अज्ञानातून किंवा निष्काळजीपणातून घरात किंवा कार्यालयात शॉर्टसर्किट होऊन  मोठय़ा प्रमाणात जिवित वा वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढते आहे. यापाश्र्वभूमीवर शॅर्टसर्किट तसेच  लिफ्टचे अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी..
कुठल्याही विद्युत सर्किटमध्ये  (+) ve व (-) ve अशा दोन वायर्स असतात. काही कारणांमुळे त्या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्या की शॉर्टसर्किट होते. त्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊन आग लागते. परिणामी जीवित हानी व मालमत्तेचे नुकसानही होते. हे टाळण्यासाठी व शॉर्टसर्किटपासून सुरक्षित राहण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवून काळजी घेणे आवश्यक आहे.
० विद्युत उपकरणे जसे-  इस्त्री, मिक्सर, फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, टीव्ही इ. ज्या वेळेस वापरत नसू, त्या वेळेस त्यांचे स्विच ऑफ पोझिशनला असावे व शक्यतो प्लग सॉकेटमधून काढून ठेवावा, म्हणजे अनावश्यक करंट उपकरणात वाहण्याचे थांबून धोका टळतो व ऊर्जा बचतही होते.
० रात्री झोपतेवेळी अथवा एरवी टीव्ही बंद करताना फक्त रिमोटने बंद करू नये, तर सप्लाय वायर ज्या प्लगमधून येते त्याचे स्विच बंद करणे जरुरी आहे. अन्यथा रात्रभर टीव्ही संचात विद्युतप्रवाह चालू राहतो, ज्यामुळे धोका उद्भवू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे स्विचेस बंद केल्याने ऊर्जा बचत होऊन १५ ते २० टक्क्यांपर्यंत वीजबिलात कपात होते.
० मोबाइल चार्ज करताना जर फोन वाजला तर त्या प्लगचे स्विच ऑफ करून बोलावे. चार्जिग सुरू असताना बोलणे कटाक्षाने टाळावे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
० घरात, कार्यालयात, उद्योगक्षेत्रात फक्त तीन पिन प्लगचाच वापर करावा. फेज अथवा(+) ve वायरही प्लगच्या उजव्या बाजूस, न्यूट्रल ही डाव्या बाजूस व तिसऱ्या टर्मिनला अर्थवायर जोडणे जरुरी आहे. घर, अपार्टमेंटमध्ये जी अर्थिग केलेली असते, ती वायरही प्लगच्या तिसऱ्या पिनला जोडावी, म्हणजे त्यावर जोडलेल्या उपकरणात काही दोष निर्माण झाल्यास तो या तारेद्वारे जमिनीत जातो व माणूस सुरक्षित राहतो.
० घरी इस्त्री करताना (ती गरम झाल्यानंतर) स्विच ऑफ करून प्लग बाहेर काढून इस्त्री करणे, अन्यथा रिटर्न फॉल्ट करंटने शॉक लागण्याचा धोका असतो.
० वायरिंगमध्ये जॉईंटस टाळावेत, अगदी आवश्यकच असेल तर त्याला उत्तमरीतीने इन्सुलेशन करावे. प्रत्येक उपकरणाच्या तारा अगदी नियमितपणे तपासाव्यात.
० कुठल्याही विद्युतीकरणाचे काम हे मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदाराकडून करवून घेणे, हे सुरक्षित व भारतीय विद्युत नियमाप्रमाणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापक मंडळाकडून हे परवाने (License) दिले जातात.
० अशा अनुज्ञप्तीधारक कंत्राटदारांनी संबंधित ग्राहकांकडे वायरिंग करताना खालील काळजी घ्यावी.
* सर्व मटेरिअल हे ISI चेच असावे.
* ग्राहकाचे कनेक्टेड लोड व संभाव्य उपकरणांना गृहीत धरून जास्त प्लग पॉइंट्स द्यावेत, जेणे करूनी extension board  अथवा  temporary wiring करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल.
* वायरिंग करीत असताना फॉल्स सिलिंगच्या आतील कामात (Interior decorator) जास्त काळजी घेणे जरुरी आहे. तिथे जॉइंटस उघडे राहिल्यास उंदीर, पाल यांचा संपर्क होऊन शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो.
