघलकालीन भव्य देखण्या इमारतींच्या तोडीची ही नियोजित वास्तू बांधायलाच हवी यासाठी ब्रिटिश प्रशासक खूपच दक्ष होते.
व्हाइसरायच्या या राजप्रसाद उभारणीसाठी त्याचा आराखडा तयार करण्याचे काम ‘सर एडविन लचिन्स’ या प्रख्यात वास्तुविशारदाकडे सोपवण्यात आले. याच एडविन लचिन्सने सर विन्स्टन चर्चिलना चित्रकलेचे धडे दिले होते. कमान कलेचे कोणतेच तांत्रिक शिक्षण घेतलेले नसताना अंगभूत हुशारी आणि कल्पकतेने एडविन लचिन्सने इंग्लंडमध्ये अनेक अमीर, उमराव, सरदारांच्या इमारती बांधल्या होत्या. तसेच चर्च आणि उद्यानांचे आराखडेही तयार केले होते. – ‘आपल्याठायी असलेली कलाकृतीची, तसेच नवनिर्मितीची देणगी परमेश्वराने आपल्याला बहाल केलेली असते, तेव्हा आपल्या कामावर तो परमेश्वर लक्ष ठेवून असतो’ यावर कलंदर एडविन लचिन्सचा विश्वास होता.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या दिल्ली नगरीला पांडवांच्या काळापासून सहा वेळा वेगवेगळ्या राजसत्तेच्या राजधानीची ओळख होतीच. इंग्रजी राजसत्ता सातव्या क्रमांकाची ठरली. नवीन राजधानी वसवण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्य समितीत एडविन लचिन्स होताच. इतर इंग्रज वास्तुविशारदांप्रमाणे लचिन्सलाही इंग्रजी कमानकलेच्या अभिमान होताच. भारतीय वास्तुशैलीत कलाकुसरीला अधिक महत्त्व आहे, असे त्याचे मत होते. पण भारतभ्रमण केल्यावर त्यांनी अनेक वास्तुशिल्पांची मनोहारी कलाकृती बघितल्यावर त्याचे वरील मत बदलले. ब्रिटिश वास्तुविशारदांना ग्रीक, रोमन, गॉथिक शैलीची भुरळ प्रथमपासून होतीच. पण या नियोजित इमारतींचे संपूर्ण काम या शैलीत केल्यास स्थानिकांच्या असंतोषात भर पडेल याची जाणीव ठेवून ब्रिटिशांनी व्हाइस रिगल लॉजचा आराखडा तयार करताना ग्रीक-रोमन शैलीबरोबर भारतीय कमान शैलीचा त्यात अंतर्भाव करण्याचे ठरवले.
एडविन लॉचिन्स कल्पक आणि अभ्यासू वास्तुविशारद असल्याने भारतभूमीवर रुजलेल्या बौद्ध, हिंदू, इस्लामी वास्तुशैलीचा त्यांनी सखोल अभ्यास करूनच ही प्रचंड इमारत उभी केली.
हिंदू समाजातील मंदिरे-प्रार्थनास्थळांच्या प्रवेशद्वारी हत्तीच्या मूर्तीना श्रद्धेने, आदरयुक्त स्थान आहे हे जाणल्यानेच या प्रचंड वास्तू प्रांगणाच्या प्रवेशद्वारी हत्तीचे महाकाय शिल्प साकारण्यात लचिन्सची कल्पकता आणि मुत्सद्दीपणा वाखाणण्यासारखा आहे.
