पावसाळयात भिंतींमध्ये पाणी झिरपणे, गच्ची गळणे, रंगांना पोपडे येणे, अशा एक ना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. आपले घर, इमारत या समस्यांपासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावर व पाऊस सुरू होण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी तसेच घराची अंतर्गत सजावट उत्तम राखण्यासाठी काय करावे, याविषयी..
नेमेचि येतो पावसाळा! आणि मग पाऊस यायच्या आधी घरांची काय काय काळजी घ्यावी याचा विचार सुरू होतो. पण खरे म्हणाल तर घरांच्या संदर्भात काही गोष्टी या पाऊस सुरू होण्याआधी करणे आवश्यक असते, तर काही गोष्टी पाऊस सुरू झाल्यावर करणे आवश्यक ठरते.
पाऊस सुरू होण्यापूर्वी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी?
१. पाऊस सुरू होण्याआधी छपरांवरील अथवा गच्चीमधील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या सर्व पाइपलाइन्स व गटारे साफ आहेत ना हे बघावे. म्हणजे पाऊस पडल्यावर गच्चीवर पाणी तुंबणार नाही. बऱ्याच वेळा जमिनीवरील गटारांमध्ये कचरा अथवा झाडांची पाने वगैरे साठून गटारे तुंबू शकतात.
२. पाऊस पडण्याआधी गच्चीच्या पॅरापेट वॉलवर साठलेली धूळ काढून घ्यावी, म्हणजे पावसाच्या पाण्याबरोबर ती धूळ इमारतींच्या भिंतीवर उतरणार नाही व रंग खराब होणार नाही.
पाऊस सुरू झाल्यावर घ्यायची काळजी:
१. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइप्सना बऱ्याच वेळा उन्हाळय़ात तडे गेलेले असतात. पाऊस पडू लागल्यावर गच्चीचे पाणी जेव्हा त्या पाइपमधून गळते तेव्हाच आपल्याला ते कळते. अशा वेळी सर्व पाइप्सची पाहणी करून जे पाइप गळत असतील त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अथवा ते पाइप बदलावेत.
२. आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच्या भिंतींना बऱ्याच वेळा तडे पडलेले आढळतात. बरेच लोक पावसाळय़ाच्या आधी ते तडे बुजवण्याचा प्रयत्न करतात व कित्येक वेळा ते तडे (Cracks) तेथे थोडे खोदून मोठे करतात व नंतर बुजवतात. पण खरे म्हणाल तर असे करू नये. भिंतीवरच्या पडलेल्या सर्वच तडय़ांमधून पाणी झिरपेलच असे नाही. उलट कित्येक वेळा ते तडे थोडे रुंद करण्याच्या नादात तिथूनच ओल येण्याची शक्यता असते.
म्हणून फक्त पहिला पाऊस झाल्यावर नाहीतर एक महिन्याभराचा पाऊस झाल्यावर मग भिंतींना कुठे कुठे ओल येते आहे ते पाहावे, खुणा करून ठेवाव्यात व मग थोडी उघडीप मिळाली, की त्या गळण्याचा व भिंतीच्या बाहेरील बाजूंच्या तडय़ांचा एकत्रित विचार करून तेवढेच तडे बुजवावेत. शक्यतो मोठे करू नयेत. तर वॉटर प्रुफिंगचे कंपाऊंड व पांढरे सिमेंट यांची एकत्रित पेस्ट करून ती पेस्ट जोर देऊन ते तडे भरावेत व नंतर त्यावर हलका स्पंज मारावा व मग पावसामुळे त्याचे क्युरिंग होईलच, पण नाही झाले तर त्यावर थोडे पाणी मारावे.
प्रत्येक केमिकलचा उपयोग त्याच्या पॅकेटवरील दिलेल्या सूचनांचा विचार करूनच करावा.
३. जी गोष्ट भिंतींमधल्या ओलीची तीच गोष्ट छतातून गळणाऱ्या पाण्याची. पाऊस चालू झाल्यावर जर छत गळत असेल तर त्याचीही दुरुस्ती पावसाची थोडी जरी उघडीप मिळाली तर लगेच करावी.