* ग्रामीण भागात असलेल्या शेतीपंपाच्या बाबतीत सर्व वायरिंग ही फ्लेक्झिबल (Flexible) पाइपमध्ये करावी. विहिरींमधील पाणी कमी झाल्यावर पंप खाली बसवला जातो, परंतु त्याची अर्थिग वायर ही वरच (पंप रूममध्ये) लोंबकळत असते, त्यामुळे बरेच प्राणघातक अपघात झाले आहेत.
* शेतातून नेलेल्या विद्युत तारांचे जमिनीपासून भारतीय विद्युत नियम २०१० नुसार अंतर न ठेवल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून जीवित व मालमत्तेची हानी होण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.
अशा वेळी पॉवर कंपनीचे अभियंते व विद्युत कंत्राटदार यांना नियमभंगासाठी जबाबदार धरण्यात येऊन ते शिक्षेस पात्र ठरतात.
० विद्युत तारांवर आकडे (hooks) टाकून विद्युत पुरवठा घेणे हे अत्यंत धोकादायक असून, विद्युत अधिनियम २००३च्या कलम १३५ प्रमाणे दंडनीय गुन्हा आहे. अशा वीजचोरीस कमीत कमी ३ वर्षे कैद व दंड अशी शिक्षा होऊ शकते.
० प्रत्येक हाऊसिंग सोसायटी, कार्पोरेट ऑफिसेस अथवा इतर संस्थांनी तेथील विद्युत संच मांडणीची उभारणी व देखभाल परवानाधारक विद्युत कंत्राटदारास देणे हे विद्युत अधिनियम २००३ व सी.ई.ए. रेग्युलेशन २०१० प्रमाणे बंधनकारक आहे. सदर कंत्राटदारास वार्षिक देखभालीचे (AMC) कंत्राट देऊन अर्थिग टेस्ट नियमितपणे करणे आवश्यक आहे. आजकाल सगळीकडे इंटिरिअर डेकोरेटरला बरेच महत्त्व आले आहे. फॉल्स सिलिंग, इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये फेरबदल इत्यादी कामे करताना विद्युत नियमांच्या माहितीअभावी या मंडळींकडून नॉन आय.एस.आय. मटेरिअल वापरण्यात येऊन कामामध्ये लूज काँटॅक्टस्, निकृष्ट काम इ.मुळे शॉर्टसर्किट होऊन आगी लागल्याची बरीच उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा वास्तूतील फेरबदलांनंतर AMC  कंत्राटदारांकडून अशी विद्युत कामे तपासून घेतल्यास आगीच्या घटनांना आळा बसून त्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांची सुरक्षा वाढेल, हे नि:संशय. इंटिरिअर डेकोरेटरनीसुद्धा एखाद्या वायरमन, सुपरवायजरकडून काम करून घेताना त्याच्याकडे शासनाचा परवाना असेल तरच त्याला काम द्यावे, अन्यथा असे अपघात घडतात.
उद्वाहन (लिफ्ट्स), एस्केलेटर्स (Escalators) याबाबतीत सेफ्टी टिप्स :
आजकाल सर्व हाऊसिंग सोसायटय़ा, कॉर्पोरेट ऑफिसेस, औद्योगिक क्षेत्रात लिफ्टचा सर्रास वापर होत आहे. तसेच वेगवेगळे मॉल्स, रेल्वे स्टेशन्स इत्यादी ठिकाणी Escalators  चा वापरही बऱ्याच प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा सुरक्षितपणे वापर आणि त्याबाबतचे नियम याबाबतीतसुद्धा सर्वसामान्य लोकांना माहिती मिळणे जरुरीचे आहे.
लिफ्टबाबत नियम : उद्वाहनांची उभारणी, वापर व देखभाल The Bombay Lifts Act 1939 Bombay Lift rules1958  नुसार केली जाते. त्यातील महत्त्वाची कलमे खालीलप्रमाणे :
महाराष्ट्रात उद्वाहन निरीक्षक (लिफ्ट इन्स्पेक्टर) हे एक पद असून कुठलीही लिफ्ट उभारताना लिफ्ट रुल्स १९५८ च्या नियम क्र. ४ (२) प्रमाणे त्या लिफ्टला परवाना (License) दिला जातो, जो प्रत्येक लिफ्टच्या आतमध्ये लावणे बंधनकारक आहे.
कुठल्याही सोसायटी, ऑफिस, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी उभारलेल्या लिफ्टच्या देखभालीसाठी नियम क्र. ६ प्रमाणे शासनप्राप्त उद्वाहन कंत्राटदारास वार्षिक देखभालीचे कंत्राट (AMC) देणे अनिवार्य आहे. सदर कंत्राटदाराने महिन्यातून कमीतकमी एकदा तरी लिफ्टचे सव्‍‌र्हिसिंग करून निर्माण झालेले दोष संबंधितांशी चर्चा करून दूर करावेत, असे निर्देश आहेत.
लिफ्टचे प्रकार : ढोबळ मानाने लिफ्टचे दोन प्रकार असतात. एक- मॅन्युअल व दुसरी अ‍ॅटोमॅटिक. परंतु लिफ्टच्या उपयोगितेनुसार खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येते.
१) पॅसेंजर लिफ्ट- या लिफ्टचा उपयोग माणसांना वर-खाली नेण्यासाठी केला जातो.
२) गुड्स लिफ्ट- या लिफ्टचा उपयोग सामानाची ने-आण करण्यासाठी केला जातो.
३) स्ट्रेचर लिफ्ट- हॉस्पिटल्समध्ये पेशंटची ने-आण करण्यासाठी वापरली जाते.
४) कॅप्सूल लिफ्ट- कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉल्स येथे याचा जास्त वापर होतो.
५) फायर लिफ्ट- २४ मीटरच्या वरील इमारतीत या लिफ्टचा वापर होतो.
लिफ्टवरील सेफ्टी डिव्हायसेस (सुरक्षा साधने) खालीलप्रमाणे-
१) दोन फायनल लिमिट स्विचेस (१.५ मी. वर व खाली)
२) Overspeed  गव्हर्नर मशीन रूममध्ये (१४० टक्के स्पीड)
३) Car Gate switch
४) Landing gate Lock (प्रत्येक मजल्याच्या दरवाजास)
५) लिफ्ट पिटमधील स्टॉप स्विच (पुश बटन)
६) कार टॉप स्टॉप स्विच (देखभालीसाठी)
७) Infra red protection (2′ from floor)
८) Toe guard or apron of 750 mm(कार दरवाजाच्या खाली)
९) ओव्हरलोड रिले व ARD हे जानेवारी २०१३ पासून लावणे बंधनकारक केले आहे. लिफ्ट बंद पडल्यास ARD मुळे काही वेळातच जवळच्या मजल्यावर जाऊन थांबते, ज्यामुळे लोक  लिफ्टमध्ये अडकून राहू शकत नाहीत. सुखरूप बाहेर येऊ शकतात.
जर लिफ्ट काचेची असेल तर त्याची जाडीही १० मि.मी. असावी व दोन तास फायर रेटिंग असणे जरुरी आहे. फायर लिफ्ट पिट सुरक्षित ठेवण्यासाठी तेथे वर एक Smoke Vent लावलेला असतो, तो चालू व कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.
लिफ्टला बोलावताना बटन एकदाच दाबावे. सतत बटन दाबत राहिल्याने सर्किटमधून जास्त करंट वाहिल्याने तारा गरम होऊन शॉर्टसर्किटचा धोका संभवतो.
बारा वर्षांखालील मुलांना एकटय़ाने लिफ्टचा प्रवास करण्यास कायद्याने मनाई आहे. (बॉम्बे लिफ्ट कायदा क्र. ३० अनुसार)
लिफ्ट बंद पडल्यास गोंधळून जाऊ नये. शांत राहावे. इंटरकॉम असेल तर त्यावर सिक्युरिटी अथवा संबंधितांना फोन करावा. धोक्याच्यावेळी फायर ब्रिगेडला (१०१) संपर्क केल्यास उत्तम. घाईने उडी मारणे अथवा वर चढण्याचा प्रयत्न करू नये.
जबाबदार नागरीक बनून थोडी काळजी घेतल्यास आपण स्वत:च्या व इतरांच्याही जीवाचा धोका टाळू शकतो. ही सुरुवात आपल्या घरापासूनच करणे इष्ट ठरेल.

Story img Loader