१९ वर्षांच्या अविरत परिश्रमातून हा राजप्रासाद अखेर इ. स. १९३१ मध्ये उभा राहिला. पण त्याचा उपभोग घ्यायला पुढे ब्रिटिशांना भारतात फार काळ राहता आले नाही. कारण १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर ते मायदेशी विलायतेला परतले आणि भारत प्रजासत्ताकाकडे जाणारा देश म्हणून जगाच्या नकाशावर आला. अखेर ‘व्हाइस रिगल लॉज’ म्हणून ओळखली जाणारी ही शाही इमारत भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणून ओळखली जायला लागली. सुमारे १३० हेक्टर विस्तीर्ण जमिनीवर हे राष्ट्रपती भवन उभे असून त्यात एकूण ३६५ खोल्या आहेत. त्यातल्या ६५ खोल्या मोठय़ा आकाराच्या आहेत. या इमारतीच्या उभारणीसाठी एकूण २२७ खांब असून अनेक सज्जे आणि कमानी आहेतच. या सज्जांमुळे प्रखर सूर्यप्रकाश आणि पाऊसपाण्यापासून इमारतीचे रक्षण होते. इमारतीच्या बांधकामात विटा-पत्थराचा जास्त उपयोग केला असून लोखंडाचा उपयोग कमीत कमी करण्यावर कटाक्ष आहे. या इमारतीच्या बांधकामातील अनेक वैशिष्टय़ांपैकी एक येथील ‘दरबार हॉल’. त्याच्या सुशोभित, भव्यपणामुळे त्याचे राजेशाही स्वरूप पाहताक्षणीच नजरेत भरते. इमारतीच्या प्रचंड घुमटाखालीच हा हॉल आहे. या गोलाकार हॉलच्या भिंती पांढऱ्या संगमरवराच्या आहेत, तर छतापर्यंत पोचलेले खांब राजस्थानी जैसलमेरच्या सोनेरी रंगाचे आहेत. छतावरचे झुंबर चित्ताकर्षक असून त्याला शेकडय़ांनी दिवे आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती याच दरबार हॉलमध्ये आपल्या पदाची, गोपनीयतेची शपथ घेतात. ब्रिटिश काळात हा हॉल सिंहासनाचे सभागृह म्हणून ओळखले जायचे. त्यात व्हाइसराय व त्याची पत्नी यांच्यासाठी सिंहासनसदृश आसनव्यवस्था होती. या हॉलमधील सिंहाच्या संगमरवरी प्रतिकृती म्हणजे ब्रिटिश साम्राज्य सत्तेचे प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रपती भवनातील आणखीन एक शाही दिवाणखाना म्हणजे ‘अशोका हॉल’. दरबार हॉलला लागूनच तो आहे. त्याची व्याप्ती ६८ चौ. फुटी तर छत ४५ फूट उंचीचे आहे. हॉलचा अंतर्गत भाग आरसे महालासारखा आहे. जमिनीचा सर्व भाग लाकडी आहे. ब्रिटिशकाळात स्त्री-पुरुषांच्या नृत्याकरता ही व्यवस्था होती. पंतप्रधान, इतर मंत्री यांचा शपथविधी या सभागृहात पार पडत असतो. परदेशी राजदूत, उच्चायुक्त आपली ओळख तथा अधिकारपत्रे राष्ट्रपतींना याच सभागृहात सादर करतात. येथील भोजनगृह म्हणजे बँकेट हॉल- लांब आकाराचा असून सुमारे १०० लोक एकावेळी बसण्याची येथे सोय आहे. येथील भिंतीवर आतापर्यंत होऊन गेलेल्या राष्ट्रपतींची तैलचित्रे आहेत. येथील अतिथी कक्षांना आता इंग्रजीऐवजी भारतीय ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थळांची नावे आहेत.
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणा आहे. भूलोकीचे नंदनवन ठरलेली ही बाग राष्ट्रपती भवनाच्या पिछाडीस आहे. त्यावर मुघल-ब्रिटिश सौंदर्याची छाप आहे. हे विशाल उद्यान म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले भूलोकीचे नंदनवन आहे. देशातील अप्रतिम बगीच्यांमध्ये ही बाग आजही आपला नावलौकिक राखत अग्रेसर आहे. या बगीचाचा आराखडादेखील एडविन लचिन्सनेच तयार करून आपली सौंदर्यदृष्टी दाखवली आहे. येथे अनेक रंगांच्या फुलांची उधळण पाहायला मिळणे हा एक नेत्रसुखद अनुभव आहे. बागेतील सहा कमळाकृती कारंजी सौंदर्यात भर घालताहेत. बगीच्यासभोवती कार्यालयीन इमारती, कर्मचारी निवास व्यवस्था आहे.
ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेली ही भव्य वास्तू आम्हा देशवासीयांना आदरयुक्त मानबिंदू ठरली आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यापासून विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीपर्यंत सर्वच राष्ट्रपतींनी या इमारतीत वास्तव्य करताना आपल्या कल्पनेतील बदल करत या वास्तूच्या वैभवात भरच घातली आहे.
भारतीय संविधानाच्या इतिहासाशी ही वास्तू तशी निगडित आहेच, म्हणूनच प्रजासत्ताक दिनी या वास्तुवैभवाचा हा लेखाजोखा. संविधानाशी संबंधित असलेल्या लोकसभा आणि सर्वोच्च न्यायालय या उत्तुंग इमारतीविषयी पुन्हा केव्हातरी…
राष्ट्रपती भवन : राष्ट्राचा मानबिंदू
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणालीचा अंगिकार करून त्रिस्तरीय संविधान शासन यंत्रणेचा स्वीकार केला. त्याप्रमाणे घटनेनुसार अनुक्रमे देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती, लोकनियुक्त प्रतिनिधींचे दोन सभागृहांचे संसद भवन आणि न्यायसंस्था अशा स्तरावर आधारित देशाचा राज्यकारभार चालेल हे निश्चित झाले.
First published on: 26-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President palace rashtrapati bhavan is a pride of the india