काही लोक वर्षांनुवर्षे अशा गळतीचे दुरुस्ती काम करत नाहीत. अशा वेळी या गळतीमुळे स्लॅबच्या आतील सळया गंजून खराब होण्याची शक्यता असते व स्लॅबलाही धोका पोहोचू शकतो.
म्हणून स्लॅबची गळती त्वरित थांबवण्याची उपाययोजना करावी. बऱ्याच वेळा लोकांना वाटते, की छत गळायला लागले तर छतावरील वॉटर प्रुफिंगचे सर्व काम पुन्हा करावे. पण तसे नसते. जेथे गळत असते त्याच्या वरच्या भागावर तडे किती आहेत ते पाहावे व वरील वॉटर प्रुफिंग बोटाने वाजवून पाहावे व जिथे जिथे डब डब असा आवाज येईल तेवढाच भाग हळुवार रीतीने काढून घ्यावा. त्यावर थोडय़ा केमिकलचा एक कोट मारावा व नंतर वरून थोडी बारीक वाळू पसरून मग वरून पुन्हा सिमेंट व वाळूमिश्रित गिलावा करावा. त्या गिलाव्यावर व आसपास थोडे दिवस पाणी साठवून ठेवावे व क्युरिंग पूर्ण झाल्यावर त्यावरून ब्रशने पुन्हा केमिकलचा एक हात मारावा व पुन्हा पाणी साठवावे व गळत नाही ना हे तपासून बघावे.
४. अजून एक गोष्ट पाऊस सुरू झाल्यावर जरूर तपासून बघावी- जर इमारतीला बेसमेंट असेल तर तेथे अथवा लिफ्टच्या डक्टमध्ये कुठे पाणी जमा होत नाही ना हे बघावे.
लिफ्टच्या डक्टमध्ये पाणी जमा होत असेल तर त्वरित लिफ्ट वापरणे बंद करावे व त्यातील पाणी पूर्ण काढून व दुरुस्ती काम करून घ्यावे व नंतरच्या पावसात पुन्हा पाणी जमा होत नाही ना हे पाहून मगच लिफ्ट वापरण्यास सुरुवात करावी.
५. जेथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केले असेल तेथे हे जरूर बघावे की पावसाचे पडलेले पाणी हे सोसायटीतल्या बोअरला रिचार्ज करत आहे ना?
६. सोसायटीच्या आवारातील पावसाचे पाणी वाहताना त्याच सोसायटीच्या जमिनीखालील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जात नाही ना, हेही तपासून बघावे.
७. इमारतीला जर रंगकाम करावयाचे असेल तर ते पाऊस सुरू होऊन दोन महिने झाले, पावसाचा पहिला जोर ओसरला की करावे. म्हणजे नंतर जो थोडा पाऊस पडेल त्याचा उपयोग सिमेंट पेंट मारला असेल तर त्याच्या क्युरिंगसाठी होऊ शकतो व रंगकामानंतर कुठे ओल नाही ना हेही तपासून बघता येते.
८. पाऊस पडत असताना पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपचे तोंड काहीतरी कचरा पडून चोक होत नाही ना, हेही बघावे.
९. बऱ्याच वेळा पावसाळय़ात लाकडी दरवाजे फुगतात. जर त्या दरवाजाची फ्रेमही लाकडी असेल तर शक्यतो दरवाजाऐवजी फ्रेमला रंधा मारावा व दरवाजा लागत आहे ना हे पाहावे.
१०. तसेच लोखंडी ग्रिल अथवा रेलिंग पावसामुळे कुठे गंजले आहे का हेही तपासून बघावे व कुठे रंग निघाला असेल तर लगेच ऑइल पेंटने रंगकाम करून घ्यावे.
तुमच्या इमारतीची, घराची एवढी दक्षता घेतली तरी तुमचा पावसाळा सुखकारक जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा